Login

वडील - एक दिव्यातील वात - जी स्वतः त्रास सहन करून कुटुंबाचे रक्षण करते

Feeling Of Daughter Towards Her Father
प्रिय दादा,
आता पर्यंत मी तुम्हाला कधीच पत्र लिहिले नव्हते ,ही पहिलीच वेळ. मला तुमच्या बद्दल काय वाटते हे शब्दात मांडू शकत नाही,ह्या आधीचे आपले सारे संवाद आठवले की वाटतं, आपण कधी एकमेकांना विनाकारण फोन केले नाही.
पण जेव्हा जेव्हा तुमच्या आधाराची गरज होती ,तेव्हा मात्र खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात ,ते ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता,यातून तुमचा माझ्या वर असलेला विश्वास आणि प्रेम मात्र मला नेहमीच जाणवले, त्यामुळे मला नेहमीच हत्तीच बळ मिळालं आणि प्रत्येक संकटातून मार्ग काढत पुढे चालत राहिले. तुम्ही कधीही मला मी मुलगी आहे म्हणून, बंधनात नाही अडकवून ठेवले , मी माझ्या आयुष्यात काय करायचे याचे स्वातंत्र्य दिले. मला आठवतं, लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात करताना देखील, पहिलं तुम्ही मला विचारलं आणि नंतर सुरुवात केली. त्या काळात ही तुम्ही आधुनिक बापाची भूमिका साकारली. शिक्षण क्षेत्र स्वतःच्या आवडीने निवडण्याची मुभा दिली, सगळ्या गोष्टी पुरवल्या, कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. लग्न झाल्यावर मला हे सांगितलं,की मी असा बाप नाही, की जो असा विचार करतो, की ज्या घरात मुलगी दिली तिथूनच तिची प्रेतयात्रा बाहेर पडली पाहिजे,आयुष्यात कधीही काही संकट आलं,तर स्वतःच बरं वाईट करण्याचा विचार करायचा नाही . थंड डोक्याने विचार केला, तर प्रत्येक समस्येचे निराकरण करता येते ,जीव घेणे हा पर्याय नाही. तू गेल्याने कुणाचं नुकसान होणार नाही, पण आमचं होईल,आम्ही नेहमीच तुझ्यासाठी आहोत. दुसरी गोष्ट तू एवढी शिकली आहे तर नेहमीच स्वतःच्या पायावर उभी असशील,तुला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. माझ्यासाठी ही नेहमीच एक अभिमानाची गोष्ट असेल. ह्या गोष्टी मी नेहमीच लक्षात ठेवल्या आहेत. तुम्हाला मी नेहमीच घरातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन प्रगती करताना पाहिले आहे, हे करत असताना तुम्ही ज्या गोष्टींना समर्थपणे तोंड दिले, हे पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळत आली. आयुष्य दुसऱ्या कडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, कसं आनंदात जगावं हे मात्र मी तुम्हाला पाहतच शिकले. दुसऱ्याचं कितीही ओरबाडलं,तर ते काय आयुष्यभर पूरं पडतं नाही. कष्टाची आर्धी भाकरी जरी असली, तरी ती सन्मानाने खावी हीच शिकवण मिळाली. मुलाचं करताना मी त्याचं का करू हा विचार नाही केला ,त्याला माझी गरज आहे तर मी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असा विचार नेहमी केला .
रिटायर झाल्यावरही तुम्ही स्वस्थ बसला नाहीत, मला तुमच्या बरोबर तुमच्या साऱ्या मित्रांचही कौतुक करावसं वाटतं,तुम्ही साऱ्यांनी मिळून रिटायर झालेल्या लोकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करणे, नदितला गाळ काढण्यासाठी योगदान दिलं, मित्रांच्या विधवा बायकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करणे,जे मित्र घराच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांना आळीपाळीने भेटायला जाणं, हे सगळं तुम्ही जे करताय ते एक समाजकार्यच झालं. जसं काही आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात तुम्ही समाज ऋणानुबंधातून मुक्त होण्याचा ध्यास घेतला आहे.
ज्यांनी तुम्हाला आपलं मानलं त्यांना भरभरून प्रेम दिलं,ज्यांनी विश्वासघात केला , त्यांना तुम्ही दाखवून दिलं,की तुम्ही दुबळे नाही ,नेहमीच स्वाभिमानाने जगत आलात,तुम्ही माझे वडील आहात ,ह्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे.
मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना जेव्हा तुमच्या बद्दल अभिमानाने सांगत होते,तेव्हा ते म्हणाले ,शेवटी ते तुमचेच वडील आहे. मी ती गोष्ट नाकारत म्हटलं,नाही तुम्ही चुकता,ते माझे वडील आहे,पण जास्त मानाची गोष्ट म्हणजे ,मी त्यांची मुलगी आहे या गोष्टीचा मला जास्त सार्थ अभिमान आहे,नाही गर्व आहे.
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा,कारण आज मी जे काही आहे,ते केवळ तुमच्या मुळेच.