
सिद्धी भुरके ©®
"ए साकेत बघ ना आपल्या ग्रीसच्या ट्रिपचे फोटो किती छान आलेत.. काय कमाल ट्रिप केली ना आपण.. "
जुई साकेताला आपल्या लॅपटॉपवर त्यांच्या ट्रिपचे फोटो दाखवत होती.
"हो ना.. सगळं एकदम परफेक्ट प्लॅनिंग होतं.. ट्रीपचं आणि आयुष्याचं पण.. अगदी आपण ठरवलं होतं तसंच घडतंय ना सगळं.. माझा तर विश्वासच बसत नाहीये."साकेत म्हणाला.
"हो ना अरे.. बघता बघता मला तिसरा महिना पण लागला.. काही महिन्यांनी बाळ आपल्या हातात असेल.. किती भारी ना.. "जुई साकेतच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली..आणि दोघे कॉफी पीत जुन्या आठवणीत रमून गेले.
जुई आणि साकेत यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. जुई इंटिरियर डीझायनर होती तर साकेत आर्किटेक्ट होता. आपल्या ध्येय, आकांक्षा समजून घेणारा नवरा जुईला हवा होता आणि साकेतला पण करिअर ओरिएंटेड मुलगी हवी होती..म्हणूनच दोघांनी एकमेकांना पसंती दिली होती. त्या दोघचं आयुष्याचं अगदी परफेक्ट प्लांनिंग झालं होतं.. म्हणजे पहिले 3 वर्ष आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि त्या नंतर बाळाचं प्लांनिंग करायचं.. आणि हो ते पण छान रोमँटिक ठिकाणी एखादी ट्रिप करून.. आणि ठरल्याप्रमाणे ग्रीसची ट्रिप करून आल्यावर जुईला दिवस गेले होते. राजा राणीचा संसार अगदी सुखाचा चालू होता.. अगदी त्यांनी प्लॅन केला होता तसा..
जुईचे नऊ महिने अगदी लाडाकोडात गेले.. सासूबाई येऊन राहिल्या होत्या काय हवं नको बघायला.. तिने अगदी नवव्या महिन्यापर्यंत जॉब केला आणि मग रजा घेऊन आईकडे राहायला गेली. काही दिवसातच जुई आणि साकेतच्या आयुष्यात एक गोंडस सुंदर मुलगी पियूच्या रूपाने आली. आईकडे जुईने चांगला आराम केला.. बाळाला आणि जुईला काय हवंय नकोय ते तिच्या आईने अगदी नीट पाहिलं आणि तीन महिन्यानंतर जुई पियूसोबत सासरी परतली.
सुरवातीचे काही महिने सासूबाई होत्या जुईची मदत करायला पण आता बरेच महिने साकेतकडे राहिल्याने त्यांना गावाकडे जाणं भाग होतं... आणि तसं बघायला गेलं तर पियू आता सहा महिन्याची झाली होती. सगळं काही व्यवस्थित जुईला समजावून त्या गावी परतल्या. जुईची खरी कसोटी आत्ता सुरु झाली. घरातलं सगळं बघून पियूचं तिला करावं लागत होतं पण ती सगळं करत होती. पण काही दिवसात जुईमध्ये बदल झाला. नेहमी नीटनेटकी राहणारी जुई आता कसंही राहू लागली, सगळ्या जगाचा भार तिच्या अंगावर पडलाय असं वागून सारखी चिडचिड करू लागली... नेहमी नवनवीन डिझाईन आणि ट्रेंड बद्दल बोलणारी ती सतत फक्त आणि फक्त पीयूचा विचार करू लागली. साकेतने जुईमधला बदल पाहिला, त्याला वाटले तिने स्वतःला थोडा तरी वेळ दिला पाहिजे.. त्याला पुन्हा पूर्वीची जुई बघायची होती.
तो आता ऑफिस मधुन लवकर घरी येऊ लागला, पियूची जबाबदारी घेऊ लागला, जुईसाठी त्याने काही इंटिरियरची मासिके आणली जेणेकरून तिला आपण करिअर पासून तुटलो आहोत असं वाटणार नाही, तिच्यासाठी नवीन कपडे आणू लागला म्हणजे ती आधीसारख राहू लागेल.. पण या सगळ्याचा जुईवर फार काही परिणाम झाला नाही.. तिची सतत चिडचिड चालू होती.. उलट ती आता सतत पालकत्वाची पुस्तकं वाचू लागली.. सतत बाळाचे संगोपन वगैरे व्हिडीओ बघू लागली.. ती पूर्णपणे स्वतःला पियू समोर विसरून गेली होती..
