लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -११)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -११)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                           आज में उपर

साराला लिमका बुक्सकडून मेल आला आणि तिची अवस्था अगदी; "आज में उपर, आसमा नीचे" अशीच झाली होती. बाबांना फोन करून झाल्यावर तिने तिच्या जवळच्या मित्र - मैत्रिणींना सुद्धा याबद्दल सांगितलं आणि राघवला फोन केला.

"हॅलोऽ राघव, एक गूड न्यूज आहे." ती म्हणाली.

"तुझा रेकॉर्ड सेट झाला ना? काँग्रॅज्युलेशन" तो म्हणाला.

"हो. थँक्यू." सारा म्हणाली.

"नुसतं थँक्यू नाही. पार्टी दे मला." तो म्हणाला.

"हो देणारच आहे, ही काय सांगायची गोष्ट आहे? आजच संध्याकाळी भेट. या यशात जेवढा माझा वाटा आहे तेवढाच किंबहुना त्याहून जास्त तुझा आहे." सारा म्हणाली.

"झालं का पुन्हा तुझं सुरू? असं बोलणार असशील तर नकोच मला पार्टी." राघव म्हणाला.

"नाही रे. जे आहे ते सांगितलं फक्त." सारा म्हणाली.

नंतर दोघांनी गप्पा मारल्या आणि साराने फोन ठेवला. रेकॉर्ड सेट झाला त्यामुळे त्यानंतरच्या ज्या फाॅरमॅलिटीज् होत्या त्याही तिने केल्या. या सगळ्यात चार वाजून गेले होते. सकाळपासून दुपारपर्यंत तिने तिला यात यश मिळालं ते सेलिब्रेट केलं होतं आणि आता ती तिच्या पुढच्या वाटचालीसाठी अभ्यास करत रूममध्ये बसली होती.

"साराऽ कुठे आहे माझा बच्चा?" विराज घरात आल्या आल्या साराला हाका मारत होता.

'बाबा आज एवढ्या लवकर? येसऽ' सारा स्वतःशीच म्हणाली आणि पळतच बाहेर गेली.

त्याच्या आवाजाने झोपलेले त्याचे आई - बाबा सुद्धा बाहेर आले.

"अभिनंदन बाळा. असंच यश मिळवत रहा." तिच्या बाबांनी तिला जवळ घेऊन भरभरून आशीर्वाद दिले.

"किती मस्त सुवास येतोय. बाबा तुम्ही टोस्ट सँडविच आणलं ना? आपलं स्पेशल?" सारा दीर्घ श्वास घेऊन नाकात तो सुवास साठवत म्हणाली.

"हो. चला सगळे मस्त खाऊन घेऊ." ते उत्साहात म्हणाले आणि समीरने त्यांच्या हातातून पिशवी घेतली.

"बाबा मी मस्त मन लावून अभ्यास करत होते. आपली पार्टी कालच करून झाली तरीही आज पुन्हा?" सारा म्हणाली.

"हो मग. माझ्या लाडक्या लेकीने जे काम केलं आहे, ते असं कोणी सहजासहजी करू शकेल का?" ते कौतुकाने म्हणाले.

सारा कितीही बालिश वागली तरी ती यश असो वा अपयश लवकरात लवकर पचवून पुढच्या वाटचालीला लागायची. आजही तिला एवढं मोठं यश मिळालं होतं, तरीही त्याचा अती गाजावाजा न करता ती पुन्हा अगदी पहिल्यासारखी वागत होती. हाच गुण तिला लवकरात लवकर सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढून योग्य मार्गावर घेऊन जात असे. आजही ती तिच्या फ्रेंड्स सोबत पार्टी करू शकत होती, पण तिने तसं केलं नव्हतं. फक्त राघवचा तिच्या यशात वाटा आहे आणि त्याचा पार्टीसाठी हक्क आहे म्हणून थोडावेळ ती त्याला देणार होती. सगळ्यांना तिचा हा गुण माहीत होता आणि ती स्वतःहून काही "चला आज पण पार्टी करू" असं म्हणणार नाही, हे तिच्या बाबांना माहीत होतं; म्हणूनच त्यांनी छोटंसं का होईना, पण सेलिब्रेशन करुया असं ठरवून टोस्ट सँडविच आणलं होतं. दोघं बाप लेक बोलत होते तोवर समीर आणि विशाखाने सगळ्यांना प्लेटमध्ये वाढलं.

"ओ बाप लेक चला लवकर." विशाखा म्हणाली.

