लेटरबॉक्स - भाग २०

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

"विराज? कुठे आहेस अरे? कधीपासून वाट बघतोय आम्ही", मीरा फोनवर विराजशी बोलत होती.

"अगं मी निघतंच होतो तेवढ्यात बॉस ने मिटिंग साठी बोलावलं. एका क्लायंट बरोबर खूप महत्वाची मीटिंग होती. ती आत्ता जस्ट संपली. आता निघतो आणि पटापट पोचतो", विराज पलीकडून म्हणाला.

"बरं, नीट ये. उगाच बाईक विमानासारखी चालवू नकोस. आम्ही थांबलोय तुझ्यासाठी", म्हणून मीराने फोन ठेवला. 

'वात्सल्य' आश्रमाला आज ४० वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्त मीरा आणि काकूंनी आश्रमातल्या सगळ्या मुलांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. आजच्याच दिवशी सगळ्यांसमोर मीरा आणि विराजचं नातं ऑफिशिअल करायचं असंही काकूंनी ठरवलं होतं. अर्थात मीराला या बद्दल काही माहित नव्हतं. तिला आणि विराजला एकमेकांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देऊन आता काही महिने होऊन गेले होते त्यामुळे काकूंनी अडून अडून विचारायला सुरवात केलीच होती. संध्याकाळी सगळे आश्रमात जमले होते, मीरा आणि मुलांनी मिळून आश्रम सजवला होता. अंगणात एक छोटासा स्टेज बांधला होता त्यावर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. सगळी तयारी झाली होती आता फक्त सगळे विराज यायची वाट बघत होते. तेवढ्यात विराजची बाईक फाटकातून आत आली. त्याला बघून मीरा धावत त्याच्याकडे गेली. "किती वेळ वाट बघायला लावतोस रे? मुलं कंटाळली बिचारी", विराज बाईक पार्क करत असताना मीरा म्हणाली.

"खरंच सॉरी यार, निघताच नाही आलं मला. आणि वाट फक्त मुलांनी बघितली का? तू नाही", विराज मीराजवळ जात म्हणाला. 

"जास्त लाडात येऊ नकोस, आधी उशीर करायचा आणि मग मस्का मारायचा. चल आता", म्हणून मीरा विराजला आत घेऊन आली.

काकूंनी आश्रमात असलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केली आणि मग सगळ्यांनी मिळून आरती केली. आरती नंतर विराज त्याच्या हातातली फुलं समोर टाकायच्या ऐवजी मीराच्या डोक्यावर टाकत होता. काकूंना कळल्यावर त्यांनी त्याच्याकडे बघून डोळे वटारले, तसा विराज गप्प बसला. ते बघून मीराला हसायला आलं. आरती झाल्यावर सगळे अंगणात आले. मुलांचे कार्यक्रम चालू व्हायच्या आधी सगळ्यांनी काकूंना आश्रमाबद्दल दोन शब्द बोलायचा आग्रह केला. शहरातले काही नामांकित बिझनेसमन त्यांच्या परिवाराबरोबर मीराच्या ओळखीने या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्या डोनेशनमुळे आश्रमात सुधारणा करायला मदत होणार होती. 

"तुम्ही सगळ्यांनी अचानक मला असं बोलायचा आग्रह केलात त्यासाठी मी खरं तर तयार नव्हते. हा आश्रम मी ४० वर्षांपूर्वी सुरू केला. ईश्वरकृपेने माझ्या आई वडिलांचं छत्र मला वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत मिळालं, पण सगळ्यांच्याच नशिबात ते असतंच असं नाही. आपल्याकडे असलेलं आपण जमेल तसं दुसऱ्यांबरोबर वाटावं या एकाच भावनेने मी हा आश्रम चालू केला होता. आणि आज ४० वर्षांनंतर ह्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी ते ध्येय साध्य करण्यात काहीशी सफल झाले आहे असं मला वाटतं. अर्थात ह्याचं अर्ध्याहून अधिक श्रेय मीराला जातं. गेली काही वर्ष हा आश्रम तिनेच सांभाळला आहे. त्यामुळे आजच्या या महत्वाच्या दिवशी माझ्या ऐवजी तिने इथे येऊन बोलणं जास्त योग्य ठरेल", म्हणून काकूंनी मीराला स्टेज वर बोलावलं. 

