जीवन...एक संघर्ष!

About Struggles Of Life


जीवन .. एक संघर्ष!


"आई, आई...." असा नीलिमाचा मोठा आवाज ऐकून तिचा भाऊ, बहीण व वहिनी हे सर्व धावतचं रूममध्ये आले.

रूममध्ये येताच दिसले की, नीलिमा आईजवळ बसून रडत होती. त्यांची आई त्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेली होती.नीलिमा व तिचे बहीण भाऊ यांना आईच्या जाण्याने खूप दुःख झाले होते,ते दुःख अश्रूरूपातून एकसारखे वाहत होते. आईचे जाणे ही त्यांच्या आयुष्यातील कधीही न भरून निघणारी पोकळी होती.गेल्या काही दिवसांपासून तिची जी अवस्था होती, तिला जो त्रास होत होता,तो पाहून सर्वांनाचं वाईट वाटत होते. आई जिंवत असूनही नसल्यासारखीच होती. शरीराच्या क्रिया एकेक करून बंद झाल्या होत्या. फक्त श्वास सुरू होता आणि तो ही आज बंद झाला होता. तिचा जो मुक्तीसाठी संघर्ष सुरू होता, तिचे जर्जर शरीर व प्राण यांच्यात जो संघर्ष सुरू होता ,तो आज कायमचा संपला होता. आयुष्यभर तिने जगण्यासाठी संघर्ष केला होता आणि आयुष्याच्या अखेरच्या दिवसात थकलेले शरीर ,जडलेल्या अनेक व्याधी यामुळे जगण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा तिला मृत्यू जवळचा वाटू लागला होता आणि आयुष्यात तिला प्रत्येक गोष्ट संघर्ष करूनच मिळाल्यामुळे मृत्यूही खूप संघर्षानंतरच मिळाला होता.तिच्या मृत्यूने तिच्या आयुष्यातील सर्व संघर्षांचा अस्त झाला होता आणि तिच्या अशांत जीवाला शांतता मिळाली होती.
आपल्या आईच्या जाण्याने मुलांना दुःख झाले होतेच पण आपली आई आपल्या सर्वांसाठी जगली,लढली आणि तिने आयुष्यात जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी जो संघर्ष सहन केला होता तो आपल्यालाही खूप काही शिकवून गेला. आपल्या आईचे जीवन म्हणजे एक संघर्षच ! असेच मुलांना वाटत होते.


जानकी जन्माला आली व तिची आई हे जग सोडून गेली. पहिली मुलगीचं आणि ती न जाता आईच गेली यामुळे जानकी घरात कोणालाच नकोशी वाटत होती. आई गेली यात बिचाऱ्या मुलीचा काय दोष? उलट तिला आपल्या आईचे प्रेम मिळाले नाही, ही तिच्यासाठी किती दुःखाची गोष्ट! जानकीच्या जीवनातील संघर्षाला जन्मतःच सुरूवात झाली होती.

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, पण मुलगी म्हणून जन्माला येणे ,येथूनच मुलींच्या आयुष्यातील संघर्षाला सुरूवात होत असते.

जानकी जगली काय किंवा मेली काय ? कोणाला काहीही फरक पडणार नव्हता. त्यामुळे तिची कोणी चांगली काळजीही घेत नव्हते.

\"देव तारी त्याला कोण मारी\"
याप्रमाणे जानकी जगत होती. लहानाची मोठी होत होती.वडिल दुसरे लग्न करून संसारात रमले होते.आजीलाही वंशाचा दिवा मिळाला होता. सावत्र आई ही आईची जागा घेऊ शकत नाही. हे जानकीला जाणवत होते. जानकी जगायचं म्हणून कसंतरी जगत होती. छोट्या छोट्या गोष्टी तिला संघर्ष करून मिळत होत्या. आई गेल्यामुळे आईचे प्रेम मिळू शकत नव्हते पण वडील जिंवत असतानाही, वडिलांचे प्रेम तिच्या वाट्याला कधी येत नव्हते. वडिलांच्या ,भावाबहीणींच्या व
आईच्या प्रेमासाठी तिचं मन रडत होतं पण तिचं मन समजून घ्यायला घरात तिचं कोणी नव्हतं.

