लेक लाडकी आमच्या घरची.. भाग ३

सासरी गेलेल्या मुलीच्या आईची कथा


लेक लाडकी आमच्या घरची.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की शोभाताई आपल्या आईशी नीट बोलत नाहीत म्हणून अवनी आईशी बोलणार असते. पाहू काय होते पुढे ते..


" आई.." दरवाजा आपल्या चावीने उघडत अवनीने हाक मारली.

" अवनी.. तू आज अशी मध्येच? बरी आहेस ना?" आईने काळजीने विचारले.

" हो. मी बरी आहे. मला सांग बाबा कुठे गेले?"

" ते त्यांच्या क्लबमध्ये गेले. आधी सांगितलं असतंस तर थांबले असते घरी."

" नाही. मला ते नकोच होते. मला तुझ्या एकटीशीच बोलायचे होते. मला सांग, तुला काल मी येत नाही म्हटले तर मग तू का आलीस तिथे?"

" अच्छा.. मला जाब विचारायला आलीस?" उषाताई हसत म्हणाल्या.

" आई... प्लीज मला मस्करी नको आहे. सौरभच्या आईला तू तिथे आलेलं नाही आवडत.. मी इथे आलेलं पण त्यांना आवडत नाहीच. पण इथे त्या काही बोलू शकत नाही.. तू तिथे आल्यावर त्या जे वागतात ते मला नाही पटत. नको ना ग येऊस.. मला जमेल तसं मी इथेच येत जाईन ना.." अवनी रडत म्हणाली.

" आपल्या पोटच्या गोळ्याला बघायला जीव कसा तळमळतो ते तुला आई झाल्यावर कळेल.. रोज नाही तरी आठवड्यातून एकदा तरी भेटावेसे वाटते तुला.. आणि ते घर त्यांचे आहे त्यांना मला बोलायचे आहे, बोलू दे. लेकीला बघण्याचे समाधान मोठे की ही बोलणी ऐकण्याचे."


" तरिही.. मी जमेल तेव्हा येत जाईन ग इथे.."

" बरं.. मी एकदाच येईन ते ही शोभाताईंना भेटायला.. चालेल?"

" पण त्या काही बोलल्या तर?"

" नाही बोलणार.."

ठरवल्याप्रमाणे उषाताई दुपारी आल्या. शोभाताईंनी दार उघडले. उषाताईंना बघून त्यांना थोडा रागच आला. पण तो न दाखवता त्या म्हणाल्या ," अवनी घरी नाहीये."

" हो. मला माहित आहे. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. आत आले तर चालेल का?" शोभाताईंना थोडे ओशाळल्यासारखे झाले..

" हो.. या ना.. बसा. मी पाणी आणते."

" पाणी नको. तुम्ही बसा फक्त." शोभाताई बसल्या. पण चेहर्‍यावर आता या
काय बोलणार असे भाव होते त्यांच्या. ते हेरून उषाताईंनी बोलायला सुरुवात केली.

" मला माहित आहे, तुम्हाला मी इथे आलेलं जास्त आवडत नाही.. पण तरिही मी येते.. त्याबद्दलच थोडे बोलायचे होते मला. राग येणार नसेल तर एक विचारू?"

"विचारा.."

" तुम्हाला कधी असे वाटले नाही की सौरभला एखादं भावंड असावं?" उषाताईंनी विचारले. हा अनपेक्षित प्रश्न ऐकून शोभाताई चक्रावल्या..

" म्हणजे?"

" तुम्ही दुसरे मूल का होऊ दिले नाही?"

" माझी तब्येत थोडी नाजूक झाली होती. दुसरे बाळंतपण मला झेपणार नव्हते म्हणून.." शोभाताई हळव्या होत बोलल्या.

"म्हणजे कुठेतरी तुम्हाला दुसरे मूल हवे होते?" उषाताईंनी परत विचारले.

" हो.. हवे होते. पण या सगळ्याचा तुमच्याशी काय संबंध? आणि अवनीसुद्धा एकुलती एकच आहे की.. मी विचारले का कधी?"


काय असेल उषाताईंच्या या प्रश्नाचा रोख? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all