Dec 06, 2021
मनोरंजन

ह्याला जीवन ऐसे नाव भाग 4

Read Later
ह्याला जीवन ऐसे नाव भाग 4

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

                                                   भाग 4

भाग 3 वरून पुढे  वाचा .....

 

एक दिवस मॅडम म्हणाल्या की पंडित, मला उद्या वेळ आहे. जे काही सामान, सुमान आणायचं आहे त्यांची लिस्ट करून ठेव. उद्या शनिवारी दुपार नंतर मला वेळ आहे. आपण सुपर मार्केट मध्ये जाऊ.

 

सुपर मार्केट मध्ये बरीच गर्दी होती आणि खरेदी आटपता आटपता रात्रीचे आठ वाजले. मॅडम म्हणाल्या की पंडित आता घरी जावून स्वयंपाक करायचा, त्यापेक्षा आपण इथे एक चांगलं हॉटेल आहे तिथेच जेवू. पंडितला नवल वाटलं. त्याच्या हे आधीच  लक्षात आलं होतं की हळू हळू त्याच्याकडे बघण्याचा मॅडम चा दृष्टीकोन बदलत चालला आहे. आणि पूजे नंतर तर बराच फरक पडला होता. घरातलाच एक माणूस समजून आता मॅडम त्याच्याशी वागत होत्या. नोकर, मालकाचं नातं केंव्हाच संपलं होतं.

 

जेवण झाल्यावर, पार्किंग मध्ये गाडी काढायला जातांना दुसरी गाडी अचानक रिर्वस मध्ये येऊन त्या गाडीने मॅडम ला उडवलं. त्या वेळी पंडित सामान गाडी मध्ये ठेवत होता. तो लगेच धावला, मॅडम पडल्या होत्या त्यांना उठवायचा प्रयत्न करत होता पण त्यांना उठता येत नव्हतं. तो दूसरा गाडीवाला पण थांबला. त्यांनी मदत केली आणि मॅडमना मागच्या सीटवर झोपवलं. त्यांनी आपलं कार्ड दिलं आणि म्हणाला माझी चूक झाली आहे आणि जो काही खर्च येईल तो देईन. तो तर निघून गेला.

मॅडम कारच्या मागच्या सीट वर विव्हळत होत्या. त्यांना ताबडतोब हॉस्पिटल नधे नेण आवश्यक होतं. पंडित ने त्यांनाच विचारलं की कोणच्या हॉस्पिटल मध्ये जायचं. त्यांनी हॉस्पिटलच नाव सांगितलं. पंडितने मोबाइल वर गूगल मॅप  लावला आणि ड्रायव्हिंग सीट वर बसला. हॉस्पिटलला पोचल्यावर सगळ्या गोष्टी पटापट झाल्या. क्ष किरण तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले की पायाचं हाड मोडलं आहे आणि ऑपरेशन करावं लागणार आहे. उद्या सकाळी ऑपरेशन करू. आणि त्यांना अॅडमिट करून घेतलं. मॅडम नी सांगितल्या प्रमाणे, पंडितने त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला विषाखाला फोन केला. अर्ध्या तासात त्या आणि त्यांचे पती दोघेही येऊन पोचले. रात्रभर सर्वच  हॉस्पिटल मध्ये होते.

 

चार दिवसांनी मॅडम घरी आल्या. पायाला प्लास्टर लावलं होतं. नंतर वेगळच रुटीन सुरू झालं. दिवसभर एक बाई देखभाल करायला असायची. ती रात्री नऊ ला गेली की मॅडम झोपायला जायच्या. दिवसभर पंडित मॅडम च्या सेवेत असायचा. त्यांना काय हवं नको सगळं निगुतीने बघायचा. संध्याकाळी कोणी ना कोणी चौकशी करायला येऊन जायचं. त्यांच्या समोर मॅडम सतत पंडितची तारीफ करायच्या. पंडितला अवघडल्यासारखं व्हायचं. या काळात मॅडम दिवसभरच घरी असायच्या त्यामुळे पंडित आणि मॅडमच्या बऱ्याच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. एक दिवस त्यांनी पंडितला विचारलं की  इतक्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला बरीच माहिती कशी काय आहे ? तेंव्हा पंडित ने सांगितलं होतं की त्याला वाचनाची खूप आवड होती त्यामुळे बरीच माहिती त्याच्याजवळ गोळा झाली आहे.

