लेटरबॉक्स - भाग १५

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

संध्याकाळी ऑफिसवरून येताना मीरा 'हैप्पी बर्थडे' लिहिलेले फुगे, चॉकलेट केक आणि काकूंच्या आवडीचे पदार्थ घेऊन घरी पोचली. काकू स्वयंपाकघरात काम करत असताना तिने हळूच मागून जाऊन त्यांना सर्प्राईस दिलं. 

"अगं मीरा, काय हे सगळं.मी काय लहान आहे का आता?", तिच्या हातातून फुगे घेत काकू म्हणाल्या. पण मनातून त्यांना बरं वाटत होतं. आज त्यांचा ७० वा वाढदिवस होता. 

"हो मग, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं", मीरा त्यांचे गाल ओढत म्हणाली. 

"म्हातारी म्हणालीस होय मला? वय वाढू दे पण मी अजून मनाने तरुण आहे बरं का", काकू आपल्या चापून बसवलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या. मीराला चहा देऊन काकू काहीतरी करायला बाहेर अंगणात गेल्या. मीरा हॉलच्या खिडकीतून बाहेर बघत होती. काकू बंगल्याच्या दाराशी असलेल्या लेटरबॉक्स मध्ये काहीतरी शोधात होत्या. ते बघून मीरा अंगणात त्यांच्याशी बोलायला गेली. 

"काकू, काही येणार होतं का आज? इकडे काय शोधताय?", मीराने प्रश्न विचारला. पण मनात कुठेतरी तिला त्या प्रश्नाचं उत्तर आधीच माहिती होतं. काकू कशाची वाट बघतायत याची तिला पूर्ण कल्पना होती.

"नाही गं, बरेच दिवसात बघितलं नव्हतं ना म्हणून म्हंटलं काही आलंय का बघूया", काकू आपली निराशा लपवत म्हणाल्या. पण प्रत्यक्षात त्या नियमितपणे तो लेटरबॉक्स बघतात हे मीराला माहित होतं. अविशी शेवटचं बोलून बरीच वर्ष होऊन गेली होती. मधल्या काळात त्याचा फोन, पत्र, ई-मेल काहीच आलं नव्हतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फेसबुक नावाच्या सोशल मीडिया वर लोकांचं एकमेकांशी बोलणं होत होतं. मीराने तिच्या एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर त्यावर आपलं अकॉउंट उघडलं होतं. एकदा ऑफिसात जरा कामाचा व्याप कमी असताना तिने सहज फेसबुक उघडलं आणि तिच्याही नकळत तिने अविचं नाव शोधलं. काही क्षणांनी त्याची प्रोफाइल तिच्या समोर उघडली. अवि.. किती दिवसांनी त्याला बघत होती ती. इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्याचा फोटो बघून तिच्या पोटात गोळा आला. अजूनही तसाच होता तो.. त्याचे घारे डोळे, निखळ हास्य अगदी तसंच होतं. पण बाकी सगळं बदललं होतं.. त्याच्याबरोबर डेझी आणि त्याच्या दोन मुलांचा पण फोटो होता. जय आणि मायरा.. जय झाला तेव्हा त्याचे फोटोज अविने सुरवातीला त्याच्या काही पत्रांबरोबर पाठवले होते. पण त्याला मुलगी झाल्याचं त्याने कळवलंही नव्हतं. कारण जयच्या जन्मानंतर काही महिन्यांतच त्याने काकू काकांशी असलेला कॉन्टॅक्ट संपवून टाकला होता. मीराने पटकन त्याची प्रोफाइल बंद केली. ज्या आठवणींपासून आपण एवढ्या कष्टाने आणि त्रासाने वेगळे झालो आहोत पुन्हा त्या गर्तेत सापडून मीराला भूतकाळातले ते क्षण अनुभवायचे नव्हते. त्यानंतर तिने पुन्हा कधी त्याची प्रोफाइल बघितली नव्हती. 

जेवण झाल्यावर काकू एकट्याच अंगणातल्या झोपाळ्यावर बसल्या होत्या. संध्याकाळपासून त्या जरा शांतच आहेत असं मीराला वाटत होतं. तिने त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलायचा खूप प्रयत्न केला पण त्या जेमतेमच उत्तर देत होत्या.

"काकू, अविची आठवण येत्ये का?", शेवटी मीराने न राहवून विचारलं. त्यावर काकू नुसत्याच हसल्या.

"किती वर्ष झाली गं आता त्याच्याशी बोलून. सगळ्या गोष्टी इतक्या बदलल्यात. मला वाटलं आता तरी त्याला आपल्या आईशी बोलावंसं वाटेल. एक वेडी आशा होती की त्याचं पत्र आलं असेल", काकूंच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

"मला समजतंय तुमचं दुःख काकू. पण आपण अवि तिकडे त्याच्या आयुष्यात सुखी आहे यातच समाधान मानून खुश राहायचं. आणि आजकाल नवीन नवीन माध्यमं आली आहेत त्यामुळे कोणी पत्र नाही पाठवत. ते जुनं झालं आता", मीरा काकूंना समजावत म्हणाली.

"आई पण तर जुनीच झालीये ना गं. मग काय हरकत आहे तिच्यासाठी एखादं पत्र पाठवायला. ज्या गोष्टींमुळे आमच्यात अंतर आलं त्यांना किती काळ लोटलाय आता. त्याचं लग्न होऊन इतकी वर्ष झाली. जय पण आता मोठा झाला असेल. हे गेले. मी त्याच्यावरचा सगळा राग कधीच सोडून दिलाय गं. मग आता हा दुरावा कशासाठी. खूपवेळा वाटतं त्याच्याशी बोलावं, त्याला पत्र लिहावं, पण त्याचा नवीन पत्ता पण नाहीये माझ्याकडे", काकू अंगणातल्या पारिजातकाच्या झाडाकडे बघत म्हणाल्या. अविचं आवडतं होतं ते. 

काकूंची समजूत कशी घालावी मीराला कळत नव्हतं. त्यांचं म्हणणं तिला पटत होतं. खरंच आता काय हरकत आहे अविला सुद्धा सगळं विसरून जाऊन पुन्हा काकुंशी बोलायला. गेले काही महिने मीरा नोटीस करत होती, काकूंचं वय दिसायला लागलं होतं, छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या होत्या. त्या दाखवत नसल्या तरी मुलापासून लांब असल्याचं दुःख त्यांना आतून पोखरत होतंच. मीरा बराच वेळ तशीच काकूंचा हात हातात घेऊन बसून राहिली. 

दुसऱ्या दिवशी मीरा आश्रमात गेली असताना तिला तिकडे विराज भेटला. ती त्याची नजर चुकवून निघणार तेवढ्यात विराज तिच्या दिशेने चालत आला. आता मीराकडे त्याच्याशी बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. 

"हाय, आज माझा लकी डे म्हणायचा. इतके दिवसांनी आपली भेट होतेय", मीराला बघून विराजला खूप आनंद झाला होता. मीरा नुसतीच त्याच्याकडे बघून हसली आणि निघाली.

"मीरा प्लिज, आपण जरा बसून बोलूया का? त्यानंतरही तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर मी तुला पुन्हा त्रास देणार नाही", विराज तिला थांबवत म्हणाला. झाल्या प्रकारापासून ती त्याला टाळतेय असं त्याला वाटत होतं आणि ते खरंच होतं. पण आज फायनली त्याला तिच्याशी बोलायची संधी मिळाली होती. 

थोड्या वेळाने दोघं आश्रमाजवळच्या कॉफी शॉप मध्ये बसून कॉफी पीत होते. "मी आढेवेढे न घेता विषयाला हात घालतो. जे झालं त्यात चुकीचं काहीच नव्हतं मीरा. तू त्यासाठी एवढं अपराधी का वाटून घेत्येस? आणि मला की टाळतेयस?", विराजने मीराला विचारलं.

"तुझ्यासाठी एवढं काहीच नसेल विराज. पण गच्चीत उभं राहून जुनी गाणी ऐकणं मी..", मीराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच विराजने ते पूर्ण केलं,"अवि बरोबर करायचीस. हेच ना?" त्याच्या तोंडून अविचं नाव ऐकून मीराने चमकून त्याच्याकडे बघितलं. काकूंनी त्याला सगळं सांगितलंय हे तिला तेव्हाच कळलं.

"मीरा अगं अशा गोष्टी होत असतात. तुझ्या भूतकाळात झालेल्या गोष्टी तू कशा हाताळल्या पाहिजेस हे मी तुला नाही सांगणार, पण त्यामुळे तू तुझ्या वर्तमानातली नाती नाकारणं चुकीचं आहे ना?", विराज तिला समजावत होता.

"नातं? आपल्यात कोणतं नातं आहे असं मला वाटत नाही. एक-दोनदा झालेल्या भेटींतून तू काहीतरी अर्थ न काढणंच बरं", मीरा विराजची नजर चुकवत म्हणाली.

"मान्य आहे, आपल्यात काही नातं नाहीये. पण असू शकतं ना? मैत्रीचं? त्यापेक्षा जास्त मला काहीच नकोय", हे बोलताना विराजला किती त्रास होत होता त्याचं त्यालाच कळत होतं. पण घाई करून, त्याच्या भावना तिच्यावर लादून ती त्याच्यापासून दूरच जाईल हे त्याला माहीत होतं.

"काय यार मीरा तू पण, कोणत्या जमान्यात जगतेयस, फक्त गाणी ऐकली ना एकत्र आपण, आणि तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवलंस, त्यात काय एवढं. आपण प्रवासात पण कधी कधी बाजूच्या प्रवाशाच्या खांद्यावर डोकं ठेवतो की, म्हणजे आपण त्याच्या प्रेमात थोडी पडतो. म्हणजे मी तरी नाही पडत हां ", विराज डोक्यात येतील ती उदाहरणं देऊन मीराला समजवायचा प्रयत्न करत होता आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. 

"ओके, पण फक्त मैत्री हां", मीराने विराजने पुढे केलेल्या हातात हात देत म्हंटलं. कॉफी संपवून दोघं निघाले तेव्हा विराजने लगेच काकूंना फोन केला. मीराच्या आणि त्याच्या नात्याला सुरवात तरी झालीये, मग ते मैत्रीचं का असेना, हेच त्याला काकूंना सांगायचं होतं. पण त्यांनी फोन उचलला नाही.

रात्री विराज ऑफिसमधून निघत होता, त्याच्या आवडीचं गाणं गुणगुणत. मीराशी झालेल्या भेटीनंतर त्याच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं होतं. ती आता पुन्हा त्याच्याशी बोलत होती. बाईक चालू करत असतानाच त्याचा फोन वाजला, तो मीराचा होता. "हॅलो? विराज? तू प्लिज आत्ता सिटी हॉस्पिटल ला येतोस का?", पलीकडून मीराचा रडवेला आवाज ऐकून विराजच्या काळजात चर्र झालं.

तो भरधांव वेगाने सिटी हॉस्पिटल कडे निघाला! 

क्रमशः..!

🎭 Series Post

View all