लेटरबॉक्स - भाग ८

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

मीरा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉल मध्ये सोफ्यावर झोपली होती. तिने आसपास पाहिलं पण कोणी दिसलं नाही. आपल्याला नक्की काय झालंय हे समजायला तिला काही क्षण लागले. तेवढ्यात तिला समोर टेबल वर ठेवलेलं पत्र दिसलं आणि झालेला प्रसंग आठवला. अविचा तो फोटो, त्याच्या बाजूला उभी असणारी ती अमेरिकन मुलगी.. अविने लग्न केलं? छे, कसं शक्य आहे. काही महिन्यांपूर्वी इकडे आलेला तेव्हा तर तो म्हणाला होता, 'डेझी त्याची फक्त चांगली मैत्रीण आहे'! आणि आमचं अमेरिकेला सेटल व्हायचं पण ठरत होतं की. मग तो असा अचानक लग्न का करेल? पत्र वाचूनच काय ते कळेल आता! मीराने समोर ठेवलेलं पत्र उचललं आणि तिला त्या खाली ठेवलेला 'तो' फोटो दिसला. ती पत्र वाचायला सुरवात करणार इतक्यात कोणीतरी ते तिच्या हातातून खेचून घेतलं. समोर काकू उभ्या होत्या. त्यांचे डोळे रडून लाल झाले होते. त्यांच्याकडे बघून मीराला त्यांच्यासाठी वाईट वाटलं. त्यांची समजूत घालण्यासाठी तिच्याकडे शब्दच नव्हते. आणि त्राण ही.. ती स्वतःच्याच भावनांशी झुंजत होती. पुन्हा पुन्हा डोळ्यात येणारं पाणी अडवायचा प्रयत्न करत होती. 

"मीरा, बाळा घाबरवलंस ना आम्हाला. बरं झालं ह्यांनी वेळेच तुला पकडलं नाहीतर केवढ्या जोरात पडली असतीस. डोक्याला वगैरे लागलं असतं म्हणजे? आता बरं वाटतंय का तुला?", मीरा च्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत काकू म्हणाल्या. त्यांच्या स्पर्शाने मीराला तिचा हुंदका अनावर झाला आणि ती हमसून हमसून रडायला लागली. काकू तिला जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. 

"नको गं रडूस अशी मीरा. माझ्या काळजाला किती घरं पडतायंत कसं सांगू. माझ्या पोटचा पोरगा या तुझ्या दुःखाला कारणीभूत आहे हे सहन नाही होत आहे गं मला. अजूनही माझा विश्वास बसत नाहीये की अविने त्या कुठल्या परवा भेटलेल्या पोरीशी लग्नं केलंय. तुला किती वाईट वाटत असेल त्याची मी कल्पना पण नाही करू शकत", तिची समजूत घालत काकू म्हणाल्या.

"काकू माझं ठीक आहे हो, पण तुम्हाला आणि काकांना पण धक्काच बसला असेल ना? काका कुठे आहेत? बरे आहेत ना ते?", मीरा डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

"आता काय बरे आहोत म्हणायचं, आपण करू तरी काय शकतो. तुमच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीची, प्रेमाची अविने काहीच किंमत ठेवली नाही. तो इकडे आला असताना तुमच्या साखरपुड्याबद्दल विचारलं तेव्हा त्याला अजून वेळ हवा होता. आणि आता सहा महिन्यात कोणातरी भलत्या मुलीशी लग्न करून मोकळा झाला? आई - वडिलांना बोलावणं तर दूर, लग्न झाल्यावर पत्राने कळवलं त्यानं? विश्वासच बसत नाही आपला अवि असं काहीतरी करू शकतो. आणि तू? तुझ्याबद्दल काहीच विचार करावासा वाटला नाही त्याला? इकडचं सगळं आयुष्य सोडून तू त्याच्यासाठी त्या नवीन देशात जायला तयार झालीस. आणि त्याने हे करावं?", काकू शून्यात बघत म्हणाल्या. 

"चला मी जेवायची तयारी करते. कधीपासून झोपले आहे मी. उशीरच झाला जरा", म्हणून मीरा तिकडून उठून निघून गेली. स्वतःसाठी कोणतीही सहानुभूती तिला नको होती. त्या एक क्षणात एक गोष्ट तिला कळली होती, तिने रंगवलेली अवि बरोबरच्या सुखी संसाराची स्वप्न मातीत मिळाली होती. तिच्या अविने खरंच लग्न केलं होतं. 