"नमस्कार, आज आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी खरंच आपली खूप आभारी आहे. काकूंनी मला ह्या सगळ्याचं श्रेय देणं हे खरं तर चुकीचं आहे. कारण त्यांनी हा आश्रम सुरु केला नसता तर कदाचित मी आज इथे नसते. तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हे माहित नसेल कारण तुम्ही मला कायम जोशी काका काकूंची मुलगी म्हणूनच ओळखलं आहे. पण वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मी या आश्रमातच वाढले आहे. इकडच्या भिंतींमध्ये माझ्या असंख्य आठवणी आहेत. पाच वर्षांची असताना मी ह्याच दारातून आत आले होते, माझ्या कोणत्यातरी नातेवाईकांचा हात पकडून. खूप विश्वासाने धरलेला तो हात मला या नवीन जागेत सोडून निघून गेला. मी जिवाच्या आकांताने त्यांच्या मागे धावले पण तेवढ्यात कोणीतरी मला पकडलं. त्या आमच्या आश्रमातल्या उमा काकू होत्या. आता मला तेव्हचं सगळंच आठवतंय असं नाही, पण इकडच्या सगळ्या माणसांनी माझ्यावर तेव्हापासून केलेलं प्रेम हे आयुष्यभर माझ्याबरोबर राहील", मीरा बोलत होती आणि सगळे शांत होऊन ऐकत होते.  

"अशातच एक दिवस शकू काकू माझ्या आयुष्यात आल्या. स्वतःचा संसार असताना, सख्खा मुलगा असताना, आश्रमातल्या या एका मुलीवर इतका जीव लावायची त्यांना खरंतर काहीच गरज नव्हती, पण त्यांनी तेव्हापासून माझ्यावर एवढं निरपेक्ष प्रेम केलंय की मला माझ्या खऱ्या आई वडिलांची आठवण कधीच आली नाही. त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी राहायला गेल्यावर मला माझं कुटुंब मिळालं. आयुष्यात ही संधी सगळ्यांना मिळतेच असं नाही. पैशांची मदत करायला कदाचित खूप हात पुढे येतीलही, पण आपल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांच्या हक्काचं प्रेम या अनाथ मुलांबरोअबर वाटणारी लोकं खूपच कमी आहेत. आणि आपल्या समाजाला खरं तर तशाच लोकांची गरज आहे आज. ह्या निरागस मुलांना ह्या पैशाने त्यांनी जे गमावलंय ते नाही मिळणार नाही, हां त्यांना राहायला जागा मिळेल, खायला प्यायला पौष्टिक अन्न मिळेल, शिक्षण मिळेल. पण ह्या सगळ्या पेक्षाही जास्त गरज आहे ती कोणीतरी त्यांना आपलं म्हणण्याची, प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायची, त्यांच्या पाठीवर शाबासकी द्यायची आणि प्रसंगी त्यांना जवळ घेऊन ते या जगात एकटे नाहीयेत याची जाणीव करून द्यायची. ह्या मीराला आयुष्यात आईचं प्रेम दुसऱ्यांदा मिळालं, पण तेच ह्या बाकीच्या मुलांनाही मिळावं एवढीच इच्छा आहे. मी..", मीराला बोलताना आपल्या भावना अनावर झाल्या. ती आपल्या डोळ्यातलं पाणी अडवायचा आणि पुढे बोलायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात विराजने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने आपल्या हाताने तिचे डोळे पुसले आणि तिच्या हातून माईक घेतला. आपला हात तसाच तिच्या खांद्यावर ठेऊन त्याने बोलायला सुरवात केली, 

"बऱ्याचदा आपल्याकडे नसलेल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या की त्याची खरी किंमत आपल्याला कळते. ती गोष्ट नसण्याचं दुःख काय असतं ते आपल्याला माहिती असतं. आणि त्यातूनच दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना जन्म घेते. पण आजकालच्या बिझी आयुष्यात आपण बरे, आपलं काम बरं आणि आपलं कुटुंब बरं ही भावना एवढी मूळ धरते आहे की आपल्याकडे असलेलं थोडंही दुसर्यांना देणं आपल्याला जमत नाही. पण मीराने ही भावना फक्त व्यक्त केली नाहीये तर त्यासाठी ती दिवसरात्र झटतेय. आज ती इथे जे काही बोलली, ते फक्त एक भाषण नव्हतं तर तिने तिच्या आयुष्यातली एक नाजूक गोष्ट तुमच्या बरोबर शेअर केली आहे. तुमच्यापैकी कितीतरी जणांनी मीरबरोबर काम केलं आहे, त्यामुळे ती तिच्या वयाच्या मानाने तिच्या क्षेत्रातली एक यशस्वी वकील आहे हे तुम्हीही मान्य कराल. योग्य वेळी मिळालेलं मार्गदर्शन, आधार आणि प्रेम एक जीवन पूर्णपणे बदलू शकतं याचं ती मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच समाजात या गोष्टीबद्दल जागरूकता वाढवणं आणि  अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोचवणं खूप महत्वाचं आहे", विराजने आपलं बोलणं संपवलं आणि सगळ्यांनी उठून त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या. विराज बोलत असताना मीरा पूर्ण वेळ त्याच्याकडे बघत होती. त्याला तसं बोलताना बघून तिला त्याचा खूप अभिमान वाटत होता. किती आदर होता त्याच्या मनात मीरासाठी आणि काळजीही. मगाशी तिला अश्रू अनावर झाले तेव्हा तिने काही न बोलता, तिच्या मनातल्या भावना तिच्याही आधी ओळखून तो स्टेजवर आला. त्याच्या तिकडे असण्याने मीराला किती आधार मिळाला होता हे ती शब्दात कधीच मांडू शकली नसती. 

विराज मीराकडे बघून हसला आणि मीरा तिची सगळी दुःख विसरली. त्याच्यापेक्षा योग्य जीवनसाथी तिला मिळूच शकत नाही याची तिला खात्री पटली. काकूंचं मनही त्या दोघांकडे बघून भरून आलं. त्यांच्या लग्नाची अनाउन्समेंट करायला त्या स्टेज वर जाण्यात इतक्यात विराजने बोलायला सुरवात केली, 

"तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर तुमचा दोन मिनिटांचा वेळ मला हवा होता. नाही म्हणजे आधीच मी बराच वेळ घेतला आहे आणि जेवणाचा छान वास येतोय, मला स्वतःलाच जाम भूक लागलीये त्यामुळे खूप वेळ नाही घेणार मी तुमचा. पण त्या आधी खूप दिवसांपासून रखडलेलं काम मला पूर्ण करायचं होतं. आणि मीराच्या आयुष्यातली या आश्रमाची आणि इथल्या मुलांची जी जागा आहे ती लक्षात घेता त्या कामासाठी हीच योग्य वेळ ठरेल". मीराने प्रश्नार्थक नजरेने विराजकडे पाहिलं. तो तिला जे वाटतंय तेच करणार आहे? आणि क्षणाचाही विलंब न करता विराज मीरासमोर गुडग्यावर बसला,

"मीरा, तुला भेटल्यापासून माझं आयुष्यच बदललंय. तुझं हसणं, तुझं भरभरून जगणं आणि दुसऱ्यांवर निःस्वार्थी प्रेम करणं ह्या सगळ्याने माझंच आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं मला. आत्तापर्यंत कुटुंबाचं प्रेम कधी मिळालं नाही, पण आता तुझ्याबरोबर माझं.. आपलं कुटुंब सुरु करायला आवडेल मला. विल यु मॅरी मी?", तिच्यासमोर अंगठी धरत त्याने विचारलं. ती अंगठी घ्यायला थांबल्यामुळेच त्याला संध्याकाळी आश्रमात यायला उशीर झाला होता. 

मीराचे डोळे भरून आले. तिने एकदा काकूंकडे बघितलं, त्यांनी मानेनंच आपली संमत्ती दर्शवली. आणि मीराने आपला हात पुढे केला. विराजने तिच्या हातात अंगठी घातली. तो उठून उभा राहिला आणि त्याने मीराला मिठी मारली. त्यांच्या भोवताली टाळ्यांचा कडकडाट चालू होता, मुलं आनंदाने ओरडत होती. पण मीरा आणि विराज, एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते, त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न बघत..!

क्रमशः..!

🎭 Series Post

View all