जानकी खूप हुशार होती आणि तिला शाळेत जायलाही आवडत होते. शिकून खूप मोठं व्हावं ,अशी तिची इच्छा होती. पण घरातल्यांना तिच्या लग्नाची घाई झाली होती.त्यामुळे ती सातवीत असतानाच तिचे लग्न करून देतात.
\"मला पुढे शिकायचे आहे,मला लग्न नाही करायचे.\" असे घरातल्यांना सांगून शिक्षणासाठी,आपल्या इच्छेसाठी तिने संघर्षही केला. पण तिची हार झाली होती.

नवरा तिला चांगला मिळाला होता. याबाबतीत ती समाधानी होती. आजपर्यंत तिला एवढं प्रेम करणारं आयुष्यात कोणी भेटलेलं नव्हतं.तिचंही आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं.सासूबाईंना कुलदीपक हवा होता आणि जानकीला पहिल्या दोन्ही मुलीचं झाल्या होत्या त्यामुळे अगोदरचं कडक वागणाऱ्या सासूबाई जानकीशी अजूनचं कठोरपणे वागू लागल्या. आपण मुलगी म्हणून जे भोगलं ते आपल्या मुलींनी भोगू नये म्हणून जानकी मुलींसाठी सासूबाईंना कधी समजावून सांगत तर कधी त्यांच्याशी भांडतही असे. एक आई म्हणून तिचा संघर्ष नेहमी सुरू असायचा.

स्त्री म्हणजे संघर्ष!
स्त्री कोणत्याही रूपात असली तरी तिला संघर्ष करावाचा लागतो.
मुलगी, सून,सासू,पत्नी, आई अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना तिला संघर्ष करावाचं लागतो.
ती मोठ्या पदावर काम करणारी स्त्री असो की गृहिणी असो. तिला कधी आपल्या लोकांसाठी इतरांशी संघर्ष करावा लागतो तर कधी आपल्या स्वतः साठीच कधी इतरांशी तर कधी आपल्याचं लोकांशी संघर्ष करावा लागतो.

दोन मुलीनंतर जानकीने कुटुंबाला कुलदीपक दिल्याने सासूबाई थोड्या सुखावल्या होत्या पण मुलींशी आणि जानकीशी कठोरपणेचं वागत होत्या.

आपल्या संरक्षणासाठी स्त्री पुरूषाशी संघर्ष करते पण जेव्हा एका स्त्रीला आपल्या संरक्षणासाठी दुसऱ्या स्त्रीशी संघर्ष करावा लागतो..यासारखे दुसरे दुर्दैव कोणते ?


\"आता सर्व काही छान सुरळीत होत रहावं.\" हीचं प्रार्थना जानकी देवाला करत असायची.
पण जानकी आणि संघर्ष हे देवाने तिच्या कुंडलीत लिहीलेलं असावं.

जानकीवर प्रेम करणारा,तिच्या आयुष्यातील एकमेव चांगला व्यक्ती, ज्यामुळे तिला जगण्याची इच्छा मिळाली होती , तिचा नवरा शेतात साप चावल्याने मेला. आणि जानकीला,मुलांना पोरकं करून गेला.
भाऊ गेल्याचे दुःख, भावाचा परिवार सांभाळण्याची जबाबदारी ,याची जाणीव तर नाही उलट जानकीचे दोघं दीर शेती,घर यातून तिला काहीही देण्यास तयार नव्हते.

कठीण प्रसंगात ज्यांच्या कडून मदतीची अपेक्षा असते. अशा नात्यांशीही आपल्या हक्कासाठी लढण्याची, संघर्ष करण्याची वेळ आपल्या आयुष्यात येत असते.

जानकीने आपल्या हुशारीने व मोठ्या संघर्षाने आपल्या हक्काची शेती व घर ,ज्यावर तिचा पूर्ण अधिकार होता ते सर्व मिळवले होते.

जे सहजपणे मिळू शकत पण जेव्हा ते मिळत नाही ,तेव्हा ते मिळविण्यासाठी संघर्ष करावाचं लागतो.

आपल्या हुशारीने, व्यवहार ज्ञानाने जानकी आपले जीवन जगू लागली व मुलांनाही वाढवू लागली.
आयुष्य जगताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला संघर्ष करावा लागला.पण जानकीने आयुष्यात हार कधी मानलीच नाही. तिने संघर्षाशी जणू मैत्रीचं केली होती. त्यामुळे तिच्यावर कितीही संकटे आली तरी तिला त्याचे भय वाटत नव्हते.
संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जो संघर्ष करतो तोचं जीवनात यशस्वी होत असतो.
हे तिला कळाले होते.

