लेटरबॉक्स - भाग १३

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

दुसऱ्या दिवशी मीरा आणि विराज कॉफीसाठी भेटले. घरातून निघताना तिने काकूंना सांगितलं तेव्हा त्यांनी बारीक डोळे करून विचारलं, "विराज कोण गं? पहिले कधी नाव ऐकलं नाही"

"अहो काकू बोलले होते की मी तुम्हाला, आपल्या आश्रमात येतो मदत करायला", मीरा आवरत म्हणाली. 

"हो का, चांगलंय की. जा जा, एन्जॉय करा. लग्न झालंय का गं त्याचं? आणि नोकरीला वगैरे कुठे आहे?", काकूंनी चौकशी सुरु केली.

"माहित नाही, विचारलं नाही मी. आपल्याला काय करायचंय ना", मीरा निघताना म्हणाली. तेवढ्यात काकूंच्या प्रश्नांचा रोख तिला कळला आणि ती परत मागे आली, "काकू आम्ही फक्त कॉफीसाठी भेटतो आहे, बाकी काही नाही. तुम्ही उगाच पुढचे विचार करू नका".

भेटल्यावर मीरा आणि विराजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आश्रमाबद्दल, तिकडच्या मुलांबद्दल, मीराच्या लॉ प्रॅक्टिसबद्दल. विराज पण सॉफ्टवेअर डेव्हलपर होता, अवि सारखाच. पुण्यातल्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कामाला होता. तो सहा वर्षांचा असताना त्याचे आई-वडील गेले होते. मीरासारखा तोही एका अनाथ आश्रमात वाढला होता. म्हणूनच मोठं होऊन कमवायला लागल्यानंतर त्याने कितीतरी आश्रमांना देणग्या दिल्या होत्या, तिकडच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च जमेल तसा उचलला होता. दोघं कॉफी पिऊन जायला निघाले तेव्हा विराजने मीराला विचारलं, "मी तुला सोडू का ऑफिसला? माझं पण ऑफिस त्याच बाजूला आहे". थोडे आढेवेढे घेऊन मीरा हो म्हणाली तेव्हा विराजचा जीव भांड्यात पडला. बाईकवरून तिला ऑफिसला सोडताना विराज समोरच्या आरशात चोरून मीराकडे कटाक्ष टाकत होता. वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या तिच्या केसांच्या महिरपीत तिचा रेखीव चेहरा किती सुंदर दिसत होता, तिच्या डार्क ब्राउन डोळ्यांवर पडलेली कोवळी सूर्याची किरणं त्यांची चमक वाढवत होती. तिचं ऑफिस येऊच नये असं वाटत होतं विराजला. 

"इकडेच थांबवा मि. मोहिते", मीराने त्याच्या खांद्यावर मारलेल्या थापेने विराज भानावर आला.

"ऑफिसला सोडल्याबद्दल थँक यु! आणि कॉफीसाठी पण. तुम्ही मला पैसे भरूच नाही दिलेत. पुढच्या वेळी मी पैसे भरणार हां", म्हणून मीरा ऑफिसच्या गेटमधून आत जायला निघाली.

"चालेल ना, मग लवकरच परत भेटलं पाहिजे कॉफी साठी", विराज पटकन म्हणाला आणि त्याची चूक त्याला कळली, "नाही म्हणजे उधार आहे ना आता माझा तुझ्यावर. उगाच वेळ गेला मध्ये तर विसरशील", तो पुढे सारवासारव करायला म्हणाला. आणि मीरा नुसतीच हसून आत निघून गेली. 

ती आता परत कधी भेटेल ह्या विचाराने विराजचा जीव वरखाली होत होता. पण त्याला जास्त वाट बघावी लागणार नव्हती. एक-दोन दिवसांनी आश्रमात गेला असताना उमा काकूंनी त्याला बोलावलं, "विराज या रविवारी फ्री आहेस का तू? शकुंतला ताईंनी आपल्याला सगळ्यांना जेवायला घरी बोलावलं आहे. शकुंतला जोशी म्हणजे मीराच्या काकू. हा आश्रम त्यांचाच आहे". मीराचं नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर उगाच स्माईल येतंय असं विराजला वाटलं. "अहो रविवारी कशाला, उद्याच जाऊ की", तो खुश होत म्हणाला. 

"काकू तुम्ही उगाच एवढ्या सगळ्यांना बोलवायचा घाट घातलात", रविवारी सगळे यायच्या आधी मीरा काकूंना स्वयंपाकघरात मदत करताना म्हणाली. 

"अगं त्यात काय एवढं, गेले काही महिने माझं आश्रमाकडे जरा दुर्लक्षंच झालं आहे. म्हणून म्हंटलं सगळ्यांना बोलवू घरी. तुझ्या त्या मित्राला पण बोलावलं आहे बरं का मी", काकूंनी निरगासपणाचा आव आणत म्हंटलं आणि सगळा प्रकार मीराच्या लक्षात आला. तिने डोक्यावर हात मारला. 

संध्याकाळी विराज जरा लवकरच आला. "अरे विराज ना तू? ये ना बाळा. बस हां, मी मीराला बोलावते", काकू त्याला हॉलमध्ये घेऊन आल्या.

"अहो काकू, खास लवकर आलो, म्हंटलं तुम्हाला काही मदत हवी असेल किंवा काही आणायचं असेल तर सांगा मला. पटकन बाईकवर जाऊन घेऊन येईन मी", विराज काकूंनी दिलेला पाण्याचा ग्लास हातात घेत म्हणाला. 

"काही आणायचं नाहीये, सगळं तयार आहे. मीराने मस्त बटाटे वडे आणि सुरळीच्या वड्या बनवल्या आहेत. सुग्रण आहे हो माझी मीरा", काकू मीराची स्तुती करत असतानाच मीरा तिकडे आली.

"मि. मोहिते? कसे आहात? घर सापडायला काही त्रास नाही झाला ना?", मीराने विचारलं. तिचं फॉर्मल बोलणं ऐकून काकूंनी डोक्यावर हात मारला. 

"अगं बस ना मीरा, आणि मि.मोहिते काय म्हणतेस, तुझ्याच वयाचा वाटतोय मला हा. विराज म्हण की. काय रे विराज चालेल ना तुला?", काकूंनी विचारलं. 

"चालेल? धावेल", विराज म्हणाला तशा काकू गालातल्या गालात हसायला लागल्या आणि मीराला कुठे तोंड लपवू असं झालं. 

हळूहळू आश्रमातले बाकीचे सगळे आले, छान गप्पा गोष्टी रंगल्या. विराज, काकूंना आणि मीराला सगळ्यांना नाश्त्याच्या प्लेट्स द्यायला मदत करत होता. काकू पूर्ण संध्याकाळ त्याला नोटीस करत होत्या. त्यांना त्याचा स्वभाव, वागणं सगळंच खूप आवडलं. मध्ये मध्ये तो मीराकडे चोरून टाकत असलेले कटाक्ष बघून त्यांना हसायला येत होतं. 

सगळे निघत असताना मीरा अंगणात उमा काकुंशी आश्रमाबद्दल काहीतरी बोलत होती. विराज त्याच्या बाईकवर बसून तिच्याकडे बघत होता. "अहं अहं", मागून आलेल्या आवाजाने त्याने चमकून मागे बघितलं तेव्हा तिकडे काकू उभ्या होत्या.  त्यांना बघून विराजने उगाच गाडी पुसण्याचं नाटक केलं. "नुसतं बघुन काही होणार नाहीये बरं का", काकू त्याला चिडवत म्हणाल्या. 

"नाही काकू, मी कुठे मीराकडे बघत होतो", विराज एकदम कावरा बावरा झाला. 

"मग? उमा काकूंकडे बघत होतास की काय? त्यांचं लग्न झालंय बरं का", काकूंनी साळसूदपणाचा आव आणला आणि विराज लाजला.

"आता काय बोलायचा प्रयत्न खूप केलाय पण तुमची मुलगी भावच नाही देत. तुम्हीच सांगा काय करू आता", तो काकूंना म्हणाला.

"कपाळ माझं, ते पण मीच सांगू आता? तुम्हा आजकालच्या पोरांचं काही कळत नाही मला. आई-वडिलांकडून काय सल्ले घेता रे प्रेमात पडायचे. बरं पण आता विचारलंच आहेस तर सांगते, तिला जेवायला वगैरे घेऊन जा ना एखाद्या दिवशी, आश्रमात भेटून काय होणार आहे, तिकडे ती त्या मुलांकडे सोडून कोणाकडे बघत नाही", काकूंनी सांगितलं. 

"कमाल आहात हां तुम्ही काकू. एकदम कूल आहात. पहिल्यांदाच कोणत्यातरी मुलीची आई मला तिला जेवायला घेऊ जा असं सांगते आहे.", विराज हसत म्हणाला. 

"अरे मग आता ती काही करत नाही म्हंटल्यावर मलाच करावं लागणार ना. ह्या वयात तिच्यासाठी मुलं बघत फिरण्यापेक्षा घरी चालत आलेलं स्थळ काय वाईट आहे? पण विराज तू हे सिरिअसली घेतोयंस ना? मला माझी मीरा दुखावलेली नाही चालणार हां. हे सगळं सोप्प नसणार आहे", काकू काळजीने म्हणाल्या.

"अफ कोर्स काकू, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. पण सोप्प नसणारे म्हणजे?", विराजने विचारलं.

"काय सांगू आता तुला. खूप मोठी गोष्ट आहे. कधी निवांत वेळ मिळेल तेव्हा सांगेन. नीट जा आता घरी. खूप अंधार झालाय. बाईक नीट चालव", म्हणून काकू आत गेल्या. 

विराज बाईक चालू करून गेटजवळ आला तेव्हा मीराने त्याच्यासाठी गेट उघडलं. "सगळं खूप छान झालं होतं मीरा. सुरळीच्या वड्या तर खूप दिवसांनी खाल्ल्या", विराज तिला म्हणाला. 

 "थँक्स", मीरा हसून म्हणाली. 

"मी पण छान स्वयंपाक करतो बरं का, ये कधीतरी जेवायला. म्हणजे काकूंना पण सांग. तुम्ही दोघी या", विराजला तिकडून निघावसं वाटतंच नव्हतं म्हणून तो बोलायला काहीतरी विषय काढत होता. 

"हो नक्की, गुड नाईट, भेटूच लवकरच", मीरा म्हणाली. 

"कधी?", मीराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच, स्वतःच्या नकळत विराजने विचारलं .

"गुड नाईट", मीरा हसून म्हणाली आणि आत निघून गेली.

तिच्या त्या हसण्याला दुःखाची छटा आहे असं विराजला उगाच वाटलं. तो काकूंच्या बोलण्याचा विचार करत होता, 'नक्की काय झालं असेल? हे सगळं सोप्पं नसणारे असं काकू का म्हणाल्या? लवकरच माहिती करून घेतलं पाहिजे'. स्वतःशीच विचार करत विराजने किक मारून बाईक चालू केली. 

क्रमशः..!

🎭 Series Post

View all