Login

लेखणी एक अस्र

लेख
लेखणी एक अस्र

मनातील भावना, कल्पना कागदावर उतरवण्याचे महत्वाचे साधन म्हणजे लेखणी.
लेखणी हे एक असे अस्र आहे कि वापराने योग्य/अयोग्य परिणाम दिसून येतात.
लेखणीची किंमत किती आहे यावरून त्याला महत्त्व येत नाही तर काय लिहले यावरून लेखणीचे स्थान ठरत असते. खिशात पैसा असेल तर कोणीही पेन विकत घेऊ शकतो. पण खिशात पैसा असेल तर तो पेन लिहु शकेल का याची कोणतीही शाश्‍वती नाही.
लेखणीची किंमत किती आहे यावरून त्याला महत्त्व येत नाही तर काय लिहिले यावरून लेखणीचे स्थान ठरत असते. खिशात पैसा असेल तर कोणीही पेन विकत घेऊ शकतो. पण खिशात पैसा असेल तर तो पेन लिहु शकेल का याची कोणीही शाश्‍वती नाही. कारण लिखाण करायला पैसा नाही प्रामाणिक मन पाहिजे. पेनाची धार आरपार या ओळी प्रमाणे पेन हा खुप धारदार आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा हे वापर करणार्‍याच्या विचारावर व संस्कारावर अवलंबून असते. 
पेनाने लिहल्यामुळे अनेक लोक मानसिक गुलाम झाले, एवढे गुलाम झाले की लिहणे, वाचणे, शिकले पण वाचलेलं कळत नाही आणि मनाने लिहता येत नाही. पूर्वीपासून चालत आलेली मानसिक गुलामी जोपासण्याचे काम लोक आजही करत आहेत. तिच मानसिक गुलामी तोडण्यासाठी पेनाचाच वापर करून मानसिक गुलामी तोडून समता, बंधुता, न्यायावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचे काम लेखणीनेच केले. म्हणून लेखणीचा वापर कशा पद्धतीने व कोणत्या संस्काराने केला जातो यावर लेखनीची किंमत व वजन ठरत असते.      
महिलांना शिक्षण सहजासहजी मिळाले नसून हे शिक्षण मिळण्यासाठी खूप मोठा त्याग, खुप मोठी क्रांती करावी लागली तेव्हा कुठे महिलांना शिक्षण मिळाले. महिला वाचायला, लिहायला, शिकल्या पण सत्य वाचण्याची आणि सत्य लिहण्याची आजही महिलांची हिंमत होत नाही. म्हणून शिकलेल्या महिला सुद्धां मानसिक गुलामगिरीमध्ये जगणे पसंत करत आहेत. शिकलेल्या महिला शिक्षण कोणी बंद केले होते? का बंद केले होते? शिक्षण कोणी सुरु केले? का सुरु केले? 
शिक्षणाने महिलांचा काय फायदा झाला? यावर स्पष्ट आणि निर्भिड लिखाण महिला करू शकत नाहीत याचाच दुसरा अर्थ लिहणे शिकले; तरी लिहता येत नाही कारण पेनाचा वापर कसा करावा हेच कळत नाही. महिलांची पहिली शाळा कुठे आहे? तिची अवस्था काय आहे याचे थोडेही भान आज महिलांना राहीले नाही. किंबहुना त्यावर लिखाण करण्याची त्यांची हिंमत नाही. शिक्षण आहे लिहता येते पण लिहले जात नाही हिच मानसिक गुलामी आहे.
अशाच प्रकारची मानसिक गुलामी येथे कायम रहावी म्हणून लेखकांनी येथे थोतांड, अंधविश्‍वास लिहुन ठेवला आहे. त्याचा प्रभाव एवढा आहे की थोतांड व अंधविश्वास यालाच लोक सत्य समजून बसलेत आणि आपल्या लेखणीचा वापर आपल्याच गुलामीसाठी आणि लाचारीसाठी करत आहेत. म्हणून ज्या लेखणींनी गुलामी, लाचारी, विषमता, पाखंड निर्माण केले गेले त्या लेखणीला आजही पायदळी तुडवले जाते.
समतावादी महापुरुषांनी लेखणी हाती घेतली आणि हजारो वर्षाची गुलामी, लाचारी, पाखंड, अंधविश्वास सारखे जाळे सपासपा कापून माणसाला माणसात आणले. एक लेखणी होती माणसाला व स्त्रियांना गुलाम म्हणून ठेवायची आणि दुसरी लेखणी माणसाला आणि स्त्रियांना मानसन्मान द्यायची. 
एवढा फरक दोन लेखणी मध्ये असेल तर आपल्या कामाची अथवा आपल्या हिताची लेखणी कोणती आणि आपणही त्या लेखणीचा- पेनाचा तसा वापर करू शकतो का? तर हो करू शकतो. आजही तुकाराम महाराज महाराज यांच्या लेखणीची भीती या विषमतावादी व थोतांडवादी व्यवस्थेला आहे. विषमतावादी, थोतांडवादी व्यवस्थेवर लेखणीने-पेनाने सपासपा वार करणारा वारकरी आजही या व्यवस्थेला मान्य नाही आणि तेव्हाही मान्य नव्हता.
म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडवून संत तुकाराम महाराज यांचे लिखाण नष्ट करण्याचा षंढ प्रयोग व्यवस्थेकडून झालेला आहे. 