दोन्ही मुली व मुलगा यांना चांगले शिक्षण दिले. मुली लग्न करून सासरी गेल्या. मुली आपल्या संसारात सुखी होत्या. मुलालाही चांगली नोकरी होती.त्याचेही लग्न होऊन तो संसारात रमला होता.
आपल्या मुलांचे सुखी आयुष्य पाहून ,आपण केलेल्या संघर्षाचे चांगले फळ मिळाले व आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असे तिला वाटत होते.

तिच्या मुलांनाही तिचा खूप अभिमान होता. आपल्या आईचे आयुष्य म्हणजे एक खडतर प्रवास! तिच्या आयुष्यात होता फक्त संघर्ष आणि संघर्षचं !

आपल्या आईला सुखात ठेवण्याचा ते सर्व प्रयत्न करीत होते. पण काट्यांची सवय झालेल्यांना फुलेही टोचू लागतात.तसे
जानकीने आयुष्यात एवढी दुःख ,एवढा संघर्ष पाहिला होता की, तिला आता जीवनाकडून सुखाची
अपेक्षाचं उरली नव्हती.
ती स्वतः साठी कधी जगलीही नव्हती आणि आताही स्वतः साठी जगत नव्हती. ती मुलांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होती.

मुलांना आपल्या आईला सुखात पाहयचे होते,पण त्यांच्या आईच्या आयुष्यात सुख नाहीचं आहे, हे देवाने ठरविलेले होते.

जानकीला अनेक शारीरिक व्याधी सुरू झालेल्या होत्या. डॉक्टरकडे जाणे,वेगवेगळ्या टेस्ट करणे ,औषधं घेणे या सर्व गोष्टींचा तिला कंटाळा येत होता.
आता हे जीवनचं नको यासाठी तिचा संघर्ष सुरू होता.
थकलेल्या, व्याधींनी जखडलेल्या देहातून मुक्ती मिळावी व जीवाला शांतता मिळावी,अशीच तिची इच्छा होती.
मुले ती चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. जानकीची तब्येत चांगली होण्याऐवजी अजूनच बिघडत होती. तिच्या शरीराला होणाऱ्या वेदना,मनाची तगमग हे सर्व पाहून मुलांनाही त्रास होत होता,वाईट वाटत होते.

आपण दुसऱ्यांची दुःख समजू शकतो ,वाटूनही घेऊ शकतो पण शारीरिक त्रास हा ज्याचा त्यालाच सहन करावा लागत असतो.

मुलांचे आईवर खूप प्रेम होते पण तिला होणारा त्रास ते स्वतः घेऊ शकत नव्हते. तिलाच सहन करावा लागत होता.

जन्माला आल्यापासून संघर्ष करणाऱ्या आपल्या आईला सुखाचे मरणही येऊ नये.याचे त्यांना वाईट वाटत होते.
आणि खूप त्रास सहन केल्यानंतर आज आई आपल्याला सोडून गेली,तेव्हा ती आपल्याला सोडून गेली याचे दुःख जास्त की...तिचा जन्मापासून सुरू झालेला संघर्ष, तिचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि आता हे जग सोडून जाण्यासाठीही करावा लागलेला संघर्ष ..या सर्वांतून तिची सुटका होऊन तिला शांती मिळाली याचे समाधान जास्त!

संघर्षाशिवाय जीवन नाही.
आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळालाही जगात येण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. स्त्री असो वा पुरुष, गरीब असो की श्रीमंत ,
प्रत्येकालाच संघर्ष करावाच लागतो.
पशु,पक्षी यांनाही आपले जीवन जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो.
ऊन,पाऊस,थंडी ,सोसाट्याचा वारा याच्याशी संघर्ष करत झाडांनाही ,मातीत मुळे घट्ट रोवून उभे रहावेचं लागतेचं ना!

आयुष्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या हक्कासाठी ,चांगल्या गोष्टींसाठी केलेला संघर्ष आपल्याला नेहमीच आनंद देत असतो.
जन्मापासून सुरू झालेला आपला संघर्ष मृत्यूनंतर संपत असतो.म्हणूनचं म्हटले जाते \"जीवन म्हणजे एक संघर्षचं!\"


नलिनी बहाळकर