 

आणि पूजा आणि मंत्र ? ते केंव्हा शिकला ? त्याच्यासाठी तर बरीच वर्ष खर्ची घालावी लागतात. पण एवढी वर्ष घालवून सुद्धा तू म्हणतोस की तू पौरोहित्य करणार नाहीस म्हणून, हे कसं काय ?

 

मग पंडितनी त्याची नोकरी वगैरे वगळून बाकी नर्मदा परिक्रमांची कथा सांगितली. एक दिवस त्यांनी विचारलं की

पंडित तू लग्न का नाही केलंस ? कोणी मुली सुचवल्या नाहीत का ?

बऱ्याच मित्रांनी आणि त्यांच्या बायकांनी प्रयत्न केलेत पण नाही जमलं. बहुधा माझ्या लग्नाचा योग नसावा. मग मी ही सोडून दिलं. एकटा जीव सदाशिव. छान चाललं आहे की.  तो विषय मग तिथेच थांबला.

 

एक दिवस रात्री मॅडम ला भयंकर स्वप्न पडलं आणि त्या दचकून जाग्या झाल्या. मॅडमची बोबडी वळली होती दरदरून घाम सुटला होता. घशाला कोरड पडली होती. जीभ टाळूला चिकटली होती. गुदमरल्यासारखं होत होतं. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पाण्याची बाटली शेजारच्या टेबलावर होती. ती घेण्यासाठी हात लांब केला तर धक्का लागून बाटली खाली पडली. बाटली घरंगळत बहुधा पलंगा खाली गेली असावी कारण डोळे ताणून सुद्धा दिसत नव्हती. बेडस्वीच दाबून दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण दिवे गेले होते. मॅडम ने इलेक्ट्रिसिटी बोर्डाला मनातल्या मनात लाखोली वाहिली. पंडित ला बोलावण्यासाठी कॉल बेल लावली होती त्याचा पण उपयोग नव्हता.  पायाला गुढ्ग्या पासून प्लास्टर होतं त्यामुळे पाय वाकत नव्हता. तश्याच अवस्थेत मॅडम कशाबशा खाली उतरल्या, आणि जमिनीवर बसल्या. बसल्यावर लक्षात आलं की त्या पाण्यात बसल्या आहेत. बाटलीतल पाणी सांडलं होतं. तशातच थोडी शोधाशोध केल्यावर बाटली सापडली. त्यांनी आधाशासारखी बाटली तोंडाला लावली. बाटलीत जेमतेम दोन चमचे पाणी होतं. तहान तर नाही भागली पण कोरड शमली. उठणं शक्यच नव्हतं मग तशाच बसून राहिल्या. केंव्हा जमिनीवरच आडव्या झाल्या ते त्यांना पण कळलं नाही.

 

सकाळी पंडित त्यांच्या खोलीत चहा घेऊन गेला तेंव्हा मॅडम जमिनीवर झोपल्या होत्या. पंडितला वाटलं की त्या पलंगावरून पडल्या आणि बेशुद्ध झाल्या आहे. त्यानी जोरजोरयात हाका मारल्या आणि चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला. मॅडम जाग्या झाल्या. आणि उठून बसल्या. चेहऱ्यावर अत्यंत त्रासिक भाव होते. एक क्षणही न घालवता त्यांनी पंडित वर आग ओकायला सुरवात केली. पंडित चुपचाप काही न बोलता उभा होता. पांच मिनिटानंतर त्यांचा राग शांत झाला. मग म्हणाल्या की

 

नुसता बघत काय उभा राहिलास, मला उठायला मदत कर. पलंगावर बसायचय.

