ईरास पत्र

काही जुन्या आठवणी

प्रिय मैत्रीण ईरा हिस,

सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

पत्र लिहिण्यास कारण की ह्या आठवड्याचा गोष्ट छोटी डोंगराएवढी ह्या स्पर्धेकरिता तू दिलेला विषय.. "टपाल!"

टपाल किंवा पत्रं ही खरं तर माझ्या बालपणीची आठवण ! त्यामुळे टपाल हा विषय बघताच माझ्या डोळ्यांसमोरून अनेक पत्रं झळकून गेलीत ..पण पहिलं पत्र आठवलं ते आबांचं ! आबा म्हणजे आईचे वडील. मी लहान असताना घरी नियमित यायचं ते आबांचं पत्र.. चि.सौ.विजूस, अनेक आशीर्वाद ..असा मायना असलेलं.. मजकुरात ख्यालखुशाली, विचारपूस अन् शेवटी घरातल्या प्रत्येकाचं नाव घेऊन आशीर्वाद.. पत्राचा शेवट..आपला आबा..

पत्र आईच्या नावानं असलं तरी पत्ता बाबांच्या नावानं लिहिलेला.. श्री.रा.रा. अशा उपाधीसह.. आजच्या पिढीला हे "श्री.रा.रा." माहीत नसावं कदाचित.. म्हणून सांगत्ये.. "श्रीमान राजमान्य राजश्री!"

आत्ताच ते पत्र डोळ्यांसमोरून तरळून गेलं..आबा पंचवीस वर्षांपूर्वीच हरवले.. पण त्यांची पत्रं त्यांच्या अक्षरासकट अजूनही स्मृतीत खोलवर रुजलेली आहेत.

आज विशीपंचविशीत असलेल्या पिढीला पत्रं माहीतही नसतील कदाचित.. अन्‌ त्यातली गोडीही.. पण त्यांना एक आवर्जून सांगेन मी .. तुमच्या TYSM अन् GNTC ची उद्गाती आमच्याही आधीची पिढी बरं का !

त्याचं असं होतं की साधारण ख्यालीखुशालीचं पत्र लिहायचं तर ते पंधरा पैशांच्या पोस्टकार्डवर!  ह्या पोस्टकार्डची किंमत कित्येक दशके पंधरा पैसेच होती ! हे पोस्टकार्ड अगदी खुल्लमखुल्ला असे. कसलंही आवरण नाही अन् कसली लपवाछपवीदेखील.. ! लिहायला जागा मात्र मर्यादित. पोस्टकार्डाचा एक चतुर्थांश भाग नुसता पत्ता लिहिण्यात निघून जाई. उरलेल्या भागात मजकूर लिहिण्यासाठी धांदल होई अन् म्हणून बारीक अक्षर काढावे लागे.. अन् शिवाय संक्षेपांचा वापर..

तीर्थरूपांसाठी "ती."  पण तिर्थस्वरूपांसाठी "ति.स्व."!  केवळ आई आणि वडील हे "तीर्थरूप" बाकी सर्व ज्येष्ठ मंडळी "तिर्थस्वरूप".. असं हे गणित !

"शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष" अशा लांबलचक अभिवादनाकरिता केवळ "शि.सा.न.वि.वि." लिहिलं की झालं !

"अ.उ.आ" म्हणजे अनेक उत्तम आशीर्वाद अन् "क.लो.अ." म्हणजे "कळावे, लोभ असावा!" हे ओघाने आलेच.


माझ्या आजोळी वडीलधाऱ्या व्यक्तींना पत्र लिहिताना "व.से.बा.शि.सा.न." असे लिहिण्याचा प्रघात होता.. ओळखा पाहू ह्याचा लाँगफॉर्म.. नाही ओळखता येत ना ? मी सांगते.. "वडिलांचे सेवेशी बालकाचा शिरसाष्टांग नमस्कार.!" हुश्श !!!

बरं पत्रावर लिहिलेला गिचमिड अक्षरातील पत्ता वाचून अन् तो हुडकून पत्र योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे कसब असलेल्या पोस्टमनचा उल्लेख केल्याशिवाय इथून पुढे जाणं म्हणजे घोर कृतघ्नता.. !

पत्रलेखनाचे बाळकडू शाळेत मिळे.. कारण "भाषा" विषय म्हटला की "पत्रलेखन" अनिवार्य ! आईस, वडीलास, भावास, बहिणीस, मित्रांस‌ किंवा शिक्षकांस पत्र लिहावयास आम्ही शाळेतच शिकलो.. शिवाय मुन्सिपालीटी किंवा तत्सम कार्यालयात औपचारिक पत्रव्यवहारही अभ्यासाचाच भाग होता..

माझ्या ओळखीची एक सासुरवाशीण सासरी पत्र धाडण्याचा कंटाळा करी.. आणि म्हणून नेहमी तिला टोमणे मिळत.. "मास्तरांनी तुला पत्र लिहायला शिकवलं नाही का ?" 

एक दिवस मात्र तिनं सांगून टाकलेलं.. "मास्तरांनी पत्र लिहायला शिकवलं पण फक्त आईबापास.. "सासू"स पत्र लिहायला शिकवलं नाही म्हणून !"

आमच्याकडे आईलाही पत्र लिहिण्याचा कंटाळा! ती तिच्या वडिलांना कसेबसे पोस्टकार्ड लिही..पण पोस्टात टाकायला विसरून जाई.. काही दिवसांनी तो मजकूर जुना झाला म्हणून पत्र फाडून केराच्या टोपलीत..!

