लेक आणि लेकीचा स्वयंपाक.. अंतिम भाग

कथा लेकीने केलेल्या स्वयंपाकाची


लेक आणि लेकीचा स्वयंपाक.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की नेत्राला स्वयंपाक करून दाखवायचे चॅलेंज प्रिशा घेते. होईल का ती यात यशस्वी? बघूयात आता.


वरणभाताचा कुकर लावून एकाबाजूला तिने बासुंदी करायला दूध बारीक गॅसवर ठेवले. तोच तिला तिच्या बेस्टीचा फोन आला.. आणि मग काय आपण आईला कसं चॅलेंज केले आणि आता कसं ते पूर्ण करतो आहोत याच्या गप्पा सुरू झाल्या. त्यात कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या हे तिला समजलेच नाही. शेवटी काही तरी जळाल्याचा वास आल्यावर तिला स्वयंपाकाची आठवण आली. ती स्वयंपाकघरात आली. पटकन गॅस बंद केले. तोपर्यंत मंदार आणि नेत्रा आलेच होते. आल्या आल्या नेत्रा स्वयंपाकघरात जाणार होती.

"आई, अजिबात आत यायचे नाहीस.. मी वाढते जेवायला." प्रिशाने हुकूम सोडला.

" अग पण.." नेत्राने बोलायचा प्रयत्न केला.

" नाही म्हटलं ना? बाबा वाढू जेवायला?"

" हो.. पटकन.. काहीच न खाता आलो आहोत. वास तर छान येतो आहे."

" येस्स.. स्वयंपाक कोणी केला आहे? तुम्ही बसा जेवायला. मी पुर्या करायला घेते."

" अरे व्वा.. आज मजा येणार जेवायला." मंदार खुश झाला पण नेत्राच्या चेहर्‍यावर बारा वाजले होते. प्रिशाने खास डिनरसेट काढला होता. केलेल्या भाज्या छान मांडल्या होत्या.

" हे तर बघूनच पोट भरलं.." मंदारच्या चेहर्‍यावरून मुलीचे कौतुक होते.

" तू एवढं केले आहेस तर बस जेवायला. मी करते पुर्‍या.." नेत्रा उठत म्हणाली. घाईघाईने तिला खाली बसवत प्रिशा म्हणाली.

" अजिबात नाही.. सकाळी बडबडलीस ना काही करत नाही म्हणून. आता बस शांत.." प्रिशाने पुर्‍या तळून आणल्या.

" एक नंबर झाले आहे सगळे.." मंदार बोटे चाखत म्हणाला.

" आई.. तू काहीच बोलली नाहीस."

" छान झाले आहे ग.." सकाळी लेकीला उगाचच बोलल्याची टोच नेत्राला लागली.

" मग.. काय वाटतं राहीन का मी उपाशी?"

" नाही ग.. आता खूप केल्यास पुर्‍या. बस आता जेवायला." नेत्राच्या डोळ्यात पाणी होते.

"अरे रस्स्यात मीठ जास्त झाले आहे.. आणि भेंडीत घातलेच नाही.. चुकून झाले. पण तुम्ही छान झाले बोललात ना?"

" ते आमच्या लेकीने पहिल्यांदा केले म्हणून.. जमेल हळूहळू.." ताटं ठेवायला नेत्रा हसत उठली. तिने स्वयंपाकघरात पाऊल ठेवले.. खरेतर ती ताटे तिच्या हातातून पडायला बघत होती. पण ती स्टीलची नाहीत काचेची आहेत याची जाणीव नेत्राला होती. ती फुटली तर आपल्यालाच आवरायचे आहे हे तिला माहित होते. पण काहीतरी प्रतिक्रिया तर द्यायचीच होती. ती जोरात ओरडली.

" प्रिशा....."

" काय ग काय झाले? का ओरडते आहेस माझ्या बछड्याला?" असे म्हणत मंदार आत आला आणि बघतच राहिला. चिरलेल्या कांद्याच्या साली पूर्ण स्वयंपाकघरात संचार करत होत्या. चिरलेल्या भेंडी, बटाटा यांचा कचरा ओट्यावर तसाच होता. उतू गेलेल्या दुधाने सगळा गॅस खराब झाला होता. फोडणी करताना उडालेल्या तेलाने आणि मसाल्याने तर थेट छत गाठले होते. करपलेला कुकर तिथे वाकुल्या दाखवत होता.

"सॉरी आई.. म्हणून मी स्वयंपाक करत नाही.." असे अपराधी स्वरात म्हणत प्रिशा बाजूला उभी राहिली.

" याला म्हणतात भीक नको पण कुत्र आवर.." नेत्रा आपल्या स्वयंपाकघराची झालेली दुर्दशा बघत रडवेल्या आवाजात म्हणाली.

" म्हणजे?" प्रिशाने विचारले.

" म्हणजे तुझा स्वयंपाकही नको आणि ही आवराआवरी तर अजिबात नको.." यावेळेस मंदारही नेत्राच्या सोबत म्हणाला.


कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all