संवाद साधूयात ना !

Need of conversation with our people .


स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय - हरवलेला संवाद

शीर्षक - संवाद साधूयात ना!
लेखिका -©® स्वाती बालूरकर , सखी

कुंदा मावशींचा फोन आला आणि उल्हास विचारात पडला. मावशींना ट्रीटमेंट साठी त्याच्याकडे यायचं होतं. या शहरात त्याच्याशिवाय कुणी नव्हतं आणि दवाखाना योगायोगाने त्याच्या घरून जवळच होता.

लहानपणापासून तो मावशींचा लाडका होताच शिवाय आई गेल्यानंतर तिच्याजागी मावशीच तर होती मायेची. तो "हो. या" असं म्हणाला पण मनात एक प्रकारचं दडपण आलं होतं.

या दरम्यान अभया त्याची बायको खूपच चिड चिड करत होती. थोडंही काम वाढलं की राग- राग करायची.
असंही या दरम्यान व्यस्ततेमुळं दोघांमधे संवाद कमीच झाला होता अन बोलायला गेलं की वादच व्हायचे त्यामुळे दोघेही औपचारिकच बोलायचे.

एवढ्या प्रेमाने राहणार्‍या नवरा बायकोंचं असं का होतं कळतच नाही.

मावशी येणार हे देखील कसं सांगायचं अशा विचारात होता व घरी आल्यावर पाहिलं तर घरात आवरा आवरी चाल ली होती.

त्याचं दडपण अजूनच वाढलं.

त्याला वाटलं की अभय आणि त्याची मुलगी पूर्वा बहुतेक कुठेतरी जाणार असतील आणि ते त्यालाही सांगणं त्यांना गरजेचं वाटलं नाही.

किंवा मग अभयाची किटी पार्टी वगैरे असेल.

उल्हास आला तर ती म्हणाली "स्वयंपाक झालेला आहे, आता जेवणार की पुन्हा तुमचे तुम्ही जेवणार?"

त्याने विचारलं," तुम्ही दोघी?"

" आम्ही नाही जेवलोय अजून, हे पूर्वाची बेडरूम आवरतो, मग जेवणार आहोत."

"अगं ,सोबतच जेवूयात ना मग!" त्याच्या या वाक्यावरती अभया ने पुन्हा एकदा वळून त्याच्याकडे पाहिलं.

त्यांच्या घरातलं वातावरण यादरम्यान असं झालं होतं की हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं होतं.

गेल्या महिन्या- दीड महिन्यापासून कधी ऑफिसच्या कामाच्या नावाखाली तर कधी ऑडिटचं काम अर्जंट असल्यामुळे पण तो त्यांच्यासोबत जेवतच नव्हता.

त्याला वेळ मिळेल तेव्हा तो वाढून घ्यायचा किंवा पुन्हा अन्न गरम करून घ्यायचा.

जर कधी अभयाने वाढून दिलंच तर आपल्या स्टडी रूम मध्ये जाऊन ऑफिसच्या टेबल वरती लॅपटॉप समोर जेवायचं .

त्यालाही मनापासून वाटत होतं की आजतरी घरातलं वातावरण थोडसं मोकळं करावं आणि मग अभयाच्या कानावरती हळूच ही बातमी घालावी.

तो फ्रेश होऊन आला आणि ठरवलं की आज कुठलंच ऑफिसचं काम घरी करायचं नाही. एवढी निकडही नव्हती.

सहजच त्यांच्या बेडरूममध्ये गेला तर पडदे बदललेले होते , त्यांच्या बेडरूम मधली चादरही बदललेली होती व ती नवीन आणि सुंदर दिसत होती.

सगळ्या वस्तू जिथल्या तिथे होत्या.

नाईट पँटसाठी अलमारी उघडली तर ती पण एकदम आवरलेली होती.

त्याला आश्चर्य वाटलं.
अभया पण नोकरी करायची.

पूर्वी ती सगळ टीपटाप ठेवायची, पण गेल्या काही महिन्यात तिच्या तब्येतीच्या तक्रारीमुळे असेल कदाचित पण स्वभावही बदलला होता आणि ती पसार्‍याकडे लक्षच देत नव्हती.

उल्हासनी पण म्हणणं बंद केलं होतं कारण तो काही म्हणेल तर ते त्यालाच आवरावे लागेल, हे तो जाणून होता.

मूड हलका करण्यासाठी तो पूर्वाच्या खोलीत आला आणि म्हणाला "अरे वा, अाज घर तर चमकत आहे. छान केलस अावरायला घेतलंस!"

" अरे वा, तुम्ही पाहिलंत पण?"

"अगं असं काय? छान वाटतंय ना, पाहून मस्त वाटलं म्हणून म्हटलं. पडदे पण बदललेस आज!"

"अरे वा! म्हणजे घरामध्ये लक्ष गेलं तुमचं!"

अभयाने मारलेला हा टोला त्याने मस्करीत झेलला आणि म्हणाला," लक्ष द्यावे लागते बाबा बायकोच्या मेहनतीला दाद तर द्यायलाच पाहिजे . आणि अभया तुझा हात फिरला की येतं ना लक्षात. . . म्हणजे बोलून दाखवत नसलो म्हणून कळत नाही असं थोडंच!"

\"यांना काय झालंय बरं? \" या मुद्रेत अभयाने पूर्वा आणि उल्हासकडे पाहिलं.

पूर्वा म्हणाली," काय बाबा ?आज अगदी गप्पा मारण्याच्या मूडमध्ये दिसत आहात. आईला मस्का बिस्का!"
तिच्या त्या डोळे मिचक्वण्याचं त्याला हसूच आलं पण त्याने आवरलं.

"पूर्वा ,बोल काही मदत हवी आहे का तुला?"

"आता तरी नको. बाकीचं सगळं आईने आवरलंय , मदत काय? काही नाही माझा टेबलावरचा पसारा आवरत होते. इतकं झालं की सॉर्टेड!"

अभया फ्रेश होवून किचनमधे गेली.
" अजून काय आवरलं आईसोबत?"

" माझ्या बेडच्या बॉक्स मधल्या गाद्या वगैरे पण काढल्यात . बेडशीटस वगैरे सगळं. नवीन ताटं वगैरे वरची. आई म्हणालिो मदत कर , मलाही आज अभ्यास नव्हता, मग केलं दोघींनी. "

" काय विशेष?पूर्वा?"

" अरे वा ! जसं काही तुम्हाला माहितच नाही?"
आता उल्हास अडचणीत आला.

" काय माहित नाही? म्हणजे नक्की काय?" तो गोंधळात.

"अहो बाबा , ते मावशी आज्जी व आजोबा येणार म्हणे ना उद्या!"

उल्हासचा जीव भांड्यात पडला.

"अगं अभया, तुला कॉल आला होता का ? ही कुंदा मावशी पण ना !"

" उल्हास , तुझ्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी मला कॉल केला होता. म्हणून मी लवकर घरी आले आणि सगळं आवरलं. आपल्या घरातला पसारा पाहून काय म्हणल्या असत्या त्या?"

"अच्छा ती बोलली का? बरं झालं पण तू आवरलंस. मी तुला म्हणणारच होतो पण तुला आधीच या दरम्यान बरं वाटत नाहीय त्यात पुन्हा हे पाहुण्यांची सरबराई करणं म्हणजे?"

"काही पण काय? सासूबाईंच्या वर्ष श्राद्धाला आल्या होत्या त्या. ४ वर्ष झाली पुन्हा आल्याच नाहीत. आणि त्यांची एवढी काही सरबराई नाही करावी लागत. बर्‍यापैकी स्वतंत्र आहेत त्या. पण दवाखान्यात दाखवायलाच हवं. मी रजा टाकलीय उद्याची. जाईन त्यांच्या सोबत."

अभयाच्या या बोलण्यावर तर उल्हास फिदा झाला. पूर्वा आत गेलेली पाहून त्याने पटकन अभयाच्या हाताचं चुंबन घेतलं. ती मात्र या आकस्मिक प्रतिक्रियेने लाजली.

उल्हास त्या क्षणी ,या घटनेने किती रिलॅक्स झाला होता हे तोच जाणत होता.

दोघांच्याही डोळ्यात एक कमालीचा खेळकरपणा व मस्ती दाटून आली होती.
याच मूडमधे आज त्याने पण ताटं घेणं , पाणी भरून घेणं, सॅलड कट करून घेणं वगैरे खूप दिवसांनी केलं होतं.
अभयाच्या या समजूतदार वागण्यावर त्याला काय करू न काय नको असं झालं होतं.
त्या दिवसाची ती रात्र तिघांसाठीही खूप वेगळी व स्मरणीय वाटली.

उल्हासची आई मंदाबाई अखंड संवादाचा झरा व प्रचंड हौशी पण ती ५ वर्षांपूर्वी गेली आणि घरातला संवाद जणु खुंटलाच होता.
एक मरगळ व उदासी सगळ्या घरावर पसरली होती.
वर्ष श्राद्ध झालं अन आईशिवाय न राहू शकणारे बाबा गावाकडे मुला कडे गेले. पाहुणे रावळे सरले अन सहा महिन्यात मुलाचा नंबर इंजिनियरिंग कॉलेजसाठी एन आय टी आंध्रप्रदेश मधे लागला. तो देखील होस्टेल वर गेला.

मग घरात एक शांतता , व औपचारिकताच राहिली. तिघेच तिघे, ते पण बाहेर जाणारे. अभयानेही वर्षभराची सुट्टी झाल्यावर नवीन ठिकाणी नोकरी धरली होती.

कितीतरी दिवसांनी दोघांमधे मोकळा संवाद , आणि जवळीक झाली होती.

रोजचं ते यांत्रिक आयुष्य व तिघे तीन खोल्यात आपापल्या मोबाईल मधे बिझी असायचे. आज एका पाहुण्यांच्या येण्याच्या बातमीने घरात पुन्हा जुना उत्साह येवू पहात होता.

उल्हास ला केव्हातरी पहाटे जाग अाली व तो मनोमन कुंदा मावशीला धन्यवाद देत होता. मावशीने अभयाशी असा काय संवाद साधला असेल जेणेकरून ती विना तक्रार आनंदाने सगळं करायला तयार झाली होती.

दुसर्‍या दिवशी मावशी व काका आले , सोबत त्यांचा मुलगा आला होता पण दवाखान्यात दाखवल्यानंतर संध्याकाळी तो परत गेला.
परंतु पुढच्या टेस्टींग व रिपोर्ट साठी मावशी काकांना १० दिवस रहावं लागणार होतं.
त्यांच्या येण्यानं जी सकारात्मक उर्जा घरात आली होती त्यापुढे त्यांचं १० दिवस राहणं काही जड वाटलं नाही.

दुसर्‍या दिवशीच मावशींनी स्वयंपाकघराचा चार्ज घेतला. सकाळी देवपूजा केली. काकांनी बागेत पाणी दिलं व फिरत जावून येताना भाजीपाला व दूध घेवून आले.

मग तिघेही बाहेर पडेपर्यंत गप्पा टप्पा सोबत चहा नाश्ता! घर कसं भरून गेलं.

हे तिघांनाही खूप छान वाटत होतं.
संध्याकाळी अभया येईपर्यंत सगळ्या पालेभाज्या निवडून जिकडे तिकडे ठेवल्या गेल्या होत्या. बाईने घरात आणलेले कपडे घड या घालून ठेवलेले होते. भांडे ट्रॉलीत लावलेले होते. वरण भाताचा कूकर झालेला होता.
हे सगळं पाहून अभयला ला भरून आलं.
फ्रेश होवून आली व कुंदा मावशीच्या गळ्यातच पडली.

"तुम्ही ट्रीटमेंट साठी आलात ना मावशी , कशाला इतकं काम करताय? मी केलं असतं ना !"

"अभया , हा चहा घे व थोडावेळ बोलत बस बरं माझ्याशी . अगं तुझा स्वभाव लग्न झाल्यापासून पाहते मी. खूप मोकळी आहेस. मंदापण खूप कौतुक करायची तुझं. आणि हो, मी तुझ्या घरी हक्काने केलेलं काम तुला खटकत नाही हे माहित आहे म्हणूनच केलं . इतक्या अदफिकाराने तुला सांगितलं की नाही मी येतेय म्हणून ."

ती संध्याकाळ किती दिवसांनी रम्य वाटली.

कुंदा मावशींनी तिघांनाही फोन बाजूला ठेवायला सांगितले. सोबत जेवण , सोबत काम, व पूर्ण आराम व सतत गप्पा गोष्टी!

अभयालाही त्यांनी समजून सांगितलं की मुलं मोठी झालीत, तुझंही वय वाढलंय , मेनोपॉज ची स्टेज आहे. चिड चिड होईल , थकवा येईल पण संवाद थांबू देवू नकात. झेपत नसेल तर नोकरी करू नको पण स्वतःसाठी वेळ दे , तब्येतीची काळही घे वगैरे.

सासूबाईं नंतर इतक्या शांततेने व मायेने बोलणारं , समजून घेणारं कुणीतरी आहे असं वाटून अभया खूप आनंदी झाली होती. आल्यापासून गप्पा मारल्यामुळे मनातलं साचलेलं बरंच काही बाहेर पडलं होतं. खूप हलकं हलकं वाटायला लागलं.

घराला आलेली मरगळ ४-५ दिवसात दूर पळाली.
मावशींचे रिपोर्ट आले. आणखी चार दिवस रहावं लागणार होतं. उल्हास व अभया खुश होते. पूर्वालाही आजीनंतर घरात दोघे मोठे माणसं पाहून काम करण्याची व सेवा करण्याची इच्छा होत होती.

मौन पसरून मोबाइल च्या कवेत गेलेलं कुटुंब संवादाच्या माध्यमातून मनाने पुन्हा जवळ आलं होतं.

९ दिवस झाले व दोघांनी निघण्याची तयारी दाखवली.
काका म्हणाले ," आमच्या काळात आम्ही आपल्या माणसांना भेटण्यासाठी ,बोलण्यासाठी, पाहण्यासाठी तरसायचो रे ! मग नाही जमलं तेव्हा पत्रांचा , मनीऑर्डर चा तर कधी तारेच्या सहाय्यानं बोलणं व्हायचं. जग खूप मोठं होतं आणि साधनं नव्हती.
फोन आले अन लोकांचे आवाज ऐकायला मिळाले ते खूप चांगलं वाटायचं. नंतर मोबाइल आले. जग किती लहान झालंय. . . म्हणजे जवळ आलंय!"
"मग छान आहे की आजोबा , आता तरसावं लागत नाही ना !" पूर्वा पटकन म्हणाली.

काकाआजोबा हसले, " त्या मोबाइलनेच माणसं दूर केली ना! आता बघ , बोलायची सोय झाली, बघायची सोय झाली आणि हवं तेव्हा हवं तिथे संपर्क करता येतो , संदेश किंवा निरोप देता येतो पण करतंय कोण? . अगं माणसांकडे साधनं आहेत पण वेळच नाहीय. बाहेरचे सोडा घरचे लोक तरी एकमेकांशी प्रेमाने बसून बोलताय का? मनातलं सांगताय का ? नाही ना! सगळेजण त्या डब्ब्यात डोकं घालून बसतात आणि जिवंत माणसांकडे दुर्लक्ष करतात. "

या वाक्यावर सगळेच गप्प झाले. बरोबरच तर होतं.

" फोन दुसरे मिळतील , नवीन मिळतील पण जिवंत माणसं पुन्हा मिळायची नाहीत."

अभयाच्या आग्रहाखातर दोघे पुढे ४ दिवस राहिले व पुन्हा महिन्या महिन्याला यायचं ठरलं. पण ते जाताना जो बोलण्याचा व कोंडी फोडण्याचा मंत्र देवून गेले तो अप्रतिमच.

उल्हास , अभया आणि पूर्वाच्या आयुष्यात संवादाचं महत्व कळून जी मनं पुन्हा एकदा घट्ट बांधल्या गेली त्याचं श्रेय कुंदा आजी व आजोबांनाच आहे.
आपणही आपल्या आयुष्यात एकदा डोकावून बघूयातच!

समाप्त

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - ४ डिसेंबर २०२२