Feb 24, 2024
वैचारिक

"अदृश्य बंधनातून 'स्वतंत्र' होऊयात?"

Read Later
"वाॅव! सगळेजण किती छान डान्स करत आहेत... मी पण जाऊ का?.... नको राहू देत."

"मला वाटतंय आज हा राणी पिंक ड्रेस घालूयात.... पण नको, जरा जास्तच भडक वाटायचा तो..... बघू, नंतर घालू पुन्हा केव्हातरी."

"आज असं वाटतंय की स्पा मध्ये जाऊन, छान रिलॅक्स व्हावं...पण नको, परीक्षा दोन महिन्यांवर आल्या आहेत."

"ढोलपथक पाहून मला एकदम भारावल्यासारखं वाटतं. किती जोशपूर्ण वातावरण निर्माण होतं. मीही यावर्षी ढोलपथकात भाग घेऊ का ? अरे... पण ऑफिसहून आल्यावर मला खूप दमून गेल्यासारखं होतं."

प्रत्येक वेळी मनात एखादी कल्पना आली - 'काहीतरी नवीन 'ट्राय' करून बघूयात', की त्याला क्षणार्धात 'प्रत्युत्तर' देणारा आवाज नेहमी हजर होतोच.
आणि बऱ्याचदा तो नकारात्मक आणि नाऊमेद करणारा असतो -
"मला नाही जमणार, मला वेळ नाही, मला आता शक्य नाही, उगाच वेळ वाया जाईल", वगैरे वगैरे...
या प्रत्युत्तरांची यादी कधीही न संपणारी आहे.
मला प्रश्न पडतो की हे सगळे मनाचे इन्स्टंट रिप्लाय नकारात्मक असतील तर आपण लगेच ऐकतो आणि कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा पिच्छा पुरवणं लगेच थांबवतो.
पण मन म्हणालं की -
जा, डान्स कर !
तो राणी पिंक ड्रेस घाल !
रिलॅक्स हो !
ढोलपथकात भाग घे !
तर आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपल्याच मनामध्ये हा भेदभाव सतत चालू असतो आणि आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत राहतो.
मग स्वतःच देवाकडे तक्रार करतो की मला जे हवं ते मला कधीच मिळत नाही.
मग ही 'अदृश्य बंधने' कोणती आहेत जी आपल्याला मन म्हणते तसं जगण्यापासून अडवत असतात ? आपल्याला हवे ते मिळवण्यापासून रोखत असतात ?

आपल्या मनात खोलवर रुजलेल्या "गैरसमजुती" !
नकळतपणे लहानपणापासून ते आत्तापर्यंत घडलेल्या काही गोष्टींचा, घटनांचा, समजुतींचा आपल्यावर खोलवर परिणाम घडत असतो.
त्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या क्षणापुरता बसतो परंतु त्याचे परिणाम लाईफ लॉंग असतात.
ते वरवर चुकीचे वाटत नाहीत, तरीही त्यांचा आयुष्यात अवलंब करायला आपण कचरत असतो.

जाता येता कोणीतरी तिसरा कमेंट पास करतो -
राणी पिंक कसा भडक रंग वाटतो....
परीक्षा संपेपर्यंत मी रिलॅक्स होऊच शकत नाही...
कंपनीचं काही सांगता येत नाही, आज सांगेल, उद्या कामावर येऊ नका... रिस्कच नको.
सगळ्यांसमोर डान्स करायला जायचं आणि सगळेजण आपल्यावर हसायचे...
मनात दडलेल्या या गैरसमजुती आपल्याला मनाचं ऐकण्यापासून थांबवतात.

परंतु ही बंधने 'अदृश्य' असल्याने आपल्याला ही प्रत्यक्ष दिसत नाहीत. आणि जे बंधन 'प्रत्यक्ष' दिसत नाही ते तोडणार कसं ?
मी सांगू ?
एकदा जे मन म्हणते ते करून तर पहा !
ही अदृश्य बंधने तुटलीच किंवा तुटायला सुरुवात झाली असं समजा.

मग या स्वातंत्र्यदिनानिमित्त मनाच्या ह्या अदृश्य बंधनांतून 'स्वतंत्र' होऊयात ?


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Prapti Gune

MBBS Intern

I have profound love for marathi language and for everyone speaks in Marathi. Assal Marathi mulgi at heart.

//