अविस्मरणीय चौदा दिवस

आयुष्यातील कधीही न विसरता येणारे दिवस

कथेचे शीर्षक: अविस्मरणीय चौदा दिवस

विषय: माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी


माझ्या आयुष्यातील हा दिवस असा आहे की, मी कधीही विसरु शकणार नाही. त्या दिवसाची आठवण आली तरी मन दाटून येते आणि डोळे भरुन येतात. त्या दिवसाने आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची हिंमत दिली आहे. 


दोन दिवस आधी म्हणजे ७ एप्रिलला मी खूप आनंदात होते, कारण माझी ईराची पहिली ट्रॉफी आली होती. त्यावेळी वाटले पण नव्हते की, दोन दिवसांनी असे काहीतरी घडेल. 


९ एप्रिल या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली. घड्याळात संध्याकाळी ४ वर काटा गेला की, आमच्या इथे सगळ्यांना चहा पिण्याची तलप येते. पप्पांना भूक लागल्याने पप्पा चहा आणि बिस्कीट खाणार होते. आईने मला चहा करायला सांगितला. कोरोनाचे दिवस चालू असल्याने कोरोनाचे पेशंट किती व कुठे निघाले? गावात कोणाला कोरोना झाला? यावर आई, पप्पा व भावाची चर्चा रंगली होती. आमचे दुकान आहे, घरातून दुकानात गिऱ्हाईक आलेलं दिसतं. 


चहा तयार झाल्यावर आईने मला सांगितले की,

"तू आणि अक्षय चहा पिऊन घ्या, मी तोपर्यंत दुकानात लक्ष देते." 


मी व अक्षयने चहा पिला. आई व पप्पांसाठी चहा गरम करुन कपात गाळला. आई गिऱ्हाईक आलं म्हणून पप्पांजवळून उठून दुकानात गेली. अक्षयचा चहा पिऊन झाल्यावर तो दुकानात चालला होता. दुकानात जाण्यासाठी पप्पांच्या रुममधून रस्ता असल्याने त्याचे लक्ष सहज कॉटवर झोपलेल्या पप्पांकडे गेले. त्याने मला आवाज देऊन बोलावून घेतले. तो ओरडल्याने आईही दुकानातून पटकन आली होती. 


पप्पांनी मान टाकली होती, त्यांचा श्वास घेणे बंद झाले होते. अक्षयने छातीवर जोरजोरात प्रेस केले. मी त्यांच्या चेहऱ्यावर थंड पाणी टाकले. आईने हातपाय चोळले. आम्हाला वाटलं होतं की, पप्पा बेशुद्ध झाले असतील.


"पप्पा गेले ग." अक्षय माझ्याकडे बघून म्हणाला.


"तू आधी डॉक्टरांना बोलावं." मी भरल्या आवाजाने त्याला सांगितले.


घरापासून जवळच असलेल्या डॉक्टरला अक्षयने काही क्षणांत बोलवले, त्याच्या मित्राला फोन करुन पप्पांना संगमनेरला दवाखान्यात घेऊन जायचं, असं सांगून पटकन घरी यायला सांगितलं. डॉक्टरने पप्पांना तपासले, त्याच्यात खरं सांगण्याची ताकद नसल्याने त्याने पप्पांना संगमनेरला हलवायला सांगितले. तोपर्यंत मी अक्षयला आमच्या फॅमिली डॉक्टरला बोलवायला सांगितले. फॅमिली डॉक्टरने येऊन पप्पांचे हार्टबिट चेक केले.

दरम्यानच्या काही क्षणांत आई माझ्याकडे बघून म्हणाली,

"आता काय करायचे?" 


"तू शांत रहा." मी एवढंच त्यावेळी आईला सांगितले.


फॅमिली डॉक्टरने मला बाजूला घेऊन सांगितले की, "पप्पा गेले, त्यांना कुठेही नेऊन काही उपयोग होणार नाही. एकतर कोरोनाचा काळ चालू आहे. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांना आपल्या ताब्यात देणार नाहीत."


