लेटरबॉक्स - भाग १७

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

काकू घरी येऊन एक दोन आठवडे होऊन गेले होते. त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मीराही पुन्हा ऑफिस आणि आश्रमाच्या कामात बुडाली होती. अशातच एका सकाळी मीरा तिच्या खोलीत आवरत असताना तिला काकूंच्या ओरडण्याचा आवाज आला. ती घाबरून धावत खाली आली तेव्हा काकू अंगणातून धावत घरात येत होत्या. "अहो काकू? हळू जरा. कुठून एवढ्या पळत येताय?", मीरा म्हणाली. आणि तेवढ्यात तिला त्यांच्या हातात पत्र दिसलं.

"मीरा, माझा विश्वासच नाही बसत आहे गं. अविचं पत्र आलं आहे मला", काकू हातातलं पत्र मीरासमोर हलवत म्हणाल्या. तिच्या काही बोलण्याची वाट न बघता त्यांनी पत्र उघडून वाचायला सुरवात केली.

'प्रिय आई,

पत्र लिहायला कुठून आणि कशी सुरवात करू मला कळत नाहीये. एवढा काळ मध्ये लोटलाय आणि एवढ्या गोष्टी बदलल्या आहेत. इतक्या वर्षात कधीच तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला, स्वतःच्या संसारात इतका रमून गेलो की आपले आई वडील आपल्या एका पत्राची वाट बघत असतील हे कधी डोक्यातच नाही आलं. आज स्वतः वडील झाल्यावर जेव्हा माझी मुलं समोर नसतात तेव्हा जीव किती कासावीस होतो ते कळलं. तू आणि बाबांनी इतकी वर्ष कशी काढलीत माझ्याशिवाय याची कल्पना मी करूच नाही शकत!

माझ्या गेल्या काही वर्षातल्या वागण्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे आई. मला मान्य आहे, माझे अपराध एवढे मोठे आहेत की मी रोज हजारवेळा माफी मागूनही ते माफ नाही करता येणार. पण मला माहित आहे आजपर्यंत तू माझ्या चुका कायम पोटात घालत आलीस, आशा करतो ह्या वेळेलाही तुझ्या अविला माफ करशील. तुझ्या मुलाला तुझ्यापासून लांब ठेवल्याबद्दल, तुझ्या नातवंडांना तुझ्यापासून लांब ठेवल्याबद्दल मी तुझा गुन्हेगार आहे! जय बद्दल तर तुला माहितच आहे, पण मायरा बद्दल मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. जय पाठोपाठ दोन वर्षांनी आम्हाला मुलगी झाली. त्या दोघांच्या मागे धावताना वेळ कसा जातो मला कळतंच नाही. 

माझं आणि डेझीचं ही बरं चाललं आहे. थोड्या कुरबुरी असतात पण भांडणं कोणत्या नवराबायको मध्ये होत नाहीत. तिच्या सांगण्याववरुन, तिला आवडत नाही म्हणून मला तुमच्याशी संबंध तोडावे लागले. पण मला एक कळलंय की असे जुने संबंध तोडून बनवलेली नवीन नाती जपणं खूप कठीण असतं. तुला प्रश्न पडला असेल की आपल्या मुलाने आपल्याला कधीच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न का नाही केला, तुमची या सगळ्यात काय चूक होती? अगदी खरं सांगतो, तुम्ही कुठेच चुकला नाहीत आणि कमीही पडला नाहीत. मीच मुलगा म्हणून कमी पडलो. बायकोचं मन राखण्यासाठी आई-वडिलांचं मन मोडलं. 

असा एकही दिवस जात नाही जेव्हा तुमची आठवण येत नाही. बाबा गेले तेव्हा यायची खूप इच्छा होती पण तेव्हा डेझी तिच्या सेमिनार साठी बाहेर गेलेली आणि मुलांची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून नाही जमलं. इतक्या वर्षांनंतरही डेझीने तुम्हाला स्वीकारलं नाहीये याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. पण आता गोष्टी एवढ्या पुढे गेल्या आहेत, आम्हाला दोन मुलं आहेत, त्यामुळे हा संसार सुखाचा ठेवणं खूप महत्वाचं आहे. डेझी आणि माझ्यामधले प्रॉब्लेम्स वाढून मुलांना त्याचे परिणाम भोगायला लागावेत असं मला खरंच नकोय. आशा करतो तु माझी ही द्विधा मनःस्थिती समजून घेशील. एक मुलगा म्हणून मी आधीच कमी पडलो आहे पण एक वडील म्हणून कमी नाही पडायचंय मला.

आता पत्र आवरतं घेतो. इतके वर्षाचं साठलेलं एका पत्रात लिहिणं कठीण आहे. जमेल तेव्हा पत्र पाठवत जाईन. पत्राबरोबर आमचे काही फोटोज आणि माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो आहे. तुला कधी लिहावंसं वाटलं तर त्या पत्त्यावर लिही. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे!आणि आई..  आय लव्ह यु!

p.s: इतके वर्षात मराठी लिहायची सवय अगदीच गेली आहे माझी त्यामुळे माझ्या बाकीच्या चुकांसारखंच माझं अक्षर आणि र्हस्व दीर्घाच्या चुकाही समजून घे.  

तुझाच,

अवि'

पत्र वाचून काकूंनी ते खाली ठेवलं आणि बरोबर आलेले फोटोज बघायला घेतले. त्यांची दोन गोंडस नातवंड, अवि आणि डेझी किती खुश दिसत होते. त्यांना बघून काकूंचं मन समाधानाने भरून आलं. 'असेच सुखात रहा', फोटोवरून हात फिरवून त्यांनी आशिर्वाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मीराला खूप समाधान मिळालं. त्यांना डिस्टर्ब न करता ती हळूच तिथून निघून गेली.

दरम्यान मीरा आणि विराजच्या भेटीगाठी होतंच होत्या. गेले काही दिवस मीराच्या चेहऱ्यावर दिसणारा अस्वस्थपणा, दुःख विराज नोटीस करत होता, पण आज जेव्हा ती त्याला भेटली ती जरा खुश वाटली. तिने त्याला अविच्या पत्राबद्दल सांगितलं.

"बघ, मी तुला बोललो होतो ना, माणसं बदलतात गं. एवढं सोप्पं होतं हा सगळा गुंता सोडवणं, शेवटी आयडिया कोणाची होती", विराज आपली कॉलर ताठ करत म्हणाला. त्यावर मीरा फक्त हसली.

"तू खुश नाहीयेस का? का अविने पत्रात तुझ्याबद्दल काही विचारलं नाही म्हणून तुला वाईट वाटतंय?", विराजने जरा चाचरतंच विचारलं.

"नाही अरे, मी खरंच खूप खुश आहे. काकूंना खूप दिवसांनी एवढं आनंदात बघितलं. त्यांचा आनंद असाच राहो एवढीच माझी इच्छा आहे", मीरा चेहऱ्यावरची निराशा झटकत म्हणाली.

त्या दिवसानंतर काकूंच्या तब्येतीत बरीच सुधारणा आली. त्या आधीसारख्याच पुन्हा नवीन नवीन पदार्थ बनवायला लागल्या. मैत्रिणींबरोबर भिशी, पिकनिक ला जायला लागल्या, आश्रमात यायला लागल्या. आत मीराचं लग्न हे त्यांचं पुढचं लक्ष्य होतं. अविने पाठवलेल्या पत्रांची त्या कधी कधी उत्तरं पाठवायच्या. पण प्रत्येक वेळेला मीराच्या हातात ते पत्र पोस्ट करण्यासाठी देताना त्यांना भिती वाटायची, 'अवि ह्या पत्राचं उत्तर देईल ना? माझ्या पत्रामुळे माझ्या मुलाच्या संसारात काही प्रॉब्लेम नाही होणार ना'. पण अविही त्यांच्या पत्राची उत्तरं पाठवत होता, काकूंच्या पुढच्या वाढदिवसाला त्याने त्यांच्यासाठी आयपॉड अन हेडफोन्स पाठवले, जुनी गाणी ऐकायला. मीरानेच त्यांना तो चालू करून त्याच्यामध्ये गाणी टाकून दिली आणि त्या आयपॉड मध्ये गाणी ऐकतानाच एक दिवस त्या इतक्या रमल्या की त्यांना मीरा घरात येऊन त्यांच्या समोर उभी राहिलेली पण कळलं नाही. काकू खुश होत्या आणि मीराही.

मीरा आणि विराजची मैत्रीही घट्ट होत चालली होती. बरेच वर्षांनी मीराला तिची सुख दुःख वाटायला कोणीतरी मित्र मिळाला होता. विराजच्या बाजूने असणारं प्रेम मीराला जाणवत होतं. तिला भेटून त्याला होणारा आनंद, तिचं दुःख बघून तुटणारं त्याचं मन, तिच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, त्याचं तिच्या डोळ्यात हरवणं, हे सगळं मीरा नोटीस करत होती. तिच्याबाजूने काहीच नव्हतं असंही नव्हतं. त्याच्या बरोबर असताना ती सगळी दुःख विसरून जायची. त्याचाशी गप्पा मारताना खळखळून हसायची. तिच्या मनाच्या जखमा हळूहळू भरून निघत होत्या पण अजूनही ते मन दुसऱ्या कोणाला द्यायला ती धास्तावत होती. 

विराज तर मीराच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. तिलाही मनात कुठेतरी त्यांच्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी वाटतंय हे त्याला कळत होतं. पण ती कबूल करत नव्हती. अशातच तिच्या वाढदिवसाला त्याने तिच्यासाठी काकूंच्या मदतीने सर्प्राईस पार्टी प्लॅन केली. त्यांच्या ऑफिसातले कर्मचारी, आश्रमातली मुलं सगळे आले होते. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. विराजने मीरा साठी एवढ्या कष्टाने प्लॅन केलेल्या या सर्प्राईसमुळे मीरा मनोमन सुखावली होती.

"थँक्स विराज, पार्टी खूपच छान झाली, मुलं पण खुश होती एकदम", विराज निघताना त्याला बाहेर सोडायला आलेली मीरा म्हणाली. दोघं त्याच्या बाइकजवळ उभे राहून बोलत होते. 

"मुलांना खुश करणं काय सोप्पं असतं गं. त्यांच्या मीरा ताईला खुश करणं कठीण आहे", विराज मीराला चिडवत म्हणाला, "म्हणून म्हंटलं थोडे एक्सट्रा एफर्टस घ्यावे लागतील". विराजने मीरासमोर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट धरलं.

"विराज, अरे याची काय गरज होती. तू ऑलरेडी खूप केलं आहेस", मीरा म्हणाली. त्याच्या आग्रहाखातर तिला ते घ्यावं लागलं. त्यात विराजने तिच्यासाठी आणलेले सुंदर कानातले होते. ते मीराला खूप आवडले पण एवढं महाग गिफ्ट घेणं तिला पटत नव्हतं आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं.

"एवढं काही महाग नाहीये हे मीरा. जेव्हा मी हे कानातले बघितले तेव्हा मला तुझीच आठवण झाली. म्हणून घेतले तुझ्यासाठी. तेवढा तर हक्क आहे ना माझा", विराज मीराचे हात हातात घेत म्हणाला. त्यांना एकमेकांना भेटून वर्ष होऊन गेलं होतं, पण तरीही त्यांचं नातं मैत्रीच्या पुढे जात नव्हतं.  मीरा विराजच्या हातातून आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. "राहू दे की", तिची झटपट बघून विराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"प्लिज विराज, कशाला उगाच गोष्टी क्लिष्ट करतोयस", मीराने काहीसा चिडून तिचा हात विराजच्या हातातून खेचून घेतला. तिच्या त्या ओरडण्याने विराज दचकलाच.

"तुला एवढं चिडायला काय झालं?" विराजही आता थोडा वैतागला होता. त्यावर मीरा काहीच नाही बोलली.

"सांग ना? मी काय कोणी अनोळखी आहे का? आणि चुकीचं काय आहे ह्यात. मैत्रीपलीकडे आपल्यात काही नाहीये असं वाटतंय का तुला अजूनही? तू न बोलल्याने किंवा दुर्लक्ष केल्याने सत्य बदलत नाही. सांग ना माझ्याकडे बघून, की तुला माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा जास्त काहीच वाटत नाही", विराज मीराला स्वतःकडे खेचत म्हणाला. त्याचा चेहरा एवढ्या जवळून मीरा पहिल्यांदाच पहात होती. एरवी खेळकर असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर आज तिला राग दिसत होता आणि दुःखही.

"विराज, प्लिज माझा हात सोड. मला दुखतंय अरे", मीरा कळवळून म्हणाली. त्याने विराज भानावर आला आणि त्याने तिचा हात सोडला. त्याचा राग मात्र अजूनही तसाच होता आणि मीरा अजूनही शांतच होती. विराजच्या नुकत्याच झालेल्या उद्वेगाने आणि तिच्या मनात चालू असलेल्या भावनांच्या कल्लोळामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला समजवावं का तिच्यावर चिडावं हेच विराजला कळत नव्हतं. तेवढ्यात मीराने बोलायला सुरवात केली, "अवि अरे मी मुद्दामून नाही करत आहे, माझं मलाच..", आणि ती मध्येच थांबली. 

"अवि नाही विराज, विराज नाव आहे माझं. सगळी गाडी आपली अजून इकडेच अडते आहे ना? तो तुझा भूतकाळ होता मीरा, पण मी आज आहे तुझ्या आयुष्यात. हे तू जेवढ्या लवकर स्विकारशील तेवढं तुझ्यासाठीच चांगलं आहे. आणि आपल्यासाठीही", म्हणून विराज तिकडून निघून गेला. आणि मीरा तिच्या डोळ्यातल्या पाण्याने धूसर झालेल्या नजरेने त्याच्याकडे पहात राहिली, तो दिसेनासा होईपर्यंत!

क्रमशः..! 

🎭 Series Post

View all