'असाच होता मनात माझ्या माझा साजन गं'

Letter

प्रिय पतीदेव (प्राणनाथ),

पत्रास कारण की हल्ली तुम्हाला माझ्याबरोबर बोलायला वेळच नसतो. एवढं तुम्ही स्वतःला बिझी करून घेतलं.
मला बोलघेवडीला तुमच्याबद्दल असलेला आदरभाव, प्रेमभावना व्यक्त करायला संधी मिळत नाही तेव्हा ठरवलं पत्र लिहून आपल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात..
तसंही इकडच्या स्वारीचा जन्मदिवस सात ऑगस्टला आहे. काही तरी भेट द्यायची होती, विचार केला ही पत्ररुपी भेट द्यावी.
ही पत्ररुपी भेट देताना थोडा भुतकाळात फेरफटका मारून आले. मी एकविसीची होते. ते वय होतं, " परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?.....भाव दाटले मनी अनामिक साद त्यांना देशील का?.... असं गाणं गुणगुणत सत्यातल्या राजकुमाराचं स्वप्न बघण्याचं. आणि काय आश्चर्य तो राजकुमार तुमच्या रुपात आला आणि २० फेब्रुवारी १९९२ ला मला घोड्यावर बसवून घेऊनही गेला.

आत्ताच सारे काही घडल्यासारखे त्या गुलाबी दिवसातले ते आनंददायी क्षण मला आठवत आहेत. तुम्ही किती खुश होता. गणपतीपुळेचा गणपती मला नवसाला पावला आणि एवढी गुणी, संस्कारी पत्नी मला दिली असे तुम्ही म्हणायचा तेव्हा मी हुरळून जायचे.

"मेरे रंगमें रंगनेवाली" हे गाणं तुम्ही माझ्यासाठी म्हणायचा. एकमेकांच्या रंगात रंगुनी जाणारे आपण एकमेकांना समजून घेत होतो. एकमेकांच्या विचारांचा, ईच्छा आणि भावनांचा आदर करत होतो. तुमच्या सुस्वभावाची मला भुरळ पडली होती आणि मीही गुणगुणायचे "असाच होता मनात माझ्या माझा साजन गं."

लग्नानंतर मला बी. एड. करायचं होतं तर तुम्ही लगेच परवानगी दिली. त्या काळात वर्षभर दुर राहिले. पंधरा दिवसातून भेट व्हायची तरी मला गुलाबी प्रेमाने ओथंबलेली पत्र लिहायचा ते दिवसच मंथरलेले होते.

तुमचा स्वभाव म्हणजे एकदम जॉली स्वभाव. लग्न झाल्यावर सुरवातीच्या काळात आपल्या विनोदी आणि खोडकर स्वभावामुळे मी थोडी त्रस्त होते. तुमच्या विरूध्द मी गंभीर, पण स्पष्टवक्ती. मग आपण केलेल्या माझ्या चेष्टा, काढलेल्या खोड्या मला आवडायच्या नाहीत, पण हळुहळू हा नटखट कन्हैया, माझा मोहन, मुरारी मला समजत गेला.

मला समजुन घेणारे, माझी वाचनाची आवड बघून भरपुर पुस्तकं, मासिके मला आणून देत होता. मला समजुन घेत, माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या सख्याच्या प्रेमात मग मी अखंड बुडाले. दोघांचं एकमेकांवरील प्रेम, बॉंडींग बघून लोकांना आपला प्रेमविवाह असावा असंच वाटायचं . एकोणतीस वर्षं झाली लग्नबेडीत आपण अडकलो त्याला. हा प्रेमाचा रंग अधिकाधिक गहिरा होत गेला, आपण दोघे ही एकमेका़शिवाय राहू शकत नाही.
किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर ? असं मी विचारते तेव्हा म्हणता," तुला ते शब्दात व्यक्त करता येतं पण मला नाही व्यक्त करता येत ." अहो प्राणप्रिय तुम्ही मला दिलेलं 'रामप्रिया 'हे नाव खुप आवडतं बरं...


साजना, आपल्यातलं खरं प्रेम अधिकाधिक फुलत गेलं ते तुम्ही गुजरातला रिलायन्सला जॉईन झाल्यावर. तेव्हा मी मुलींना घेऊन चिपळूण मध्येच रहात होते, आणि तुम्ही जामनगरला. एकमेकांची प्रचंड ओढ रोज तासभर, होणाऱ्या फोनवरील गप्पा. दोन महिन्यांनी होणाऱ्या भेटीची तुम्हाला प्रचंड ओढ लागायची.
किती आठवणी येतात म्हणून सांगू "क्या भूलूॅ क्या याद करूॅ."

तुम्ही पहिल्यांदा "बाबा" झाला तेव्हा केवढा आनंद झाला तुम्हाला. बाबा होणार म्हणून माझी किती काळजी घेतली. दवाखान्यात लेबर रूमच्या बाहेर दुपारी एक वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत येरझारा मारणारा माझा प्राणप्रिय सखा, आदर्श, प्रेमळ बाबा. बाबा झाल्याच्या खुशीत आनंदाने वेडा झाला होता. मुलींवर तर आपले एवढे प्रेम, माया, त्यांना फिरायला नेणे, गप्पागोष्टी सांगणे, त्यांच्याशी विविध खेळ खेळणे, जादुचे प्रयोग करून दाखवणे आणि विनोद बुध्दीने तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत त्यांना खळखळून हसवणे किती छान जमतं तुम्हाला ‌... घरातलं वातावरण नेहमी आनंदी, हसरं ठेवण्याचं सगळं श्रेय माझ्या मुलींचे बाबा तुमचंच आहे....


मुलीही तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. त्यांचा अभ्यास असो की त्यांना प्रत्येक गोष्टीतलं मार्गदर्शन, नेहमी त्यांना योग्य दिशा दाखवली त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य दिलं, करियरमध्ये पाठिंबा दिला. मोठी लेक डेन्मार्कला चालली तर तुम्ही दोन महिने तिच्या सामानाची खरेदी, बांधाबांध करायला मदत करत होता. तिला प्रोत्साहन देणारा बाबा ती गेल्यावर किती हळवा झाला होता.


तुमचा अजुन एक विशेष गुण म्हणजे, बाहेर कितीही पंचपक्वांनाचं जेवण असो ते कधीच तुम्हाला आवडत नाही , माझ्या हातचं जेवण खुप आवडतं.
कधी बायको, कधी प्रिया, कधी अर्धांगिनी तर कधी लाडके म्हणत लाडे लाडे माझ्या साडीच्या पदराने तोंड पुसणारा माझा मुरारी. माझी निसर्गपर्यटनाची आवड नेहमीच जपता तेव्हा मी तुमच्यावर खुप लट्टू होते.
तुमच्या कुठल्या कुठल्या रुपांवर भाळते मी माहित आहे ? वाचा मग पुढे...

लॉकडाऊनच्या काळात मुलींना कंटाळा येऊ नये, त्या नेहमी आनंदी रहाव्या म्हणून त्यांच्याशी रात्री दोन वाजेपर्यंतही कॅरम, जेंगा खेळत बसणारा बाबा, तरीही दुसऱ्या दिवशी ऑफिसला वेळेतच जाणार.

तुमचा अजुन एक गुण मला आवडतो. "आपल्या कामाला प्राधान्य देणे आणि तेथे वेळेपुर्वी पोहोचणे". हाच गुण तुमच्या मोठ्या लेकीने तुमच्या कडून घेतला आहे. तुमचा मला अभिमान वाटतो.

गुणांची खाण असणारा माझा सखा, खेळकर स्वभाव, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वात मिसळणारे, तरुणांचा मार्गदर्शक सल्लागार, चांगला वक्ता, समुपदेशक, गरीब श्रीमंत भेदभाव न करणारा, सर्वांना सांभाळून, सर्वांबरोबर काम करणारा.

तुमचं सामाजिक कार्य ही खुप मोठं आहे. अनेक सहकारी संस्थेत यशस्वी, प्रामाणिकपणे काम केलं, करत आहे तेथेही सर्वांशी सहकार्याच्या भावननेने रहाता.
मला आवडतो तुमच्यातला समुपदेशक, समुदेशन करत युवक युवतींना करियर बाबत ही मार्गदर्शन करणारा उत्तम मार्गदर्शक.