आपले पप्पा आपल्या डोळ्यांसमोर हे जग सोडून गेले आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही, हे पचत नव्हतं. आईला अक्षय व माझ्या चेहऱ्याकडे बघून कळून चुकलं होतं, तिने जोरात आक्रोश केला. आमच्या दोघांच्याही डोळयात अश्रूंनी गर्दी केली होती, पण आईला सावरायचे होते. नातेवाईकांना कळवायचे होते. आम्ही दोघांनी कोणाकोणाला कळवायचे हे ठरवून घेतले. काहींना मी फोन केले तर काहींना अक्षयने. 


बहिणींना फोन करण्याची ताकद माझ्यात नव्हती, ते काम अक्षयने केले होते. घरात सर्वांत लहान म्हणून जन्म घेतलेल्या आम्हा दोघांना अचानक मोठं व्हावं लागलं. तेवढ्यात माझ्या दुबईला असणाऱ्या बहिणीचा फोन आला. मी पहिल्यांदा तिचा फोन कट केला. ती लांब राहत असल्याने तिला पप्पा गेल्याची बातमी सांगायची नव्हती. तिचा पुन्हा फोन आला.

मग मात्र मला तिचा फोन घ्यावा लागला. माझा भरलेला आवाज ऐकून तिने विचारले की,

"तू रडते आहेस का? काय झालं?"


"आपले पप्पा गेले." मी एवढंच बोलू शकले. 


मी पुढे बोलू शकणार नाही, हे तिला माहीत असल्याने तिने त्यावेळी फोन कट केला. काही वेळानंतर ती फोन करुन म्हणाली,

"माझा व्हिडिओ कॉल रिसिव्ह कर. एकदा मला शेवटचं त्यांना बघूदेत." 


तिला व्हिडिओ कॉल मध्ये पप्पांचा चेहरा दाखवताना माझा हात थरथरत होता. तिची तिकडे झालेली अवस्था मला बघवत नव्हती आणि तिची इच्छा असून सुद्धा ती लगेच आमच्याकडे येऊ शकत नव्हती. आज तो क्षण आठवला तरी डोळयात पाणी येते.


अक्षय व त्याच्या मित्रांनी अंत्यविधीची तयारी करुन ठेवली होती. माझ्या दोघी बहिणी पुण्यावरुन येत असल्याने त्या आल्यावरचं अंत्यविधी करायचा होता. एकीकडे आईला सांभाळायचं होतं. आईची अवस्था बघून आता हिला काही होणार तर नाही ना? ही भीती सतत वाटत होती. 


माझी बहिण व तिची मुलगी आदल्या दिवशीच पुण्याला परत गेल्या होत्या. बहिणीची मुलगी पप्पांसोबत खूप अटँच होती. 


"माझे बाबा कुठे आहेत?" हे जर तिने विचारले, तर तिला काय उत्तर द्यायचे? हे मला कळत नव्हते.


पप्पा गेल्या बारा वर्षांपासून आजारी होते, तेव्हापासून हे एक दिवस जातील, ह्याची कल्पना आम्हाला होती. पण इतक्या पटकन जातील असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला कोणालाच हे पचत नव्हतं. 


नुकताच कोरोना होऊन गेल्याने मला खूप अशक्तपणा आलेला होता, अंगात अजिबात त्राण राहिलेला नव्हता. अशातच आता हे सगळं कसं हाताळायचं? हा प्रश्न मला पडला होता.


माझ्या शरीरातून गरम वाफा बाहेर पडत होत्या. आपल्याला काय होतंय? यापेक्षा आईला काही होऊ नये, याची काळजी मला घ्यायची होती. माझ्या मोठ्या बहिणीने "आईला सांभाळ." फोन करुन मला सांगितलं होतं. पप्पा जाताना खूप मोठी जबाबदारी देऊन गेल्यासारखे वाटले. आम्ही दोघे बहीणभाऊ डोळयात पाणी घेऊन आपापले कर्तव्य पार पाडत होतो. 


अंत्यविधीच्या वेळी त्या व्यक्तीला नवीन कपडे परिधान करायचे असतात, त्यामुळे जमलेल्या कोणीतरी दुकानात जाऊन साधे कपडे घेऊन आले होते. आमच्या पप्पांनी उभ्या आयुष्यात सफारी सोडून कोणतेच कपडे वापरले नव्हते. दररोज कडक इस्त्री केलेला सफारी ते घालायचे.


"पप्पांनी आता काही दिवसांपूर्वी नवीन सफारी शिवून घेतला आहे. तोच त्यांना घातला गेला पाहिजे." मी सगळ्यांना सांगितले.


पप्पांचा नवीन ड्रेस मी कपाटातून काढून दिला.

"थांब मी हा ड्रेस इस्त्री करुन आणतो. पप्पांनी आजवर विना इस्त्रीचा ड्रेस कधीच घातला नाही, तर शेवटच्या प्रवासाला जाताना तरी ते इस्त्री न केलेला ड्रेस कसा घालू शकतील?" अक्षयने सांगितले.


एरवी पप्पांच्या ड्रेसला इस्त्री करुन आणण्यासाठी अक्षय नेहमी कटकट करायचा, पण आज मात्र स्वतःहून त्याने ड्रेस इस्त्री करुन आणला आणि स्वतःच्या हाताने तो ड्रेस त्यांना घातला.


रात्री अकराच्या सुमारास माझ्या दोघी बहिणी घरी पोहोचल्या. त्या आल्यावर झालेला आमचा आक्रोश आठवला की अंगावर काटा येतो. कोरोना असल्याने जवळचे नातेवाईक कोणीच आले नव्हते. आधीच आम्ही भावनिक दृष्टीने खचलो होतो, त्यात आपले नातेवाईक आले नाही, हे बघून जास्त खचलो होतो. 


आईच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले, तिच्या बांगड्या फोडण्यात आल्या, तिचे मंगळसूत्र तोडले गेले. तो क्षण बघवला जात नव्हता. 


 पुढील काही वेळातच आम्ही पप्पांना शेवटच्या प्रवासासाठी स्मशानभूमीच्या दिशेने घेऊन गेलो. आमच्याकडे चितेला फेऱ्या मारुन मुला व मुलीने पाणी देण्याची पद्धत आहे. मी व अक्षयने पप्पांना पाणी दिले. पाणी देताना पप्पांना शेवटचं डोळे भरुन बघून घेतलं. आता आपण पप्पांना कधीच बघू शकणार नाही, ही कल्पना करुनचं त्यावेळी जास्त रडायला येत होतं.


स्मशानभूमीतून घरी परतताना पावलं जड झाली होती, कारण आपलं घर पप्पांशिवाय कसं असू शकतं? ज्या घरात पप्पा नसतील, त्या घरात आपण कसे राहू? हे विचार मनात येत होते.


माझ्या बहिणीच्या मुलीला त्रास होऊ नये, म्हणून आम्ही तिला काहीच सांगितलं नव्हतं, तिला स्मशानभूमीत पण नेलं नव्हतं. बिचारी मास्क लावून एका खुर्चीत आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे बघत होती. तिला काही कळू नये, म्हणून मी तिला घरात नेलं, पाणी प्यायला दिलं व तिच्या हातात मोबाईल दिला, जेणेकरुन ती काही प्रश्न विचारणार नाही. 


ती माझा हात हातात घेऊन म्हणाली,

"डॉक्टर मावशी तू रडू नकोस, नाहीतर मी पण रडेल. अग जे माणूस जन्माला येतं, ते मरतचं ना. काही होत नाही."


हे असं बोलणं एका सहा वर्षांच्या मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मला अजून भरुन आलं होतं. मी त्यावेळी कसंबसं स्वतःला कंट्रोल केलं. किती सहजासहजी तिने तिच्या बाबांचं जाणं ऍक्सेप्ट केलं होतं.