एक दिवस साकेतने डिनरचा प्लॅन केला.. त्याने स्पष्टच जुईला सांगितलं कि एक दोन तास आपण पियूला तुझ्या आईकडे ठेवू.जुईचे काही मन होईना पण साकेतने तिचं एक ऐकलं नाही. थोडा वेळ तरी जुई वेगळ्या वातावरणात गेली कि तिला बरं वाटेल असं त्याला वाटत होतं.
ठरल्याप्रमाणे दोघे बाळाला आजीकडे ठेवून बाहेर गेले.
बऱ्याच दिवसांनी जुई आणि तो बाहेर आल्याने साकेत खुश होता.
"काय मागवायचं गं.. तुझं आवडतं चायनीज?? " साकेतने विचारले..
"काही पण.. तुला हवं ते मागव.." जुई म्हणाली.
"साकेत मी आईला एक फोन करू का.. पियू रडत नसेल ना?" जुईने विचारलं.
"अगं तसं काही असतं तर त्यांचा फोन आला असता तुला.. तू टेन्शन घेऊ नकोस.. बरं मग कधी ऑफिस जॉईन करणारेस.. अगं सध्या रस्टिक डिझाईनचा ट्रेंड आलाय.. "बोलून साकेतने विषय बदलला.
पण जुई फक्त आणि फक्त पियू विषयी बोलत राहिली.. आता तिला कोणती खेळणी आणली पाहिजे.. तिचे कपडे कुठून घ्यायचे या व्यतिरिक्त तिच्याकडे विषयच नव्हता दुसरा.
आता साकेतला रहावेना तो चिडून बोलला "जुई अगं बास.. जगात तू एकटी आई झाली नाहीयेस.. काय झालय तुला.. तू स्वतःला विसरून गेलीयेस.. थोडा वेळ तरी दे स्वतःला.. सारखं काय पियू पियू करतेस???
तू पियूची आई आहेस पण माझी बायको आहेस हे विसरू नकोस.. मी कधी बघणार आधीच्या जुईला? "
जुईला साकेतचे बोलणे सहन झालं नाही.. ती चिडून टेबलवरून उठून न जेवता सरळ पार्किंग लॉट मधे गेली.. साकेतही पटकन बिल भरून तिच्या मागे गेला..
"जुई काय वागणं आहे हे? "त्याने विचारलं..
"तुला बाळ नकोय का.. तू असं का बोलतोय मला.. मी काय करतीये जगावेगळं?? फक्त माझ्या बाळाची काळजी घेतीये.. "जुई रडत म्हणाली.
"अगं ती माझी पण मुलगी आहे.. पण तू फक्त आणि फक्त तिची काळजी घेतीये.. स्वतःची नाही.. माझं एवढंच म्हणणं आहे तू स्वतःला थोडा वेळ दे.. मी पण जमेल तशी मदत करतोय तुला पियुला सांभाळायला." साकेत म्हणाला.
"तुला वाटतंय इतकं सोपं नाहीये साकेत हे आईपण.. जाऊ दे तुला नाही कळणार.. "म्हणून जुई गाडीत जाऊन बसली.
साकेतही काही न बोलता गाडीत बसला.. तिच्या आईकडून पियुला घेऊन दोघे घरी आले. एकमेकांशी काहीही न बोलता तसेच झोपून गेले.
एकमेकांशी अबोला धरल्याने दोघांना झोप येत नव्हती. "साकेत काही चुकीचं बोलला नाही.. खरंच आपण खूप गुरफटून गेलोय.. अर्धा तास तरी स्वतःला दिला पाहिजे" असं जुईला वाटू लागलं..
आणि "आपण खूप बोललो जुईला.. बिचारी आपल्या बाळासाठी करतीये सगळं.. समजून घेतलं पाहिजे तिला " या विचाराने साकेतला झोप येत नव्हती.
जुई सकाळी लवकरच उठली.. तिने साकेतचा डबा केला..पण साकेत तिच्याशी काहीही न बोलता डबा घेऊन तसाच निघून गेला ऑफिसला..
त्याचं मन काही लागत नव्हतं कामात.. लंच ब्रेक कधी झाला ते समजलंच नाही त्याला..त्याने डबा उघडला तोच त्याला जुईने लिहिलेली एक चिट्ठी मिळाली.. आणि तो वाचू लागला..
"प्रिय साकेत,
आज बऱ्याच गोष्टीसाठी तुझी माफी पण मागायची आहे आणि आभार पण. खरंच किती बदलीये ना मी.. लग्नानंतर काही वर्षांनी तुला अशी जुई बघायला मिळेल अशी अपेक्षाच केली नसशील. नेहमी चीड चीड करते.. जणू काही जगाचं ओझं वाहतीये असे चेहऱ्यावर भाव असणारी जुई नवीनच आहे ना तुझ्यासाठी. पण काय करू ही छोटीशी पियू आहे ना तिने माझं आयुष्यच बदलून टाकलं.
कारण आज डिझाईनची मासिके सोडून मी बाळाचे संगोपन अशी पुस्तकं वाचते..शॉपिंग पण तिच्या कपड्यांची करते आणि खरं सांगू का ती एकदम आत्मविश्वासी जुई आता पियू जरा पडली तरी घाबरते.. बरं हे एवढं सगळं घडतंय माझ्या सोबत तरी मला काहीच हक्क नाहीये चीड चीड करायचा.
कारण या प्रवासात तू नेहमी माझ्या सोबत उभा आहेसच रे. पियू रात्री झोपली नाही कि माझ्यासोबत तू पण जागा राहतोस.. तिने कधी खाल्लं नाही तर तिला भरवायला मदत करतोस.. वेळ आली तर तिला झोपवतोस सुद्धा..
आता एवढे दिवस सगळं निभावलं आहेस तर अजून काही दिवस काढ कारण आपलं बाळ ना अजून खूप लहान आहे.. तिला आत्ता आपली खूप गरज आहे. उद्या जेव्हा ती मोठी होईल ना मग आहोतच तू आणि मी..
पुन्हा ते दिवस जगूया.. date वर जाऊया.. लॉन्ग ड्राईव्हची मजा घेऊया.. रात्रभर जागून खूप गप्पा मारूया.. आणि मागे वळून जेव्हा या दिवसांची आठवण येईल तेव्हा म्हणू कि तुझ्या मदतीने आयुष्यातला अवघड गड पण आपण सर केला... मी तुला खात्रीने सांगते कि आजपासून स्वतःला मी वेळ देणार... माझ्या आवडी निवडी जपणार.. बास नेहमीसारखा तू असाच माझ्यासोबत रहा...
तुझीच जुई"
ती चिट्ठी वाचून साकेतला खूप बरं वाटलं.. त्यालाही समजलं कि आत्ता पियुला जास्त गरज आहे आपली आणि जुईने प्रॉमिस पण केलंय कि ती स्वतःला वेळ देणार.. अजून काय हवय आपल्याला.. त्याने लगेच जुईला फोन केला..
"जुई सॉरी अगं.. मला आता समजलंय पियू खूप लहान आहे तिला आत्ता आपण वेळ देऊ.. मी काल तुला जरा जास्तच बोललो गं.. "
"अरे तू काही चुकीचं बोलला नाहीस..आहे आत्ता पियुला गरज म्हणून मी स्वतःला विसरून जाणं चुकीचं आहे ... तू माझ्या चांगल्यासाठी बोललास.. मला चांगलंच कळून चुकलंय कि सगळ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करता येत नाही आयुष्यात.. बाळ झालं कि त्याच्या प्रमाणे बदलावं लागत हे खरंय पण स्वतःच अस्तित्व पण टिकवून ठेवता आलं पाहिजे.. पियूची आई तर आहेच त्यासोबत जुई म्हणून पण माझी ओळख आहे.. चल ये संध्याकाळी लवकर घरी.. घरातच आज डिनर date करूया... " आणि जुईने छान घर सजवून डिनरची तयारी केली...
कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा.. माझाच अनुभव मी कथेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय.. प्रवाहासोबत वाहत न जाता स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने साथ दिलीये.. धन्यवाद..
सिद्धी भुरके©®