लग्नानंतर मीरा आणि विराज फिरायला हृषीकेश ला गेले होते. १० - १२ दिवस सगळ्या ताण-तणावापासून दूर, हिमालयाच्या कुशीतल्या त्या छोटाश्या पण अतिशय सुंदर गावात एकत्र वेळ घालवून परत आल्यावर मीरा आणि विराज पुन्हा त्यांच्या ऑफिसला रुजू व्हायला तयार होते. फिरून परत आल्यावर, सुट्टी संपायच्या आधी मीरा दोन दिवस काकूंकडे राहायला आली होती. दोघींनी रात्री जागून भरपूर गप्पा मारल्या. मीरा विराजबद्दल भरभरून बोलत होती. तिला तसं संसारात रमलेलं बघून काकू मनोमन सुखावल्या. दोन दिवसात त्यांनी तिला तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवून खायला घातले. विराजही दिवसातून एखादी फेरी मारत होताच. काकूंच्या हातचं चविष्ट जेवण जेवायला आलोय असं कारण तो सांगत असला तरी प्रत्यक्षात दोन दिवसपण मीरापासून लांब रहावत नव्हतं त्याला.
सोमवारी मीराची सुट्टी संपली. ती ऑफिसला जायला निघाली तेव्हा काकू तिच्या मागे मागे तिला काय हवं नको बघत फिरत होत्या. "काकू, आज इकडे आहे म्हणून तुम्ही सगळं हातात देताय पण उद्या घरी परत गेल्यावर सगळं मलाच करावं लागणार आहे", मीरा त्यांना म्हणाली.
"असू दे गं, माहेरपणाला आली आहेस ना, म्हणून करतेय. तसंही मला काय काम आहे. बरं मीरा तुझी इतके दिवस सुट्टी होती म्हणून मी बोलले नाही, पण आज ऑफिसला चालली आहेस तर जरा हे माझं पत्र पोस्ट करशील का?", काकू म्हणाल्या.
"हो करते की, असं का विचारताय, इतकी वर्ष करतेय मग आज पण करेनच. द्या मला पत्र", मीरा म्हणाली आणि काकू लगबगीने पत्र आणायला गेल्या. त्या परत आल्या तेव्हा मीराच्या हातात पत्र देताना जरा काचकूच करत होत्या.
"मीरा, मला कळत नाहीये मी हे पत्र पाठवू का, अविला आवडेल का ?", काकूंना अचानक पडलल्या ह्या प्रश्नाचा उलगडा मीराला होत नव्हता.
"असं का वाटतंय तुम्हाला? अवि काही बोलला का तुम्हाला ज्याने तुम्हाला वाईट वाटलंय?", मीराने काळजीने विचारलं.
"नाही तो काही बोलला नाही, पण मी ह्या पत्रात लिहिलंय त्याने कदाचित त्याला एकदम कात्रीत पकडल्यासारखं वाटेल आणि त्यामुळे त्याने मला पत्र पाठवणंच बंद केलं तर?", काकू स्वतःशीच विचार करत म्हणाल्या.
"असं तुम्ही काय लिहिलंय पत्रात", मीराने त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं विचारलं.
"नाही म्हणजे आता तुझंही लग्न झालं आहे त्यामुळे तू इथे रहात नाहीस. म्हणून मी म्हटलंय त्याला की एकदा येऊन जा घरी. आता ह्या वयात मला तर काही तिकडे जायला जमणार नाही, त्यात त्याच्या बायकोला आवडायचं नाही. एकदा त्याला भेटायची फार इच्छा आहे गं मीरा. ह्या वयाचा काही भरवसा नाही, कधी काही झालं पटकन तर.. एकदा त्याला बघायचं होतं गं", काकू आलेला आवंढा गिळत म्हणाल्या. मीराला काय बोलावं सुचेना.
"काकू, आपलं आता ठरलंय ना त्याच्या संसारात आपली अडचण नको. आणि पत्र पाठवतोय की तो नियमित. मला फक्त तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तुम्हालाच त्रास होईल याची काळजी वाटतेय. आपण हे पत्र पाठवूया पण तुम्ही अविचं जे काही उत्तर येईल ते स्विकारायला तयार आहात का?", मीरा काकुंजवळ जात त्यांना जवळ घेऊन समजावत म्हणाली.
"मीरे अगं पोटच्या पोराला इतकी वर्ष भेटले नाहीये मी, त्याचा आवाज ऐकला नाहीये. बरेचदा त्याला फोन करावा असं वाटतं, पण मनात कायम भीती असते चुकून फोन डेझी ने उचलला तर त्यांच्यात अडचणी नको. मनात कुठेतरी आशा असते एखाद दिवशी त्याचाच फोन येईल, किंवा तो दारात उभा असेल. इतकी वर्ष वाट बघितली आणि म्हंटलं आता आपणच विचारावं अविला. स्वतःच्या मुलाकडे एवढीशी गोष्ट तर मागूच शकते ना एक आई", काकू बोलत होत्या, शेवटी मीराने नाईलाजाने ते पत्र घेतलं.
"मला समजतंय काकू तुम्हाला काय वाटतंय. द्या ते पत्र. आजच पाठवते मी", म्हणून मीरा ऑफिसला निघाली. बाहेर विराज बाईकवर तिची वाट बघत होता.
"काय मॅडम, झालं की नाही माहेरपण अजून? संध्याकाळी ऑफिसवरून पिक उप करेन तुला, एकत्रच घरी जाऊ", मीरा बाईकवर बसत असताना विराज म्हणाला.
"एवढी काय घाई आहे, अजून एक दोन दिवस राहते की इकडे", मीरा त्याला चिडवायला म्हणाली.
"ए मीरा, नाही हां. दोन दिवस कसे काढलेत मलाच माहिती. आज तू घरी ये ना प्लिज. मला करमत नाही गं तुझ्याशिवाय", विराजच्या बोलण्यावर मीराला हसू आलं.
"हो रे, मज्जा करत होते मी. आज घरी येतेच आहे", बाईकवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत मीरा म्हणाली. शेवटी तिनेही त्याला मिस केलंच होतं.
खूप दिवसांनी ऑफिसला आल्यामुळे मीराचे पुढचे दिवस इतके बिझी गेले की बघता बघता त्यांच्या लग्नाला दोन - तीन महिने होऊन गेले. दोघं संसारात आणि कामात बुडाले होते. मीरा दिवसाआड काकूंना भेटून येत होती, पण आजकाल त्यांचा चेहरा तिला ओढल्यासारखा वाटत होता. अशातच एक दिवस मीरा ऑफिसमध्ये असताना तिला काकूंच्या शेजाऱ्यांचा फोन आला.
फोन ठेऊन मीरा तातडीने हॉस्पिटलला जायला निघाली, वाटेतच तिने विराजला फोन केला. दोघे मागोमागच तिकडे पोचले. "मीरा, अगं काय झालं अचानक? काकूंना काय झालंय?", त्याने आल्या आल्या विचारलं.
"मला पण माहित नाही रे, त्या सबनीस काकूंचा फोन आला होता, त्या..", बोलता बोलता मीराला रडायला येत होतं. विराजने तिला जवळ घेतलं, "काळजी नको करुस, काही नाही होणार काकूंना",तिच्या डोक्यावरून हात फिरवत, तिला समजावत तो म्हणाला. तेवढ्यात डॉक्टर तिकडे आले.
"मीरा, मी तुला स्पष्टच सांगतो जरा, ह्या वेळेला परिस्थिती जरा गंभीर आहे. त्यांचं बी.पी., शुगर सगळंच वाढलंय. औषधं त्या वेळेवर घेत नव्हत्या बहुतेक. त्यातच त्यांना हार्ट अटॅक आलाय, नशिबाने त्यांना वेळेवर इकडे आणलं त्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो. पण त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे, मी तर म्हणेन तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर बोलवून घ्या", डॉक्टरांच्या बोलण्याने मीराच्या पायातलं त्राणच गेलं. ती आधारासाठी जवळच्या खुर्चीत बसली.
"मीरा, मला समजतंय वेळ जरा कठीण आहे पण आपल्यालाच काय तो निर्णय घ्यावा लागेल. आपल्याशिवाय त्यांचं जवळचं अजून कोणी आहे का? त्यांच्या बहिणी, मैत्रिणी वगैरे?", मीराच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला. मीराला अजूनही झाल्या गोष्टींचा उलगडा होत नव्हता. पण विरजचं म्हणणं बरोबर होतं.
"नाही, बहिणी वगैरे नाहीयेत, मैत्रिणी आहेत आपल्या कॉलनी मधल्या पण त्यांना हॉस्पिटल मध्ये बोलावण्याइतक्या जवळच्या नाही आहेत त्या", मीरा म्हणाली.
"बरं, आणि.. अवि?", विराजने विचारलं. तसं मीराने चमकून त्याच्याकडे बघितलं.
"नाही म्हणजे त्यालाही सांगावं लागेल ना आपल्याला. आपला त्याचाशी काही कॉन्टॅक्ट नसला तरी काकुंशी तर त्याचं पत्रातून बोलणं होत होतं ना. आपण त्याला फोनवर कळवून टाकू", विराज तिला म्हणाला.
"मला नाही वाटत त्याची काही गरज आहे, ह्या सगळ्याला तोच जबाबदार आहे", म्हणून मीरा तिकडून निघून गेली. बघता बघता दिवसाची रात्र झाली, विराज आणि मीरा अजूनही हॉस्पिटल मध्येच होते. काकूंची तब्येत सकाळपेक्षा थोडी सुधारली होती पण अजून त्या शुद्धीवर आल्या नव्हत्या. आय.सी.यु मध्ये नातेवाईकांना थांबायला परवानगी नसल्यामुळे मीरा किंवा विराजला तिकडे थांबता येणार नव्हतं. डॉक्टरांशी बोलून दोघं घरी यायला निघाले.
"मीरा प्लिज थांब, आपलं सकाळचं बोलणं अर्धवटच राहिलं आहे. त्यांच्या सख्ख्या मुलाला त्यांच्या तब्येतीबद्दल न सांगणं मला पटत नाहीये. तो कसाही वागला असेल पण शेवटी तो त्यांचा मुलगा आहे . उद्या जर काही बरं वाईट झालं, तर त्याला प्रश्न नाही पडणार का, की अचानक काकूंची पत्र येणं बंद का झालं? तेव्हा त्याला कळलं तर केवढा मोठा धक्का बसेल अगं", विराज मीराला तिच्या निर्णयापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होता. दोघं हॉस्पिटलबाहेर बोलत उभे होते.
"विराज, आजपर्यँत मी तुला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सांगितली आहे, शिवाय एक सोडून. ती गोष्ट कधीच कोणालाच कळू नये असंच मला वाटत होतं. पण आता आपलं लग्न झालंय आणि काकूंचं हे असं.. माझ्या एकटीमध्ये हे सहन करण्याची ताकद आता नाहीये", मीरा बोलत होती. विराजची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.
"बोल ना मीरा, काय सांगायचंय तुला?", तिच्यासमोर जात त्याने विचारलं.
"चल काकूंच्या घरी जाऊया, तिकडेच सांगते सगळं", म्हणून मीरा निघाली. दोघं घरी जात असताना विराजच्या डोक्यात विचारांची चक्र फिरत होती, 'काय सांगायचं असेल मीराला मला?'
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा