लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१३)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१३)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              भरारी

समीर आणि सारा छान रमत गमत गाडीजवळ आले. अजूनही कॅरलाॅन सर तिथेच होते. साराला तर कधी एकदा घरी जाऊन ही आनंदाची बातमी सांगतेय असं झालं होतं. ती गाडीत बसणार एवढ्यात सर स्वतः तिच्या गाडीजवळ आले.

"सारा, तुम्हे आजही हजारीबाग के लिये रवाना होना पडेगा |" कॅरलाॅन सर म्हणाले.

"हजारीबाग?" समीरने गोंधळून विचारलं.

"झारखंडमध्ये आहे हे. तिथे बिबटे आढळतात." सारा म्हणाली.

"राईट. इफ यू कॅन टेक सम गूड फोटोज् देन यू कॅन कम विथ मी फॉर नेक्स्ट प्रोजेक्ट." कॅरलाॅन सर म्हणाले.

"ओके सर. आय एम रेडी." सारा म्हणाली.

तिने फक्त दादाकडे बघितलं आणि त्याने डोळ्यांनीच तिला होकार दिला. कॅरलाॅन सर मुद्दाम तिला ऐनवेळी टास्क देऊन ती तिच्या कामाला किती प्राधान्य देते? हे बघत होते. आजवरच्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना भारतीय मुलीला मार्गदर्शन करायचं म्हणजे वेळ खर्ची घालवणं आहे असं वाटत होतं. आजवर त्यांच्याकडे ज्या कोणी मोजक्या मुली गेल्या होत्या त्यांनी ट्रेनिंग अर्धवट सोडली होती आणि त्यामुळे त्यांचा आणि इतर मुलांचा सुद्धा वेळ वाया गेला होता, म्हणून यावेळी एकदम पारखून ते साराची निवड करणार होते.

"फर्स्ट थिंक प्रॉपरली देन टेक डिसिजन." कॅरलाॅन सर म्हणले.

"येस सर. आय एम रेडी." सारा म्हणाली.

"सर, दो मिनिट हा." समीर म्हणाला आणि तो साराला जरा बाजूला घेऊन गेला.

"काय झालं दादा?" साराने गोंधळून विचारलं.

"अगं तू तुझे ओरिजनल डॉक्युमेंट्स कुठे आणलेत? तू फक्त कॉपी आणल्या होत्या ना? कशी जाणार तू एअरपोर्टवर?" समीर म्हणाला.

"अरे हे लक्षातच नाही आलं." सारा डोक्यावर हात मारून म्हणाली.

कॅरलाॅन सरांचं त्या दोघांकडे बरोबर लक्ष होतं. समीर आणि साराचे हावभाव बघता सारा काही पुढे यात काम करणार नाही असंच वाटत होतं. ते त्यांच्याकडेच बघत होते. दोघंही पुन्हा तिथे आले.

"बोलो क्या प्रॉब्लेम है? कौन बिमार है? या किसकी शादी है?" कॅरलाॅन सरांनी विचारलं.

सर असे का बोलतायत? म्हणून सारा गोंधळली. तिच्या चेहऱ्यावर हे भाव लगेच दिसून येत होते.

"बोलो, बोलो क्या बहाना है?" पुन्हा सरांनी विचारलं.

त्यांचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे हे साराच्या लक्षात आलं. समीर बोलायला जाणार तर तिने त्याला थांबवलं.

"सर, बहाना नहीं | झारखंड जाना है वह भी कल तक तो फ्लाईटसे जाना पडे़गा | मेरे पास ओरिजनल डॉक्युमेंट्स नहीं हैं |" साराने जे खरं होतं ते सांगितलं.

"ओह! बस यही बात है?" कॅरलाॅन सरांनी विचारलं.

"हा." सारा म्हणाली.

समीर आणि सारा टेंशनमध्ये दिसत होते आणि साराला काहीही करून तिचं पुढचं करिअर कॅरलाॅन सरांचं मार्गदर्शन घेऊनच करायचं होतं म्हणून तिचा आटापिटा सुरू होता. त्या दोघांचे असे चेहरे बघून सर हसायला लागले. त्यांना असं हसताना बघून दोघं अजूनच बुचकळ्यात पडले.

"सॉरी." कॅरलाॅन सर हसू थांबवत म्हणाले.

दोघंही अजूनच गोंधळले होते. कॅरलाॅन सर लगेच घसा खाखरुन बोलायला लागले; "टुमारो नियर एविनिंग यू कॅन रिच देअर. डोन्ट टेक मोअर टेंशन. नाऊ गो टू होम, कल मुंबई एअरपोर्ट पे मिलेंगे |"

त्यांच्या या बोलण्याने साराच्या जीवात जीव आला.

"ओके." सारा म्हणाली.

"ऑल द बेस्ट" सर म्हणाले आणि ते तिथून निघाले.

समीर आणि सारा सुद्धा लगेच घरी जायला वळले. गाडीत बसल्या बसल्याच साराने घरी फोन करून याबद्दल सांगितलं. रात्रीची वेळ असल्याने जास्त ट्रॅफिक नव्हतं. दोघं लवकरच घरी पोहोचले. सगळे त्यांची वाट बघतच होते.

"आई, माझे डॉक्युमेंट्स काढून ठेवलेस? मला लगेच बॅगेत घालून ठेवू दे. सकाळी लवकर निघायचं आहे." साराने घरात पाऊल टाकताच विचारलं.

"आधी घरात तरी ये. किती धावपळ करशील?" तिची आई म्हणाली.

सारा पळतच घरी गेली आणि सोफ्यावर बसली.

"समीर, सारा! जा आधी फ्रेश होऊन या. पटकन जेवायला वाढते. शांतपणे जेऊन घ्या." साराची आई म्हणाली.

"अगं आई.." सारा बोलत होती तिला मध्येच तोडत आई म्हणाली; "काहीही बोलू नकोस. सांगितलं आहे तेवढं कर."

समीरने साराला फक्त खूण केली आणि ती फ्रेश व्हायला गेली. पाचच मिनिटात दोघं बाहेर आले तोवर विशाखाने सगळ्यांची पानं घेतली होती.

"आई खरंच नको जेवायला." सारा म्हणाली.

"ते काही नाही. तुला जेवावं लागेल नाहीतर जाऊ नकोस." तिने ठामपणे सांगितलं.

तिच्या या बोलण्याने सारा गप्प बसली.

"मी काय म्हणतेय, लगेचच उद्याच्या उद्या एवढ्या लांब का जायचंय तुला?" तिच्या आजीने तिला विचारलं.

"अगं आजी ते सर माझी उद्या प्रात्याक्षिक परीक्षा घेणार आहेत." सारा म्हणाली.

"पण एवढ्या लांब का? तुम्ही पुण्यात त्या अभयारण्यात होतात ना? तिथे काय प्राणी नाहीयेत का?" आजी म्हणाली.

"अगं आजी उद्या मी जिथे जाणार आहे तिथे बिबटे आहेत. त्यांनी काहीतरी टास्क ठरवला असेलच ना?" सारा म्हणाली.

"सारा मला वाटतंय तू जाऊ नकोस. एवढ्या तडकाफडकी असं एवढ्या लांब बोलावतात का?" आजी म्हणाली.

आजीची आता पुन्हा नकार घंटा सुरू झाली म्हणून साराला अस्वस्थ वाटत होतं. आधीच धावपळ झालेली आणि आता हे असं बोलणं ऐकून तिची चिडचिड होत होती तरीही तिने कसंबसं स्वतःला सावरलं होतं.

"अगं आजी तसं नसतं. मागच्यावेळी तुला सांगितलं होतं की नाही मला असं बाहेर जावं लागणार? ते आता सुरू झालं." सारा म्हणाली.

"अगं जा की तू, नाही म्हणत नाहीये पण जरा तुझ्या त्या सरांना आधी घरी बोलाव एकदा." आजी म्हणाली.

तिच्या या बोलण्यावर साराला हसावे की रडावे हे कळेना.

"अगं आजी असं नाही होत. तू त्यांच्यावर संशय घेऊ नकोस. खूप नाव आहे त्यांचं. साराला जाऊदे." समीर तिची बाजू घेत म्हणाला.

"तू गप रे! तुला काय कळतंय? तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. अरे सारा एक मुलगी आहे. तिची तब्येत नाजूक आहे तुझ्यासारखी नाही. शिवाय इतर अडचणी असतात त्या वेगळ्या." आजी म्हणाली.

"आजी अगं नको काळजी करुस. मला काहीही होणार नाही. एवढी नाजूक नाहीये मी." सारा म्हणाली.

"हो आई, साराला काही नाही होणार. सवय आहे तिला अश्या धावपळीची." साराचे बाबा म्हणाले.

"पोरीचा बापच तिच्या बाजूने बोलतोय तर काय बोलणार? मी आपले अनुभवाचे बोल सांगितले हो. आता तुमचं तुम्ही बघा." आजी म्हणाली आणि काही न बोलता जेवण करू लागली.

"अगं कांता काही नाही होणार आपल्या नातीला. तिने आधीच आपल्याला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं आहेच ना? शिवाय तिचे ते सर तेही खूप चांगले आहेत. आपण टीव्हीवर त्यांच्या मुलाखती बघितल्या आहेत की नाही?" साराचे आजोबा आजीला समजावू लागले.

"मी काही म्हणाले का? जेवा आता." साराची आजी म्हणाली.

तिच्या मनात अजूनही नाराजी आहे हे साराला समजलं होतं तिने फक्त तिच्या बाबांकडे बघितलं. त्यांनी खुणेनेच मी समजावतो म्हणून खूण केली तेव्हा सारा जेवली. सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळे एकत्र बसले होते.

"आई, मला तिथे किती दिवस लागतील माहीत नाही. जर मी सरांच्या परीक्षेत पास झाले तर मला आफ्रिकेला जाण्याची संधी मिळू शकते." सारा म्हणाली.

"अरे वा! सारा बघ तू छानच काम करशील." तिचे बाबा म्हणाले.

"खूप मोठी हो बाळा! मला तर आत्ता पर्यंत तू लहान होतीस तेच दिवस आठवतायत. आज तीच सारा देश विदेशी फिरणार आहे." साराची आई साश्रू नयनांनी म्हणाली.

"आई, त्यात रडायचं काय गं?" सारा तिला बिलगून म्हणाली.

"तू आई होशील ना तेव्हा तुला समजेल. आपलं बाळ असं दूर राहतं तेव्हा काय वाटतं हे आत्ता नाही कळणार तुला." तिची आई म्हणाली.

"अच्छा हो का? बरं चल आता जेमतेम चार ते पाच तास झोप मिळेल. मी झोपते." सारा म्हणाली आणि रूममध्ये पळाली.

सगळेच झोपायला गेले. विशाखाचा मात्र काही केल्या डोळा लागत नव्हता. ती सतत कुस बदलत होती.

"काय झालं विशाखा?" विराजने तिला असं अस्वस्थ बघून विचारलं.

ती आणि विराज दोघंही उठून बसले.

"काही नाही रे. साराची काळजी वाटतेय." विशाखा म्हणाली.

"अगं उलट आत्ता कुठे आपली सारा उंच आकाशात भरारी घेणार आहे. काळजी कसली?" विराज म्हणाला.

"त्याचीच भीती वाटतेय रे. उंच आकाशात भरारी घेताना तिच्या पंखांचं बळ कमी पडलं तर?" विशाखा म्हणाली.

"अगं असं कसं होईल? आपल्याला नीट माहित आहे आता आपलं पिल्लू उडण्याच्या योग्य झालं आहे. तिच्या पंखांत तेवढं बळ आलं आहे. अगं त्या मुक्या पक्ष्यांना सुद्धा समजतं की नाही आपली पिल्लं आता उडण्या योग्य झालीत की नाही? आपण तर माणसं आहोत ना? सारा आहे केपेबल. नको काळजी करुस." विराजने तिला समजावलं.

"सगळं कळतंय रे, पण वळत मात्र नाहीये. सारावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त या जगात लोक उडत्या पक्ष्यांना पिंजऱ्यात कैद करायला बसले आहेत त्याची भीती वाटतेय, आकाशात उडताना इतर त्रास देणाऱ्या भक्षक पक्ष्यांची भीती वाटतेय. त्याचं काय करू?" विशाखा म्हणाली.

"विशू! तू खूप जास्त विचार करतेयस. आपली सारा म्हणजे काही चिमणी नाहीये. गरुड आहे ती गरुड! कितीही कावळे तिला चोच मारायला आले तरीही ती एवढी उंच भरारी घेईल ना की त्यांची मजल तिच्या पर्यंत पोहोचू शकणार नाही." विराजने तिला समजावलं.

"सगळं पटतंय पण शेवटी एका आईच्या दृष्टीने विचार करून बघ ना. एक तरणी ताठी पोर अशी वणवण भटकत असणार, कुठल्या कुठल्या अनोळखी प्रांतात, देशात, वस्त्यांत जाणार याची तीव्रता आत्ता जास्त जाणवतेय." विशाखा म्हणाली.

"मीही विचार केलाय. पण बघ आपण असे कमजोर राहिलो ना तर साराला बळ कुठून येईल? तू कसलाच विचार न करता आत्ता झोप. साराला काहीही होणार नाही." विराजने समजावलं आणि तिला बळेच झोपवलं.

क्रमशः.....
****************************
साराच्या आईला वाटणारी काळजी रास्तच आहे. पण ही काळजी तिच्या करिअरच्या आड येणार नाही ना? सारा या जगातल्या आव्हानांना कशी सामोरी जाईल? पाहूया पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all