नंतर पंडित ने त्यांना चहा बिस्किटे दिली. चहा प्यायल्यावर मॅडम नेहमीच्या मूड मध्ये आल्या.

काय झालं मॅडम खाली कशा पडल्या ? पंडितने विचारलं.

मग मॅडम नी सगळी कथा सांगितली. आणि म्हणाल्या की

पंडित तू आत्ताच शेजारच्या खोलीत शिफ्ट हो. काल रात्री इथे असतास तर आवाज ऐकून तू आला असतास. आणि पुढचं रामायण टळलं असतं. 

 

पण मॅडम माझ्यासारख्या नोकर माणसाने घरात राहणं म्हणजे लोकांना बोलायला संधि देण्या सारखं होईल.

तुझ्या अंगाला भोकं पडतील ?

नाही.

मग माझं मी बघून घेईन. तू चिंता करू नकोस. आणि पंडित, एक तरी  असा प्रसंग सांग की, जेंव्हा मी तुला नोकरा सारखं वागवलं आहे ?

नाही मॅडम, तो तुमचा मोठेपणा आहे. पण लोकांच्या दृष्टीने हे विचित्र आहे.

माझी सोय बघायला लोक येणार आहेत ? नाही ना, मग मी सांगते तस कर. शेजारच्या रूम मध्ये शिफ्ट हो. त्या रूम मध्ये सगळी सोय आहे. तुला काहीच त्रास होणार नाही.

ठीक आहे मॅडम.

 

सव्वा महिना झाला आता चार दिवसांनी प्लास्टर निघायचं होतं. त्या दिवशी रात्री बेडपॅन ची गरज लागली. रात्रीचे अकरा वाजले होते आणि बाई तर निघून गेली होती. आता काय करायचं ? मॅडम आणि पंडित दोघेही संकटात सापडले. थोडा वेळ तसाच गेला. पण आता मॅडम ना असह्य व्हायला लागलं होतं. शेवटी पंडितला त्यांच्या कडे बघणं कठीण झालं. तो म्हणाला

 

मॅडम प्राप्त परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग मला सुचतो आहे. तुम्ही संकोच बाजूला ठेवा. मी बेडपॅन देतो. मी कोणाला काही सांगाण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही पण सांगू नका आणि विसरून जा.

मॅडमचा चेहरा शरमेने काळवंडून गेला. पण दूसरा उपाय त्यांना पण सुचत नव्हता शेवटी त्यांनी नाईलाजाने मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी पंडित चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेला तेंव्हा मॅडम म्हणाल्या की

पंडित मला खूप लाज वाटते आहे. काल तुला माझी नको ती सेवा करावी लागली. काय करू मी ? सॉरी.

मॅडम प्रसंग सगळ्यांवरच कधी ना कधी येत असतात. त्यांची वाच्यता न करणेच श्रेयस्कर. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ.

 

महिना भरानंतर मॅडमनी पुन्हा बँकेत जायला सुरवात केली. मॅडम ड्राइव करणं शक्यच नव्हतं. त्यांनी मैत्रिणीला फोन केला की कोणी रिक्शा वाला आहे का जो ने आण करेल. ती चौकशी करते अस म्हणाली. पण मग म्हणाली की पंडितलाच विचार, त्यानीच तुला दवाखान्यात नेलं होतं त्या दिवशी. मॅडम ला पण आठवलं, त्यांनी पंडितला विचारलं आणि पंडित हो म्हणाला. आता पंडितची धावपळ  सुरू झाली. सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून स्वयंपाक करायचा ,डबा भरायचा आणि मॅडमला बँकेत सोडून यायचं. संध्याकाळी पुन्हा घ्यायला जायचं. आल्यावर चहा नाश्ता मग रात्रीच्या जेवणाची तयारी सगळं आटपायला रात्रीचे अकरा वाजायचे. दिवस भराभर जात होते. विचार करायला फुरसत नव्हती. एक दिवस बँकेतून येतांना मॅडम जरा वैतागलेल्या दिसल्या. नेहमीची प्रसन्न मुद्रा नव्हती.

