लेटरबॉक्स - भाग २५ (अंतिम भाग)

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

सकाळी विराज आणि मीरा हॉस्पिटलला जायला निघत होते तेवढ्यात डॉक्टरांचा फोन आला. काकूंची तब्येत रात्रीत खालावली होती. आता कधीही काहीही होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं.

थोड्यावेळाने मीरा काकूंच्या बाजूला त्यांचा हात हातात घेऊन बसली होती. काकू ग्लानीत बोलत होत्या. अवि बद्दल विचारत होत्या. त्याला भेटायची त्यांची इच्छा अपूर्णच रहाणार या विचाराने मीराचा जीव तुटत होता. काय करावं तिला सुचत नव्हतं. तेवढ्यात तिला त्यांनी अविला लिहिलेलं शेवटचं पत्र आठवलं. 

"काकू, अवि भेटणारंच आहे तुम्हाला लवकरच. हे काय त्याचं पत्र आलं आहे की. तुम्ही त्याला म्हणाला होतात ना की तुम्हाला त्याला भेटायचंय, पण मग तुम्ही अशा आजारी पडलात. कसं वाटेल इतके वर्षांनी तुम्हाला असं बघून अविला. त्याने तुम्हाला पाठवलेलं पत्र तुम्ही वाचलंच नाहीत, हे बघा त्याने पत्रात काय लिहिलं आहे, 

'प्रिय आई,

तुझं मागचं पत्र वाचून माझ्या जिवात जीव आला. मागचं सगळं विसरून जाऊन मलाही आपल्यामध्ये आलेलं अंतर कमी करायचं आहे. कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. पण मी तिकडे येऊन फक्त थोडे दिवसच थांबू शकतो आणि तेवढे दिवस आपल्याला कुठे पुरणार आहेत इतक्या वर्षांचं राहिलेलं बोलण्यासाठी. त्यापेक्षा मी तुला इकडे अमेरिकेला घेऊन येतो. मग तू इकडेच रहा आमच्याबरोबर. मुलांना मी तुझ्याबद्दल कायम सांगतो, त्यांच्या आज्जीला भेटून त्यांना आनंदच होईल. 

इकडच्या आपल्या घरासमोरच्या बागेत मी झोपाळा लावून घेईन तुझ्यासाठी. त्यावर बसून तुझी रफींची गाणी ऐक तू मस्त. इतके दिवस सगळ्यांचं सगळं केलंस ना, आता छान आराम कर, मुलाकडून आणि सुनेकडून भरपूर सेवा करून घे'

मीराने बोलताना मध्येच थांबून काकूंकडे बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मीराकडे खरं तर कोणतंच पत्र नव्हतं, ती तिच्या मनाने बोलत होती. "काकू ऐकलंत का? अवि काय म्हणतोय? तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे तो. तुम्हाला कधीपासून जायचं होतं ना अमेरिकेला. जय आणि मायराला भेटायचं होतं. मस्त ठणठणीत बऱ्या व्हा आता आणि फिरून या अमेरिकेला", बोलताना मीराला अश्रू आवरत नव्हते. 

"तो म्हणाला यातच माझ्या मनाचं समाधान झालं बघ. पण आता नाही जमणार गं एवढा प्रवास. आणि तू आणि विराज? तुम्हाला सोडून कशी जाणार मी. त्याला सांगून टाक माझ्या मीराला सोडून कुठे नाही जायचंय मला आता", काकू कशाबशा बोलल्या. त्यांच्या त्या वाक्याने मीराच्या अश्रूंचा बांध फुटला. अविला भेटायला मिळणार या आनंदापेक्षा त्यांना मीराची जास्त काळजी होती. 

"आई, खरंच नाही ना गं जाणार मला सोडून? तुझ्या मीराला तुझ्याशिवाय करमणार नाही गं. जेव्हापासून समजायला लागलंय तूच माझ्या आयुष्यातला आधार बनून मला वाढवलंस. जन्मदात्या आईला तर खूप आधीच गमावलंय आता तुला नाही गमवू शकत मी. प्लिज बरी हो ना लवकर", मीरा काकूंच्या हातावर डोकं ठेऊन रडत होती. विराजचेही डोळे भरून आले होते. 

"आज माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बघ. एकदा तुझ्या तोंडून 'आई' ऐकायचं तेवढं राहिलं होतं", काकूंना बोलताना धाप लागत होती, म्हणून त्या पुढे काही बोलल्या नाहीत. मीरा आणि विराज बराच वेळ त्यांच्याजवळ त्यांचा हात पकडून बसून होते. शेवटी संध्याकाळी हळूहळू त्यांचा श्वास स्थिरावला आणि मीराला पुन्हा एकदा पोरकं करून त्या निघून गेल्या. 

काकूंना जाऊन काही दिवस होऊन गेले होते. मीराने नुकतीच पुन्हा ऑफिसला जायला सुरवात केली होती. घरी बसून तिला पुन्हा पुन्हा काकूंच्या आठवणीने रडायला येत होतं, म्हणून विराजनेच तिला सुचवलं होतं. काकू गेल्याचं तिने अविला ई-मेल करून सांगितलं होतं. त्यावर त्याचा काहीच उत्तर आलं नव्हतं. काही दिवसांनी मीराला वैद्य काकांचा फोन आला. वैद्य काका म्हणजे जोशी फॅमिलीचे वकील. काका काकू गेल्यानंतर त्यांच्या घराबद्दल, काकांच्या लॉ फर्म बद्दल त्यांना काहीतरी बोलायचं होतं एवढंच त्यांनी मीराला सांगितलं होतं. रविवारी सकाळी ते काकूंच्या घरी येणार होते. ते यायच्या काही वेळ आधीच मीरा आणि विराज तिकडे पोहोचले. काकू गेल्यानंतर मीरा पहिल्यांदाच त्या घरात आली होती. घरात पाऊल टाकल्यावर लगेचच एका ओळखीच्या, प्रेमाच्या भावनेने तिचं मन भरून आलं. ती जुन्या आठवणीत रमली असतानाच दारावर थाप पडली, "आले वाटतं वैद्य काका", म्हणून मीराने दरवाजा उघडला आणि ती तशीच निःस्तब्ध उभी राहिली. समोर अवि उभा होता. 

काहीच न बोलता मीरा दारातून बाजूला झाली आणि अवि आत आला. तेवढ्यात विराजही तिथे आला. मीराने दोघांची ओळख करून दिली. विराजने मनातली सगळी किल्मिषं बाजूला ठेऊन त्याच्यासमोर हॅन्डशेक साठी हात धरला पण अवि त्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या जुन्या खोलीत निघून गेला. मीराने विराजला डोळ्यानेच शांत राहायची खूण केली. तेवढ्यात वैद्य काकाही आले. 

"मीरा, तुला साधारण अंदाज आलाच असेल एव्हाना मी तुला इथे का बोलावलं आहे, म्हणजे तुझा नवीन पत्ता माझ्याकडे आहेच पण..", ते त्यांचं वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात त्यांचा आवाज ऐकून अवि खाली आला. "मला वाटलं आपल्या सगळ्यांसाठी भेटायला ही जागाच सोयीस्कर पडेल. काही दिवसांपूर्वी अविनाश चा मला फोन आला होता. जोशी वाहिनीनंतर आता या घराकडे बघायला कोणी नसणार आहे म्हणून त्याला ते विकून टाकायचं आहे. काही कामानिमित्त तो भारतात येणार होता म्हणून त्याने इथे भेटायचा आग्रह केला", अविकडे बघत वैद्य काकांनी त्यांचं वाक्य पूर्ण केलं. 

