लेटरबॉक्स - भाग २२

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

मीरा आणि विराजच्या लग्नाचा दिवस उजाडला. ज्या दिवसाची दोघांनी एवढ्या आतुरतेने वाट बघितली होती तो दिवस आला होता. दोघांचेही आई वडील नसल्यामुळे त्यांचं लग्न ज्ञानप्रोबोधिनी पद्धतीने करण्याचं ठरलं होतं. जे विधी परिस्थितीला अनुरूप आहेत आणि गरजेचे आहेत तेवढेच केले गेले. पण दोघांनी त्या दिवसातला प्रत्येक क्षण मनापासून एन्जॉय केला. विराज बरोबर सप्तपदी चालताना मीराला तिचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. अविनंतर पुन्हा कोणावर आपण प्रेम करू शकू, कोणाबरोबर आपलं आयुष्य जगू शकू असं मीराला वाटलं नव्हतं, पण विराज आला आणि तिचं पूर्ण जगच बदलून गेलं. त्याच्यापासून तिच्या भावना लपवताना ती त्याच्यात अजूनच गुंतत गेली.. तिच्याही नकळत. आणि आज त्यांचं नातं एका नव्या टप्प्यात प्रवेश करत होतं, दोघांच्याही मनात थोडी धाकधूक होत होती पण त्या दोघांनाही आजच्याइतका आनंद पहिले कधीच झाला नव्हता. लग्न आप्तेष्टांच्या आणि काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं. आश्रमातल्या मुलांनीही लग्नात भरपूर मज्जा केली.. शेवटी लग्न त्यांच्या लाडक्या मीरा ताईचं आणि विराज दादाचं होतं..

लग्नानंतर मीरा आणि विराज काकूंबरोबर घरी आले होते, तिकडूनच ते त्यांच्या नवीन घरी जाणार होते. विराजकडे करायला कोणी नसल्यामुळे लक्ष्मीपूजनाची तयारी काकूंनी त्यांच्या घरीच केली होती. सगळं झाल्यावर मीरा जायला निघाली, तेव्हा काकूंना सोडून तिचा पाय निघत नव्हता. त्यांना असं एकटं सोडून ती कधीच राहिली नव्हती. खास करून काका गेल्यावर.. आपण गेल्यानंतर एवढं मोठं घर काकूंना खायला उठणार आहे हे तिला माहिती होतं पण तिचा इलाज नव्हता. काकूही जरा जुन्या वळणाच्या असल्यामुळे, मुलीच्या संसारात जाऊन राहणं त्यांना पटत नव्हतं. 

"नीट रहा काकू, मी उद्या सकाळी येईनच", मीरा डोळ्यातले अश्रू अडवत म्हणाली. 

"अगं आता तू तुझ्या संसारात लक्ष दे, माझं काय, मी रमवेन मन कशात तरी! हे तुमचे लग्नानंतरचे प्रेमाचे गुलाबी दिवस. त्यात माझी काळजी करत बसू नकोस, कळलं का? विराजकडे लक्ष दे. त्याला काय हवं नको बघ. ते घर आता तुझी जबाबदारी आहे", काकू म्हणाल्या तशी मीरा त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. 

तिला प्रेमाने थोपटत काकू विराजकडे बघून म्हणाल्या, "विराज, तुला तसं काही सांगायची गरज नाहीच आहे. मला माहिती आहे माझ्या मीराला तू कायम खुश ठेवशील. पण तरी आईचं मन आहे ना, म्हणून सांगते, तिच्या वाटची दुःख तिची आधीच भोगून झाली आहेत, आता तिच्या आयुष्यात फक्त आनंद आणि सुख येईल याची जबाबदारी तुझी. तशी फार गुणाची आहे माझी मुलगी. तू फक्त तिला समजून घे आणि तिच्यावर भरभरून प्रेम कर, मग बघ ती तुमचा संसार कसा सुखाचा करेल", काकू विराजच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. 

निघताना दोघांनी काकूंना नमस्कार केला, "सुखी रहा आणि सुखाने संसार करा", काकूंनी आशिर्वाद दिला. दोघं निघून गेल्यावर काकू हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसल्या. गेल्या कितीवर्षात पहिल्यांदाच त्या या घरात एकट्या होत्या. त्या घराच्या भिंतींमधल्या आठवणी त्यांच्यासमोर जणू पुन्हा जिवंत होत होत्या. त्यांनी आणि काकांनी एकत्र घालवलेले क्षण, अविचं बालपण, मीरा त्या घरात पहिल्यांदा आली तो दिवस, तिचे आणि अविचे  प्रेमाचे दिवस, सगळं काही काकूंच्या डोळ्यासमोर पुन्हा घडत होतं. पण त्या आठवणीतली कोणीच माणसं आज त्यांच्या बरोबर नव्हती. त्या उठून टेबलाजवळ गेल्या आणि समोरच्या खुर्चीवर बसल्या. टेबलवर त्यांनी अविला अर्धवट लिहिलेलं पत्र पडलं होतं. मीराच्या लग्नाच्या गडबडीत त्यांना ते पूर्ण करता आलं नव्हतं,  आज जरा निवांत वेळ मिळाल्यावर त्यांनी ते पूर्ण करायला घेतलं.

विराज आणि मीरा त्यांच्या नवीन घरी पोचले तेव्हा अंगणात अंधार होता, ते स्वाभाविकच होतं म्हणा. विराज नुकताच तिकडे राहायला आला होता त्यामुळे सगळं सामान अजून जागच्या जागी लागायचं होतं, अंगणातले गेलेले दिवे सुद्धा. दोघं अंगणात आले आणि विराज मीरासमोर हात धरून तिला थांबवत म्हणाला, "एक मिनिट इकडेच थांब, मी आलोच", म्हणून तो अंधारात गायब झाला. मीरा आसपास बघत होती, अंधारामुळे फारसं काही दिसत नव्हतं. तेवढ्यात बंगल्याला लावलेले लाइट्स चालू झाले. विराजने पूर्ण बंगल्याला लाईटच्या माळा लावून घेतल्या होत्या, त्यांच्या प्रकाशात पूर्ण बंगला उजळला होता. मीराच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती बंगल्याजवळ येऊन दार उघडणार तेवढ्यात विराजने दरवाजा उघडला, त्याच्या हातातलं माप त्याने दरवाजात ठेवलं. 

"विराज, अरे एवढं सगळं कुठे करत बसलास", मीरा त्याच्याकडे बघत म्हणाली. 

"एवढं कुठे? आणि हा तर तुझा हक्क आहे ना, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, तिचं घर सोडून नवीन घरी येताना तिचं स्वागत व्हावं, शेवटी या आठवणी आयुष्यभरासाठी असतात. म्हणून मी काकूंना विचारून घेतलं सगळं. आता हे माप ओलांडून ये आत", विराज म्हणाला. 

ते माप ओलांडून आत जाताना मीराचं लक्ष दरवाजा जवळच्या पाटीकडे गेलं, 'सौ. मीरा विराज मोहिते' असं नाव त्या पाटीवर लिहिलं होतं. आपल्या नावापाठी लागलेलं विराजचं नाव पाहताना मीराच्या सर्वांगातून आनंदाची लहर गेली. आज पर्यंत तिला तिच्या खऱ्या कुटुंबाबद्दल काहीच माहित नव्हतं. जोशी काका काकूंनी तिच्यावर सख्ख्या आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं असलं तरी त्यांनी तिला कायद्याने दत्तक घेतलं नव्हतं, त्यामुळे तिने कधीच त्यांचं नाव लावलं नव्हतं. पण आज तिला तिचं हक्काचं नाव, कुटुंब मिळालं होतं. आजपासून आयुष्यभरासाठी ती मीरा विराज मोहिते म्हणून ओळखली जाणार होती.

"कुठे हरवलीस? ये की आत. अजून खूप काही करायचं राहिलंय", विराज तिला डोळा मारत म्हणाला तशी मीरा लाजली आणि माप ओलांडून आत आली.

कपडे बदलून आणि फ्रेश होऊन मीरा त्यांच्या खोलीत आली तेव्हा विराज खिडकीजवळ उभा होता. जवळच फोनवर त्याने हळू आवाजात जुनी गाणी लावली होती. तिला बघून तो तिच्याजवळ आला आणि मीराने अवघडून दुसरीकडे बघितलं. आजपर्यंत ती आणि विराज कायम त्यांच्या नात्याची मर्यादा ओळखून वागले होते, त्यामुळे आज असं त्याच्याबरोबर एकटं त्यांच्या खोलीत असताना मीराला थोडं अवघडल्यासारखं होत होतं. विराजने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला, " काय मिसेस मोहिते, कसं वाटतंय?" तिच्या चेहऱ्याजवळ जात तो म्हणाला आणि मीराने तिचे डोळे भितीने आणि काहीशा लाजेने बंद केले. काही क्षण ती तशीच उभी राहून विराजच्या स्पर्शाची वाट बघत होती. पण काहीच झालं नाही तेव्हा तिने बिचकतच डोळे उघडले, विराज समोर उभा राहून तिच्याकडे बघून हसत होता.

"तुला काय वाटलं, मी काय करणार आहे? आणि काय गं, त्या दिवशी तर एकदम शूरवीर बनत होतीस, मग आज काय झालं? पुन्हा ते रूप बघायला आवडेल मला", तिचा चेहरा हातात घेत विराज म्हणाला आणि मीराने लाजेनं त्याच्या मिठीत आपला चेहरा लपवला.

पौर्णिमेचा चंद्र आकाशात वर चढत होता. अंगणातली झाडं रात्रीच्या गार हवेत नाजूकपणे हलत होती, खिडकीवर पडलेल्या त्यांच्या सावल्यांकडे मंत्रमुग्धपणे पहात मीरा आणि विराज एकमेकांच्या मिठीत पहुडले होते. खिडकीतून येणाऱ्या चांदण्याच्या प्रकाशात उजळलेला मीराचा चेहरा विराज एकटक पहात होता. अशाच एका रात्री गच्चीत गाणी ऐकत असताना तिच्या चेहऱ्याकडे पाहतांना विराज तिच्या प्रेमात पडला होता. आता प्रत्येक रात्री तो हाच चेहरा बघून झोपणार होता आणि दिवसाची सुरवातही त्यानेच करणार होता. त्याने नाजूकपणे मीराच्या चेहऱ्यावरची केसांची बट बाजूला केली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बाजूलाच किशोर कुमारांचं गाणं वाजत होतं..

कोरा कागज़ था ये मन मेरा
लिख लिया नाम इसपे तेरा
सूना आंगन था जीवन मेरा
बस गया प्यार इसपे तेरा!

क्रमशः..!

🎭 Series Post

View all