तिचे आबा पत्राची वाट बघून थकून जात. शेवटी तिनं एकदाचं स्पष्ट करून टाकलं.. " पत्र आलं नाही म्हणजे सर्व काही कुशल आहे असे समजावे.. जर काही काळजीचं असेल तर पत्र येईलच..!"

आम्ही बहिणी मात्र वर्षातून एकदा दोन्ही आजीआजोबांकडे पत्र लिहीत असू.. शाळेचा रिझल्ट लागल्यावर.. गुणांची टक्केवारी कळवायला..!

"पत्र म्हणजे अर्धी भेट" असं म्हणत.  कुटुंबातील वयोवृद्ध सदस्य लेकराबाळांच्या पत्रखुशालीची उत्सुकतेनं वाट बघत. एकदा पत्र आलं की त्याची अनेकदा पारायणं होत. पत्रातील भाषेवरून पत्रलेखकाच्या मनस्थितीचा अंदाजही अनुभवी मंडळी घेत.

नेहमीच्या पत्रांशिवाय घरी पत्रं येत असत ती औपचारिक.. कुणाकडे लग्न आहे म्हणून तर कुणाकडे मौंज..! कधी कुणाला बाळ झालं म्हणून बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचा निरोप घेऊन तर कधी कुणी आपलं माणूस आपल्याला सोडून देवाघरी निघून गेल्याची दुःखद बातमी घेऊन पत्र दारी हजर होई. घरी जर लग्नाचा मुलगा असेल तर मुलगी "सांगून" येणाऱ्या पत्रांची संख्याही मोठी असे.

हल्ली ही सर्व कामं अन् निरोप फोन, व्हिडिओ कॉलिंग, व्हॉट्सऍप अन् फेसबुकच्या माध्यमातून पार पडतात. पत्र ही जर अर्धी भेट .. तर फोन ही पाऊण भेट.. अन् व्हिडिओ कॉलिंग ही  "शून्य पूर्णांक नऊ दशांश" भेट म्हणायला काहीच हरकत नाही.

हे झालं घरगुती ख्यालखुशालीबद्दल..

आवडत्या सिनेतारकांना पत्रं लिहून त्यांच्या स्वाक्षरीचे फोटो मागविणारी अन् ती "मालमत्ता" खजिन्यासारखी जपणाऱ्यांपैकी मी ही एक ! 

त्याकाळी प्रियकर अन् प्रेयसीच्या दूरसंवादाचं "पत्र" हे एकमेव माध्यम होतं..‌ अशी पत्रे घरच्या पत्त्यावर बोलावण्याची सोय नसे.. मग मित्र किंवा मैत्रिणीच्या माध्यमातून पत्रांची देवाणघेवाण होई.

साखरपुडा झालेल्या वाग्दत्त वधूवरांकरिता पत्रांचं महत्त्व अनन्यसाधारणच ! गुलाबी कागदावर लिहिलेली.. फुलापानांची कलाकुसर केलेली.. अन् विविध प्रकारच्या शेरोशायरीनं सजलेली "ती" लाजरीबुजरी प्रेमपत्रं ही पुढच्या प्रेमळ संसाराचा पायाच जणू ! अनेकांनी लग्नापूर्वीची प्रेमपत्रं अनेक वर्ष जपून ठेवलीत.. एका साहित्यिक जोडप्यानं तर अशा लग्नापूर्वीच्या पत्रांचं पुस्तकही छापलंय म्हणे !

आमच्या काळी "पत्र" हे मैत्रीचेही साधन होतं. आपले विचार अन् भावना पत्रांद्वारे एकमेकांना पोहोचवून पत्रमैत्रीची साखळी तयार व्हायची अन् एकमेकांना प्रत्यक्षात न ओळखणारेदेखील ह्या पत्रमैत्रीच्या नात्यानं बांधले जायचे.. जन्मभरासाठी..!

माझा स्वतःचा पत्रसंवाद कधी थांबला हे आठवतही नाही.. बहुधा मी शेवटचं पत्र १९९४ च्या आक्टोबरमध्ये लिहिलं असावं.. माझ्या बाबांना.. पण आठ वर्षांपूर्वी बाबाही हरवलेत.. मग "त्या" पत्रांची काय कथा !

आता मी पत्रं लिहिते ती फक्त ऑफिसमध्ये.. तीही छापील असतात.. साचेबंद मजकुराची.. रिकाम्या जागा भरायच्या असतात.. त्याही "मेलमर्ज"ने भरून निघतात..

कां कोण जाणे..! पण वय झालंय बहुधा.. ! पंधरा पैशांच्या पोस्टकार्डचं समाधान व्हॉट्सऍप मेसेजनं भरून निघतंय खरं.. मात्र ईमेलने फक्त निरोप जातोय.. भावना पोहोचत नाहीत.. असंच वाटत‌ राहतं.

पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिरेस लिहिलेली पत्रं आजही विसरली गेली नाहीयेत आणि जी.ए. अन् सुनीताबाई देशपांडेंचा पत्रव्यवहार अजूनही मराठी साहित्यातील एक मानाचं पान आहे.. हेही नसे थोडके !

असो.. पत्र बरेच लांबले.. त्याकरिता क्षमस्व ! पण आठवणी निघाल्या की एखाद्या धबधब्यासारख्या कोसळतात.. त्यांना अडवणे अशक्य !

कळावे, लोभ आहेच.. तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती..

तुझीच मैत्रीण

कल्याणी पाठक