लेटरबॉक्स - भाग ५

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

अवि आणि मीराचं बोलणं होऊन काही दिवस होऊन गेलेले. आणि एक दिवस सकाळी काकू अंगणातून ओरडत घरात आल्या. आधी मीरा आणि काकांना भीतीच वाटली, नक्की काय झालंय? पण मग काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. "अगं, केवढ्यांदा ओरडलीस? काय झालंय एवढं ?", काकांनी विचारलं.

"अहो, तुम्हाला कळलं की तुम्हीपण असेच ओरडाल. हे बघा, आपल्या अविचं पत्र आलंय.", काकू हातातलं पत्र हलवत म्हणाल्या. काका काही बोलायच्या आधीच त्यांनी पत्र उघडून वाचायला सुरवात पण केली होती. 

' प्रिय आई-बाबा,

खरं तर पत्र कसं लिहितात तेच मला माहित नाही, पण म्हंटलं प्रयत्न करून बघूया, म्हणून लिहायला सुरवात केली. तुम्ही दोघं कसे आहात? मीरा शी इमेल्स वर बोलणं होतं पण तुमच्याशी कधी फोन वर बोलणं होतं तेवढंच. म्हंटलं बाबांनी बसवून घेतलेल्या लेटरबॉक्स मध्ये पत्र नीट पोचतायत का बघूया? 

मी इकडे एकदम मजेत आहे. अभ्यास आणि प्रोजेक्ट्स एकदम जोरात सुरु झालेत त्यामुळे खायचं-प्यायचं पण भान राहत नाही. दिवस कॉलेजमध्येच जातो. इतके दिवस नोकरी केल्यावर परत विद्यार्थी बनून, जागून अभ्यास करणं जरा कठीण जात होतं सुरवातीला, पण आता हळूहळू सवय होतेय. इकडे मिळणारे नवीन अनुभव बघून मला खात्री पटली आहे की माझा इकडे यायचा निर्णय योग्यच होता. गेल्या दोन महिन्यात मी इतका स्वावलंबी झालोय, पुण्याला असताना साधा चहा करता येत नव्हता मला, आणि इकडे पूर्ण पोळी भाजी, वरण- भाताचा स्वयंपाक करायला शिकलोय. स्वतःची खोली आवरून ठेवायला शिकलोय. (आई, तू हे मीराला सांगू नकोस, नाहीतर नंतर ती मलाच या सगळ्या कामांना लावेल, हा हा हा !)

इकडे मित्र-मैत्रिणीपण झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर असताना घरची आठवण कमी येते. पण रात्री झोपायला जाताना मात्र आपलं घर आठवतं, तुम्ही दोघं आठवता. आमच्या इकडच्या घराला पण आपल्या घरासारखंच अंगण आहे, फुलझाडं आहेत, पण त्याला आईच्या पारिजातकासारखा वास येत नाही. पत्राबरोबर माझे इकडचे एक दोन फोटोज पाठवतो आहे. इकडे सगळं एवढं सुंदर आहे, आईला इकडे फिरायला खूप आवडेल. मी आत्ताच ठरवलं आहे, माझा कोर्स पूर्ण झाला की मी तुम्हाला इकडे फिरायला घेऊन येणार आहे. 

चला आता आवरायला जातो नाहीतर उशीर होईल. पत्र लिहून मला स्वतःलाच खूप छान वाटतंय. तुम्ही दोघं काळजी घ्या आणि माझी काळजी करू नका.

तुमचा, अवि '  

पत्र वाचून शकू काकूंचे डोळे भरून आले. "किती  दिवसांनी बघतेय मी माझ्या अविला", पत्राबरोबर पाठवलेल्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या. बाजूला उभ्या असलेल्या मीरा ने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अविने तिचं ऐकून पत्र पाठवलं म्हणून ती मनातून सुखावली होती, पण ' हे काय, माझा उल्लेख पण नाही केला पत्रात. घर, काका-काकू, अगदी त्या पारिजातकाच्या झाडाची पण आठवण येत्ये त्याला, आणि माझी नाही ', मीरा ने स्वतःशीच विचार केला. ती हिरमुसली होऊन तिच्या खोलीत चालली असतानाच काकूंचे शब्द तिच्या कानावर पडले, "अगं अशीच कुठे चाललीस, आत्ता तर एकच पत्र वाचून झालंय. तुझ्यासाठी खास वेगळं पत्र पाठवलंय. का ते पण मीच वाचू मोठ्याने?", काकू तिला चिडवत म्हणाल्या.

तशी मीरा खुद्कन हसली, "काय हो काकू तुम्हीपण". त्यांच्या हातातून पत्र घेऊन मीरा धावत तिच्या खोलीत गेली.

मीराच्या एल.एल .एम चा निकाल जाहीर झाला तेव्हा घरी सगळेच आनंदात होते. तिला डिस्टिंक्शन मिळालं होतं. गेली पाच वर्ष तिने केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. कधी एकदा अविला फोन करून सांगते असं तिला झालं होतं. त्याला अमेरिकेला जाऊन एव्हाना वर्ष होत आलेलं . त्याचा एक वर्षाचा कोर्स संपवून नवीन कंपनी जॉईन करायच्या आधी गणपतीसाठी तो भारतात येणार होता, असं त्याने त्याच्या नुकत्याच आलेल्या पत्रात लिहिलं होतं, त्यामुळे काका काकू अजूनच खुश होते. त्याच्या पहिल्या पत्राने काकू काकांना किती आनंद झालेला हे मीरा ने त्याला सांगितल्यावर अविने त्यांना नियमितपणे पत्र पाठवायला सुरवात केली होती.

"अहो, मी काय म्हणते, मीराचं शिक्षण आता पूर्ण झालंय, आणि अविचं पण. त्याला चांगली नोकरी पण लागली आहे. एक-दोन वर्ष तिकडे काम करून भारतात येणार आहे परत असं म्हणाला होता तो. यंदा इकडे येईल तेव्हा त्यांचा साखरपुडा करून टाकायचा का आपण? नाही म्हणजे मीरा साठी मला लोकं विचारतात हो. एकदा साखरपुडा झाला कि लोकांची तोंड पण बंद होतील.", काका-काकू रात्री अंगणात गप्पा मारत बसले असताना काकूंनी विषय काढला.

"माझी काय हरकत असणार आहे, फक्त एकदा मीरा ला विचार. म्हणजे तिचं आत्ताच शिक्षण झालंय. आणि तशी लहान आहे ती अजून. तिला एडव्होकेट व्हायचंय. लग्नाचा विचार सध्या करतेय का ती हे जाणून घ्यायला हवं", काका म्हणाले.

"तुमचं बरोबर आहे, पण लग्न पुढच्या वर्षी करू की. आणि लग्नानंतर तिच्यासाठी काही बदलणार नाहीच आहे. तेच घर, तीच माणसं.. देऊ दे की तिला करिअरकडे लक्ष. तरी तुम्हाला हवं तर विचारते मी एकदा तिला", काकू स्वतःशीच विचार करत म्हणाल्या. पण मनात त्यांनी साखरपुड्याच्या याद्या बनवायला सुरवात केली होती.

बघता बघता अविचा यायचा दिवस आला. मीराला दोन दिवस आधीपासून झोपच लागत नव्हती. जेव्हापासून काकूंनी तिला तिच्या आणि अविच्या साखरपुड्याबद्दल विचारलं होतं, मीरा दिवस रात्र त्याचीच स्वप्न रंगवत होती. तिचं आणि अविचं नातं आता सगळ्या जगासमोर ऑफिशिअल होणार होतं. सुखी कुटुंबाचं जे स्वप्न तिने लहानपणापासून रंगवलं होतं, ते आता पूर्ण होणार होतं. म्हणजे जोशी काका-काकूंनी तिला कधीच परक्यासारखं वाढवलं नव्हतं, त्यांच्यासाठी जसा अवि तशीच ती होती. पण आता त्या नात्याला नाव मिळणार होतं. सासू सासऱ्यांच्या रूपात तिला तिचे आई-वडील मिळणार होते. ज्या शकू काकूंनी तिच्यावर एवढं प्रेम केलं होतं, त्यांना ती आता हक्काने आई म्हणू शकणार होती. आणि अवि.. तो तर तिच्या स्वप्नातला राजकुमारच होता. बालपणीची मैत्री, तारुण्यातलं प्रेम आणि आता जन्मांतरीचा सखा. तिला समजून घेणारा, तिची थट्टा मस्करी करणारा, गोष्टी मनासारख्या झाल्या नाही कि तिच्यावर चिडचिड करणारा पण नंतर स्वतःच हळवा होणारा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा अवि.. यापेक्षा जास्त एखाद्या मुलीला काय हवं असतं जोडीदारात. अवि अमेरिकेला गेल्यापासून त्यांच्यात थोडा दुरावा येतोय असं मीरा ला सारखं वाटत होतं. आधी कायम एकत्र असणाऱ्या त्या दोघांची आयुष्य अचानक वेगळी आणि जगाच्या दोन कोपऱ्यात चालू होती. आनंदाचे - दुःखाचे क्षण सहज एकमेकांबरोबर शेअर करणं त्यांना शक्य होत नव्हतं. पण आता हा सगळा दुरावा नाहीसा होणार होता, आयुष्यभरासाठी..

सगळे घरी अविची वाट बघत होते. "अजून कसा आला नाही हा?", काकू घडाळ्याकडे बघत येरझाऱ्या घालत होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात अवि त्याच्याकडे बघत हसत उभा होता. काकूंनी त्याला ओवाळलं आणि तो घरात आला.

"औक्षण काय करतेस आई, मी काय युद्ध लढून आलोय का?", काकूंचे गाल लाडाने ओढत त्यांना मिठी मारत अवि म्हणाला.

"अवि, तब्येत छान केलीयेस. इकडे असताना पोट सुटलं होतं. सारखा त्या कम्प्युटर समोर चिप्स खात बसलेला असायचास. पण छान दिसतोयस हो आता", लेकाकडे कौतुकाने बघत काकू म्हणाल्या.

"अगं आत तर येऊ दे त्याला, सगळ्या गप्पा इकडेच मारणार आहेस का? अवि तुझं सामान कुठेय", अविकडे बघत काका म्हणाले.

"आणतो, पण त्या आधी आई-बाबा मला तुम्हाला कोणालातरी भेटवायचं आहे", अवि दाराकडे बघत उभा होता. कोणीतरी गोरी मुलगी त्यांच्याबाजूला येऊन थांबली.  

"हि माझी मैत्रीण डेझी, माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकते.", तिच्याकडे बघत अवि म्हणाला. काका-काकू गोंधळून आलटून पालटून त्या दोघांकडे पहात होते. त्यांच्यामागे उभ्या असलेल्या मीराच्या रडवेल्या झालेल्या चेहऱ्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं..

क्रमशः ..! 

🎭 Series Post

View all