Letter to husband

A letter to husband

प्रिय पतीदेव,

               आज तुमच्या जवळ थोडसं मन मोकळं करावसं वाटतंय. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एकमेकांशी बोलायला तसा फारच कमी वेळ भेटायचा. मात्र आता लॉक डाऊन मध्ये आपण बराच वेळ एकत्रित घालवला आहे. खूप छान वाटलं. तसं आपल्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या आधीचे सात वर्ष जोडली तर आपल्याला एकत्रित तेरा वर्ष झाली आहेत. लग्नाच्या आधीच्या वर्षात तर आपण बराच वेळ फोनवर तासन तास गप्पा मारण्यात घालवलेला आहे. मात्र लग्नानंतर एक वर्ष तर आपलं फार गोडी गुलाबी गेलं. परंतु, नंतर असं एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी फारच कमी आली. आता तर आपली दोन मुलं पण झाली आहेत. त्यामुळे माझा बराचसा वेळ त्यांच्या संगोपनातच जातो. आणि आता आपण बोलतो ते पण बऱ्याच वेळा मुलांविषयीच असते. म्हणून मला आज आपल्याबद्दल माझं प्रेम व्यक्त करावसं वाटतेय. आपण माझा आयुष्यात महत्वाचे आहात हे तसं मी शब्दांत सांगू शकत नाही. परंतु, आज सांगण्याचा प्रयत्न करते.

        लग्नाच्या आधी जेव्हा आपली भेट झाली. त्यावेळेस तर तुम्हाला बघताक्षणीच तुमच्या प्रेमात पडली. आपलं ते स्मित हास्य. कमी बोलणं परंतु, जे पण बोलणं ते अगदी मार्मिक. ह्या गोष्टींनी तर मी तुमच्यावर भाळली होती. या तर झाल्या लग्नाअगोदर च्या गोष्टी. परंतु, जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे आहे तेव्हापासून तुम्ही मला तक्रार करण्याची संधी दिली नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि, तुम्ही माझ्या या जीवनात आला. तुमच्या सोबत मला माझं आयुष्य छान जगायचय.

        मी तुमच्यापेक्षा वयाने लहान. म्हणून तुम्ही मला किती समजून घेतात. आपल्यात भांडणेही होतात. परंतु, फार काळ अबोला न धरता तुम्ही लगेच भांडण सोडवतात. तुमची नेहमी तक्रार असते की, मी माझ्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही मला फिट बनवण्यासाठी नेहमी तत्पर असतात. परंतु, मीच जरा आळशीपणा करते. पण इथून पुढे मी तुम्हाला वचन देते की, आपण दोघे मिळून एक आरोग्यमय जीवन व्यतीत करू.

          मी तशी तुमच्यापेक्षा बोलकी आहे. मी नेहमी बोलत असते. माझं प्रेम पण बऱ्याच वेळा बोलून व्यक्त करते. परंतु, माझी तक्रार असते की, तुम्ही कमी बोलतात आणि तुमचं प्रेम व्यक्त करत नाही. परंतु, यावेळेस तुम्ही तुमच्या कृतीतून माझ्याबद्दल प्रेम दाखवून दिलं. मी सात महिन्यांची गरोदर असल्याने मला माहेरी जायचे होते. मात्र त्यावेळेसच कळाले की, पप्पांना करोना झालाय. म्हणून मला जाता आले नाही. या स्थितीत मी पप्पांच्या चिंतेत व्याकुळ होती. मी त्यांच्या व मम्मीच्या मदतीला जाऊ शकत नाही या विचाराने मला वाईट होते. परंतु, या परिस्थितीत तुम्ही माझ्या मनाची घालमेल समजून घेऊन तुमच्या जीवाची पर्वा न करता माझ्या आई-वडिलांसाठी धावून गेला. जावई कधी मुलगा होऊ शकत नाही हे तुम्ही खोटं करून दाखवलं. मी तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाही आहे. माझ्या मनातील तुमच्या विषयीचे प्रेम आणि आदर असंख्य पटीने वाढला आहे.

         माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नेहमीच साथ राहील. असा जोडीदार मला देवाने दिला त्याच्याबद्दल मी देवाचे आभार मानते.

          साथ माझी तुम्हाला,

          शेवटच्या श्वासापर्यंत असेल.

          नाही सोडणार हात तुमचा,

           जोपर्यंत प्राण माझ्यात असेल.

                                   

                                               तुमचीच,

                                                    भार्या.