जीवनाचे विधिलिखित - भाग ४ ( अंतिम)

बऱ्याचदा जीवनाचे विधीलिखित ठरलेले असते आणि तिथवर आपण आपोआप जाऊन पोहोचतो

       मागील भागात आपण पाहिले डॉक्टरांनी केलेल्या निदानामुळे वृंदा पूर्णपणे व्यथित होते व आपण आता काहीही करू शकणार नाही अशी नकारात्मक भावना तिच्या मनात निर्माण होते. आता पाहूया पुढे..


       काही दिवसांतच वृंदाची हॉस्पिटलमधून सुट्टी होते व ती घरी जाते. तिला फिजिओथेरपी व मेडिसिन चालू असतात. सुरेशची आई मुलांना छान सांभाळते. स्वयंपाकाला व इतर कामांना बाई लावल्यामुळे घराचे व्यवस्थापन बऱ्यापैकी सुरू असते. मुलांची परीक्षा असल्याने सुरेश स्वतः ऑफिस वरून आल्यावर त्यांचा अभ्यास घेतो. त्याचा परिणाम म्हणून दोन्ही मुले चांगल्या मार्कांनी पास होतात.
     

      इकडे वृंदा आपल्या खोलीतून कुटुंबाची आपल्या न लागणाऱ्या हातभारामुळे होणारी तारांबळ पाहून अधिकच दुःखी होते. याचा परिणाम म्हणून ती सतत आजारी पडू लागते.


       सुरेश मात्र एक खंबीर नवरा होता. आपल्या सर्व गुणसंपन्न ऍक्टिव्ह बायकोला हे सर्व भोगावे लागत आहे याचा त्यालाही खूप त्रास होत होता. पण यावर आपण काहीतरी मार्ग काढूया असे त्याला मनोमन वाटत होते.


एक दिवस वृंदा झोपलेली होती अचानक तिचा फोन वाजला ,
"हॅलो वृंदा, मी आरती!"


"हॅलो.. वृंदा झोपलेली आहे मी सुरेश बोलतोय तिचा नवरा!"


"अच्छा कशी आहे माझी मैत्रीण वृंदा?"


सत्य सांगण्याचे टाळत, सुरेश म्हणाला,
"ती ठीक आहे.. पण आपलं काही काम आहे का तिच्याकडे?"


"हो. माझ्याकडे तिची एक डायरी आहे. त्यात तिने महाविद्यालयात असताना खूप कथा,कविता लिहिल्या होत्या!"


"पण ही डायरी तुमच्याकडे कशी आली?"


"काही दिवसांपूर्वी मी तुमच्याकडे आले होते, तेव्हा मीच तिच्याकडून ही डायरी मागवून घेतली होती मला वाचण्यासाठी! ती खूप छान लिखाण करते. कॉलेजमध्ये असताना ती नेहमी निबंध व इतर लेखन स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवायची;म्हणून तिला मी म्हटले सुद्धा की आताही तू तुझे लिखाण कायम ठेव ,पण ती म्हणाली माझे कुटुंब माझे पहिले प्राधान्य आहे.त्यामुळे मी लिखाण सोडले."

"अच्छा! बर ठीक आहे .मी सांगतो तिला तुमचा फोन येऊन गेला म्हणून."


" हो ठीक आहे चालेल!"


सुरेश अवाक झाला. आपल्या बायकोची लेखनाची आवड आपल्याला आजवर कशी कळाली नाही याचे दुःख त्याला झाले.


      दुसऱ्याच दिवशी त्याने आरतीकडून वृंदाची डायरी आणली आणि लिखाण सुरू करण्यासाठी वृंदाला प्रवृत्त केले.


"वृंदा या नैराश्यातून पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी तुझा छंद म्हणजे तुझे लेखन तुला नक्की वेगळा आत्मविश्वास देईल ,नवी उमेद देईल याची मला खात्री आहे. करशील ना तू पुन्हा सुरू तुझं लिखाण?"


वृंदाला आरतीकडून सारे काही समजले. तिनेही सुरेश चे ऐकत आपले लिखाण सुरू केले.


     आज वृंदाचे सिनेसृष्टीतील एका नामांकित सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पटकथा लेखिका म्हणून सत्कार सोहळा होता. सुरेशसोबत एका अलिशान गाडीत ती या सोहळ्यासाठी निघाली होती.तेव्हा हा तिचा सारा जीवनपट , नव्हे आयुष्याचा पूर्वार्ध तिच्या डोळ्यासमोरून अगदी जिवंत चित्रासारखा तरळून गेला.


ती मनाशीच पुटपुटली,
   " खरंच माझ्या आयुष्यात मला पुढे लेखिका म्हणून घडायचे होते म्हणूनच या साऱ्या ज्या काही घडामोडी माझ्यासोबत घडल्या ते सारे काही विधीलिखितच होते. एकाएकी मला आलेला हा अधुपणा,आरतीने फोन करणे, डायरी मिळणे, सुरेशला माझ्या लेखनाबाबत माहित होणे आणि लेखनाच्या प्रवासात इथवर येऊन पोहोचणे हे सारे देवाने ठरवून ठेवलेले होते. देवा आता मला माझ्या या अधूपणाबाबत काहीही दुःख नाही, माझ्या जीवनाचे  विधीलिखित एवढे छान केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद! "


     तेवढ्यात भव्य दिव्य सोहळ्याचे प्रवेशद्वार आले आणि वृंदा आपल्या गाडीतून वॉकरच्या सहाय्याने हळूहळू चालत आपल्या व्हीआयपी आसनावर स्थानापन्न झाली..
काही क्षणांतच तिचा सर्वोत्कृष्ट पटकथा लेखिका म्हणून सत्कार झाला आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.हा पुरस्कार तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे सुरेशला समर्पित केला आणि आज तिला आपल्याला मिळालेल्या आयुष्याचे खरे समाधान मिळाले याची प्रचिती आली.


      काही दिवसांतच ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. आपला संसार आणि लिखाण हेच तिने तिचे आयुष्य बनवले आणि ती नव्याने सुख उपभोगू लागली!


समाप्त!!

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all