लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१५)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१५)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                               नाराजी

विशाखाने अगदी बाबांना आवडतो तसा मसाला चहा केला आणि ती त्यांना रूममध्ये द्यायला गेली. ते चहा घेत होते तोवर साराच्या आजीचा आवाज आला.

"झालं! आता हा कितवा चहा? म्हणून बडबड सुरू होईल." आजोबा म्हणाले आणि त्यांनी पटकन उरलेला चहा पिऊन दोघं बाहेर गेले.

"काय गं कांता? काय झालंय? एवढी बडबड करत का आलीस?" त्यांनी विचारलं.

"तुम्हाला फक्त माझीच बडबड ऐकू येते. जरा बाहेर जाऊन बघा, लोकं साराबद्दल काय बोलतायत ते. कधी नव्हे ते त्या परब बाईंनी मला चार गोष्टी सुनावल्या आहेत." साराची आजी नाराज होत म्हणाली.

"काय झालंय आई नक्की? कोण काय म्हणालं तुम्हाला?" विशाखाने विचारलं.

"अगं काय झालं नाही ते विचार. आत्ता देवळात गेले होते तर तिथे ती चोंबडी परब होतीच. माझीच वाट बघत बसली होती तिथे." साराची आजी म्हणाली.

"कांता! अगं असं कोड्यात नको बोलू. नीट सांग काय झालं? देवळातून आलीस ना आणि अशी चिडचिड काय करतेस?" साराचे आजोबा म्हणाले.

"अहो, देवळात मनःशांती मिळावी म्हणूनच गेलेले, पण या सारामुळे आता तीही मिळणार नाहीये." साराची आजी जरा नाराजीतच म्हणाली.

"नीट सांग कांता काय ते. सारखं त्या पोरीला मध्ये आणू नकोस." साराचे आजोबा म्हणाले.

"अहो, तिच्यामुळेच तर झालं ना सगळं. तिने तो कसला रेकॉर्ड केला त्याची बातमी या सगळ्यांपर्यंत पोहोचली. आधी सगळ्यांनी कौतुक केलं तिचं मग आल्या सगळ्या मूळ पदावर. म्हणे काय, तुम्ही तुमच्या नातीला हे काम करूच कसं देताय? आमच्या घरात चाललं नसतं असं. काय ते नसते उद्योग! उगाचच नको त्या निर्जन ठिकाणी फिरतीवर राहायचं आणि स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा. अश्याने तुमच्याच घराची प्रतिष्ठा वेशीवर टांगली जाते की नाही बघा. बरं त्या पोरीला एक कळत नाही, पण तुम्ही सगळे मोठे आहात ना? का अडवलं नाही तिला? असं म्हणत होती ती परबिण." साराच्या आजीने सगळं सांगितलं.

हे सगळं सांगताना तिला किती दुःख झालं आहे हे तिच्या डोळ्यात दिसत होतं. साराबद्दल असं काही ऐकून घेणं तिला आवडलंच नव्हतं. अर्थात कोणालाही असं आपल्या माणसाबद्दल ऐकून घेणं आवडणाऱ्यातलं नव्हतं, पण साराची आजी आधीच या सगळ्याला विरोध करत असताना साराने तिच्याच मनाचं खरं केलं आणि आता हे असं तिच्या विरोधात ऐकून घ्यावं लागतंय म्हणून तिच्या आजीला अजूनच त्रास होत होता.

"तरीही मी सांगत होते, साराला अडवा. जगात काय फक्त हेच एक क्षेत्र शिल्लक राहिलं आहे का काम करायला? पण नाही! माझं कोणी ऐकेल तर शप्पत. बरं आणि हिला फोटो काढायची आवड आहे तर जंगली प्राण्यांचेच का काढायचे आहेत? ते विराजने काय इव्हेंट काय सांगितलं होतं ते काम करायला काय होत होतं?" साराची आजी तणतणत बोलत होती.

"आई, तुम्ही आधी शांत व्हा. बसा इथे आणि पाणी घ्या." विशाखा तिच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाली.

"तुझ्या पोरीने तोंडचं पाणी पळवलं आहे आणि तू कसलं पाणी पाजतेस?" साराची आजी म्हणाली.

"कांता! काय सुरू आहे गं तुझं? पाणी घे आधी आपण बोलू सविस्तर." साराच्या आजोबांनी तिला समजावलं.

साराच्या आजीने पाणी घेतलं आणि थोडावेळ ती शांत होण्यात गेला. विशाखा आणि साराचे आजोबा तिच्या बाजूला बसले.

"कांता, आता माझं शांतपणे ऐकून घे." तिचे आजोबा म्हणाले.

आजी काहीतरी बोलायला जाणार तर ते पुन्हा म्हणाले; "ऐकून घे आधी." तशी ती शांत बसली.

"कांता, बघ आपणच आपल्या नातीला समजून घेतलं नाही आणि लोकांच्या बोलण्याने एवढा त्रास करून घेतला तर लोक अजूनच बोलणार. यापेक्षा काहीही न बोलता किंवा आपण कसा सारावर विश्वास ठेवला आहे हे त्यांना तू पटवून दिलंस ना की कोणीही तुझ्या वाटेला जाणार नाही." तिचे आजोबा म्हणाले.

"तुम्हाला काय वाटतंय? मी काही बोलले नसेन? बोलले ना सगळ्यांना. खूप बोलले, पण मी कशी चुकीची आहे आणि साराने कसे घरचे संस्कार मोडीत काढून, सगळ्या रितीभाती डावलून ती या कामासाठी गेली हे ऐकवून दाखवलं." साराची आजी म्हणाली.

"हो ना? हेच जर आपण साराला विरोध केला असता ना, तर हीच लोकं तिच्या बाजूने बोलली असती. आजचं जग किती बदललं आहे, नवीन नवीन संधी ज्या आजच्या तरुणाईला मिळतायत याबद्दल तुला सुनावलं असतं सगळ्यांनी. कांता अगं लोकं दोन्ही बाजूंनी बोलतात. आपण काहीही केलं तरीही त्यात कुठे चुका आहेत? हेच शोधतात." आजोबांनी तिच्या आजीला समजावलं.

"आई आणि तुम्हीच विचार करा ना, आपल्या साराने जर वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे तर ती काय काय करू शकते? अहो, आपला तर आपल्या सारावर आणि आपल्या संस्कारांवर विश्वास आहे ना? मग बघा सारा आपल्या देशमुख घराण्याचं नाव कसं उंचावते ते." विशाखा म्हणाली.

एवढ्यात तिचा मोबाईल वाजला. "सत्य आहे." साराचे आजोबा म्हणाले.

"बाबा समीरचा फोन आहे." विशाखा म्हणाली आणि तिने फोन उचलला.

त्यांचं फोनवर जुजबी बोलणं झालं आणि तिने फोन ठेवला.

"समीरने साराला एअरपोर्टवर सोडलं आहे. तो घरी यायलाच निघाला आहे." विशाखाने सांगितलं.

"बरं. चला आता साराची परीक्षा एकदा चांगली होऊदे." आजोबा म्हणाले.

"जे सारासाठी चांगलं असेल तेच होऊदे. मग ती या परीक्षेत नापास झाली तरीही चालेल." तिची आजी म्हणाली.

"अजूनही तुझं सुरूच आहे का? अगं कितीवेळ अशी नाराज राहणार आहेस?" तिचे आजोबा म्हणाले.

"जाऊदे! मला काही बोलायचं नाहीच मुळी. मी आहे खोलीत. विशाखा तेवढं पूजेचं तबक देव्हाऱ्यात ठेव." साराची आजी म्हणाली आणि ती खोलीत गेली.

"बाबाऽ आई खूपच नाराज आहेत ओ. मलाही साराने मनापासून हे काम करावं असं वाटत नाहीये अजूनही, पण तिच्या हट्टापुढे तर आता मी हात टेकले आहेत. आईंचं सगळंच बोलणं चुकीचं आहे असं नाही. त्यांची काळजीही योग्य आहे." विशाखा म्हणाली.

"विशाखा आता तू तिची री ओढू नकोस. एवढं दडपण घेण्याची काहीही गरज नाहीये. अगं सारा आता अगदी लहान नाहीये. हेच वय आहे तिचं धडपड करण्याचं. आपण आहोत ना तिला सावरायला? मग झालं तर. साराला काही निर्णय तिचे तिला घेऊ देऊ. जे काही होईल ते तिच्या स्वतःच्या निर्णयामुळे होईल आणि म्हणूनच ती यातून जास्त शिकेल. तू नको एवढा त्रास करून घेऊ." साराच्या आजोबांनी तिच्या आईला समजावलं.

"माझं डोकं बधीर झालंय बाबा. समीरही आधी साराला यासाठी नाही म्हणत होता, विराज पण तयार नव्हता. अचानक या मुलीने लिमका बुक्समध्ये रेकॉर्ड काय केला आणि सगळेच तिला हळूहळू का होईना पाठिंबा द्यायला लागले, पण माझी मनस्थिती मात्र अजूनही दोलायमान आहे. कधी कधी तुमचं सगळ्यांचं म्हणणं पटतं तर कधी कधी आईंचं. एक आई म्हणून साराची खूप काळजी वाटते ओ मला." विशाखाने तिच्या मनातलं बोलून दाखवलं.

"बघ विशाखा, शेवटी जे व्हायचं असतं तेच घडतं. आपल्या साराच्या नशिबात जर हेच काम लिहिलं असेल तर हेच घडणार, आपण काहीही केलं तरीही. अगं मी तुझी अवस्था समजू शकतो. मलाही सारा हे जे करतेय ते आधी पटत नव्हतं, पण काल रात्री मनात विचार आला; जर सावित्रीबाईंनी असाच विचार केला असता तर कदाचित आज मुलींना शिकायला मिळालं नसतं, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली नसती तर आजही आपण गुलामच राहिलो असतो किंबहुना आजची स्त्री सुद्धा जर एवढ्या जबाबदाऱ्या असूनही घराबाहेर पडली नसती तर कदाचित सगळ्याच स्त्रिया परावलंबी असत्या ना? मग साराने तर फक्त तिच्या करिअरसाठी एक आगळं वेगळं क्षेत्र निवडलं आहे एवढंच." साराचे आजोबा म्हणाले.

"तेही बरोबरच आहे." विशाखा म्हणाली आणि विचार करत करतच पूजेचं तबक ठेवायला आत गेली.

'तुझ्या मनाची तर समजूत काढली गं विशाखा, पण साराची काळजी मलाही वाटतेय. बघूया आता काय होतंय. देवा, परमेश्वरा! पोरीला सांभाळून घे रे बाबा.' साराचे आजोबा मनातच म्हणाले.

एवढ्यात समीर घरी आला.

"काय आजोबा? असे का बसला आहात?" त्याने आजोबांना विचारात गढलेलं बघून विचारलं.

"काही नाही रे बाबा. तू बोल साराला सोडलं ना? किती पर्यंत ती तिथे पोहोचेल?" त्यांनी विचारलं.

क्रमशः.....
****************************
सारा कॅरलॉन सरांच्या परीक्षेत पास होईल? कसं असेल तिचं पुढचं आयुष्य? ती काहीतरी वेगळं करू पाहतेय म्हणून तिला कायम सगळ्यांच्या नाराजीचा आणि विचित्र नजरांचाच सामना करावा लागेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all