लेटरबॉक्स - भाग २

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

सकाळचे आठ वाजले होते. मीराची ऑफिसला जायची गडबड चालू होती. शकू काकूंनी तिला डबा आणून दिला, "मीरा, हे बघ डबा परत विसरली असतीस. आणि सगळ्यांना वाटत बसू नकोस ऑफिसमध्ये".

मीरा ने काकूंच्या हातातून डबा घेतला, "काकू तुम्ही ना मला फार लाडावून ठेवलं आहे. असं सगळं हातात आणून द्यायची सवय लावली आहे तुम्ही मला. चला येते मी. चावी घेतली आहे आज. नाहीतर परत कालच्यासारखं व्हायचं". मीरा निघून गेली आणि काकू पेपर वाचायला त्यांच्या आराम खुर्चीत बसल्या. 'किती लाघवी पोर आहे. देवा तिच्या वाटेची सगळी दुःख तिची भोगून झाली आहेत आणि दुर्दैवाने माझा मुलगाही त्याला कारण आहे. आता अजून तिला काही सहन करायला लावू नकोस बाबा. एखादा छानसा, माझ्या मीराला साजेसा मुलगा तिच्या आयुष्यात येऊ दे. एकदा का तिचं लग्नं झालं की मी डोळे मिटायला मोकळी', काकू स्वतःशीच विचार करत होत्या. 

मीरा ५ वर्षाची असताना तिचे आई वडील एका कार एक्सीडेंट मध्ये गेले आणि तिच्या सख्ख्या नातेवाईकांनी तिला पुण्याच्या 'वात्सल्य' अनाथाश्रमात नेऊन सोडलं. आधीच आई वडिलांपासून दुरावलेल्या मीराला या नवीन ठिकाणी एकदम एकटं वाटत होतं. ती दिवसभर कोणाशीही न बोलता खिडकीतून बाहेर बघत बसत. एक दिवस 'वात्सल्य' च्या संचालिका आश्रमाला भेट द्यायला आल्या.. शकुंतला जोशी.

"उमा ही छोटी मुलगी कोण गं? मागच्या वेळी मी आले तेव्हा नव्हती ती", त्यांनी आश्रमात काम करणाऱ्या उमा ला विचारलं. 

"ताई अहो महिनाच झाला आहे तिला येऊन. आई वडील एक्सीडेंट मध्ये गेले आणि घरच्यांना जबाबदारी नको म्हणून इथं आणून सोडलं. आल्यापासून कोणाशीच काहीच बोलत नाही. तिची ती बाहुली घेऊन कोपऱ्यात बसलेली असते", उमा ने आश्रमाच्या हिशोबाची वही त्यांच्या हातात देत सांगितलं.

दिवसभर त्या मीराला नोटीस करत होत्या. तिच्या वयाच्या मानाने ती खूपच समंजस होती. त्या दिवशी संध्याकाळी निघत असताना आश्रमात नवीन मुलगी आली. ती जवळपास मीराच्याच वयाची होती. तिची आज्जी तिला सोडून जात असताना तिने रडून आश्रम डोक्यावर घेतला. तेव्हा जे घडलं ते पाहून तिथे असणाऱ्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. एरवी शांतपणे आपल्या कोपऱ्यात बसून असणारी मीरा त्या नवीन मुलीला रडताना बघून बाहेर आली आणि तिला स्वतःची बाहुली दिली. ती बघून त्या मुलीचं रडणं थांबलं. मीराने तिचे डोळे पुसले आणि तिचा हात धरून तिला आत घेऊन गेली. एवढ्या लहान वयात मीरा मध्ये असलेली समज आणि ओलावा बघून शकुंतला ताई थक्क झाल्या. त्यानंतर मीरा त्यांच्या आयुष्याचा एक भागच बनली. घरी काहीही कार्यक्रम असला की त्या तिला घरी घेऊन यायच्या. तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनीच उचलला. आपल्याला मुलगी असावी असं त्यांना कायमच वाटायचं. पण अविच्या जन्मानंतर पुन्हा मातृत्व त्यांच्या नशिबात नव्हतं. मीराच्या रूपात त्यांची ती इच्छा पूर्ण झाली होती. लहान असताना मीराला शकुंतला ताईचं पूर्ण नाव म्हणता येत नव्हतं, म्हणून त्यांनी तिला 'शकू काकू' म्हणायला शिकवलं. तेव्हापासून ती त्यांना शकू काकूच म्हणायला लागली. 

शकू काकूंबरोबरच जोशी काका आणि अविची सुद्धा मीराशी छान गट्टी जमली होती. अवि तिच्यापेक्षा २ वर्षांनीच मोठा होता. त्यामुळे त्या दोघांचं छान जमत असे. दोघं मोठे झाले तशी त्यांची मैत्री अजूनच घट्ट होत गेली. मीरा ने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा शकू काकूंनी तिला घरीच राहायला आणलं. त्यांच्या घरावरून तिचं कॉलेज जवळ होतं आणि एव्हाना ती त्यांच्या कुटुंबाचा भागच झाली होती. घरी आल्यापासून ती काकूंना सगळ्या कामात मदत करायची. रात्री जेवण झाल्यानंतर कितीतरी वेळा त्या दोघीच अंगणात गप्पा मारत बसायच्या. त्यांच्याशी दिवसभरातल्या कॉलेज मधल्या गप्पा मारताना मीराला खूप छान वाटायचं.

एकदा त्या अशाच गप्पा मारत असताना अवि त्यांना बोलवायला आला, "काय गं आई, माझ्याशी कधी अशी गप्पा मारत बसायची नाहीस. ही आल्यापासून माझ्यासाठी वेळच नाहीये तुझ्याकडे", लटका राग आणत अवि म्हणाला.

"हो का, मुलांना कुठे आईशी बोलायला वेळ असतो. सारखं त्या कॉम्प्युटर वर गेम खेळत बसलेला असतोस, आणि तुला कोणी अडवलंय. ये की, तू पण बस गप्पा मारायला आमच्या बरोबर", काकू त्याला चिडवत म्हणाल्या. अवि पण लगेच जवळच्या खुर्चीवर बसला. बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर काकूंना खुर्चीतच झोप लागली, ते बघून अवि आणि मीरा दोघं एकदम त्यांच्या अंगावर शाल घालायला पुढे आले. तेव्हा मीराला अविच्या हाताचा स्पर्श झाला. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. त्यावेळी मीराला वाटलेल्या भावना तिला या पूर्वी कधीच वाटल्या नव्हत्या. पटकन तिने आपला हात मागे खेचला आणि धावत आत निघून गेली. त्या दिवसापासून मीरा आणि अवि मधलं नातं बदललं. दोघं काहीतरी कारणं काढून एकमेकांशी बोलायला यायचे पण समोर आल्यावर दोघांच्या तोंडून शब्दपण फुटायचा नाही. जेवणाच्या टेबलवर एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकणं, रात्री अंगणात फेऱ्या मारायच्या निमित्ताने भेटणं, गच्चीवर एकच हेडफोन शेअर करून जुनी हिंदी गाणी ऐकणं, यातूनच हळू हळू त्यांचं प्रेम उमलत होतं. पण एका घरात राहून सुद्धा त्यांनी कधीच त्यांच्या नात्याची मर्यादा पार केली नव्हती.

काका काकूंना सुद्धा त्यांनी इतक्यात काही सांगितलं नव्हतं. तसे दोघं अजून लहान होते. मीराचं शिक्षण बाकी होतं आणि अविला पण पुढे अजून शिकायचं होतं. त्यामुळे इतक्यात घरी काही न सांगितलेलंच बरं असं दोघांनाही वाटत होतं. पण ते म्हणतात ना 'प्यार छुपायें छुपता नहीं ', तसंच काहीसं या दोघांचं पण झालं. एकदा मीराला कॉलेजवरून यायला उशीर झाला तेव्हा काकू तिला दारातच भेटल्या,"काय गं मीरा, आज उशीर झाला तुला. आणि हे काय, तोंड का असं रंगलं आहे तुझं?".

