लेखणी एक अस्त्र

लेखणी एक अस्त्र...

कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : लेखणी एक अस्त्र 
                           लेखणी एक अस्त्र 
लहानपणी अक्षरांसोबत ओळख झाल्यावर लेखणीसोबत आपसूकच मैत्री होते. वेळ पुढे सरकत असताना कुणी अभ्यास आहे म्हणून तिला आपलसं करतं, तर काहींची खरोखरच तिच्यासोबत गट्टी जमते. याच गट्टीमुळे एखादी व्यक्ती कधी त्या लेखणीत रमायला लागते, हे त्या व्यक्तीला देखील कळत नसावं. 

लेखणी बद्दल कितीही बोललं तरी कमीच वाटेल, खासकरून जेव्हा बोलणारी किंबहुना लिहिणारी व्यक्ती एक लेखक असेल. शब्दांचे तीर एखाद्याच्या अगदी वर्मी लागले की प्रचंड जहाल वाटतात. आणि तोच शब्दांचा प्रहार लेखणी नामक अस्त्रामार्फत असेल तर जहाल काय किंवा मग मवाळ काय, व्हायचा तो परिणाम होतोच!
एखाद्या निरस व्यक्तीला विचारलं तर लेखणी म्हणजे एक साधंसोपं लिहिण्याचं माध्यम आहे असंच उत्तर मिळेल. अर्थात इथे निरस म्हणजे ज्याला लेखणी संबंधित कोणत्याही गोष्टीची आवड नाही, असाच अर्थ आहे. परंतु लेखणीची खरी ताकद ज्याला कळते, तो कदापि त्या लेखणीला कमी लेखण्याचा विचार करणार नाही. थोड्याशा नजरचुकीने एक अस्त्र भयंकर उलथापालथ करून ठेवण्याची क्षमता ठेवतं. आणि हीच उलथापालथ लेखणी नावाचं अस्त्र कोणत्या पातळीवर जाऊन करू शकतं, हे आपल्याला वेळोवेळी जाणवून येतंच.
लेखणी जशी हृदय जिंकू शकते, तसंच ती खुपल्यामुळे वैषम्य सुद्धा पसरवू शकते. 

बरेचदा आपण पाहतो की मितभाषी व्यक्ती बोलण्यातून जे बोलू शकत नाही, तेच लिखाणातून मात्र भरभरून व्यक्त होत असतात. लेखणीची जादूच अशी आहे की आपसूकच तिच्या द्वारे मन रितं करावसं वाटतं.

लेखणीची किमया कितीतरी क्षेत्रात दिसून येते. लेखणी सामाजिक विषयांवर भाष्य करू शकते. लेखणी कोणत्याही संवेदनशील विषयांना वाचा फोडू शकते. ही लेखणी मनोरंजन करू शकते. आणि हीच लेखणी समाजप्रबोधन सुद्धा करू शकते. साहित्य म्हटलं की लेखणी आपसूकच आठवते. लेखणी स्वतःचं अस्तित्व अगदी प्राचीन काळापासून दाखवत आली आहे. महाकवी कालिदास असो किंवा मग छत्रपतींच्या काळातील कवी भूषण, पुढे जाऊन महात्मा फुले असो वा डॉ. आंबेडकर, बहिणाबाई चौधरी, रमाबाई रानडे, वि.स.खांडेकर, व.पु., साने गुरुजी, इ.इ. कितीतरी व्यक्तींनी लेखणीच्या जोरावर विविध प्रकारचे विचार मांडले. आणि अजूनही असे अनेक विचार मांडले जात आहेत. लेखणीचं योगदान तेव्हाही होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते असणार यात काही शंकाच नाही! 
लेखणी क्रांतीचं कारण ठरू शकते, याचा प्रत्यय येण्यासारख्याही घटना घडल्या आहेत. साहित्य असो अथवा क्रांती अन् इतर क्षेत्र, लेखणीने स्वतःच्या अस्तित्वाची दखल देशविदेशात घ्यायला लावली आहे. मालिका, चित्रपट, नाटकं, एकांकिका, वेगवेगळे इव्हेंट आणि शो, वर्तमानपत्र, वर्तमानपत्रांतील विविध लेख किंवा खास स्तंभलेखन, इ. कितीतरी गोष्टींत लेखणीचं योगदान अतुलनीय आहे. 
व्यक्ती व्यक्तींनुसार विचारांमध्ये फरक हा असतोच. कुणी या लेखणी नावाच्या अस्त्राने स्वतःचं मत अगदी परखडपणे मांडतं, तर कुणी अतिशय प्रेमळ शब्दांत स्वतःचा मुद्दा समोरच्याला पटवून देतं. काहींना परखड शब्दांची टोकदार लेखणी भावते. तर याउलट काहींना प्रेमळ शब्दांत केलेली कानउघडणी आवडते. पण हो, एक मात्र खरं आहे की लेखणीची चपराक चांगलीच बसते!
हेतुपुरस्सर गैरवापराने हे लेखणी नावाचं अस्त्र समाजाला घातकही ठरू शकतं.‌ आणि काळजीपूर्वक, चांगल्या हेतूने केलेल्या वापराने हेच लेखणास्त्र समाजाला वरदान सुद्धा ठरू शकतं. शेवटी वापर करणं आपल्याच हाती आहे.
या लेखणास्त्राद्वारे एक सुसंस्कृत चांगला समाज घडण्यास मदत होत राहूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
-©® कामिनी खाने.