एका पेनाने लिहलेले साहित्य नदीच्या पाण्यात बुडवावे आणि बुडविल्या नंतरही त्या पेनाच्या लेखनीतून निर्माण झालेल्या गाथा आजही जिवंत राहाव्या हिच तर ताकद लेखणीची-पेनाची आहे. पेनाने लिहलेले साहित्याला पाणी सुद्धा बुडवू शकत नाही एवढी ताकद या लेखणीमध्ये आहे फक्त आपल्याला वापर कसा करायचा हे आपल्या विचारावर अवलंबून असते. संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज, अण्णा भाऊ साठे यांची लेखणी सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेवर वार करून समाता रुपी व्यवस्था निर्माण करण्यासाठी होती. मानसिक स्वातंत्र्यासाठी होती. पण आजही आम्ही मानसिक गुलामगीरीला एवढे लपेटून घेतले आहे की आमच्याकडे समतावादी व्यवस्था निर्माण करणारी लेखणीच नाही. कारण आम्ही लेखणीला फक्त लेखणी म्हणून बघितलं लेखणीची समीक्षा कधीच केली नाही.
 महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी लेखणी हाती घेतली आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीला थोतांडाला असा सुरंग लावला की एका लेखणीत हजारो वर्षाची व्यवस्था उलथून पाडली. न भुतो न भविष्य अशी क्रांती त्यांनी करून दाखवली. सर्वसामान्य लोकांच्या कल्पना शक्तीपलिकडचे काम करून इतिहास रचला आणि हे झाले फक्त पेनाच्या टोकामुळे. 
तलवारीने माणसे कापण्याऐवजी पेनाने व्यवस्था कापुन रक्तविरहीत क्रांती करणारे महापुरुषांचा आधार फक्त पेन. लाखो करोडोच्या संख्येने शत्रु आणि त्यामध्ये एकटा योद्धा शत्रुकडे त्याच्या भाषेत बोलायचे झाले तर साम दाम दंड भेद आणि महात्मा फुले यांच्याकडे शस्त्र फक्त लेखणी आणि याच लेखणीच्या जोरावर महात्मा फुले जिंकले. आजही गुलामगिरी, आसुड, तृतीय रत्न नाटक जरी वाचले तर व्यवस्था हादरून बसते. ही पेनाची ताकद होती फुले दाम्पत्यांची. 
त्यांनर अजून एक लेखणी लिहिती झाली आणि इतिहास, भूगोल बदलून टाकला ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी.
समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करून अन्यायाविरुद्ध बंड करण्याची धमक यांच्या लेखणीमध्ये आहे. अन्याय, लाचारी, गुलामगिरी यांच्या विरोधात त्यांची लेखणी लिहती होती. सर्व प्रकारचे हक्क अधिकार नाकारलेले असताना ते सर्व बहाल करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी लिहत गेली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून लेखणीने व्यवस्थेवर वार केले आणि जगाच्या पाठीवर पेनाचे टोक किती धारदार असते हे सिद्ध करून दिले. 
पेनाच्या धारेवर विषमता, अंधविश्वास, पाखंडाला सुरुंग लावून समतावादी व्यवस्था निर्माण करून दिली. परंतु आज लोकांची लेखणी लाचारी गुलामीकडे वळत आहे म्हणून अनेक संकट माणसावर व देशावर आलेले आहेत. देश बरबाद करणार्‍या माणसाला मानसिक अपंग लोक मसिहा समजतात. हिच लाचारी आणि गुलामी आहे.
आज अनेक लोक लिहतात पण त्यांच्या लिखाणात मानसिक गुलामी, लाचारी, विषमता स्पष्ट दिसून येते. गुलामी, लाचारीत मग्न राहण्यात त्यांना धन्यता वाटते. थातुरमातुर लिखाण करून प्रसिद्धी मिळवण्या साठी खटाटोप करणारे लेखक, लेखिका सत्य गोष्टीपासून दूर जातात, अंधविश्वास व थोतांडावर लिखाण करून मानसिक गुलामीच्या पावत्या देतात. पण या मध्ये काही लिखाण असे असते की त्या प्रत्येक लिखाणामध्ये तथागत बुद्धांपासून भाऊराव पाटील यांच्यापर्यंत संत महापुरूषांचे दाखले असते. 
संताचे व महापुरुषांचे वारंवार दाखले तेच देतात जे मानसिक गुलाम नसतात. मानसिक गुलाम लोक तर वेळेनुसार आपले लिखाण बदलून फक्त प्रसिद्धीसाठी कशाचा कशाशी संबध नसला तरी संबध जोडतात व लाचार होऊन गुलामीचे लिहतात. त्याच लेखणीची धार धारदार असते जी लेखणी सत्य, विज्ञानवाद, समता, चिकीत्सा आणि तर्कावर आधारीत असते आणि ही धार निर्माण करण्यासाठी माणसाची मानसिकता ही गुलामीत नसावी लागते.
 पेनाचा वापर योग्य पद्धतीने करून संत व महापुरुषांची समतावादी व्यवस्थेला अभिप्रेत लिहून अंधविश्वासाचे व थोतांडाला पायदळी तुडवून माणसाला माणसाची माणुसकीने जोडून, आपल्या शत्रुची आणि मित्राची ओळख करुन देणारी लेखणी कधीही धारदार आणि वंदनीय असते. म्हणून लेखणीची धार कधीच बोथट होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. आणि आजपर्यंत परिवर्तन हे लेखणीच्या जोरावर झालेले आहे; म्हणून आमच्या महापुरूषांनी संतांनी लिखाणाचा भांडार ठेवला आहे ते जरी वाचले तरी कळते लेखणीचे घाव कुठे, कोणाला आणि कसे बसतात. माझ्या लेखणीची धार बोथट होणार नाही यावर प्रत्येकाने लक्ष देऊन लेखणीचा वापर फक्त प्रसिद्धी साठी नाही तर परिवर्तनासाठी असावा हिच अपेक्षा असते.

श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर, औरंगाबाद