लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१८)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१८)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                ट्विस्ट

सारा बाहेर येऊन सरांची वाट बघत होती. जंगलात असल्याने तिथे लवकरच अंधार पडला होता आणि संध्याकाळचे सात, साडे सात वाजले असले तरीही रात्रीचे नऊ वाजून गेलेत असं वाटत होतं. सारा तिच्या रुमच्या पायरीवर बसूनच सगळी जागा न्याहाळत होती. एवढ्यात तिला सर आल्याची चाहूल लागली आणि ती उठून उभी राहिली.

"सारा आर यू रेडी?" त्यांनी विचारलं.

"येस सर बट फॉर व्हॉट?" साराने विचारलं.

"लेपर्ड कब शिकार करने निकलते है?" त्यांनी विचारलं.

"डे अँड नाईट बोथ टाईम. बट मोस्टली नाईट. इन रेअर केसेस डे टाईम." सारा म्हणाली.

त्याबरोबर सरांनी तिच्याकडे फक्त बघितलं आणि साराला जे समजायचं ते समजलं. सर तिची आत्ताही परीक्षा घेणार आहेत हे लक्षात आल्यावर तिने पटकन जाऊन तिचा नाईट व्हिजनचा कॅमेरा आणला आणि तिची शूटसाठी रेडी करून ठेवलेली सॅकसुद्धा बाहेर आणली.

"आय एम रेडी सर." ती म्हणाली.

"ग्रेट! लेट्स गो." सर म्हणाले.

सारा, कॅरलॉन सर आणि तिथले एक वरिष्ठ वन अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत गेले. ओपन जीप मधून ते जंगलाच्या दिशेने जात होते. अचानकच सरांनी साराची परीक्षा घ्यायचं ठरवल्याने ती आधी थोडी बावरली होती, पण नंतर स्वतःलाच समजावून पूर्ण उत्साहात ती होती.

"सारा, ऍक्च्युली तुम्हें सडनली एेसे टेस्ट देके आय वॉन्ट टू सरप्राइज यू, बट तुमनेही मुझे सरप्राइज न होके सरप्राइज कर दिया |" सर म्हणाले.

"सर, अब ये फील्ड में काम करना है तो हमेशा रेडी होना चाहिए ना?" सारा सहज बोलून गेली आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं.

आधी ती जरा गोंधळून गेली असली; तरीही तिने जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डवेळी सरांच्या आर्टिकलमधून अभ्यास केला होता तेव्हा तिने हेही अभ्यासलं होतं की, आपल्याला प्रत्येक क्षणाला तयार राहायचं आहे. दिवस, रात्र, ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता फक्त फोकस हा कामावर करायचा आहे.

'सर मला वाटलं होतंच की आज तुम्ही अचानक असा काहीतरी ट्विस्ट टाकाल. आपण ज्याअर्थी बिबट्याचं निरीक्षण करायला आणि त्याचे फोटो, व्हिडिओ काढायला आलो आहोत म्हणजे रात्रीचं काम लागणार याची मला थोडी कुणकुण होतीच.' सारा मनातच म्हणाली.

थोडावेळ जंगल न्याहाळण्यातच गेला. ते सगळे आता त्यांना हव्या असलेल्या स्पॉटवर पोहोचले होते. रातकिड्यांचा आवाज आणि मध्येच एखाद्या जंगली श्वापदाचा आवाज तिथली शांतता भंग करत होता. एव्हाना आता डोळ्यांना कमी प्रकाशाची सवय झाली होती.

"सारा! स्वीच ऑफ युअर मोबाईल अँड पुट इट ऑन युअर बॅग." सर म्हणाले.

साराने लगेचच मोबाईल स्विच ऑफ करून बॅगेत ठेवला आणि ती तिचा कॅमेरा सेट करू लागली.

"सारा यू हॅव टू स्टे हिअर फॉर डे आफ्टर टूमारो अल्सो." सर म्हणाले आणि सारा काहीतरी बोलायला जाणार तर तिला हातानेच खूण करून थांबवून ते बोलू लागले; "लिसन, तूम्हें ये बात घरपें कॉल करके नहीं बतानी है | इन धिस फील्ड काम एनी टाईम एक्सटेंड हो सकता है |" त्यांनी तिला सगळं सविस्तर सांगितलं.

साराकडे दुसरा काही पर्याय सुद्धा नव्हता म्हणून तिने फक्त "ओके" म्हणलं.

'आता मी काय करू? हा विचार मी आधीच करायला हवा होता. घरी सांगताना आधीच एक दोन दिवस जास्तीचे सांगितले असते तरी चाललं असतं. यावरून तर आजीची बोलणी खावी लागणार आहेतच.' सारा मनातच विचार करत होती.

"साराऽ ऑल सेट?" सरांनी विचारलं तशी सारा भानावर आली.

स्वतःचा कॅमेरा स्टँडला लावत तिने "हो" म्हणून सांगितलं. आता काहीही करून तिला कामावर लक्ष केंद्रित करावं लागणार होतंच.

'जे होईल ते बघू. आत्ता तरी कामावर फोकस केला पाहिजे. उद्याच्या काळजीत आजची परीक्षा हातची जाऊ द्यायची नाहीये.' तिने स्वतःलाच समजावलं आणि कामात मग्न झाली.

सरांनी ज्या काही सूचना तिला केल्या होत्या त्यानुसार सगळा सेटअप लावून बिबट्या कुठे दिसतोय? हे ती बघत होती. आधीच प्रवास आणि त्यात सरांनी एकावर एक टाकलेल्या ट्विस्टमुळे ती दमली होती, पण आता तिला अश्या धावपळीची सवय करून घेणं भाग होतं. एव्हाना रात्रीचे साडे आठ वाजून गेले होते. साराने थोडा डब्बा खाल्ला असला तरीही तिला भूक लागली होती आणि त्यामुळेच डोळ्यावर झापड येत होती. एवढ्यात एका झाडाच्या फांदीची हालचाल जाणवली आणि सगळ्यांचच लक्ष तिथे वेधलं गेलं.

"सारा बी रेडी." सरांनी तिला सावध केलं.

"येस सर." सारा म्हणाली.

आता तिची झोप, थकवा आणि भूक कुठच्या कुठे पळून गेली होती. ती ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण आला होता. सारा तिच्या नाईट व्हिजनच्या कॅमेरा मधून बघत होती. कॅरलॉन सर आणि वन अधिकाऱ्यांकडे सुद्धा तश्या दुर्बिणी होत्या आणि तेही त्या बिबट्यावर लक्ष ठेवून होते. संपूर्ण काळोख्या रात्री आता फक्त त्या बिबट्याच्या गुर्गुरण्याचा आवाज येत होता. सारा तिच्या कॅमेरा सोबत तयारच होती. एक प्रौढ बिबट्या झाडावरून खाली उतरला आणि एकदम ऐकटीत चालत होता. आखुड पाय, लांब शरीर, मोठी कवटी, गोल डोके, चपटे नाक, सडपातळ आणि लांब शेपूट, पिवळ्या रंगावर असलेले काळे पुंजक्यांमधले ठिपके आणि तीक्ष्ण अणकुचीदार नखे त्याला त्या अंधाऱ्या रात्री अजूनच भयानक दर्शवत होती.

"सारा! ये लेपर्ड का वजन क्या होगा एैसा तुम्हें लगता है?" कॅरलॉन सरांनी विचारलं.

सारा त्या बिबट्याचं नीट निरीक्षण करू लागली. 'त्याच्या शरीराची लांबी साधारण दोनशे पन्नास ते दोनशे साठ सेंटिमीटर असावी, खांद्याजवळची उंची साधारण ऐंशी सेंटिमीटर आणि त्याला बघून त्याचं वजन साधारण साठ ते पासष्ट किलो असेल असं वाटतंय.' सारा मनातच म्हणाली आणि नंतर हेच तिने सरांना सांगितलं.

एवढं व्यवस्थित निरीक्षण आणि चोख उत्तर ऐकून सर खुश झाले होते पण तसं काहीही चेहऱ्यावर न दाखवता आणि काहीही न बोलता ते बिबट्या कुठे जातोय? आणि काय करतोय? हे बघू लागले. दबक्या पावलांनी जाऊन त्याने पटकन समोर असलेल्या एका रान मेंढीला त्याची शिकार बनवले होते. कळपापासून दूर राहिलेली ती मेंढी जरा रात्रीच्यावेळी विसव्याला थांबली असावी आणि काळाने बिबट्याच्या रूपात तिच्यावर हल्ला केला होता. बिबट्याने तिथे शिकार केल्यावर काही तरसं तिथे गोळा झाली होती पण बिबट्याने त्याच्या गुर्गुरण्याने स्वतःच्या शिकारीचं रक्षण केलं. साराने तर तिच्या कॅमेऱ्यात या क्षणाला कैद केलं पण तिला मनातून त्या मेंढी विषयी वाईट वाटत होतं.

"सारा, कॅन यू कॅच धिस फोटो?" सरांनी तिला विचारलं.

त्यांच्या आवाजाने ती भानावर आली आणि "हो" म्हणाली.

'सारा असं चालणार नाही. हेच आता आपलं काम आहे. निसर्गाने जी अन्नसाखळी बनवली आहे त्यात जंगली प्राणी हे इतर प्राण्यांना खाणारच. जास्त विचार करू नकोस.' तिने स्वतःलाच समजावलं आणि ती पुन्हा कामावर लक्ष देऊ लागली.

थोडं अंतर पुढे गेल्यावर तो बिबट्या शिकार घेऊनच पुन्हा एका झाडावर चढला. त्याचा झाडावर चढतानाचा एक छान फोटो साराने क्लिक केला. ते झाड जास्त घनदाट नसल्याने साराला त्या बिबट्याचे शिकार खातानाचे सुद्धा काही फोटो मिळाले. यात कधी मध्य रात्र झाली हे साराला समजलं सुद्धा नाही. एवढ्यात साराला बिबट्याची पिल्लं दिसली. इतकावेळ त्या एकाच बिबट्यावर लक्ष ठेवल्याने कदाचित तिच्याकडून ती नजर चुकीने राहिली असतील हे तिच्या लक्षात आलं. तिने फक्त सरांकडे एकदा बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांनी त्या पिल्लांना आधीच बघितलं होतं हे तिला समजलं.

"सॉरी सर. नेक्स्ट टाईम ऐसी गलती नहीं होगी |" तिने तिची चूक प्रामाणिकपणे कबुल केली.

"हम्म. दॅट्स बेटर. अभी तुमने ये मिस्टेक ऍक्सेप्ट नहीं की होती तो..." सर बोलता बोलता थांबले आणि साराला लक्षात आलं आपले मार्क्स कापले गेले असते आणि कदाचित आपण सरांसोबत काम करण्याची संधी गमावली असती.

'खरंतर माझी ही खूप मोठी चूक झाली. मला आता झोप आणि भूक यावर आवर घालायला हवा. एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफरने सर्वत्र लक्ष ठेवलं पाहिजे पण मी तसं करू शकले नाही. ठीक आहे! आता मी याची काळजी नक्की घेईन. चुका होणार हे मान्य आहे फक्त अश्या बारीसारीक चुका करून मी माझे गुण कमी करून नाही घेऊ शकत. आधीच सरांना भारतीय मुलीला मार्गदर्शन करायचे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटतंय त्यात मी असं वागून त्यांच्या या मताला खतपाणी घालायला नकोय.' तिने मनातच विचार केला.

क्रमशः.....
*****************************
सरांनी अचानक टाकलेल्या अश्या ट्विस्टमुळे सारा घरी काय उत्तर देईल? यामुळे तिच्या आजीला बोलण्याची अजून एक संधीच मिळणार आहे. तिच्या आईची यावर काय प्रतिक्रिया असेल? सरांच्या परीक्षेत सारा पास होईल? पाहूया पुढच्या भागात. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all