"अहो काकू, मैत्रिणीबरोबर शॉपिंगला गेले होते. येताना बर्फाचा गोळा खाल्ला", तिने कसंबसं तोंड लपवत उत्तर दिलं.

काकू बाहेर जाऊन आल्या तेव्हा अवि अंगणात बाईक पार्क करत होता. दोघं एकत्र घरात आले तेव्हा प्रकाशात काकूंना अविचं तोंड पण रंगलेलं दिसलं.

"काय रे, तू पण बर्फाचा गोळा खाऊन आलास का?", त्यांनी गोंधळून अविला विचारलं. तेवढ्यात मीरा पण तिकडे आली. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे 'चोरी पकडली गेल्याचे' भाव बघून सगळा प्रकार काकूंच्या लक्षात आला.

"अच्छा म्हणजे या मैत्रिणीबरोबर गेली होतीस का", त्यांनी चिडवत मीराला विचारलं.

तशी मीरा लाजून त्यांच्या गळ्यात पडली, "काय हो काकू".

"काकू नाही हं..आता आई म्हणायचं.", तिला जवळ घेत काकू म्हणाल्या.  

मीरा आणि अविचं प्रेमप्रकरण घरात कळल्यापासून काकू-काका दोघं खुश होते. मीरासारखी लाघवी, प्रेमळ, समंजस मुलगी आपली सून होणार म्हणून त्यांना मनापासून आनंद झाला होता. अशातच जेव्हा दोन-तीन महिन्यांनी अविने काका काकूंना रात्री जेवणानंतर काहीतरी बोलायचं आहे म्हणून एकत्र बसवलं तेव्हा काकूंना पूर्ण खात्री होती कि आता अवि त्याच्या आणि मीराच्या लग्नाचा विषय काढेल.

"आई - बाबा बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. म्हणजे मीराला पण अजून बोललो नाहीये मी. आधी तुमची परवानगी घ्यायची म्हणून थांबलो होतो", अवि त्या दोघांकडे बघत म्हणाला.

"हो का, आमची परवानगी हवी आहे का आता? प्रेमात पडताना नव्हती घेतलीस ती परवानगी?", काकू त्याला चिडवत म्हणाल्या. मनातून त्यांनी आधीच अवि आणि मीरा च्या लग्नाचे प्लॅन बनवायला सुरवात केली होती. 

"काय गं आई, बोलू दे ना मला. तर.. तुम्हाला दोघांना तर माहितीच आहे मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. आता नोकरीला लागून पण बरेच दिवस होऊन गेले आहेत. या काळात मला आयुष्यात नक्की काय करायचंय ते मला कळलंय. म्हणजे असं एका नोकरीमध्ये वर्षानुवर्ष काम करून निवृत्त व्हायचं, असं मला नको आहे. काहीतरी वेगळं करायचं, स्वतःच्या कल्पनांना चालना देऊन स्वतःचं काहीतरी करायचं अशी माझी इच्छा आहे. पण त्यासाठी योग्य शिक्षण आणि अनुकूल परिस्थिती इथं नाहीये.", अवि बोलत होता. आता काकूंना कळत नव्हतं त्याला नक्की काय सांगायचं होतं.

"अरे अवि, एवढी प्रस्तावना काय करतोयस. लवकर बोलून टाकावं", त्या न राहवून म्हणाल्या.

"आई-बाबा, मला अमेरिकेला शिकायला जायचंय"!,अवि म्हणाला त्याच्या त्या वाक्याने काका-काकू दोघं गप्पं होऊन त्याच्याकडे बघत राहिले. तेवढ्यात दारातून आलेल्या आवाजाने तिघांनी त्या दिशेला पाहिलं. नुकतीच कॉलेजवरून परतलेली मीरा लालबुंद चेहऱ्याने दारात उभी होती. तिच्यासमोर हातातून पडलेल्या डब्यातून अविच्या आवडत्या कचोऱ्या जमिनीवर विखुरल्या होत्या. आणि त्या बरोबर तिची स्वप्नंही...

क्रमशः..!

🎭 Series Post

View all