डॉ.पतिस पत्र

आज जवळजवळ एक महिना होत आला आहे.आपली प्रत्यक्ष भेटत तर नाहीच,शिवाय फोनवरही संभाषण किंवा संदेशाची देवाण-घेवाण झालेली नाही.
पत्रलेखन
प्राणप्रिय पति राज
                   आभाशी गळाभेट.
वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की,
 आज जवळजवळ एक महिना होत आला आहे.आपली प्रत्यक्ष भेटत तर नाहीच,शिवाय फोनवरही संभाषण किंवा संदेशाची देवाण-घेवाण झालेली नाही.
लग्नापासून आज पर्यंत, असा एकही दिवस गेला नाही की, सकाळी मी तुझ्या रूंद कपाळावर माझे ओठ टेकवून तुला "शुभ सकाळ" म्हणून उठवले नसेल. पण या कोरोणाने सारंच बदलून गेलं रे…! 
    मला चांगलंच आठवते. लग्नाच्या पहिल्याच दिवशी तू सांगितले होते, की तुझं पहिलं लग्न रुग्ण सेवेशी झाले आहे. मलाही त्याबद्दल कुठलीच हरकत नव्हती, कारण तू माझ्यावर किती जिवापाड प्रेम करतो हे मला चांगले माहीत आहे. दूर राहिल्याने प्रेम कमी होत नसेलही, पण तुला न बघता नाही जगू शकत रे मी. सुरुवातीला कोरोणाचा कहर थोडा कमी होता. तेव्हा तू घरी यायचास.मास्क वापरणे. सॅनिटायझर करणे, अंतर ठेवणे हे सर्व आपण करत होतो पण तुला बघून जगण्यास बळ मिळत होते रे. 
रात्री उशिरा घरी आलास तरी घरचे बनवलेले, गरम, पौष्टिक जेवण तुला देताना खूप समाधान वाटत होते, नंतर जशी रुग्ण संख्या वाढू लागली तेव्हापासून तुझे घरी येणे हे बंद झाले. माझ्यासोबतच आपली छकुली ही तुझी खूप आठवण करते. आपल्या आजूबाजूला बऱ्याच जणांचे वर्क फॉर्म होम असल्यामुळे ते ऑफिसच्या कामासोबतच आपल्या मुलांनाही भरपूर वेळ देतात, त्यांना बघून आपली छकुली हिरमुसली होऊन जाते रे. ! बाबा कधी येणार म्हणून सारखे विचारत असते. कोरोणा काय आहे? तू किती भयंकर परिस्थिती हाताळतो आहेस हे त्या तीन वर्षाच्या जीवाला सांगूनही समजणार नाही, म्हणून मलाही प्रश्न पडतो तिला काय सांगावे. कसे समजावे.
  त्यानंतरच्या पंधरा दिवसात माझे चाळीस-पन्नास मेसेजेस आणि वीस-बावीस कॉल नंतर तुझा एखादा रिप्लाय द्यायचा. तेवढेच तुझे उत्तर मिळाल्याने समाधान वाटत होते. पण आता काही दिवसात तेही बंद झाले तुझा फोन सारखा बंदच दाखवत होता. नंतर तुझ्या सहकाऱ्यांना संपर्क केला तेव्हा कळले, रुग्णांचे प्राण वाचवता वाचवता तू स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तब्येतीकडे दुर्लक्ष केले, त्यात तुझी चूक नाही दहा-बारा तास पूर्ण अंगावर पी पी ई, तोंडावर दोन दोन मास्क असताना कितीही वाटलं तरी काही खाणे पिणे शक्यच नव्हते. अशातच तो कोरोना तुझ्यावर हावी झाला आणि तेही तू मला कळवलेच नाही.
नंतर तुला दुसर्‍या मोठ्या हॉस्पिटल ला हलवण्यात आल्याचे कळले, पण तू कुठे आहेस हे घरी न सांगण्याचे तुझ्या सहकार्‍यांकडून तू वचन घेतले आहेस म्हणे. सहकारी तुझे खूप काळजी घेत आहे म्हणाले. पण मला असं पोरक का केलस रे? जीवनातील सगळी सुख दुःख आपण दोघांनी वाटून घ्यायची ठरलं होतं ना? मग तू असा का वागला.
सहकार्‍यांसोबत मी तुला हे पत्र पाठवत आहे.तू ही कसा आहे, कुठे आहे ते मला लवकरच कळवशील. फोन तरी करशील.
    तु लवकर ठीक होऊन घरी यावे अशी प्रार्थना करते. मी आणि छकुली तुझी वाट बघत आहोत. माझ्यासाठी आपल्या छकुली साठी तुला ठीक होऊन घरी यावेच लागेल.
तुझ्याशिवाय रात्र रात्र झोप लागत नाही. नको ते विचार डोक्यात काहूर माजवत असतात. मोठ्या हिमतीने स्वतःला आणि छकुली ला सांभाळत आहे. लवकरच सगळेठीक होईल, छकुली सोबतचे हसण्या- खेळण्याचे आपले ते दिवस परत येतील या आशेवर एक एक दिवस काढत आहे. तू स्वतःची काळजी घे. लवकर घरी ये. खुप अधीरतेने तुझी वाट बघत आहे.

तुझीच वेडी
राज ची राणी