Feb 26, 2024
वैचारिक

नवविवाहित लहान बहिणीला पत्र

Read Later
नवविवाहित लहान बहिणीला पत्र

लहान बहिणीच्या लग्नाला सध्याच्या परिस्थितीमुळे येता न आल्यामुळे मोठ्या बहिणीने तिला लिहिलेलं पत्र.
"लग्न " आयुष्यातला खुप महत्वाचा निर्णय...आपले पुर्ण आयुष्य बदलणारा. आजच्या या समानतेच्या जगात कोणी माझ्या विचारांना हसतील, पण आपण कितीही समान हक्क बोललो तरी आजहि आपल्या देशात लग्नानंतर मुलींनाच जास्त जुळवून घ्यावे लागते. तसे पहिले तर मुलगा आणि मुलगी दोघांचे आयुष्य बदलते, दोघांनाही जुळवून घ्यावेच लागते पण मुलीकडून जास्त अपेक्षा असतात. आपल्या आई वडिलांनी, नातेवाईकांनी, समाजाने आपल्यावर जे संस्कार केले आहेत, त्यामुळे लग्नानंतर कसे वागायचे हे तुला वेगळे सांगायची गरज नाही पण तरी एक मोठी बहीण या नात्याने आणि मला आलेल्या काही अनुभवातून तुला काही सांगायचा छोटासा प्रयत्न. आशा आहे तुला त्याची मदत होईल.
लग्न झाल्यावर सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आपल्या आई-वडिलांचे घर सोडुन दुसऱ्या घरी जायचे. ज्या घरात आपला जन्म झाला, जिथे आपण वाढलो ते घर सोडुन जाणे अवघड आहे. हो, लग्नानंतरही आपला तेवढाच हक्क असतो आणि आपण कितीही  वेळा माहेरी जाऊ शकतो, आजकाल माहेरी जाण्यावर शक्यतो बंधन नसते, पण तरी लग्नानंतर माहेरी आल्यावर थोडी वेगळी भावना असते. इतके वर्ष आपण आपल्या आई-वडिलांसोबत राहत असतो, वर-वर ते कितीही ओरडले, चिडले तरी ते आपले सगळे हट्ट पुरवत असतात. त्यांचे ओरडणे आपल्या चांगल्यासाठीच असते. ते जितके ओरडतात त्यापेक्षा जास्त प्रेम करत असतात आणि अशा माणसांपासुन आपण दूर जातो तर आपण भावनिक झालेलो असतो आणि त्याच वेळी आयुष्यातल्या एका सुंदर वळणाची सुरुवात झालेली असते. आपल्या भावी जीवनसाथीसोबत आपण खूप स्वप्नं रंगवलेली असतात. फोनवर खुप गप्पा मारुन झालेल्या असतात. खुपदा भेटुनही झालेले असते. नवीन घरी जायची उत्सुकता असते. खुप स्वप्न असतात. खुप काही ठरवलेले असते, आणि मग लग्न होते.
नवीन घरात आपले लक्ष्मी म्हणुन स्वागत होते. नंतर मग देवदर्शन, पुजा असेच काही दिवस निघुन जातात आणि मग हळुहळु आपण सासरच्या घरात रुजु लागतो. खुप सुंदर दिवस असतात हे. सगळे नवीन नवीन...आपले घर...आपला संसार...आपले निर्णय... खरे तर घरात आपण खुप नवीन असतो.. आधी थोडेफार घरातल्यांसोबत बोलून, भेटून घरातल्या लोकांचा स्वभाव समजलेला असतो पण प्रत्यक्ष सगळ्यांना समजुन घेऊन त्यानुसार वागणे हि एक कलाच आहे आणि हि कला आपल्या मुलींना आधीपासुनच अवगत असते. सगळ्यात आधी तर रिलॅक्स राहायचे. घरातल्या सगळ्यांना हळुहळु समजुन घ्यायचे. त्यांच्या सवयी, कोणाला काय आवडते काय नाही, त्यांचा दिनक्रम, सगळे नीट समजुन घेऊन त्यांच्यासाठी आपल्याला जितके चांगले करता येईल तेवढे करायचे आणि हो सगळे मनापासुन आवडीने करायचे. काही गोष्टी जर आपल्याला नाही पटल्या तर शांत राहुन आपले मत मांडायचा प्रयत्न करायचा. असे नाही कि सगळे ऐकुन घ्यायचे आणि असेही नाही कि प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, विचार वेगळे आणि सासरच्या लोकांसाठीपण तू नवीन असणार, त्यांना थोडा वेळ लागणारच तुला समजुन घ्यायला. त्यामुळे थोडा वेळ जाऊ द्यायचा. लगेच कोणाबद्दल किंवा घरात घडणाऱ्या गोष्टींबद्दल मत नाही ठरवायचे आणि हो सगळ्यात महत्वाचे की सगळा अनुभव स्वतः घ्यायचा. कोणीतरी सांगतेय म्हणुन ती व्यक्ती तशी आहे असा कधीच विचार नाही करायचा. कदाचित ती व्यक्ती तुझ्यासाठी चांगले वागू शकते. मला तर असे वाटते की आपण जसे वागु तसे समोरची व्यक्ती आपल्यासोबत वागते. म्हणुन कोणी कोणाबद्दल कितीपण वाईट सांगितले तरी आपण चांगलेच वागायचे आणि आपल्या अनुभवावरुन त्या व्यक्तीबद्दल आपले मत ठरवायचे.
आधी तर सासरच्या घरातल्या पद्धती समजुन घ्यायच्या, असेही होऊ शकते कि त्यातल्या तुला काही आवडणार नाही म्हणुन लगेच विरोध नाही करायचा आणि आपल्या माहेरच्या गोष्टींसोबत तर कधीच तुलना करायची नाही. प्रत्येक घर वेगळे असते, त्याच्या परंपरा वेगळ्या असतात. हो, आपण पण सुन असतो आणि आपलाही अधिकार असतो की आपल्या मनाप्रमाणे घरातल्या गोष्टी करायच्या पण यासाठी थोडा वेळ दे. घरातल्याना समजून घे, आधीतर त्यांच्या मनासारखे वाग, त्यांचे मन जिंकुन घे, त्यांचा विश्वास मिळव. त्यांनापण लगेच असे नको वाटायला कि एक व्यक्ती आल्यामुळे आपले घर बदलतेय. त्यांनाही तुझा स्वभाव, आवडी-निवडी समजु दे. एकदा त्यांना तु आणि तुला ते नीट समजले की मग तु बिनधास्त तुझे मत मांडु शकते आणि तुझ्या मनाप्रमाणे घरातही बदल करू शकते. फक्त सगळे लगेच होत नाही, थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. कधी आपल्याला न आवडणाऱ्या पण त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यातही मजा असते आणि नंतर असेही होऊ शकते कि ती गोष्ट आपल्यालाही आवडु लागते. प्रत्येक गोष्टीवर 'वेळ' हाच बेस्ट उपाय आहे.