"मि. वैद्य मला कळत नाहीये तुम्ही मीराला इकडे का बोलावलं आहे? या घराचं काय करायचं हा निर्णय माझा आहे ना, मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे..लिगली. आणि मीरापण ते मान्य करेल, कायद्याची तेवढी समज तिलाही आहेच. त्यामुळे माझ्या निर्णयाला तिचा काही आक्षेप असायचं कारण मला तरी दिसत नाहीये", अवि उर्मटपणे म्हणाला.

"त्याचं काय आहे मि. जोशी, कायदा फक्त वारसा हक्क सिद्ध करण्यापुरता मर्यादित नाहीये. बाकीही बऱ्याच बाजू असतात त्याला, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं आहे", वैद्य काका काहीसे वैतागून म्हणाले.

"काका, तुम्ही या ना, बसा इकडे. आपण बसून बोलू", अविच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत मीरा म्हणाली. सगळे बसल्यावर काकांनी त्यांच्या बॅग मधून काही कागद पत्र काढली आणि बोलायला सुरवात केली,

"मीरा आणि अविनाश, जोश्यांच्या सगळ्या संपत्ती मधले काही मोठे असेट्स म्हणजे हे त्याचं राहतं घर, लॉ फर्म आणि आश्रम. तुमचे वडील गेल्यानंतर त्यांच्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड डेपोझिटस वगैरे वहिनींच्या नावावर केली होती. पण त्यांनी त्यातली फारशी रक्कम वापरली नाही, त्या सगळ्यांसाठी त्यांनी मीराला नॉमिनी म्हणून नेमलं आहे. नॉमिनी म्हणजे कायद्याच्या भाषेत एखाद्या माणसाच्या जाण्यानंतर त्याने त्याच्या संपत्ती साठी नेमलेली व्यक्ती", बोलताना मध्येच अविला टोमणा मारत काका म्हणाले.

"मीरा ही त्यांच्या गुंतवणुकींची माहिती पत्र आहेत. तुला बँकेत जाऊन काही कागदपत्रांवर सही करावी लागेल. त्यानंतर तू या पैशांचं तुला हवं ते करू शकतेस", म्हणून मीराच्या हातात त्यांनी काही कागदपत्र दिली आणि पुढे बोलायला सुरवात केली,"यातच जोश्यांच्या बिझनेसचे पण पेपर्स आहेत. ते जेव्हा निवृत्त झाले तेव्हाच त्यांनी त्यांची लॉ फर्म तुझ्या नावावर केली होती कारण ती तूच सांभाळत होतीस आणि अजूनही सांभाळते आहेस. यापुढेही ती तुझीच राहील. जर पुढे मागे तुला ती विकायची असेल तर मात्र त्यांचे काही नियम आहेत ते ही तुला या कागदपत्रांमध्ये सापडतील".

अविचा संताप आता वाढत चालला होता, "ही काय फालतुगिरी आहे? बिझनेस, इन्वेस्ट्मेन्ट्स सगळं हिच्याच नावावर आहे, मग मला काय मिळणार आहे? मी एवढ्या लांब ह्या सगळ्यासाठी आलोय का?"

"ह्याच्यासाठी? मला तर वाटलं तू तुझ्या कामासाठी आला होतास ना भारतात? आता तू एकुलता एक वारस आहेस म्हंटल्यावर वाहिनी गेल्यावर तू आलंच पाहिजेस नाही का? आणि सगळं कुठे अजून हे घर राहिलंय की", वैद्य काका उपहासाने म्हणाले.

"म्हणजे हे घर माझ्या नावावर केलंय?" अविने आनंदानं विचारलं.

"नाही, मी कुठे तसं म्हंटलं, घरही मीराच्याच नावावर आहे", वैद्य काका छदमीपणे म्हणाले.

"बास झाली ही फालतुगिरी, काय गं मीरा या सगळ्यासाठी करत होतीस का आई ची सेवा?शेवटी तुला हवं ते मिळालं की तुला", अवि बोलला आणि विराजचा पारा चढला.

"सगळे लोकं तुमच्या पातळीवर नाही उतरत मि. जोशी. तोंड सांभाळून बोला, नाहीतर राग मलाही येतो", विराजचे डोळे रागाने लाल झालेले.

