© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
पार्टी तो बनती है
***************************
पार्टी तो बनती है
साराचा आत्मविश्वास बघून सगळ्यांनाच बरं वाटलं होतं, पण ती हे काम करणार म्हणून काळजीही वाटत होती. तिला आत्ता सगळं सहज सोपं वाटत असलं; तरीही तिला कुठल्या कुठल्या दिव्यांना सामोरं जावं लागणार आहे हे घरच्यांना कळत होतं. त्यात तिच्या आजी, आजोबांनी मनापासून परवानगी दिलेली नव्हतीच. साराचा आनंद मात्र आता गगनात मावत नव्हता. तिला आपल्याला या करिअरसाठी परवानगी मिळाली म्हणून आनंद तर झालाच होता, पण जास्त आनंद तिला तिच्या लाडक्या दादाने तिची बाजू मांडली याचा झाला होता.
"अभी तो पार्टी बनती है..." सारा मोठ्याने बोलत आनंदाने नाचत होती.
परवानगी मिळवण्यासाठी पार तोंड पाडून बसलेली सारा आणि आत्ताची सारा यात जमीन आस्मानाचा फरक होता. आता पुन्हा नाही म्हणून तिचं मन मोडवं असं कोणालाही वाटत नव्हतं.
"आता आपण बाहेर जाऊया ना जेवायला. पटकन सगळे तयार होऊन या.. प्लीज..." सारा आनंदात म्हणाली.
तिचा आनंद बघून समीरने सुद्धा तेच सांगितलं आणि दोन्ही पोरं एवढं म्हणतायत म्हणून सगळे तयार होऊन आले आणि लगेचच सगळे बाहेर जेवायला गेले. सगळ्यांनाच ही पार्टी कशासाठी आहे? हे माहीत असल्याने त्या पार्टीचा आनंद द्विगुणित झाला होता. साराची अखंड बडबड ऐकत सगळ्यांनी जेवण केलं आणि थोडं फिरून मगच सगळे घरी आले. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते. उद्या आता त्या लोकांचा काय मेल येतोय या विचारातच सगळ्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीप्रमाणे होती. आजी - आजोबांची पूजा करून झाली होती, समीर आई बरोबर स्वयंपाक घरात होता, विराज ऑफिसला जायच्या तयारीत होता आणि सारा मॅडम अजूनही घोरत होत्या.
"सारा उठ. नऊ वाजून गेलेत." साराची आई तिला येऊन सारख्या हाका मारून जात होती.
एवढ्या हाकांचा मात्र तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. कालच्या सलग सहा तास केलेल्या धावपळीमुळे ती खूप दमली होती.
"आई, मला वाटतंय तिला अजून थोडावेळ झोपू दे. थोड्यावेळात बघ मीच कसा उठवतो तिला." समीर म्हणाला.
याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन असणार हे जाणून आई फक्त हसली आणि त्यांची त्यांची कामं चालू ठेवली. थोड्याचवेळात सगळी धावपळ संपली आणि रोजचं रूटीन सुरू झालं. समीर साराच्या रूममध्ये गेला. तिच्या उश्याला असलेला मोबाईल त्याने हळूच घेतला.
"आईऽ हे बघ साराला मेल आला आहे. तिचं या रेकॉर्डसाठी...." समीर तिला जाग यावी म्हणून मुद्दाम मोठ्याने ओरडून बोलत होता. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सारा ताडकन उठून बसली आणि त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला.
तिला कुठेही नवीन मेल आलेला दिसत नव्हता. तिने अगदी पुन्हा पुन्हा रिफ्रेश करून बघितलं तरीही नवीन मेल आलेला तिला दिसत नव्हता. समीर जेव्हा हसायला लागला तेव्हा तिला समजलं आपल्याला उठवायला दादाने हे केलं आहे.
"काय रे दादा? अजून थोडावेळ झोपू द्यायचं होतं ना." ती तोंड फुगवून पुन्हा आडवी होत उशी कानावर ठेवत म्हणाली.
"आळशी. जा आवर ना आता. उद्या तुझं सिलेक्शन झालं यासाठी आणि तू कामासाठी बाहेर गेलीस तर आम्ही कोणी येणार आहोत का तुला उठवायला? की तुझे प्राणी थांबणार आहेत त्यांची दिनचर्या सुरू करायला?" समीर तिच्या हातातून उशी खेचून घेत म्हणाला.