ती रात्र सगळ्यात भयानक रात्र होती. शरीरात त्राण नव्हते. अंगातून गरम वाफा निघत होत्या. मन अशांत होतं, सतत काही ना काही विचार येत होते. डोळे जड पडले होते, पण काही केल्या झोप लागत नव्हती. डोकं सुन्न झालं होतं. शेजारी झोपलेल्या आईला रात्री कितीतरी वेळेस उठून चेक करत होते. आईला काही होणार तर नाही ना, ही भीती सतत मनात वाटत होती. कधी एकदा सकाळ होते असं झालं होतं.


वडील नावाचं छप्पर काय असतं? हे त्यावेळी जाणवलं होतं. नकळतपणे अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या होत्या. आपल्या आयुष्याच्या पुढील प्रवासात आपले पप्पा सोबत नसतील ही कल्पना करवत नव्हती.


दुसऱ्या दिवशी राख गोळा करुन अक्षयच्या दोन मित्रांसोबत राख पाण्यात टाकण्यासाठी मी एकटी गेले होते. अक्षयला गावाची वेस ओलांडायची नसल्याने तो सोबत येऊ शकला नव्हता. पाण्यात राख सोडताना सहज मनात विचार येऊन गेला की, माणसाचे आयुष्य किती क्षणिक असते, या राख पाण्यात मिसळल्या बरोबर त्यांचं सगळं अस्तित्वचं नष्ट होऊन गेल्यासारखं वाटलं होतं.


पुढील दोन तीन दिवसांनी आईला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, तर तिला कोरोना डिटेक्ट झाला. आईच्या अनुपस्थितीत पप्पांचे सर्व विधी आम्हालाच करावे लागले होते. नातेवाईक, शेजारी कोणी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. 


दररोज सलाईन घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी लागत होती, अंगात त्राण नसताना हे सगळं करणं अशक्य होत होतं. दोन घासांच्या पुढे जेवण जात नव्हतं. कमालीचा अशक्तपणा आलेला होता. मनसोबत शरीर थकत चाललं होतं. पण कर्तव्य शांत बसू देत नव्हते. अँबुलन्सचा आवाज ऐकला तरी अंगावर काटा यायचा.


पप्पांचे सर्व विधी विधिपूर्वक पार पाडले. पप्पांच्या चौदाव्याचा विधी केल्यावर आईला हॉस्पिटल मधून घरी आणण्यासाठी मी व अक्षय गेलो होतो. गेल्या सात ते आठ दिवसात आईला बघितले नव्हते. पावणे दोन लाख हॉस्पिटलचे बिल भरले. वार्डबॉयने आईला कोरोना वार्डमधून आणून आमच्या ताब्यात दिले. आईच्या तब्येतीकडे बघवत नव्हते. सात दिवसात तिचे दहा किलो वजन घटले होते. आता आईला पूर्णपणे बरं कसं करायचं? हा प्रश्न समोर उभा राहिला होता. आईला गाडीत बसवल्यावर अक्षयने विचारले की,


"हे आपल्याच नशिबात का? इतकी वर्षे पप्पांचं आजारपण काढलं, त्यांना आपण गमावलं. आता आईला कसं बरं करायचं?" 


पप्पांच्या आजारपणाच्या वेळी आई भक्कम होती, पण आईच्या वेळी आम्हाला भक्कम राहणं गरजेचं होतं. आमची आई पूर्ववत व्हायला पुढील चार महिने लागले. आईला पूर्ववत बरं करताना मानसिक व भावनिक त्रासाला सामोरे जावे लागले.


माझ्या आयुष्यातील ते चौदा दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. या काळात आपलं कोण? परकं कोण? हे समजलं. त्या दिवसांत आपण पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकू की नाही, ही शंका कायम वाटत होती. याच चौदा दिवसांनी समोर येणाऱ्या संकटांशी लढण्याची ताकद मला दिली आहे. मला सक्षम बनवलं.

©®Dr Supriya Dighe