लेटरबॉक्स - भाग १२

Letterbox is a story of a young girl Meera who is an orphan living with a foster family. Story unfolds ups and downs in Meera's life as a tragic turn in her life forces her to question legitimacy of love.

मीरा आणि विराज आश्रमाच्या पायऱ्यांवर येऊन बसलेले, परीचा ताप आता उतरला होता आणि ती शांत झोपली होती. पण तिला तशा अवस्थेत सोडून घरी जाणं मीराला शक्य नव्हतं. म्हणून तिने रात्री तिकडेच थांबायचं ठरवलं होतं, विराजही तिला कंपनी द्यायला थांबला. त्याचाही मुलांवर तितकाच जीव होता. "मि. मोहिते तुम्ही या वेळेला इकडे कसे? म्हणजे रोज येता का तुम्ही आश्रमात?", मीराने काहीतरी संवाद चालू करायचा म्हणून म्हंटलं. 

"नाही मी मोस्टली शनिवार, रविवार येतो, पण आज ऑफिसवरून लवकर निघालो म्हणून म्हंटलं इकडे एक चक्कर टाकू. तेव्हा कळलं परी आजारी आहे, मग माझाही पाय निघाला नाही इकडून. तू आलीस तेव्हा डॉक्टरांना सोडायला आणि तिची औषधं आणायला गेलो होतो", विराज म्हणाला. त्याच्या बोलण्याने मीराला बरं वाटलं. 

"आपलं नंतर भेटणं झालं नाही म्हणून बोलणं राहून गेलं. पण मला माझ्या मागच्यावेळीच्या वागण्यासाठी माफी मागायची होती. मी तुमच्याशी एवढं उद्धटपणे बोलायला नको होतं. घरी थोडे प्रॉब्लेम्स चालू होते तो राग तुमच्यावर निघाला. आय एम सॉरी!", मीरा हातातल्या कड्याशी खेळत म्हणाली. 

"अगं एवढी काय फॉर्मॅलिटी, होतं असं कधी कधी. मी तर विसरलो पण होतो. आणि त्यात मी पुण्याचा आहे ना, त्यामुळे अपमान मनाला लावून घेत नाही मी फार, नाहीतर जगणं कठीण व्हायचं. हाs हाs हाs!", विराज हसत म्हणाला आणि मीराला पण हसायला आलं. "तुला चालणार असेल तर एक बोलू का?", तो पुढे म्हणाला. मीराने मान हलवून संमत्ती दिली.

"नाही म्हणजे आश्रमासाठी काम करणं एक असतं, पण मागच्या वेळेला तुला चिडलेलं बघून, तुझं ह्या मुलांशी इतकं जवळचं नातं आहे हे बघून छान वाटलं. आजकाल अशी निःस्वार्थी मनाने दुसऱ्यांवर जीव लावणारी लोकं कमी असतात", विराज सदा काकांनी आणून दिलेल्या कॉफी चा घोट घेत म्हणाला. 

"हा माझ्यासाठी फक्त आश्रम नाहीये , हे माझं पाहिलं घर आहे. मी इथेच लहानाची मोठी झाले. त्यामुळे या जागेशी, इथल्या लोकांशी माझं खूप जवळचं नातं आहे. त्या दिवशी मी खूप दिवसांनी आश्रमात आले होते. इतके दिवस मुलांना न भेटता आल्यामुळे मलाच अपराधी वाटत होतं, तरीही मनात कुठेतरी स्वार्थी विचार होता की मला बघून मुलं आनंदाने धावत येऊन मला मिठी मारतील, पण मी आले तेव्हा मुलं इकडे नव्हतीच. त्यामुळे मला जरा वाईट वाटलं, म्हणून मी तशी रिऍक्ट झाले", मीरा कॉफी पित म्हणाली. त्यावर विराज हसला. 

"आता मी तुला गमंत सांगतो, त्या दिवशी मी सकाळी आश्रमात आलो तेव्हा मुलं तू खूप दिवसात भेटली नाहीस म्हणून उदास होऊन बसली होती. तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी मी पार्क मध्ये घेऊन गेलो, पण तिकडेही ते सगळे मला तुझ्याबद्दलच सांगत होते. मीरा ताई अशी, मीरा ताई तशी.. खूप जीव आहे त्यांचा तुझ्यावर", विराज मीराकडे बघत म्हणाला. तेव्हा पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांकडे एवढ्या जवळून पाहिलं. तिच्या लाईट ब्राउन डोळ्यात विराज क्षणभर हरवला. मग पटकन सावरून त्याने दुसरीकडे बघितलं.

सकाळी डोळ्यांवर आलेल्या सूर्याच्या किरणांनी मीराला जाग आली. रात्रभर खुर्चीत झोपून तिची मान आखडली होती. तिने आजूबाजूला बघितलं, विराज कुठे दिसत नव्हता. ती पटकन आत जाऊन परीला भेटून आली. तिची तब्येत आता बरी होती. ती मीराने तिच्याबरोबर थांबावं म्हणून हट्ट करत होती, पण मीराला आज ऑफिसला जावंच लागणार होतं. परीचा हट्ट चालू असतानाच विराज तिकडे आला. "परी, मी काय म्हणतो, मीरा ताईला ऑफिसला जाऊ दे ना, आपण दोघं मज्जा करू इकडे आणि तिला टुकटुक करू", विराज परीला उचलून घेत बोलला. कशीबशी परीची समजूत घालून मीरा ऑफिसला आली. पण दुपारी आश्रमातून फोन आल्यावर तिला पुन्हा तिकडे जावं लागलं. परीचा ताप पुन्हा वाढला होता. मीरा तिकडे पोचली तेव्हा तिची डॉक्टरांशी भेट झाली. आता काळजीचं काही कारण नाही असं ते म्हणाले, नशिबाने सदा काका परीला जेवणासाठी उठवायला आले तेव्हा त्यांना तिला पुन्हा ताप भरल्याचं कळलं आणि त्यांनी लगेच डॉक्टरांना बोलावलं. मीरा त्यांच्याशी बोलत असतानाच विराज तिकडे पोचला. त्याला पाहून मीराचा पारा चढला.  

"मि. मोहिते तुम्ही तर दिवसभर परीजवळ थांबणार होतात ना? मग अशा अवस्थेत तिला एकटीला सोडून कसे गेलात? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं गांभीर्यच नाहीये का? आज जर सदा काकांना कळलं नसतं तिचा ताप वाढलेला तर काय झालं असतं कळतंय का तुम्हाला?", ती आल्या आल्या विराजवर बरसली. "हा आश्रम म्हणजे तुमच्यासाठी फक्त एक 'समाजसेवा' करायचा मार्ग असेल, पण माझ्यासाठी ही मुलं म्हणजे माझं कुटुंब आहे. त्यांच्या बाबतीत कोणतीही हयगय मी सहन करणार नाही. त्यांनी आधीच खूप काही सहन केलं आहे आयुष्यात. म्हणा तुमच्यासारख्या लोकांना काय कळणार त्यांचं दुःख", म्हणून मीरा तिकडून रागाने निघाली. तेवढ्यात विराजने तिला हाताला धरून स्वतःकडे खेचलं. 

"काय बोलतेयस मीरा? दुसऱ्यांचं बोलणं ऐकून ना घेता त्यांना मनाला येईल ते सुनवायचं हा तुझा स्वभावच आहे वाटतं. नाही मागच्या वेळी पण तेच केलं होतंस म्हणून म्हंटलं. मी सकाळपासून परीजवळच होतो. ती झोपली तेव्हा मी तिची औषधं आणि तिच्यासाठी तिच्या आवडीचा काहीतरी खाऊ आणायला बाहेर गेलो होतो, कारण ती सकाळपासून काहीच खात नव्हती. जाऊ दे तुला कशाला सांगतोय मी हे", म्हणून विराज ने तिचा हात सोडला, तो जायला निघाला आणि परत मागे वळला, "आणि हो, जगात सगळ्यांचं दुःख फक्त तुम्हालाच समजतं ह्या भ्रमात जगू नका मिस. मीरा, आयुष्याची पंधरा वर्ष मीही अशाच एका आश्रमात काढली आहेत, त्यामुळे या मुलांचं दुःख माझ्याशिवाय जास्त चांगलं कोणाला समजू शकतं असं वाटत नाही मला". विराज तिकडून निघून गेल्यावर मीरा त्याच्याकडे पाहतच राहिली. काय बोलावं तिला कळेना. तेवढ्यात सदा काकांनी तिला हाक मारली आणि ती आत निघून गेली. 

रात्री ऑफिसवरून घरी जायच्या आधी मीराने आश्रमात एक चक्कर टाकली. उमा काकुंशी बोलून ती परीला भेटायला गेली तेव्हा विराज तिला लाडीगोडी करून जेवण भरवत होता. मीरा दाराआडून दोघांकडे पहात होती. विराजचा तो निरागसपणा आणि परीसाठी वाटणारी काळजी पाहून तिला स्वतःच्या सकाळच्या बोलण्याची लाज वाटली. त्या दोघांना डिस्टर्ब् न करता ती तशीच बाहेर येऊन बसली. थोड्यावेळाने विराज घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याला मीरा अंगणात भेटली. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला, तेवढ्यात तिची हाक त्याच्या कानावर पडली, "मि. मोहिते.".. आणि त्याने नाईलाजाने मागे बघितलं.

"मी तुमच्याशीच बोलायला थांबले होते. मगाशी आले तेव्हा तुम्ही परीला भरवत होतात म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब् नाही केलं. आता बरीच बरी आहे ती, हो ना", मीरने संवाद सुरु करायला म्हंटलं. 

"हं", विराज एवढंच बोलला. शेवटी मीराने सरळ विषयाला हात घातला.   

"आय एम सॉरी विराज. सकाळी मी जे काही बोलले त्यासाठी. माझी काळजी, माझा राग असा तुझ्यावर काढायचा मला काहीच हक्क नाहीये. आणि ते चुकीचंही आहे. मला दिसतंय ना, या मुलांसाठी तू केवढं करतोयस. प्लिज मला माफ कर'", मीराच्या तोंडून पहिल्यांदा त्याचं नाव ऐकून विराजला वेगळंच वाटलं. त्यानेच त्याचा सगळा राग गेला.

"बरं, केलं माफ. पण एका अटीवर. उद्या मला फ्री कॉफी प्यायला न्यायचं", हसत विराज म्हणाला.

त्याच्या बोलण्याने मीरा एकदम अवघडली. असं कुठल्यातरी मुलाबरोबर अचानक कॉफी प्यायला कसं जायचं याचा विचार ती करत होती. तिला तसं विचारमग्न बघून विराज म्हणाला, "बरं बाई माझ्या कॉफीचे पैसे मी भरेन, आता तर येशील?" त्याच्या बोलण्याचं मीराला हसू आलं आणि ती कॉफीसाठी तयार झाली. 

"चालेल, उद्या सकाळी भेटू. येते मी आता. गुड नाईट!", म्हणून मीरा तिकडून निघाली. 

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विराज काहीवेळ तसाच उभा राहिला, तिने म्हंटलेलं 'विराज' अजूनही त्याच्या मनात घोळत होतं. 'काय होतंय मि. मोहिते', त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात मारत म्हंटलं आणि तो त्याच्या बाईकच्या दिशेने चालायला लागला. 

क्रमशः..!

🎭 Series Post

View all