दोघंही लगेच डायनिंग टेबलवर जाऊन बसले.

"बरं केलंस विराज तू लवकर आलास. या तुझ्या लाडक्या लेकीने दिवसभर काहीही खाल्लं नाहीये. म्हणे काय मला भूक नाही." साराची आजी म्हणाली.

"अच्छा असं म्हणाली होती का सारा? राहिलं. मग काय आत्ताही तिला भूक नसेल. मी आणि समीर तिच्या पण वाटचं खातो आता. काय करणार ना?" विराज मुद्दाम म्हणाला.

"नाही ना बाबा. मला खूप भूक लागली आहे." सारा म्हणाली.

"घे रे माझ्या पिल्ला आणि आता पुन्हा असं उपाशी राहायचं नाही. कितीही आनंद झाला किंवा दुःख झालं तरीही." तिचे बाबा तिला सँडविच भरवत म्हणाले.

साराने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि सगळे एन्जॉय करत खात होते. आधीच घरातलं शेंडेफळ आणि त्यात असं काहीतरी वेगळं काम करून त्यात रेकॉर्ड सेट करणारी त्यांच्या घरातली पहिली साराच होती म्हणून विशेष कौतुक सुरू होतं. विराजने त्याच्या मित्रांना आणि सगळ्या नातेवाईकांना कळवल्या पासून सतत फोन ठणकत होते. साराचं कौतुक सगळ्यांना होतंच. काहीकाही लोक फक्त याबद्दल नकारात्मक बोलत होते. तेव्हा मात्र विराज स्वतः त्यांना त्याच्या परीने उत्तर देत होता. अश्यातच दिवस कधी संपला हे समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी पासून प्रत्येकाचं रूटीन चालू झालं होतं. यात फक्त एक बदल होता तो म्हणजे सारा नऊ, दहा ऐवजी कोणीही न उठवता स्वतःहून पाच वाजता उठत होती. रोज सकाळी लवकर बाहेर पडून ती पक्ष्यांचं निरीक्षण करायची आणि त्यांचे मस्त मस्त फोटो, दिनचर्या कॅमेऱ्यात टिपून घरी सगळ्यांना दाखवायची. अश्यातच एक महिना सरला आणि साराला ज्या क्षणाची आतुरता होती तो आला. तिचे आदर्श गुरु कॅरलाॅन सर भारतात आले होते.

"आई, मागे मी तुला म्हणलं होतं त्याप्रमाणे कॅरलॉन सर भारतात आले आहेत. त्यांना मी ऑफिशियल मीटिंगसाठी मेल पाठवला आहेच पण अशी बातमी आहे की ते उद्या पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यात जाणार आहेत, तर मीही तिकडे जाण्याचा विचार करतेय." सारा स्वयंपाकघरात आई जवळ घुटमळत म्हणाली.

"ठीक आहे. आता तुझ्या करिअरची खरी सुरुवात होईल. दादा येईल उद्या तुझ्याबरोबर." साराची आई म्हणाली.

"अगं आई जाईन मी. तसंही यापुढे मला एकटीलाच सगळीकडे जावं लागेल ना?" सारा म्हणाली.

"नको. उद्या तुला सोडायला दादा येईल. मग पुढचं पुढे बघू." साराची आई ठामपणे म्हणाली.

'आई निदान जाऊ तरी देतेय ना? आत्ता एवढंच बास.' असा विचार करून सारा स्वयंपाक घरातून बाहेर आली.

तिला तिथे गेल्यावर किती दिवस राहावं लागेल? याची कल्पना नव्हती म्हणून चार दिवसाचे कपडे आणि बाकी सामान तिने पॅक करून ठेवलं. तिने काहीही करून सरांचं मार्गदर्शन मिळवायचंच हे मनाशी पक्क ठरवलं होतं. साराला अगदी कळत्या वयापासून त्यांच्या फोटोग्राफीचं वेड होतं. त्यांच्या फोटोंमध्ये तिला वेगळाच जिवंतपणा वाटायचा. कॅरलॉन सर तिच्यासाठी कायम आदर्श होते आणि त्यांच्या सोबत काम करायचं हे तिचं तेव्हापासूनच स्वप्न होतं जे उद्या पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. तिच्या मनाला आज हुरहूर लागली होती.

'सर उद्या भेटतील का? भेटले तरी माझं ऐकून घेतील? जर ते मला भेटलेच नाहीत तर?' असेच विचार तिच्या मनात येत होते आणि त्यामुळेच ती बेचैन होती.

रात्र झाली होती आणि टीव्हीवर तिचा आवडीचा कॅरलॉन सरांचा शो लागला होता तरीही तिचं त्याकडे लक्ष नव्हतं.

"सारा अगं एरवी हा शो बघताना तुझ्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवत नाही आणि आज काय झालंय? लक्ष कुठेय?" तिच्या आजोबांनी विचारलं.

त्यांच्या आवाजाने ती भानावर आली आणि "कुठे काय? काही नाही." असं म्हणाली.

"सारा अगं का एवढं टेंशन दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर? एरवी तूच आम्हाला टेंशन देतेस." तिचे बाबा मुद्दाम तिला चिडवायला म्हणाले.

"काही नाही." ती म्हणाली.

"असं कसं काही नाही? आईने सांगितलं मला, तू उद्या पुण्याला जाणार आहेस. अगं तुझं मोठं स्वप्न आता पूर्ण होणार ना? मग कसली काळजी वाटतेय तुला?" तिच्या बाबांनी तिला विचारलं.

"बाबाऽ" असं म्हणत ती फक्त त्यांच्या कुशीत शिरली.

"सारा, अगं एवढी टॉम बॉय आहेस ना तू? एवढ्या लहान लहान गोष्टींचं टेंशन कधी पासून घ्यायला लागलीस?" त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं.

"बाबा, उद्या जर मला सरांनी सांगितलं की ते मला मार्गदर्शन नाही करणार तर? जर ते मला भेटलेच नाहीत तर?" साराने तिच्या मनातली भीती बोलून दाखवत होती.

तिच्या बाबांचा मायेचा हात डोक्यावरून फिरल्यावर इतकावेळ दाबून ठेवलेल्या तिच्या भावना बाहेर आल्या होत्या. तिचं बोलणं ऐकून साराची आई सुद्धा तिच्या बाजूला बसली.

"सारा, अगं असं कसं होईल? तू त्यांचे कितीतरी इंटरव्ह्यू बघितले आहेत की नाही? त्यात त्यांनी स्वतः सांगितलं आहे ना, त्यांना त्यांचं ज्ञान इतर मुलांना शिकवण्यासाठी वापरायला आवडतं?" साराची आई तिला समजावत म्हणाली.

"हम्म. पण आई तू एक विसरलीस, त्यांनी हेही सांगितलं आहे की ते आधी त्यांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात. मी त्यात पास होईन का?" सारा म्हणाली.

"हे बघ सारा, आपल्या हातात काय आहे? आपलं बेस्ट देणं. तू तुझं एकदम बेस्ट दे. शेवटी जे होणार असेल तेच होईल. तू अशी उदास राहिलीस तर तुझं लक्ष कसं लागेल कामात?" साराचे बाबा तिला समजावत म्हणाले.

आता साराला थोडं बरं वाटत होतं. तिच्या आई - बाबांनी तिला मायेने समजावल्यावर तिची भीती कुठच्या कुठे पळून गेली होती.

"चला फायनली आता आमचं पिल्लू प्राण्यांच्या पिल्लांचे फोटो काढायला जाणार." समीर तिला चिडवत म्हणाला.

"दादाऽ कितीवेळा सांगू मला पिल्लू नाही म्हणायचं?" त्याच्यावर उशी फेकून सारा त्याला ओरडली. पण त्याने तो वार चुकवला आणि "पिल्लू, पिल्लू" म्हणत तिला चिडवू लागला.

तीही त्याच्या मागे लागली आणि आता तिचं सगळंच टेंशन संपलं होतं.

"काय ही पोरं? नुसती वयाने वाढली पण बालिशपणा आहे तसाच आहे." आजी दोघांकडे बघत हसत म्हणाली.

"चला, बास बास." विराजने समीरला थांबवत सांगितलं.

दोघंही बहिण - भाऊ हसत खेळत सोफ्यावर बसले. सगळं कुटुंबं आज हसत खेळत समाधानी होतं. एकमेकांना टेंशनमधून बाहेर कसं काढायचं? याची नस प्रत्येकाला माहीत होती. साराला असं हसताना पाहून सगळ्या घरातच चैतन्य पसरलं होतं.

क्रमशः.......
***************************
सारा आता तिच्या खऱ्या प्रवासाला लागणार आहे. कसा असेल तिचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनण्याचा प्रवास? तिला तिच्या आदर्श गुरूंकडून मार्गदर्शन मिळेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all