लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१४)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              ऑल द बेस्ट

दुसऱ्या दिवशी सकाळी साराची घाई सुरू होती. तिला साधारण दहा वाजता एअरपोर्टवर पोहोचायचं होतं. सगळी चेकिंग होऊन साधारण दुपारी एक वाजता तिची फ्लाईट होती. तिने राघवला सुद्धा याबद्दल सांगण्यासाठी फोन केला.

"हॅलो राघव, तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे." सारा म्हणाली.

"बोल ना." तो म्हणाला.

"मी हजारीबागला जातेय. तिथे कॅरलॉन सर माझी प्रॅक्टिकल परीक्षा घेणार आहेत." तिने सांगितलं.

"अरे वा! मस्तच. ऑल द बेस्ट. छान काम कर तेही कसलंही टेंशन न घेता." राघव म्हणाला.

"हो. आता कसलंच टेंशन नाहीये. आता दादासुद्धा मला पाठिंबा देतोय शिवाय बाकीचे पण तयार आहेत. हा फक्त आजी, आजोबा अजून मनापासून तयार नाहीत एवढंच." सारा म्हणाली.

"हम्म. तेही होतील तयार. अगं आपल्या पिठीत आणि त्यांच्या पिढीत खूप अंतर पडतं त्यामुळे जरा वेळ लागेल पण होतील तयार." राघवने तिला समजावलं.

"हो रे ते आहेच. बरं चल मी आता माझं आवरून घेतेय जरा आणि हो मी तिथून आले की आधी तुला भेटेन." सारा म्हणाली.

"ओके. बाय.... आणि ऑल द बेस्ट." राघव म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

आता समीर स्वतः तिला पाठिंबा देतोय आणि घरचेसुद्धा यासाठी तयार झालेत म्हणून तोही आनंदी होता. तिथून आल्यावर सगळ्यात आधी त्याला भेटण्याचं प्रॉमिस करून सारा तयारी करत होती.

"आईऽ थोडावेळ ये ना इथे." सारा आईला हॉलमध्ये बोलवत होती.

"अगं काय सारा? तुलाच जायचं आहे ना? थांब ना जरा. प्रवासात खायला काहीतरी करू दे." साराची आई हात पुसतच बाहेर येऊन म्हणाली.

"आई तिथे सगळं खायला असेल. तू थोड्यावेळ बस ना इथे." सारा म्हणाली.

"आई, ती एवढं म्हणतेय तर बस तिच्याजवळ मी बघतो." समीर म्हणाला.

त्याने सगळी किचनची जबाबदारी घेतली म्हणून विशाखा बाहेर आली.

"काय झालं? बोल." ती साराच्या बाजूला बसत म्हणाली.

"काही नाही. थोडावेळ इथेच बस." सारा तिच्या कुशीत शिरत म्हणाली.

"येडी कुठली! अगं तू जेमतेम तिथे दोन, चार दिवस जाशील. असं सासरी चालल्यासारखी काय वागतेयस?" साराची आई हसत म्हणाली.

"असुदे!" सारा तोंड फुगवून म्हणाली.

"बरं. आमचा लाडोबा कुठला." साराची आई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

सारा पहिल्यांदा तिच्या घरच्यांना सोडून एवढ्या लांब जाणार होती. तिने कितीही मनाची तयारी केलेली असली तरी तिला सतत घरच्यांचे चेहरे डोळ्यासमोर दिसत होते. ती कितीही टॉम बॉय असली तरीही तिचं मन घरच्यांसाठी कायमच इमोशनल असायचं. एवढ्यात समीर किचनमधून बाहेर आला.

"सारा, तू आत्ताच एवढी इमोशनल होत आहेस तर सासरी जाशील तेव्हा काय होईल? तेव्हा तर सगळे लाड फक्त माझे. तू थोडे दिवस पाहुण्यासारखी येऊन राहणार." समीर तिला चिडवत आईच्या कुशीत शिरत म्हणाला.

"तू जा ना दादाऽ आई माझेच लाड जास्त करणार." सारा तोंड फुगवून म्हणाली.

"शूऽ तुम्ही दोघंही मला सारखेच आहात. दोघांना सेम प्रेम मिळणार आहे. सारा! चल आता आवर बाळा." तिची आई म्हणाली.

