Dec 01, 2023
कविता

आयुष्य..

Read Later
आयुष्य..

आयुष्यात खुप
सारी स्वप्नं पाहिली
पण काही स्वप्नं
अपूर्णचं राहिली

का कुणास ठाऊक
असे का झाले?
प्रयत्न कमी पडले
की नशीब आडवे आले

जे काही हवे होते
ते तर नाही मिळाले
पण जे लाभले
ते आनंदाने स्विकारले

कधी तरी प्रयत्नांती
यश पदरी पडले
तर कधी आलेल्या
अपयशांना ही पचविले

कधी हव्या वाटणाऱ्या
सुखांचे स्वागत ही केले
तर कधी नको वाटणाऱ्या
दुःखांनाही सामोरे गेले

जीवनात कधी हसले
तर कधी खुप रडले
जीवन जगता जगता
जगण्यास मात्र शिकले

जीवनरूपी संघर्षात
खुप काही मिळविले
पण आयुष्यातील
बरेचं काही गमवावेही लागले

आयुष्यातील आनंदाचे
कण अन् कण वेचले
पण दुःखरूपी शल्याने
मनही घायाळ झाले

जीवनाच्या संगीतात
कधी उत्साहाचे सूर गवसले
तर कधी नैराश्याने
संगीतच बेसूर झाले

आयुष्यात प्रवासात
सोबती भेटत गेले
आणि सुखदुःखाचे
वाटेकरी बनत गेले

मागे वळून पाहताना
आयुष्याने काय दिले?
या प्रश्नाचे उत्तर
अजूनही नाही सापडले

उत्तर शोधता शोधता
जीवन संपत चालले
कडू गोड क्षण
मात्र आठवणीत राहिले


स्वतःसाठी जगताना
इतरांसाठी जगण्याचे ठरविले
सुंदर आयुष्य दिल्याबद्दल
देवाचे आभार ही मानले
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//