आईचे मुलीस पत्र

मुलीस पत्र

     गोष्ट छोटी डोंगराएवढी.                               विषय:- टपाल                                            आईचे मुलीस पत्र....                                                                                                           प्रिय बेटा ज्ञानेश्वरी......                                                                 पत्र लिहण्यास कारण की.... बेटा मुली वयात आल्यानंतर त्यांना मोठ्या माणसांनी सांगितलेले  चुकीचे वाटते.प्रत्येक वेळी आई, वडील ,आजी, आजोबा ओरडले की तुला राग येतो की, मी चुकीचे नसताना सुध्दा मला ओरडा बसतो पण बेटा मोठी माणसे काही चुकीचे तर नाही ना सांगणार. बेटा दगडाच्या मूर्तीला देवत्व आणायचे असेल तर तिला पण टाक्याचे थोडे घाव सोसावे लागतात.तसेच आपले जीवन पण चढउतारानी भरलेले आहे.                                                                                             आई म्हणून काही गोष्टी तुला शिकवताना बऱ्याचदा तुला माझ वागण पटत नसेल, माझा राग येत असेल की मी तुला बसता उठता सूचना देते, काय करायच, काय नाही, कस करायच कस नाही हे सांगते, तुझ्यावर ओरडते, रागावते, प्रसंगी तुला शिक्षाही करते, पण समजून घे की हे फ़क्त तुझ्या चांगल्यासाठीच असतं, मी असं नाही म्हणत की मला सगळच् कळत, पण वय आणि अनुभव माणसाला थोडाफार शिकवतात, त्यामुळे माझ्या प्रत्येक, वागण्याची, म्हणण्याची दूसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर.                                                                                            तू आता आयुष्याच्या अशा वळणावर आहेस की जिथुन तुझ्या आयुष्याला एक नविन कलाटणी मिळणार आहे. आजवर तु कायम कुटुंबाच्या छायेत वाढली आहेस, एकटी बाहेर पडण्याची ही तुझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता काही गोष्टी तुला स्वतः करण्याची वेळ येईल, प्रत्येकवेळी मी किंवा घरातले कोणी तुझ्यासोबत असुच असे नाही. तेव्हा  येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची, तयारी ठेव. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सल्ले घेणे बंद करशील तरच तुझ्यातली निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल.                                                             तुझ हे वय अस आहे की तुला आमच्यापेक्षा तुझा मित्र परिवार जास्त जवळचा वाटू शकतो, आणि ते स्वाभाविकही आहे, मित्र मैत्रिणी निवडताना त्यांचा पैसा, आर्थिक आणि सामाजिक दर्जा, यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते तुमची एकमेकांना समजुन घेण्याची वृत्ती. कोणी चुकत असताना योग्य ते मार्गदर्शन करतो तो खरा मित्र, कायम गोड बोलणाऱ्या व्यक्ती आपल्या हिताचा विचार करत असतीलच असं नाही.                                                 खरा मित्र तोच असतो जो आपल्या चांगल्याचा विचार करतो आणि योग्य वेळी आपले कानही धरतो. आयुष्यात असेच सवंगडी जोड कारण रक्ताच्या नात्यानंतर किंवा बऱ्याचदा त्यांच्याही आधी हेच तुझे सोबती असतील. तु आता खऱ्या अर्थाने बाहेरची दुनिया बघशील, जग खुप वाईट आहे किंवा जगरहाटी कशी आहे हे मी तुला सांगणार नाही कारण त्यामुळे तुझा चांगुलपणावरचा विश्वास उडु शकतो, कारण प्रत्येक माणसात, गोष्टीत, घटनेत काहीना काही चांगले हे असतेच् आणि ते बघायची, जाणुन घ्यायची सवय तू स्वतःला लावुन घे.                                                              वाईट गोष्टी आजुबाजुला घडत असताना त्यातुन चांगल शिकण्याचा प्रयत्न कर, अन्याय करू नकोस आणि त्याला बळीही पडु नकोस, तुझ वय खऱ्या अर्थाने मोठ होण्याच् आहे त्यामुळे तू आजुबाजुला काय पाहतेस, अनुभवतेस त्यावरून तुझे बरेच निर्णय ठरू शकतात, त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेव की तुला तुझ आयुष्य कुठे न्यायच आहे? कारण आता तू तुझ्या निर्णयांसाठी जबाबदार असणार आहेस आणि असायलाच हवस, त्यामुळे जरी चुकलीस तरी आपल्या चुका मोठेपणाने स्विकारुन त्यांची जबाबदारी घ्यायला आणि त्या सुधारायला शिकल पाहिजे.                                                                                   बेटा आई म्हणून तुला योग्य रस्ता दाखवण्याचे काम माझे आहे. तुला तुझ्या आयुष्यात कसे वागायचे ते तू ठरव. हा पण तू चुकीचं वागलीस तर तुझी आई तुला योग्य रस्ता दाखवण्याचे काम नक्की करेल..तुला पटते की नाही ते बघ. नेहमीं सत्याचा मार्ग धर आणि योग्य निर्णय घे.तुझी आई सदैव तुझ्या सोबत असेन.                                                  तुझीच आई......                                                                 ©®ॲड. श्रद्धा मगर