स्वतःला सतत कामात व्यस्त करून घेता, आपला नवनवीन गोष्टी शिकण्याचा व्यासंग आणि जिद्द, चिकाटी अतुलनीय आहे. त्यामुळेच २०१४ पासून तुम्हाला लागलेल्या जोतिषशास्त्राची आवडीने तुमच्या पदरात सात पदव्या टाकल्या. त्यात विशेष श्रेणीत पास झाला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला फोन येतात. कोण शास्त्री म्हणतात तर कोणी पंडीत पण तुम्हाला ' गुरुजी ' म्हणून घ्यायला जास्त आवडतं."

प्रत्येक क्षेत्रातलं आपलं कर्तृत्व आणि आपला डॅशिंग स्वभावाच्या नेहमीच मी प्रेमात आहे..

विविध कलागुणांनी संपन्न असणारे माझे "पतीदेव" , अहो "प्राणप्रिय" तुम्ही माझी किती काळजी घेता, छोटीच्या वेळी मी आई होणार होते तेव्हा तुम्ही माझी आईच्या मायेने घेतलेली काळजी, मी कधीच विसरू शकत नाही..... माझं डोकं दुखलं तर तेही चेपुन दिलं, पायदुखी मध्ये पायही चेपुन दिले.


स्वयंपाकघरात आज मम्मीला सुट्टी देऊया म्हणत मोठ्या खुबीने मुलींसोबत स्वयंपाक करणारा, त्यांना भाजी बनवायला मार्गदर्शन करणारा माझा "सखा", माझ्या मुलींच्या बाबांच्या प्रेमात मी अधिकच रंगून जाते. आपल माझ्यावरच प्रेम बघून तुमच्या प्रेमावर माझी अधिक श्रध्दा वाढलेय, आपल्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो .

कधीतरी घरात भांड्याला भांडं लागत, मीच आक्रमक होते. तेव्हा मोठ्या खुबीने आपण गप्प बसता. आणि मला शांत करता. मला समजुतीने सांगता एक संतापला तर दुसऱ्याने गप्प बसायला हवं, दोघांनीही चिडूनन कसं चालेल, माझा राग बघून तुम्ही मला कधी कधी लाडाने वाघोबा म्हणता. मी रुसल्यावर लाडे लाडे मला मनवता.

लग्नानंतर आपल्या आयुष्यात चढ उतार ही आले पण आलेल्या प्रसंगांवर मोठ्या हिमतीने आपण मात केली. प्रचंड धडपडा स्वभाव, सतत कार्यरत राहने आणि सकारात्मक विचार ही आपली जमेची बाजू.
तुम्ही नकारात्मक विचारांना कधीच मनात थारा दिला नाही .

आपण मला नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्रेरणा दिली. माझ्यावरचा आपला प्रचंड विश्वास, आणि माझ्याबद्दल गौरवोद्गार काढताना माझ्या बाबांचा अधुन मधुन केलेला उल्लेख (तु माथणे सरांची मुलगी आहेस!..) मला माझ्या आई बाबांबद्दल तुमच्या मनातला त्यांच्याबद्दल जे प्रेम आणि आदरभाव दिसतो त्याने माझ्या मनाला खुप आनंद होतो.

कुटुंबवत्सल, घरात समानतेचं वातावरण ठेवणारा, आधुनिक प्रगल्भ विचारांचा माझा सखा.
आदर्श पती, कर्तृव्यदक्ष पिता, सामाजिक बांधिलकी जपणारे, सुस्वभावी, मित्रमंडळी, नातेवाईकांचा प्रचंड गोतावळा जपणारे, सहकार्यास सदैव तत्पर असणारे, उत्तम समुपदेशक, ज्योतिषशास्त्री, उत्तम वक्ता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, "माझ्या कपाळीच कुंकू आहे", याचा मला प्रचंड अभिमान वाटतो.

तुमच्या बद्दल लिहिताना किती सांगायचंय मला किती सांगायचंय... बरंच लिहायचं बाकी राहून जातयं खुप मनात आहे पण शब्द अपुरे पडत आहेत.

अहो, जाधव साहेब तुमच्या व्यस्त शेड्युलमधून माझ्यासाठी वेळ काढत जा बरं. नाहीतर अशीच पत्र लिहावी लागतील मला.
पुरे करते आता नाहीतर आपल्यापर्यंत माझ्या प्रेमभावना पोहोचवताना मारुतीच्या शेपटासारख हे पत्र वाढतच जाईल.

असाच होता मनात माझ्या माझा साजन गं....❤️

तुमचीच लाडकी,
प्रिया
सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

३०/०६/२०२१