सारा तोंड वाकडं करतच उठली आणि थोड्यावेळाने आवरून आली. तिचं सगळं आवरून होईपर्यंत साडे दहा वाजून गेले होते. ती नाश्ता करायला बाहेर आली तर आज आई आणि दादा सुद्धा तिच्यासाठी थांबले होते.
"आई, दादा तुम्ही दोघं का थांबलात? खाऊन घ्यायचं होतं ना." सारा म्हणाली.
"नाही. आज जरा तुझ्याशी बोलायचं आहे." साराची आई म्हणाली.
सारा लगेचच डायनिंग टेबलवर जाऊन बसली. नाश्ता वाढून झाल्यावर समीर आणि आई सुद्धा बसले. सारा फक्त प्रश्नार्थक नजरेने समीरकडे बघत होती. त्यानेही खांदे उडवून त्याला काही माहीत नाही हे सांगितलं.
"नाही नाही. तू दादाकडे बघूच नकोस. त्याला काहीही माहीत नाहीये." विशाखाने ते बघितलं आणि म्हणाली.
"मग काय बोलायचं आहे आई?" साराने गोंधळून विचारलं.
"काल तुला आम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी हो म्हणलं असलं तरी मला तुला काहीतरी विचारायचं आहे." विशाखा म्हणाली.
'आता आई पुन्हा नाही म्हणते की काय?' या विचाराने ती घास तोंडात घालता घालताच थांबली. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ तिच्या आईला कळत होता.
"एवढं काळजी करण्यासारखं नाही. खाऊन घे. तुला मी पुन्हा नाही म्हणणार नाहीये." ती म्हणाली.
तेव्हा कुठे साराला बरं वाटलं आणि ती खाता खाता म्हणाली; "विचार ना आई."
"बघ सारा, तू काल म्हणालीस की हा तुझा रेकॉर्ड झाला तर पुढे तू काय करणार आहेस हे तुझं ठरलं आहे. ते नक्की काय आहे? हे नीट सांग. याची दुसरी बाजू म्हणजे जर हा रेकॉर्ड सेट नाही झाला तर काय करणार आहेस? हेही सांग." आईने सरळ विषयाला हात घातला.
"आई, तुला माहीतच आहे मी तेरा, चौदा वर्षांची असल्या पासून कॅरलॉन सरांची किती मोठी फॅन आहे. ते या क्षेत्रात एक्स्पर्ट म्हणून ओळखले जातात. मला त्यांच्या अंडर काही वर्ष काम करायचं आहे. त्यांनतर मी आपल्या देशासाठी काम करणार. रिसर्च इन्स्टिट्यूट्सना अभ्यासासाठी बरेच फोटो, व्हिडिओ लागतात त्यासाठी मी तिथे जॉईन होणार." साराने तिच्या मनात जे होतं ते सांगितलं.
"पण तू कधी विचार केला आहेस का त्यांच्या पर्यंत तू कशी पोहोचणार? तुझ्यासारखे अजून किती लोक असतील ज्यांना त्यांचं मार्गदर्शन हवं असेल? शिवाय तुला जर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जायचं असेल तर त्यासाठी बराच अनुभव गाठीशी लागेल लगेचच तुला तिथे काम मिळणार नाहीये." तिच्या आईने तिची शंका बोलून दाखवली.
"हो आई. बरोबर आहे तुझं. मी सरांबद्दल सगळी माहिती काढली आहे. पुढच्या महिन्यात ते भारतात येणार आहेत तेव्हा मी त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यांना मी ऑफिशिअल मेलसुद्धा पाठवणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सोबत केलेल्या कामामुळे मला अनुभव मिळेल तर मी इन्स्टिट्यूट जॉईन करू शकते." सारा म्हणाली.
"पण हा रेकॉर्ड जर सेट नाही झाला तर?" साराच्या आईने विचारलं.
"जर हा रेकॉर्ड सेट नाहीच झाला तर..." सारा बोलत होती एवढ्यात तिच्या मोबाईलची नोटिफिकेशन ट्यून वाजली. स्क्रीनवर मेलचं नोटीफिकेशन आहे हे बघून तिने मोबाईल हातात घेतला.
"सारा, किती वेळा सांगितलं आहे खाताना मोबाईल घ्यायचा नाही. मुळात तू डायनिंग टेबलवर आलीस तेव्हा मोबाईल का आणलास?" साराची आई तिला ओरडत होती.
याकडे मात्र तिचं लक्ष नव्हतं. ती पूर्णपणे मोबाईल मध्ये गुंतली होती. समीर तिच्याकडे बघत होता. नक्कीच लिमका बुक्स वाल्यांचा मेल असणार हे त्याला समजलं होतं. साराने मिनिट भरातच सगळा मेल वाचला.
"आईऽ दादाऽ कालच्या फोटोंचा रेकॉर्ड सेट झाला. मी लगेच बाबांना..." सारा खाता खाता बोलत होती त्यामुळे तिला जोरात ठसका लागला.
"अगं सारा हळू ना. घे आधी पाणी पी." तिची आई काळजीने उठली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला पाणी दिलं.
थोड्यावेळात तिला बरं वाटलं.
"बरं वाटतंय आता. आई मी बाबांना फोन करून सांगते हा." ती उत्साहात म्हणाली आणि तिथून उठली.
"अगं आधी खाऊन घे." समीर म्हणाला पण ती काहीही न ऐकता फोन करायला पळाली.
"अजूनही लहान असल्यासारखी वागते." समीर हसत म्हणाला.
"आज तर काय साराला भूकच लागणार नाही." तिची आई सुद्धा कौतुकाने म्हणाली.
"आई, थँक्यू तुम्ही सगळ्यांनी साराला पाठिंबा दिला. आता बघा आपली सारा कसं नाव काढते ते." समीर साराचं कौतुक करत म्हणाला.
"आमची पण मुलगीच आहे रे ती. तिच्या आनंदातच आपला आनंद. फक्त या तिच्या जगावेगळ्या करिअरमुळे आपल्याला सतत तिची काळजी लागून राहणार. लोक बोलायला आहेतच पुन्हा." तिची आई जरा काळजीने म्हणाली.
"अगं आई लोक काय दोन्ही बाजूंनी बोलतात. लोकांवर लक्ष देत बसलो ना तर जगणं मुश्किल व्हायचं." समीर म्हणाला.
"म्हणून तर तो विचार लगेच झटकला ना. काल रात्री मनात विचार आला, सारा तिच्या मार्गाने बरोबर चालली आहे. खरंतर सगळ्या मुलींनी जरी या क्षेत्रात उतरायचं म्हणलं तरी काही वावगं नाही. खरंतर स्त्रिया निसर्गाशी जास्त जोडलेल्या असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त निसर्ग उमगतो. भूमीतून जसं बियांचं रूपांतर अंकुरात, रोपट्यात आणि वृक्षात होतं तसंच स्त्रियांचं सुद्धा असतं ना. त्यामुळे निसर्गाला समजून घेणं हे अवघड राहत नाही." तिची आई बोलत होती.
"हो. सगळ्यांचेच आई - बाबा तुमच्यासारखे मुलांना समजून घेणारे असते, स्पेशली मुलींना तर जग किती सुंदर बनलं असतं ना? आपलाच देश आज सगळ्यात पुढे असता." समीर म्हणाला.
"समीर अरे कोणी मुद्दाम करत नाही हे. परिस्थिती भाग पाडते असं वागायला. असो! आपल्याला देवाच्या कृपेने काहीही कमी नाही. करू दे साराला जे हवं ते. आपण साराला आपल्या परीने पूर्ण पाठिंबा द्यायचा." आई म्हणाली.
क्रमशः......
*******************************
साराचा रेकॉर्ड तर झाला, आता तिची पुढची वाट कशी असेल? तिने आजवर ज्यांना आदर्श मानलं आहे त्या कॅरलॉन सरांचं मार्गदर्शन तिला मिळेल का? निसर्गाचे कोणते नवीन पैलू तिला बघायला मिळणार आहेत? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
*******************************
साराचा रेकॉर्ड तर झाला, आता तिची पुढची वाट कशी असेल? तिने आजवर ज्यांना आदर्श मानलं आहे त्या कॅरलॉन सरांचं मार्गदर्शन तिला मिळेल का? निसर्गाचे कोणते नवीन पैलू तिला बघायला मिळणार आहेत? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा