लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१६)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                             मानसिकता

समीर साराला सोडून आला होता आणि पाणी पिऊन त्याने बोलायला सुरुवात केली; "हो आजोबा तिला मी एअरपोर्टवर सोडलं आहे आणि तिचे सरही होते तिथे. साधारण अडीच तास लागतील तिला पोहोचायला. मग सगळी चेकिंग वैगरे होऊन ती तिथल्या एअरपोर्टवरून बाहेर पडेल." समीरने सगळं अगदी नीट सांगितलं.

"बरं. तिचे सर काही म्हणाले का? म्हणजे त्यांना तिथे किती दिवस लागणार आहेत किंवा काय?" आजोबांनी विचारलं.

"तसं तर काही म्हणाले नाहीत. बघूया! साराकडून कळेलच." समीर म्हणाला.

"हम्म. जा तू फ्रेश होऊन ये मग थोड्यावेळाने जेवायला बसू." आजोबा म्हणाले.

"हो. आई आणि आजी कुठे आहेत? दिसत नाहीत." समीरने विचारलं.

"आजी आहे खोलीत आणि आई आतच आहे. तू आधी तुझं आवरून ये." आजोबा म्हणाले.

समीर लगेचच फ्रेश व्हायला गेला. साराला सोडून येईपर्यंत साधारण बारा वाजले होतेच. त्यात आजी नाराज होती म्हणजे तिची समजूत काढून तिला जेवायला लावण्यात वेळ जाणार होता. समीरला बाहेरून आल्या आल्या हे सगळं सांगायला नको, म्हणून आजोबांनी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. त्याचं आवरून तो बाहेर आला आणि त्याने आईलाही बोलावून घेतलं आणि आजीला बोलवत होता तरी ती आली नाही म्हणून तो बाहेर हॉलमध्ये आला.

"आजोबा! आजी येत का नाहीये? जेवायचं नाही म्हणतेय ती. बरं वाटत नाहीये का तिला?" त्याने काळजीने विचारलं.

"नाही रे. तिला काहीही झालं नाहीये. सारा अचानक अशी हजारीबागला गेली ना म्हणून जरा नाराज आहे." त्याच्या आजोबांनी सांगितलं.

"पण सकाळी तर ती..." समीर बोलत होता.

"हो, सकाळी ती जरा तरी नीट वागली पण नंतर जेव्हा ती देवळात गेली तेव्हा..." असं म्हणून आजोबांनी त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगितला.

"अच्छा, असं आहे तर? थांबा मी बोलतो." समीर म्हणाला आणि तो आजीच्या खोलीत गेला.

त्याची आजी डोक्याला बाम लावून, डोकं बांधून बेडवर मागे डोकं टेकून शांतपणे पडली होती.

"आजी." समीरने हळूच तिला आवाज दिला.

"समीर मला जरा आराम करू दे रे. मी नाही येणार जेवायला. नंतर बघू बरं वाटलं तर खाईन." ती म्हणाली.

"आजी अगं आधी ऐकून तरी घे." असं म्हणत समीर तिच्या बाजूला बसला आणि तिचं डोकं चेपून देऊ लागला.

त्याच्या डोकं चेपून देण्याने आजीला बरं वाटत होतं आणि ती शांत बसली होती.

"आजी! मला आजोबांनी जे काही घडलं ते सांगितलं. आता तूच बघ तुला बोलणाऱ्या त्या बाकीच्या आज्या; त्या ठणठणीत आहेत, त्यांची त्यांची कामं करत असतील आणि तू इथे स्वतःला त्रास करून घेत आहेस." समीर म्हणाला.

"समीर तुला आत्ता नाही कळणार. अरे या वयात आता नाही सहन होत कोणी आपल्याला चार गोष्टी सुनावल्या तर. अरे आता आमची नवीन गोष्टी पटकन आत्मसात करायची शक्ती संपली रे. या वयात सगळं कसं; जसं सुरू आहे तसंच सुरू रहावं, आयुष्याची घडी कायम बसलेली राहावी असं वाटत असतं, पण सारामुळे फक्त तिच्या नाही; तर आपल्याही आयुष्यात खूप बदल होणार ते सहजरीत्या पेलण्याची ताकद नाही राहिली." आजी म्हणाली.

"मला पटतंय आजी तुझं. एका वयानंतर आपल्याला आपल्याच कंफर्ट झोनमध्ये राहायला आवडतं, पण साराचं वय मात्र तो झोन बाजूला सारून नवीन आव्हाने स्वीकारण्याचे आहे ना? अगं जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी जाणार होतो तेव्हाही तुला बऱ्याच लोकांनी दुसरे पर्याय सुचवले होते की नाही? पण तेव्हा जशी तू ठाम माझ्या बाजूने होतीस तशीच साराच्या बाजूने उभी रहा ना." समीरने तिला समजावलं.

"कशी राहू? अरे तुझी गोष्ट वेगळी होती. शिवाय तोवर बऱ्याच हॉटेल मध्ये पुरुष आचारी असतात हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलं होतं, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. साराच्या बाबतीत तर हे सगळं नवीनच आहे शिवाय सारा एक मुलगी आहे रे. तुला कळत नाहीये उद्या सारावर कोणीही कसलेही बिन बुडाचे आरोप जरी केले तरीही तिच्या पुढच्या आयुष्यासाठी ते तिला कठीण जाईल." त्याची आजी म्हणाली.

"अगं आजी जर ते आरोप बिन बूडाचे असतील तर त्याचा तिला काहीही त्रास होणार नाही. जे काही असेल ते तेव्हाचं तेव्हा बघता येईल." समीर म्हणाला.

"समीर अरे तुला नाही कळणार. जाऊदे! तुम्ही सगळे जेवून घ्या आज मी लंघन करते." आजी म्हणाली.

"ठीक आहे मग. तू नाही जेवणार तर कोणीही काहीच नाही खाणार आणि तुला माहित आहे आईला गोळी घ्यायची असते." समीर म्हणाला.

कशीबशी आजीची मनधरणी करून तो आजीला जेवायला घेऊन आला.

"आईऽ अजून कितीवेळ तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल?" विशाखा तिला शांत पाहून म्हणाली.

"मला काहीतरी सांगायचंय." आजी म्हणाली.

"काय?" आजोबांनी आश्चर्याने विचारलं.

"सारा आत्ता ज्या परीक्षेला गेली आहे त्यात जर ती पास झाली नाही तर तिला दुसरं काम करायला सांगायचं." आजी म्हणाली.

"आजी पण.." समीर बोलत होता पण त्याला मध्येच तोडत त्याची आई बोलू लागली; "ठीक आहे आई मान्य. तसंही मलाही साराची खूप काळजी वाटतेय."

दोघीही सासवा सूना एकाच टीममध्ये आल्या होत्या आणि आत्ता कोणालाही काहीही बोलण्यात अर्थ नव्हता म्हणून समीर आणि आजोबा गप्पच बसले. कोणीही काहीही न बोलता कसेबसे चार घास पोटात ढकलले. सगळी आवरा आवर आणि बाकी कामं होईपर्यंत साधारण दोन वाजून गेले होते.

"आई, थोड्यावेळात साराचा फोन येईल. तसा आहे अजून थोडा अवकाश तोवर तू जाऊन पड." समीर म्हणाला.

आजी, आजोबा आणि विशाखा आराम करायला आत गेले आणि समीर टीव्ही लावून बसला.

'साराला हे सगळं कळेल तेव्हा काय होईल? आत्ता तरी तिला काहीही सांगण्यात अर्थ नाही नाहीतर तिचा फोकस हलेल. एकतर ती आधीच माझ्या वागण्याने दुखावली गेली आहे त्यात मला अजून भर घालायची नाही. जरी नंतर मी तिला सपोर्ट केला असला तरीही आधी तिची तीच लढली आहे याची सल तिच्या मनातून गेलेली नसणार.' समीर त्याच्याच तंद्रीत टीव्ही समोर बसला होता.

समोर टीव्ही सुरू असला तरीही त्याचं त्यात लक्षच नव्हतं. 'काल आई, बाबा, आजोबांना समजावावं लागलं होतं. आज आजीला, उद्या अजून कोणाला असं कुठवर सगळ्यांना समजावत राहणार?' असे विचार त्याच्या मनात येत होते.

कोणी काही नवीन करू पाहत असेल आणि ते समाजाच्या साच्यात बसत नसेल तर लगेचच सगळे त्या व्यक्तीला वर्षानुवर्षे चालत आलेल्या एकाच साच्यात बसवायला बघत असतात याचीच जाणीव साराला आणि समीरला सुद्धा होत होती. सतत विचार करून करून त्यालाही नको नको झालं होतं. समोर सुरू असलेला टीव्ही बंद करून तो डोळे मिटून विचार करत बसला होता. स्वतःला शांत करण्याचा आणि डोक्यात कसलेही विचार येऊ न देण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याच्या या तंद्रीतच त्याचा बसल्या बसल्या डोळा लागला आणि कधी चार वाजले हेही समजलं नाही आणि फोनच्या रिंग मुळेच त्याची झोप मोडली.

'साराचा फोन. पोहोचली वाटतं.' समीर फोन बघून मनातच म्हणाला.

"आईऽ साराचा फोन आलाय, ये लवकर." समीरने आईला हाक मारली आणि फोन उचलला.

लगेचच त्याची आई, आजी आणि आजोबा बाहेर आले.

"सारा कसा झाला प्रवास? तू ठीक आहेस ना?" विशाखाने विचारलं.

"हो आई मला काय होणार आहे? अगं मस्त फ्लाईटने प्रवास झालाय त्यामुळे काही त्रास नाही." सारा म्हणाली.

"सारा! तुझी परीक्षा कधी सुरू होईल?" आजोबांनी विचारलं.

"आजोबा ते तर आता कळेल नंतर. आत्ता आम्ही इथे पोहोचलो आहोत. समजलं की पुन्हा फोन करते." सारा म्हणाली.

"ठीक आहे. काळजी घे गं." विशाखा म्हणाली.

"हो आई. बरं! आजी नाहीये का तिथे? ती काहीच बोलली नाही." साराने विचारलं.

"आहे इथेच. कशाला हवी आहे तुला आजी? तू तर..." आजी बोलत होती तिला मध्येच तोडत समीर बोलू लागला; "अगं सारा आजीला असं म्हणायचं आहे की, आता तू तिथे गेली आहेस तर घरची सारखी आठवण नको काढू. बरं आपण नंतर निवांत बोलू." समीर म्हणाला.

साराने सुद्धा लगेचच "बाय" म्हणून फोन ठेवला.

क्रमशः.....
****************************
सारा तर हजारीबागला पोहोचली, पण तिची परीक्षा कशी होईल? तिला तिच्या सरांकडून पुढचं मार्गदर्शन मिळेल? साराची आजी या सगळ्याला कशी तयार होईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरु नका.

🎭 Series Post

View all