पुढचे कितीतरी दिवस कसे गेले ते मीराला कळलं ही नाही. बराचसा वेळ ती घरातली कामं करण्यात घालवत होती. उरलेल्या वेळात तिच्या खोलीत पडून असायची. एरवी पुस्तकांचा फडशा पाडणारी मीरा आता पुस्तकाच्या एका पानाकडे तासनतास बघत बसायची. त्या पानांवर तिला तिने आणि अविने एकत्र घालवलेले क्षण दिसायचे. तिच्याही नकळत पुस्तकाची पानं तिच्या अश्रूंनी भिजायची. जेवणाच्या टेबलवर ती नुसतीच ताटाकडे बघत बसायची आणि शेवटी न जेवताच खोलीत निघून जायची. काकू-काकांना तिची खूप काळजी वाटायला लागली होती.  एरवी तिच्या बडबडीने आणि हसण्याने भरलेलं घर आता अचानक शांत झालं होतं. अवि ने असं का केलं असेल? हा एकाच प्रश्न तिला भेडसावत होता. तिने काकूंकडे त्याचं पत्र वाचायला मागितलं होतं पण त्यांनी तिला स्पष्ट नकार दिला.

"मीरा, त्या दिवशीची तुझी अवस्था आठवतेय ना? मी पुन्हा ती रिस्क नाही घेऊ शकत बाळा. आणि ते पत्र वाचून तरी काय फायदा आहे आता? तू हे सगळं शक्य तितक्या लवकर विसरलेलंच बरं", काकू तिला म्हणाल्या. 

अविचं पत्र येऊन महिना होऊन गेला होता. मीरा त्या महिनाभरात क्वचितच घराबाहेर पडली होती. काकूंनी तिला कितीवेळा आश्रमात जायला सांगितलं, काकांनी तिला ऑफिसमध्ये यायला सांगितलं. पण मीराला यातलं काहीच करावंसं वाटत होतं. मनात कुठेतरी ती स्वतःलाच दोष देत होती. 'काय गरज होती मला हे सगळं एवढं ताणायची. पटकन त्याला अमेरिकेला जायला हो म्हंटलं असतं तर आज ही वेळ आली नसती. अवि माझ्यापासून दूर जायला मीच जबाबदार आहे', मीरा स्वतःशीच विचार करत होती. एक दिवस दुपारी मीरा अशीच खोलीत बसली असताना काकू तिला बोलवायला आल्या,

" मीरा आता बास झालं. काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे तू स्वतःला इतका त्रास का करून घेते आहेस? धड खातपीत नाहीस, घराबाहेर पडत नाहीस, बोलण्यात लक्ष नसतं, हसताना तर मी तुला शेवटचं कधी बघितलंय मला आठवत पण नाही", मीरासमोर बसत काकू म्हणाल्या. 

"चूक फक्त अविची नाही, माझीपण आहे ना. तो माझ्यापासून दूर जाण्याला मीच कारणीभूत आहे. वेळेवर त्याच्या बरोबर अमेरिकेला जायला होकार दिला असता तर आत्ता आपण सगळेच आनंदात असतो. कसं सांगू तुम्हाला काकू, दाराशी चालत आलेलं सुख मी माझ्या हाताने दूर लोटलंय. लहानपणापासून आपलं हक्काचं कुटुंब असावं, हक्काची आई असावं असं कायम वाटत होतं. अविशी लग्न करून मला फक्त जन्माचा साथीदार नाही पण हक्काचे आई-वडील पण मिळणार होते. माझं स्वतःचं कुटुंब मिळणार होतं आणि हे सगळं मी एक निर्णय घ्यायला उशीर करून हातचं घालवलं. कशी माफ करू मी स्वतःला?", मीरा समोरच्या टेबलवर ठेवलेल्या तिच्या, काका-काकूंच्या आणि अविच्या फोटोकडे बघत होती. सगळे किती आनंदात दिसत होते. मीराला त्या फोटो मधल्या हसऱ्या चेहऱ्यांचा हेवा वाटत होता. तिचं बोलणं ऐकून काकू खोलीतून उठून निघून गेल्या. त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या हातात अविचं पत्र होतं. 

"मीरा, आत्तापर्यंत हे पत्र तुला न दाखवून मी तुला दुःख होऊ नये एवढाच प्रयत्न करत होत. पण आता मात्र वाटतंय तू हे पत्र वाचलंच पाहिजेस. तुझ्या मनातली अपराधीपणाची भावना जाण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे", काकू मीरा समोर पत्र धरत म्हणाल्या.

मीराने त्यांच्या हातून पत्र घेऊन वाचायला सुरवात केली..

क्रमशः..!

🎭 Series Post

View all