लेखणी समाजमनाचे प्रतिबिंब

ईरा शब्दांचा नजारा


लेखणी हे मनातील भावना व्यक्त करणारे साधन आहे.प्राचिन काळापासून लेखणी भरभरुन लिहीत आहे. साहित्यक्षेत्रातील अनेक नामवंत लेखक , लेखिकांंची लेखणी अनमोल साहित्याने अजरामर झाली आहे. माध्यमांचा बोलबाला झाला आणि लेखणीचे खरे भरभराटीचे दिवस आले .

ज्यावेळी बाळशास्री जांभेकर यांनी निर्भिड पत्रकारीता सुरु केली त्यावेळी पत्रकारीतेला सुगीचे दिवस आले.समाजातिल अनिष्ट चालीरीती , अज्ञान , रुढी याविषयी वृत्तपत्रात सडेतोड लिखाण करुन लेखणीच्या माध्यमांतून समाजप्रबोन करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.पत्रकार हा समाजातील बदलाचे जवळून निरिक्षण करत असतो.समाजाच्या अंतरीक बदलाची जाणिव त्यांना सतत होत असते त्यामुळे एखाद्या समस्येवर लेखणाच्या माध्यमांतून त्यांनी प्रकाश टाकला आहे.वृत्तपत्र ही समाजमनाची प्रतिबिंब असतात त्यामुळे वृत्तपत्रात जे लिखाण असते त्यामुळे अनेक ज्वलंत प्रश्नांची उकल झाली आहे.वृत्तपत्रात ग्रामिण भागातील कानाकोप-यांतील इत्यंभूत बातम्या म्हणजे तळागाळातील लोकांच्या मनात डोकावून पाहून त्यावर केलेले परखड भाष्य आहे

पत्रकारीकेतून समाजमन टिपत असताना माध्यमांचा बदलामुळे लेखणीचे स्वरुप बदलले.प्रसारमाध्यमांची रेलचेल सुरु झाली अनेक डिजीटल माध्यमांच्यामुळे लेखनकला आत्मसात करण्यास सोपे जाऊ लागले आणि मग लेखणीने विराट रुप धारण केले.वृत्तपत्रात.जनमनाचा कानोसा घेतला जाऊ लागला .शिक्षणाचा प्रसार वाढल्यामुळे वैचारिक क्षमतेला नवी पालवी फुटू लागली.वाचन वाढले , आपले विचार समाजाला दिले पाहिजे हा सामाजिक विचार बळावू लागला आणि यातून स्रीशक्तीच्या विचारांच्य बीजांना चालना मिळू लागली.

सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड कष्ट घेऊन स्रीशिक्षणाचा पाया रोवला आणि स्रीला अक्षरांचा लळा लागला.फळ्यावरील अक्षरांनी पाटी समृद्ध केली आणि अक्षरांनी जगाच्या दुनयेत विराट झेप घेतली.स्री विचारांने परिपक्व झाली.कुटुंबं सदृढ झाली .मुले संस्कारक्षम झाली .बदलाच्या वाटेवरील समाज स्रीयांच्या विचारासाठी असूरला होता त्यावेळी स्रीने लेखणी हातात घेतली.समाजाचे विदारक दृश्य प्रथम तिने हृदयात सामावून घेतले मग स्रीयांच्या अन्यायाला , अत्याचाराला सद्सदविवेक बुद्धिमत्तेची जोड देऊन वाचा फोडण्याचे काम केले.अनेक जबाबदारीचे जोखड तिची परिक्षा घेवू लागले पण तिने न डगमगता त्याला ध्येर्याने तोंड दिले .स्रीयांच्या विचारात प्रचंड ताकद आहे , तिचे विचार मौलिक आहेत , तिची निरीक्षणशक्ती अफाट आहे याची पुरेपूर खात्री स्रीला झाली आणि तिने लेखणीच्या माध्यमातून आपले चौफेर विचार मांडण्यात सुरवात केली.

लेखणी कधी गरीबांचा तारणहार ठरते तर कधी मनाच्या श्रीमंतीने आनंदाची लयलूट करते.अनेक करुण कहाण्या , विरह , दुःख याचा कधी लेखणीला स्पर्श झाला तर शब्दांतून पाझणारे अश्रू मनाचा ठाव घेतात.गलीतगात्र झालेला जीव लेखणीला आपली करुण कहाणी सांगण्यास धडपडतो.समाजातील असे कित्येक हृदयद्रावक प्रसंग लेखणीने सहज हाताळले आहेत.आनंद सोहळ्यांचे वर्णन करणारी लेखणी साजशृंगारानी नटलेली असते .तिच्या प्रत्येक थेंबातून आनंंद ओसंडून वहात असतो अमर्याद आणि अखंंड ..! कुणीही लेखणीची कुचेष्ठा करावी आणि मग लेखणीने रुद्र रुप धारण करावे ..! पाषाणहृदयी माणसांना आपल्या तिक्ष्ण शब्दांनी घायाळ करुन पायाशी लोळण घ्यायला लावणारी लेखणी म्हणजे वंचीतांची आधारवड आहे.लहान मुलांने तालावर डुलावे , फुलपाखरांनीसुद्धा पिंगा घालावा , पानाफुलांनी बहरावे त्यांचे मनसोक्त गुणगाण गावे ते फक्त लेखणीनेच...! कौतुकाचा सोहळा त्याला सुंदर कलात्मकतेचा लेप देऊन सदाबहार करावे फक्त लेखणीनेच.मातीतून उगवणा-या कोंबाचे , पहाटे पडणाऱ्या दवाचे ,ओघळणा-या पारिजातक व सोनचाफ्याचा मनमोहक सुगंधाचे वर्णन लेखणीने केल्यास मन प्रसन्न होते.शब्दांतून कथा , कविता यांंच्या निर्मितीत लेखणी खरी सुखावते.

अशा सर्वांना आवडणा-या व प्रेरणा देणाऱ्या व अन्यायाचे प्रभावी शस्र असणा-या लेखणीला त्रिवार वंदन ..!!

©नामदेवपाटील