"विराज जाऊ दे अरे, तू कशाला चिडतोयस उगाच. काका अजून काही राहिलंय का आपलं बोलायचं", अविकडे पूर्ण दुर्लक्ष करून मीराने विचारलं.

"हो, 'वात्सल्य' आश्रम. पण अविनाश ह्यातही तुझ्यासाठी फार काही नाहीये. आश्रम त्यांनी मीरा आणि विराजच्या नावावर केला आहे. पण  तुझ्यासाठी हे एक पत्र लिहिलं आहे त्यांनी जे त्या गेल्यावरच तुला द्यावं अशी त्यांची अट होती. हे त्यांनी काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे दिलं होतं. बास, एवढंच ठेवलंय त्यांनी तुझ्यासाठी. काय करणार आता, कायद्यापुढे आपलं कुठे काय चालतंय", वैद्य काका गालातल्या गालात हसत म्हणाले. 

"मीरा, विराज, येतो मी आता, काही लागलं तर मला फोन करा", म्हणून काका गेले.

"मी हे सगळं एवढं सहजासहजी मान्य करणार नाहीये. तुम्हाला कोर्टात खेचीन मी. त्यासाठी मला इकडे रहावं लागलं तरी चालेल", अवि चिडून म्हणाला.

"वा, आता बरा वेळ मिळाला तुला इकडे राहायला. हे चालणार आहे का तुझ्या बायकोला? हाच वेळ जर काकू असताना इकडे घालवला असतास तर आज हे करायची वेळ आली नसती", इतका वेळ गप्प असलेली मीरा म्हणाली. 

"आता ह्या पत्रात काय गुप्त खजिन्याचा पत्ता दिलाय का आईने?", म्हणून अविने चरफडत त्याला दिलेलं पत्र उघडलं.

'प्रिय अवि,

तू हे पत्र वाचतोयस म्हणजे मी या जगात नसणार. तुला हे अशा पद्धतीने कळावं अशी इच्छा नव्हती पण आपण सगळ्याच गोष्टी पत्रातून बोलतो एकमेकांशी नाही का, म्हणून हे ही तसंच सांगितलं.

बरं, आता मी गेल्यावर आपलं घर, बिझनेस याचं काय हा प्रश्न तुला पडलाच असेल. पण काळजी करू नकोस, तुला त्याचा काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे मी. घर विकायला किंवा आपली फर्म विकायला तुला उगाच भारतात यावं लागेल आणि ते काही डेझीला आवडणार नाही. उगाच माझ्यामुळे तुमच्यात प्रॉब्लेम्स नको. म्हणून मी ते सगळं मीराच्या नावावर करून टाकलं आहे. इतक्या वर्षात तुला तुझ्या आई -वडिलांना भेटायला भारतात यायला जमलं नाही, तर एवढ्या छोट्याश्या कारणासाठी कुठे तुला इकडे बोलवायचं.

तुझं लग्न झालं तेव्हा सुरवातीला काही दिवस नाराज होते मी पण मग माझ्या सुनेसाठी, डेझीसाठी काही दागिने करून घेतले होते. पण तू म्हणालास तसं आमच्यामुळे तिला अवघडल्यासारखं नको व्हायला म्हणून मी तेही शेवटी मीराला देऊन टाकले, तसंही अमेरिकेत कुठे दागिने घालणं होणार आहे तिचं. आणि आपला आश्रम, त्याबद्दल तर तुला तसंही एवढं काही वाटायचं नाहीच, मोजून एक दोन वेळा माझ्याबरोबर आला होतास. तुला अमेरिकेतून इकडचे व्यवहार बघणं कठीण जाईल, म्हणून मी तो मीरा आणि तिचा नवरा, विराजच्या नावावर केला आहे. त्या दोघांना फार वाटतं रे तिकडच्या मुलांबद्दल, ते सगळं करतील इकडचं, तुला काहीच करावं नाही लागणार हां. नाहीतर म्हणशील उगाच आई जाता जाता जबाबदाऱ्या टाकून गेली. आधीच तुझ्यावर तुझ्या कुटुंबाची, कामाची केवढी जबाबदारी आहे, नाही का. सगळं मीराला का दिलं असं वाटून तू गैरसमज करून घेऊ नयेस म्हणून हे पत्र लिहिलं.

बाकी माझा आशिर्वाद कायम आहेच तुझ्याबरोबर. सुखाने रहा आणि सुखाने संसार करा. येते आता!

आई'

ते पत्र वाचून अवि गप्प बसला, थोडावेळ तिकडे घुटमळून पत्र जवळच्या टेबलवर ठेऊन तो निघून गेला. तो गेल्यावर मीरा आणि विराजने ते पत्र वाचलं. ते वाचून त्यांना हसायलाही आलं आणि एका आईच्या नशिबात असं पत्र लिहायची वेळ यावी याचं वाईटही वाटलं. 

काही महिन्यांनी मीराने काकूंचा बंगला 'वात्सल्य' आश्रमासारखाच एक नवीन आश्रम, 'ममता', काढण्यासाठी वापरायचं ठरवलं. समाजतल्या पीडित मुलींच्या पुनर्वसनासाठी ती हा आश्रम चालू करणार होती. आज बंगला पाडून तिकडे आश्रमाचं बांधकामाचं सुरु होणार होतं.

मीरा पहाटे लवकर उठून तिकडे गेली. बंगल्याचं फाटक उघडून ती आत आली, पहाटेच्या सूर्याची पहिली किरणं बंगल्यावर पसरली होती. काही वर्षांपूर्वी ती याच दारातून आत आली होती तेव्हा समोर हसऱ्या चेहऱ्याने जोशी काकू उभ्या होत्या, तिचं स्वागत करायला. त्यांच्या बाजूला काका आणि अवि पण होते. त्या दिवसापासून आजपर्यंत मीराच्या त्या घरातल्या इतक्या आठवणी होत्या, काही कटू तर काही गोड. अंगणातून चालत आत येताना पारिजातकाच्या फुलांचा मंद वास मीराच्या नाकात भरला. बांधकाम करताना त्या झाडाला अजिबात धक्का नाही लागला पाहिजे असं तिने कंत्राटदारांना ठणकावून सांगितलं होतं. घरात आल्यावर मीराने हॉलवरून एक नजर फिरवली, कोपऱ्यात काकूंची खुर्ची होती, त्यावर त्यांची शाल नीट घडी घालून ठेवली होती. मीराने ती आपल्या भोवती ओढून घेतली. त्यातल्या काकूंच्या प्रेमाची ऊब अनुभवत ती घरातल्या बाकीच्या खोल्यांमधून फिरत होती. तिकडच्या आठवणी मनात साठवून घेत होती. निघताना मीरा अंगणात आली, जायच्या आधी तिला एक शेवटचं काम करायचं होतं. मीराने अंगणातला लेटरबॉक्स काढला, कारण त्यात आता कोणाचंच पत्र येणार नव्हतं. काकूंची आजपर्यँतची सगळी पत्र मीरा तिच्याबरोबर घेऊन आली होती. ती तिने त्या लेटरबॉक्समध्ये ठेवली आणि तो घेऊन ती तिकडून निघाली. तोपर्यंत विराजही तिला शोधत तिकडे पोहोचला होता. तिच्या मनातल्या भावना ओळखून तो काही न बोलता फक्त तिच्या जवळ उभा राहिला. मीराने एकदा शेवटचं वळून त्या घराकडे पाहिलं. तिच्या आयुष्यातला एक अध्याय आता संपला होता. विराजचा हात धरून ती त्यांच्या घराच्या दिशेने चालायला लागली, तिची नजर मात्र अजूनही काकूंच्या बंगल्यावरच खिळलेली.. तो दिसेनासा होईपर्यंत!

समाप्त!

🎭 Series Post

View all