लेख - स्त्री मानसिकता
विषय - स्त्री आणि परावलंबित्व
फेरी - राज्यस्तरीय लेख / लघुकथा स्पर्धा
उरातील सारी स्वप्ने...
सत्यातून उतरुन यावे...
तू चालशील ते रस्ते....
किरणांनी शिंपीत जावे .
निसर्गतः पुरुष स्त्रियांपेक्षा शरीराने ताकदवान असतात.
मातृत्वाची जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर टाकल्याने ती काहीशी
कमजोर होते. यातूनच पुरुषप्रधान संस्कृतीचा जन्म झाला.
स्त्रियांकडे पूर्वापार घरकाम, मुलांना जन्म देणे, त्यांचा सांभाळ
करणे. अशी कामं होती. त्यांची ही कामे फक्त शरीर पातळीवरची.
त्यांची बुद्धी, त्यांचे विचार यांना संधीच नव्हती.
स्वाभिमान, आत्मगौरव, आत्मविश्वास, स्वातंत्र्य, स्वावलंबन
या नैसर्गिक इच्छा मारल्यानंतर जो कोंडमारा होतो त्याला स्त्री
बळी पडली होती. \" मी कोण \" यापासून \" मी हे करू शकते. \"
हा आत्मविश्वासाकडे नेणारा स्त्रीचा प्रवास आज झालेला आहे.
पूर्वीच्या काळी स्त्रियांची जी काम होती ती आजच्या स्त्रीलाही
करावी लागतात. पण ते सर्व करून करिअर करण्याची कसरत
ती करते आहे.
शिक्षणाने स्त्री पुरुष भेद पुसट केला म्हणूनच पुरुषांच्या टीमचे नेतृत्व
महिलांच्या खांद्यावर आले. राजकारण असो वा अन्य क्षेत्र
त्यात महिलांनी पुढारी पण सिद्ध केले आहे. पुरुषांच्या करिअरची
किंमत आणि कौतुक स्त्रीला असतं पण आपल्या करिअर इतकेच
महत्व स्त्रीच्या करिअरला देणारे पुरुष फार कमी असतात.
एखादेवेळी स्त्री जर पुरुषाच्या पुढे जाऊ लागली तर बहुतेक
पुरुषांना ते सहन होत नाही. आजही स्त्री समाजात नांदते
ती जात्यावरच्या खुंटासारखी. म्हणजे स्वतःच्या स्थानाशी भक्कम
तरीही परिस्थितीप्रमाणे घुमणारी, स्वतःला बदलणारी.
\" एका तळ्यात होती बदके पिले सुरेख \"
या गाण्यातल्या कुरूप वेड्या पिलासारखी अनेक बायकांची
स्थिती असते. तिच्यामध्ये असलेल्या कलेला व्यक्त करण्याचे
तिचे प्रयत्न अनेकदा चार भिंतीतच राहतात. परिणामी
ती स्वावलंबी होऊ शकत नाही.
\" स्व \" त्याची जाणीव इथे तिला नेमकी सांगता येत नाही.
प्रथम ती अमक्याची बायको म्हणून स्वतःची ओळख करून देते.
नंतर ती ओळख जर पुरेशी वाटत नसली तर अमक्याची आई..
म्हणून ती स्वतःला गौरवते. लहानपणापासूनच मुलींना
अशा प्रकारे वाढवलेले असते की यामुळे आपण कमी..
असल्याची भावना त्यांना असते. यातूनच मग आपल्या
निर्णयावर पुरुषांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय तो निर्णय योग्य
आहे असं कित्येक स्त्रियांना वाटत नाही.ती त्यांची
मनोधारणा बनते.
भाजी घ्यायला जाताना नवऱ्याच्या हातात भाजीच्या जड
पिशव्या तिच्या हातात पैशाची पर्स असूनही भाजीवाल्याने
भाजी वीस रुपये पाव म्हणताचं ती नवऱ्याकडे पाहते.
पाहिलंच तर पर्समध्ये पैसे बघू शकले असती.का ?
तर भाजीचा भाव वाजवी आहे की नाही ही खात्री तिला नसते.
किंबहुना भाजी घेण्याबाबतचा निर्णय तिने आपणहून त्याला
दिलेला असतो. आपण आपल्या क्षेत्रातल्या गोष्टींविषयी
जागरूक असले पाहिजे. यात नवऱ्याचा काय दोष ?
प्रथम आई वडिलांच्या, थोडं वयात आलं की भावाच्या धाकात,
लग्न झाल्यावर नवऱ्याच्या हातात सापडल्यावर अगदी थोड्याफार
फरकाने तेच पैलू बघितल्यावर त्यातून बाहेर पडणाऱ्या
थोड्याच जणी असतील. नोकरीनिमित्त बाहेर पडताना सुद्धा
प्राधान्य ती घरच्या कामांनाच देते. तिने स्वतःभोवती जो कोश
निर्माण केला आहे त्यातून ती बाहेर पडतच नाही. नव्हे तिला..
पडावसचं वाटत नाही. नवीन काही गोष्टी शिकताना मला हे
जमणारच नाही, आधी काहीतरी झालं असेल म्हणून आताही
तसंच होणार म्हणून ते काम करायचं नाही, पळवाटा शोधायच्या.
स्वतःकडून थोडी जरी चूक झाली तरी सारखं स्वतःला दोष देत
बसायचं. या सुद्धा गोष्टी कधी कधी स्त्रियांकडून पाहायला मिळतात.
म्हणजेच कोणत्याही परिस्थितीला स्वतःवरच्या अविश्वासातून
सामोरे जाणे, आणि नैराश्याने ग्रासले जाणे या गोष्टी तिच्या
विकासाच्या मार्गातील काटे ठरतात.
आपण आपल्या कुटुंबासाठी किती मौल्यवान आहोत, आपले
महत्व किती आहे हे स्त्री अनेकदा विसरते. आज स्त्रीला
शिक्षण, अर्थार्जन करण्याची संधी, प्रगतीची संधी हे सर्व
मिळतंय. तिचं एकच म्हणणं आहे,की एक स्त्री म्हणून नव्हे तर
एक व्यक्ती म्हणून तिचा आदर करण्यात यावा. आज स्त्रीच्या हातात
पैसा, प्रतिष्ठा, समानता, वैचारिक स्वातंत्र्य, निर्णय क्षमता
हे सर्व काही आहे पण कुठेतरी, काहीतरी कमी पडत आहे.
हे तिला कळत आहे.
आजची स्त्री शिक्षित आहे. या शिकलेल्या स्त्रीचं स्वरूप
काय आहे तर जी मुलांचा अभ्यास घेऊ शकते, लाईट,
पाण्याची बिल भरू शकते. नोकरी करणारी स्त्री याबाबतीत
दोन पावलं पुढे असते. ती पुरुषांच्या बरोबरीने कमावते.
घरात संपन्नता आणते. आज काही सर्व घरातील स्त्री पुरुष..
दोघेही नोकरी करतात. घरातील पुरुषाला कामावरून उशिरा
येण्याचा हक्क असतो. पण स्त्रियांच्या बाबतीत तसं नसतं.
पुरुष अगदी कौतुकाने ' आज मला घरी यायला उशीर होईल. '
'आज मिटींग आहे.' असं फोन करून सांगू शकतात. पण
हेच जर 'मला घरी यायला उशीर होईल.'असे स्त्रीने सांगितले,
तरी थोड्यावेळाने लगेच 'किती वेळ आहे?'छकुलीची परीक्षा आहे.
'स्वयंपाक कधी करणार'? नाना प्रश्न. टेबलवर फायलींचा ढिग
आणि इकडे घरची काळजी.
स्वतःच्या कौशल्याचा उपयोग सुद्धा तिने कितपत, कुठे आणि
कसा करायचा हे घरातल्या मंडळींच्या वेळेप्रमाणे ठरवावं लागतं.
इथे सुद्धा फार कमी स्त्रिया आपले छंद जोपासतांना दिसतात.
स्त्रीची शारीरिक आणि मानसिक ठेवण यामुळे स्त्रीला
जीवन जगताना कोणाचातरी आधार घ्यावा लागतो. स्त्री आणि
पुरुष यांची जोडी वृक्ष आणि वेल यासारखी आहे.
वेल ही वृक्षाच्या आधारानेच फुलते. वेलीला वृक्षाचा आधार
तर वेल हे वृक्षाचे वैभव. जीवन जगत असताना स्त्रीला
कुणाच्यातरी आधाराने जीवनाची वाटचाल करावी लागते.
ही एक व्यवस्था असून ती निसर्गनिर्मित व नैसर्गिक आहे.
सुरक्षा हीसुद्धा तिची एक गरज आहे. परंतु कधीकधी व्यसनी
व मारहाण करणाऱ्या नवऱ्याला जर ती 'पतीदेव'समजून
त्याला जन्मभर चिकटून राहत असेल तर मात्र चुकीचे आहे.
तिने सरळ त्याच्याशी संबंध तोडून द्यावेत. परंतु असे करण्यासाठी
त्या स्त्रीमध्ये मनोधैर्य असले पाहिजे. लग्न जर टकलादू
पायावर उभे असेल तर ते लग्न मोडणे चांगले याचा विचार स्त्री
करू शकते. एकटी स्त्री सुद्धा समाजात सन्मानाने जगू शकते
हे तिने सिद्ध केले आहे.
अशाप्रकारे आजची स्त्री सक्षम बनली आहे. या सक्षमतेमुळे
समास तिचा आदर करतो. नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्यांवर
लढणाऱ्या स्त्रीला सुपर वुमन संबोधले जाते. पण हे सुपर वुमन
पद टिकवतांना अनेक काम एकटीवर लादून घेणारी किंवा
नोकरीच्या ठिकाणी उच्च पदावर पोहोचताना स्वतःची
अनेक मुल्ये पायदळी तुडवावी लागलेली आजची स्त्री
स्वतःच्याच नजरेतून उतरत तर चालली नाही ना?
स्त्री बदलली तिच्या समस्या बदलल्या आता तिच्या समस्यांकडे..
वेगळ्या नजरेने पाहायला हवं.
ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री...
त्यागाचे प्रतीक ती शिवबाची जिजाई...
भीमरावांची सावली ती रमाई...
रणांगणावर लढते जशी राणी लक्ष्मीबाई...
त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी!...
जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी .
कुणीतरी लिहिलेल्या या ओळी खरोखरचं हृदयस्पर्शी आहेत.
समाप्त.
सौ. रेखा देशमुख
टिम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय साहित्य करंडक.
.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा