Login

लेखणीची धार-एक तळपती तलवार

लेखणीची धार -एक तळपती तलवार

विषय-  'लेखणी एक अस्र'

मानवाला जेव्हा लेखन कला अवगत नव्हती तेव्हा ऋषीमुनींनी, विद्वान पंडितांनी सांगितलेले ज्ञान श्रृती आणि स्मृती द्वारे मनात साठवून ठेवले जाई. आणि त्या त्या व्यक्तीच्या मृत्यू सोबतच ते ज्ञान नष्ट होत असे. श्रृती म्हणजे ऐकणे आणि स्मृती म्हणजे स्मरणात ठेवणे. परंतु लेखन कला अवगत झाल्यानंतर हेच ज्ञान लेखणी द्वारे कागदावर उतरू लागले व पुस्तक रूपाने आज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. असे हे लेखणीचे महत्त्व.


लेखणी एक अस्त्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वृत्तपत्रातून सतत लेखन करून आणि सभा संमेलनातून व्याख्याने देऊन स्वराज्य, स्वदेशी याची जाणीव लोकमानसात जागृत ठेवली. पुण्यातील १८९६ च्या प्लेगच्या साथीत रँड नावाच्या उद्दाम अधिकाऱ्याने जो जनतेचा अन्वनित छळ केला. त्या विरोधात लोकमान्य टिळकांनी आपल्या 'केसरी' वृत्तपत्रातून 'या सरकारचे डोके ठिकाणावर आहे कां?' अशी घणाघाती टीका करत ब्रिटिश शासनाची झोप उडवली होती. इतके सामर्थ्य या लेखणीत आहे.


वि. दा. सावरकरांनी सुद्धा ब्रिटिश शासनाशी लढा देताना ज्या हातात बॉम्ब पिस्तुले धरली त्याच हातांनी मृदू काव्येही लिहिली. म्हणजे ज्या हाताने शस्त्रे त्याच हाताने लेखणी हे अस्त्रही वापरले. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेले पहिले मराठी वृत्तपत्र 'दर्पण'. त्यातूनच त्यांनी तत्कालीन समाज स्थितीचे दर्शन घडवून निद्रिस्त समाजाला जागे केले. आगरकरांनी सनातनी लोकांचा रोष पत्करून 'सुधारक' वृत्तपत्र चालवले.


समतावादी महापुरुषांनी आपल्या लेखणीतून हजारो वर्षाची गुलामी, लाचारी, पाखंड, अंधविश्वास यांचे जाळे सपासपा कापून माणसाला माणसात आणले. ज्योतिराव फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे अगदी चपखल वर्णन केले होते. आणि शेतीची परिस्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिश शासनाला उपाय सुद्धा सुचवले होते. अशी ही लेखणीची किमया.


आजही समाजात घडणाऱ्या इष्टानिष्ट घटनांची नोंद वृत्तपत्रे घेत असतात. समाजातील विषमता, भ्रष्टाचार, लाचलुचपत, वासनाकांड, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या समाजाला विनाशाच्या गर्तेत लोटणाऱ्या गोष्टींना वृत्तपत्रांमधून वाचा फोडली जाते. लेखक असो वा कवी त्यांचे शब्द जेव्हा लेखणीमध्ये उतरतात तेव्हा कधी ते लोण्याहून मऊ आणि अमृताहून मधूर होतात. तर प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर व धारदार बनतात. मात्र लेखणीची धार ही केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर परिवर्तनासाठी असली पाहिजे.


अशाप्रकारे लेखणी एक अस्त्र आहे. एक तळपती तलवार आहे. आज ईरा व्यासपीठही एक अत्यंत लोकप्रिय व्यासपीठ ठरत आहे. अनेक दिग्गज लेखक, लेखिका, कवयित्री वेगवेगळे विषय घेऊन लिखाण करत आहेत. त्यांची प्रतिभाशाली  लेखणी अशीच तळपत राहू दे. व या ज्ञानाच्या सागराच्या प्रवासात अनेक छोट्या मोठ्या नद्यांनी विलीन होऊन याचा महासागर बनू दे. हीच सदिच्छा.

सौ.रेखा देशमुख