साराने उठून बाकी उरली सुरली तयारी केली आणि घरातल्या देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करून ती निघायला तयार झाली. आजीने तिच्या हातावर दही साखर दिलं.

"आता चालली आहेस तर नीट काळजी घे. तिथे मनाला येईल तसं वागू नकोस." तिची आजी म्हणाली.

"हो आजी. मी काळजी घेईन." सारा तिला मीठी मारत म्हणाली.

"हे काय? हे असलं काही मला चालणार नाही. त्यापेक्षा जरा वाकून नमस्कार कर." तिची आजी पुन्हा ओरडली.

तिने आजीला पुन्हा नमस्कार केला आणि दोघं निघाले.

"समीर! तिला एअरपोर्टवर सोडलंस की कळव आणि सारा तू! तू तिथे पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला फोन करायचा." तिची आई म्हणाली.

"हो आई. नको टेंशन घेऊ. मी कळवते." सारा म्हणाली.

"बरं सगळं घेतलं ना? तुला जे काही सामान लागणार आहे ते सगळं आहे ना? नाहीतर काहीतरी विसरून जाशील." बाबांनी विचारलं.

"हो बाबा. सगळं घेतलं आहे. आता आम्ही निघू?" सारा म्हणाली.

"हो. सावकाश जा आणि कळवत रहा. ऑल द बेस्ट." बाबा म्हणाले.

सगळ्यांनीच साराला अंगठे उंचावून बेस्ट लक दिलं. समीर आणि सारा बाहेर पडले.

"सारा ऑल द बेस्ट. तू छानच काम करशील आणि याही परीक्षेत पास होशील. फक्त जे काही करशील ते नीट विचार करून आणि डोकं शांत ठेवून कर." समीर तिला समजावत म्हणाला.

"हम्म." सारा फक्त एवढंच म्हणाली.

"अगं काय झालंय? नुसतं हम्म काय?" समीरने विचारलं.

"दादा अरे, आपण जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा तू होतास माझ्यासोबत. मला एक आधार वाटत होता तुझा. आत्ता मी परीक्षेला चालली आहे आणि माझ्यासोबत कोणीच नसणार. म्हणजे मला हे माहीत होतं की, हे काम मी निवडलं आहे तर सगळीकडे मला एकटीलाच जावं लागेल पण..." सारा बोलता बोलता थांबली.

"पण तुला असंच वाटतंय ना की, तुझ्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी आई किंवा बाबांना सुट्टी असेल तर ते वर्गाबाहेर थांबून राहायचे आणि ते आत्ता नाहीत. इनफॅक्ट तुझ्या बोर्ड एक्साम वेळी पण ते सेंटर बाहेर थांबले होते." समीरने तिच्या मनातली सल बरोबर ओळखली होती.

"हो. मला वाटलं होतं निदान सर जेव्हा परीक्षा घेतील तेव्हा तू तरी असशील माझ्या बरोबर. पण नाही." सारा म्हणाली.

"सारा, अगं आता तू मोठी झालीस. ही वाट तूच निवडली आहेस ना? तुला आधीपासून माहीत होतं तुला या वाटेने एकटीने चालायचं आहे. मग आता असा विचार करून चालणार नाही. बघ, मी आज तिथे नसलो तरीही आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तिथे तू एकटी नाहीस तर तुला ज्या गुरूंकडून मार्गदर्शन हवं होतं ते स्वतः आहेत. मनात असले विचार आणून कामावरचा फोकस आता अजिबात घालवू नकोस." समीरने तिला समजावलं.

साराने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसतमुखाने मानेनेच होकार दिला.
*******************************
इथे साराच्या घरी सगळं नेहमीसारखं सुरू होतं. साराचे बाबा ऑफिसला जायला निघाले होते आणि आजी सारा एवढ्या लांब चालली आहे म्हणून देवळात निघाली होती.

"विशाखाऽ मी देवळात जाऊन येते. मला कितीही सारा अचानक असं बाहेर जाणं पटलं नसलं तरीही तिच्या यशासाठी प्रार्थना करायला चालले आहे." आजीने पूजेचं तबक घेत विशाखाला सांगितलं.

"हो आई तुम्ही या जाऊन." विशाखा म्हणाली.

"काय करणार? ही आजकालची पिढी स्वतःचच खरं करणार आणि आपल्या जिवाला घोर लावून निघून जाणार." आजी म्हणाली.

"अगं कांता अजून किती बोलशील? आपण मोठे आहोत म्हणजे लहानांना समजून घेणं आपलं काम आहे की नाही?" तिचे आजोबा म्हणाले.

"हो म्हणून काय आपल्या अनुभवांच्या बोलांना हे लोक किंमत पण देणार नाहीत का?" आजी म्हणाली.

"जाऊदे आत्ता तो विषय. तू जा देवळात जाऊन ये बरं वाटेल." आजोबा म्हणाले आणि ते पेपर घेऊन आतल्या खोलीत गेले.

साराची आजी सुद्धा लगेचच देवळात गेली.

"बाबा!" विशाखाने साराच्या आजोबांच्या खोलीच्या दारात जाऊन हाक मारली.

"ये विशाखा. बोल काय झालं?" तिच्या चेहऱ्यावरची काळजी बघून त्यांनी विचारलं.

"बाबा, सारा जे करतेय ते तुम्हालाही मनापासून पटत नाहीये ना? आई निदान स्पष्ट बोलतायत पण तुम्ही काहीही बोलत नाहीये." विशाखा म्हणाली.

"तू बस जरा इथे." त्यांनी समोरच्या खुर्ची कडे हात करून विशाखाला बसायला सांगितलं.

"बघ विशाखा आमचा काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. आमच्या काळी फक्त मोजकी क्षेत्र होती पण आता असं नाहीये. हा! मलाही साराची काळजी वाटतेय पण आपल्याला सुद्धा आता काळानुरूप स्वतःमध्ये बदल हे करावेच लागणार की नाही?" ते म्हणाले.

"हो बाबा सगळं मान्य, पण सारा गेल्या दोन चार दिवसापासून जे वागली, जसं बोलली त्याचा मला त्रास होतोय. त्यात आई सुद्धा तिच्या या निर्णयाने नाराज आहेत." विशाखा म्हणाली.

"नको एवढा विचार करुस. थोडे दिवस जाऊदे मग बघ हीच कांता नातीचं कौतुक सगळीकडे कशी सांगत सुटेल ते." ते म्हणाले.

"असं झालं तर चांगलंच आहे पण त्यांना असंही वाटायला नको की, आम्ही कोणीही त्यांच्या मताचा आदर करत नाही. त्याही सगळं साराच्या काळजीपोटी बोलतात कळतंय मला." विशाखा म्हणाली.

"मी समजावतो तिला. सारा अजून लहान आहे, ती कुठे धडपडली तर आपण तिला आहोत सावरायला. हेच वय आहे तिचं अनुभव गोळा करण्याचं. तू आता कसलाच विचार न करता फक्त स्वतःची काळजी घे. आधीच तुला बी.पी.च्या गोळ्या सुरू आहेत." ते म्हणाले.

"हम्म. तुमच्याशी बोलून खूप हलकं वाटलं. विराज तर काय नेहमी तुम्हा दोघांना गृहीत धरतो म्हणून त्याच्याशी बोलता येत नव्हतं." विशाखा म्हणाली.

"असंच असतं. पोरं आपल्या आई, वडलांना गृहितच धरतात कारण त्यांचा ठाम विश्वास असतो, सगळं जग आपल्या विरोधात गेलं तरीही आई, वडिलच आपल्या पाठीशी उभे राहणार." ते म्हणाले.

"हो. घरात मोठी अनुभवी माणसं असली की कसलीच काळजी नसते हे आज खूप प्रकर्षाने जाणवलं. थँक्यू बाबा खूप बरं वाटलं." विशाखा म्हणाली.

"मग एक चहा घेऊन ये मस्तपैकी. तुझी सासू नाहीये तोवर शांततेत पिता येईल." ते म्हणाले.

"हो बाबा, आणते." विशाखा स्मित करत म्हणाली आणि चहा आणायला गेली.

क्रमशः.....
******************************
साराच्या परीक्षेत ती पास होईल का? तिची आजी या सगळ्यासाठी मनापासून कधी तयार होईल? सारा तिचं स्वप्न कसं पूर्ण करेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरु नका.

🎭 Series Post

View all