प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि सगळ्यांनी सोबत एकत्र राहायचे म्हंटल्यावर थोडेफार वादविवाद होणारच, पण म्हणुन गोष्टी जास्त ताणुन धरु नये. घरात वागतांना नेहमी आपला इगो बाजूला ठेवावा. भांडण झाले तरी लवकरात लवकर मिटेल असा प्रयत्न करावा. आपल्या माणसांसाठी आपली चुक नसतांना कधी कमीपणा घ्यावा लागला तर घ्यावा, शेवटी काय तर घरात सगळ्यांनी मिळुन मिसळुन राहणे महत्वाचे. 'संवाद' खुप महत्वाचा असतो. गप्प बसुन किंवा रुसुन कधीच प्रश्न सुटत नाही तर त्यावर बोलण्यानेच उपाय मिळतो, म्हणुन आयुष्यात कधी काही प्रॉब्लेम आला तर एकमेकांसोबत मोकळे बोलुन उपाय काढावा आणि कोणाच्या घरातले असे वागले म्हणजे आपल्यापण घरातले तसेच वागतील अशी तुलना कधीच करू नको, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते.
कधी कधी इकडे माहेर इकडे सासर असे अडकु शकतो, म्हणुन त्यात समतोल साधता आला पाहिजे. मला तर वाटते सासर आणि माहेर असा फरक करुच नये. सगळ्यांसोबत सारखे वागणे ठेवायचे आणि हे सगळे करत असतांना स्वतःकडे दुर्लक्ष कधीच करु नको. नेहमी स्वतःसाठी स्पेशल "ME TIME" काढायचा आणि स्वतःचे छंद जोपासायचे. यात खुप अवघड असे काही नाही. असेच हळुहळु आपण त्या घरात रुजुन जातो आणि सासर कधी "आपले घर" होते ते समजतही नाही, म्हणुन आता निवांत राहा आणि लग्न एन्जॉय कर. तुझ्या भावी आयुष्यासाठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा !!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//