 

घरी आल्यावर त्याने चहा देता देता विचारलं. काय झालं मॅडम चेहरा जरा उतरलेला दिसतोय ? काही प्रॉब्लेम आहे का ?

या मेडीक्लेम चा काही तरी घोळ झालेला दिसतोय. काय करावं समजत नाहीये. मी हे पहिल्यांदाच करते आहे म्हणून गोंधळ उडाला आहे.

काय झालं काय पण ?

मग मॅडमनी काय झालंय ते सांगितलं आणि म्हंटलं म्हणून क्लेम मिळत नाहीये. पण तू का विचारतो आहेस ? तुला काही कळतंय का त्याच्यातलं ?

 

पंडित नी काही न बोलता त्याच्या ऑफिस मध्ये फोन लावला. पंडितचा फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर  मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला  आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्याच्याकडे चकित नजरेने पहात होत्या.

 

माझ्या मित्राला सांगितलं आहे बघू तो काय करतो ते.  तुम्ही आता आराम करा मी आता संध्याकाळच्या तयारीला लागतो. आज काय करू ?

अरे, तू जे काही करशील ते मला आवडेल.

संध्याकाळी मॅडम ला मेसेज आला की त्यांचा क्लेम अप्रूव झाला आहे.

गेल्या महिन्यायाभरात आणखी एक development झाली होती. मॅडम आणि पंडित बरोबर एकाच टेबल वर जेवायला बसायला लागले. जेवतांना मॅडमनी विचारलं की पंडित तू असा कोणाला फोन केला होतास की दोन तासात approval चा sms आला ? तुझी इतकी पोहोच कशी ? दर वेळेला टाळाटाळ करतोस आज तरी सांग.

 

पंडितलाही वाटलं की आता सगळं सांगूनच टाकाव. परिणाम काहीही होवोत. मग त्यानी सुरवाती पासून सगळी कथा सांगितली. आणि रूम मध्ये जाऊन आपलं id card आणलं आणि मॅडम च्या समोर ठेवलं. आणि म्हणाला-  

तुमचं मेडीक्लेम आहे त्याच कंपनीत मी काम करत होतो.

 

मॅडम त्याच asst. general manager च कार्ड बघतच  राहिल्या. त्यांना समजेना की या पदावर असलेला माणूस अचानक नोकरी सोडून आपल्या कडे चौकीदार, आणि कुक म्हणून काम करत होता ? का ?

 

तिच्या मनातले विचार पंडितने ओळखले आणि म्हणाला-

मला जेंव्हा धोब्याने कामाची ऑफर दिली तेंव्हा मी सर्दच झालो होतो पण मग माझं माझ्या कपड्यांकडे लक्ष्य गेलं आणि मनात विचार आला की काय हरकत आहे, नाहीतरी अनुभव घ्यायलाच निघालो आहोत. म्हणून मी हो म्हंटलं. त्यानंतर मात्र जसं आयुष्य वळण घेत होतं तस तसा जात राहिलो. आता अजून एका मोठ्या वळणाची वेळ आली आहे. मी उद्याच एका हॉटेल मध्ये शिफ्ट होतो. इथे राहण्यात आता काहीच शहाणपणा नाहीये आणि प्रयोजन तर मुळीच नाही. Forgive me for everything. जर मी तुम्हाला जाणता आजाणता दुखावलं असेल तर I am sorry.

 

थोडा वेळ कोणीच बोललं नाही मग मॅडम म्हणाल्या –

तू आता जे काही सांगितलस ते फक्त तुला आणि मलाच माहीत आहे. तेंव्हा मला आठ दिवस आणखी दे. तो पर्यन्त मी नवी कुक शोधते. मला तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत ते पण ऐकायचे आहेत. They must be interesting. पण त्या बद्दल आपण नंतर बोलू. सध्या तरी तुझी आहे ती भूमिका चालू ठेव अशी मी तुला विनंती करते. I request, please.

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired