लेटरबॉक्स - भाग ७

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

रविवारी पहाटे अवि अमेरिकेला निघून गेला आणि घर पुन्हा शांत झालं. अविने काका-काकूंना त्याचा प्लॅन सांगितल्यापासून ते दोघंही फारसे उत्साहात नव्हते. काकूंचं आणि अविचं भांडणही झालं.

"आमच्या मनासारखं काही करायचंच नाहीये का तुला? का तिकडे जाऊन आई -वडीलही नकोसे झालेत? आणि मीराचा तरी विचार कर? बिचारी वर्षभरापासून तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसली आहे. अजून किती वर्ष वाट बघायची आहे तिने? आज म्हणतोयस अजून थोडी वर्ष राहायचं आहे तिकडे, उद्या म्हणशील परत येतच नाही. मग काय करायचं आम्ही? तू तिकडे एवढा लांब असताना, आम्हाला इकडे काही झालं तर कोण आहे बघायला?", काकू चिडून बोलत होत्या.

"आई, अगं मीरा पण तिकडे येऊ शकते की. आणि तुम्ही सुद्धा. इतकी वर्ष इकडे राहिलोच ना आपण. मग आता थोडी वर्ष तिकडे राहू. शेवटी आपण सगळ्यांनी एकत्र असणं महत्वाचं आहे ना?", अवि त्यांना समजावत होता पण काकू ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी मीराने मध्यस्थी केली आणि वाद संपला.

अवि परत गेल्यावर मीराला त्यांच्या बोलण्यावर विचार करायला वेळ मिळाला. 'अवि शिवाय इतकी वर्ष लांब राहू शकते का मी? आणि तो म्हणतोय त्यात वाईट पण काय आहे. करू की प्रयत्न तिकडे जाऊन नवीन आयुष्य जगायचा. काका काकूंना पण तिकडे नेता येईल', मीराने स्वतःशीच विचार केला. तिने अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीज ची माहिती काढायला सुरवात केली. अविला तिचा निर्णय सांगायच्या आधी तिला सगळी माहिती गोळा करायची होती. दरम्यान अवि गेल्यापासून त्याची पत्र येणं कमी झालं होतं, तो काका काकूंना दुरावत चालला होता असं मीराला वाटत होतं. आठवड्यातून एकदा फोनवर बोलणं व्हायचं तेवढंच. त्यातही काकूंनी अविच्या परत येण्याचा विषय काढला की भांडणंच सुरु व्हायचं. लवकरात लवकर आपण काहीतरी निर्णय घेऊन हा तिढा सोडवला पाहिजे एवढंच मीरा ला वाटत होतं. 

काका काकुंशी बोलून मीराने अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटीज मध्ये अर्ज पाठवले होते. त्यांचा होकार आला की अविला सर्प्राइज द्यायचं असं तिचं ठरलं होतं. काकूंनी पण शेवटी अविचा निर्णय मान्य केला होता. एकुलत्या एका मुलावर किती दिवस राग धरणार? शेवटी तो आणि मीरा सुखात राहणं महत्वाचं आहे, मग ते इकडे असो वा अमेरिकेत. मनातून कितीही वाटत असलं तरी अविशी बोलताना त्या तो विषय टाळायला लागल्या. सततच्या बोलण्याला कंटाळून आपला मुलगा आपल्यापासून लांब गेला तर इथे बसून त्याला समजावणं पण कठीण होईल असं त्यांना वाटत होतं. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी मीराला न्यूयॉर्क च्या एका युनिव्हर्सिटी मधून होकार आला. अविची नवीन कंपनीही तिकडेच होती. सगळं योगायोगाने जुळून आलं होतं. कधी एकदा अविला हि बातमी सांगते असं तिला झालं होतं. गेले काही महिने त्यांच्यामध्ये चालू असलेली भांडणं, गैरसमज लवकरात लवकर दूर व्हावे असं तिला वाटत होतं. काका-काकू आणि अवि मध्ये होणाऱ्या वादांचा तणाव अवि आणि मीराच्या नात्यावरही आलाच होता. मीराचं अमेरिकेला जाणं हाच ह्या सगळ्यावरचा उपाय होता. युनिव्हर्सिटीचं उत्तर आल्यापासून मीरा अविला फोन/मेसेज करायचा प्रयत्न करत होती. तिने त्याला एक दोन इमेल्स पण पाठवले होते. पण त्याचं काहीच उत्तर आलं नव्हतं. एवढी मोठी गोष्ट ई-मेल वर सांगणं मीरा ला बरोबर वाटत नव्हतं. आणि तिला अविच्या आवाजातला आनंद ऐकायचा होता, म्हणून ती त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत होती. काकू काकांनाही ती अविला सांगितल्यावरच सांगणार होती. 'अवि लवकर फोन कर रे, अजून किती वाट बघायला लावणार आहेस? आता आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील बघ', मीराच्या खोलीतल्या टेबलवर ठेवलेल्या त्या दोघांच्या फोटोकडे बघत मीरा म्हणाली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आवरून आश्रमात जायला निघत असताना तिने काकूंना विचारलं, "काकू तुमचं अविशी काही बोलणं झालं का हो? मी गेले दोन-तीन दिवस त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतेय पण होतंच नाहीये".

"नाही गं, मला पण काही फोन नाही आलाय त्याचा. म्हणा माझ्याशी त्याला बोलायचंच नसतं आजकाल. आई तेच तेच बोलून डोकं खाते असं वाटतं त्याला. पण तू काळजी नको करुस. करेल तो फोन. कामात असला की आपली कोणी वाट बघतंय याचं पण भान नसतं त्याला", काकू पोहे परतत म्हणाल्या. "आणि हो, तू न खाता निघू नकोस. एकदा त्या आश्रमात गेलीस कि तुलाही कसलं भान राहत नाही." मीरा खाऊन आश्रमात आली. तिकडे आल्यावर तीची सगळी दुःख, काळजी दूर व्हायची. स्वतःचे आई-वडील गमावून सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मानणाऱ्या त्या निरागस लहान मुलांसमोर तिला तिची दुःख खूपच किरकोळ वाटायची. नेहमीप्रमाणे तिला बघून सगळी मुलं तिच्याकडं धावत आली आणि त्यांनी तिच्या भोवती घोळका केला. आठवडाभराच्या गोष्टी तिला सांगताना त्यांना किती आनंद होत होता. त्या सगळ्यांना तिच्याशी एकदमच बोलयचं होतं. त्यांचं तिच्यावरचं ते प्रेम बघून मीराचे डोळे भरून आले. या चिमुकल्यांना सोडून कशी जाणार आहे मी? आणि मी गेल्यावर त्यांनाही किती त्रास होणार आहे. अविला हे का समजत नाही? पैसे, अमेरिकेतला तो झगमगाट, या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. पण नात्यांचं हेच असतं ना. कुठलंही नातं टिकवण्यासाठी थोड्या तडजोडी कराव्याच लागतात. आणि लहान मुलांचं काय, हळूहळू विसरतील त्यांच्या मीरा ताईला. पुढे काय होईल या विचाराने मला माझा आत्ताचा त्यांच्या बरोबरचा वेळ वाया नाही घालवायचाय. मीराने स्वतःशीच विचार केला आणि मनातले सगळे विचार दूर लोटून ती त्या मुलांच्या उत्साहात सामील झाली.

संध्याकाळी मीरा घरी आली अन तिच्या मागोमाग काकू हातातलं पत्र हलवत आत आल्या. "अविचं पत्र आलं आहे गं. लेकाने किती महिन्यांनी पत्र पाठवलं. सगळा राग गेलेला दिसतोय आई वरचा. तू विचारात होतीस ना सकाळी अविबद्दल", स्वतःशीच बोलत काकूंनी पत्र वाचायला सुरवात केली. मीरा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होती. एरवी अविचं पत्र वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आज तिला दिसत नव्हता. वाचून झाल्यावर काकूंनी थरथरत्या हातांनी पत्र बाजूला ठेवलं आणि त्या बरोबर आलेला फोटो डोळ्यासमोर धरला. काही क्षण त्या तशाच फोटोकडे बघत उभ्या राहिल्या. अखेर त्यांच्या भावना अनावर होऊन तो फोटो त्यांच्या हातातून जमिनीवर पडला. मीराने काळजीने काकूंकडे पाहिलं आणि मग त्या फोटोकडे. त्यात काळ्या रंगाचा सूट घालून अवि उभा होता, चेहऱ्यावर तेच मिश्किल हास्य, डोळ्यात तोच खट्याळपणा, त्याचा तो फोटो बघून मीराच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं पण मग तिने त्याच्या बाजूला सुंदर पांढऱ्या वेडिंग गाऊन मध्ये उभी असलेली मुलगी बघितली, डेझी? त्या फोटोचं आकलन व्हायला मीराला काही क्षण लागले. तो फोटो बघत असताना ती कुठल्यातरी खोल खड्ड्यात पडते आहे आणि तिने मदतीसाठी धरलेले सगळे हात तिच्या हातातून सुटत आहेत असं तिला वाटत होतं. लांबून तिला काकूंचा आवाज येत होता, त्या तिचंच नाव घेत होत्या. फोटोतून तिच्याकडे बघणाऱ्या अविने त्याचे हात पुढे केले होते. पण ते तिच्यासाठी नव्हते. ते हात पकडण्यासाठी ती धडपड करत होती पण तोवर खूप उशीर झाला होता. तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार उरला होता..

क्रमशः.. !

🎭 Series Post

View all