आयुष्य...!

आयुष्याचे परिमाण.
या व्यावहारिक जगात जगताना प्रत्येकाला अपेक्षित असते ती फक्त औपचारिकता... व्यावहारीक आयुष्याच्या प्रत्येक साच्यात स्वत:ला त्यानुसार तोलण्याची जणू स्पर्धाच असते एकमेकांच्यात. या साचेबद्ध क्रमवारीत स्वत:ची गणती होण्यासाठी काय नाही करत आपण? सगळंच तर करतो पण याचा शेवट मात्र आपल्याला उमगत नाही. किंबहुना ते शेवटचं टोक आपल्या वेळेप्रमाणे धावणाऱ्या परिमाणामध्ये नकळत आपल्यालाच अपेक्षित नसतं...!
दोन घडीचे व्याही म्हणून आपण ज्या तरतूदींना आपल्या जीवनात प्रवेश दिलेला असतो. तिथे तेच प्रत्येक गोष्ट बनून जणू आपल्यासहित आपल्या परिणामांना मोडीत काढून आपल्यादेखत आपल्या ठायी विराजमान होतात. आणि परत व्याही बनतो ते दस्तूरखुद्द आपण, आपल्याच जीवनात... हीच असते प्रत्येक माणसाची व्यावहारिकता आणि जगण्यातली औपचारिकता. याच तथाकथित अभिनिवेशात आपण बसत नसू तर माणूस त्यात पराकाष्ठेने स्वत: ला झोकून देऊ पाहतो. किंवा स्वत:ला यातून बाहेर काढण्याच्या आणि अलिप्त राहण्याच्या जिज्ञासेपोटी स्वत:लाच संपवतो.