मागील भागात आपण पाहिले वृंदा निधी आणि विहानला बस स्टॉप वर शाळेच्या बसची वाट बघत थांबलेली असते.
वृंदा मुलांची गोड पापी घेत त्यांना शाळेत बसवून देते.
"बाय मम्मा.."
"बाय बाय निधी ,विहू!"
बस निघून जाते. ती घराकडे परत येण्यासाठी निघते.घरी आल्यानंतर सर्वप्रथम योगा करते. सासुबाईंचा चहा नाष्टा उरकते. दुपारचा स्वयंपाक, धुणी, भांडी सारे काही अगदी टापटीप आवरते. दुपारी पुन्हा सासूबाईंचे व स्वतःचे जेवण उरकून जराशी आडवी होते.
मग मुले येण्याचा परतीचा वेळ झाला की त्यांना पुन्हा बस स्टॉप वर आणण्यासाठी जाणे, आल्यावर त्यांचे खाणे पिणे, त्यांना थोडेसे झोपवून पुन्हा ट्युशनला सोडणे, तोपर्यंत मधल्या वेळात घरातली बरीचशी छोटी मोठी कामे उरकणे, पुन्हा मुलांना आणण्यासाठी जाणे, मग संध्याकाळचा स्वयंपाक, सुरेश आल्यावर त्याचा चहा नाश्ता, सर्वांची रात्रीची जेवणे, संध्याकाळची भांडी सारी काही व्यवस्थित उरकून झोपण्यासाठी जाणे असा तिचा परफेक्ट दिनक्रम ठरलेला होता.मुलांच्या सुट्टीच्या दिवशी आराम करण्याऐवजी तिला घरातील पेंडिंग कामे करण्यासाठी खूप आवडत असे. खरंतर ती गप्प बसणाऱ्यांमधली नव्हतीच मुळी! तिचा सतत काहीतरी उद्योग चाले.
एक रविवारी सासूबाई तिला म्हणाल्या,
"वृंदा खरच माझ्या घराला तू घरपण आणलंस. मी काहीही न शिकवता किती छान सांभाळतेस तू नवरा,मुले आणि माझी जबाबदारी! शिवाय रविवार असतानाही घरातील पेंडिंग कामे सुद्धा करतेस! मला बापुडीला मात्र नुसतीच बसवून ठेवतेस.माझा सुरेश आणि मी तुला जेव्हा बघायला आलो तेव्हा, तुझ्या चेहऱ्यावरील चमक मी पारखली होती. सुरेशलाही तू तेव्हाच पसंत पडली होती. सुरेशचे आणि तुझे हे पहिलेच स्थळ. माझा सुरेश एक हुशार इंजिनियर, आणि तू सुद्धा एम कॉम. मग काय हवं होतं आम्हाला? सुरेशला आणि मला आमचे कुटुंब सांभाळणारी एक हुशार मुलगी हवी होती आणि जेव्हा तुला तुझ्या अपेक्षा विचारल्या ,तेव्हा तु सुध्दा आम्हाला सुसंगत अशीच माहिती दिलीस. मग काय माझ्या सुरेशने अगदी योग्य जोडीदाराशी लग्न गाठ बांधली. तुमच्या लग्नाला आठ वर्ष झाली, पण कधीही कुठल्या गोष्टीचा त्रागा नाही, कधीही भांडणतंटा नाही. खरच माझे भाग्य आहे आणि सुरेशचेही की त्याला तुझ्यासारखी हुशार व समंजस बायको मिळाली."
सासुबाईंनी असे मन भरून कौतुक केल्यावर वृंदा गाल्यातल्या गालातच हसली व एक समाधानाची अनुभूती तिला आली.
"सासुबाई खरंतर मीही स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला असा नवरा आणि अशी सासू आज मिळाली आहे. तुम्ही सुद्धा मी घरकाम करत असताना कधीही हे असेच कर ,ते तसेच कर अशी आडकाठी टाकली नाही. मला हवे ते आणि तसे करू दिले. म्हणूनच आपसूकच आपले नाते मुलगी आणि आईप्रमाणे फुलत गेले. सुरेश ने ही मला पहिल्यापासून समजून घेतले. खरंच मी माझ्या संसारात खूप सुखी ,समाधानी आहे. माझी दोन मुले माझा नवरा आणि तुम्ही माझा भक्कम आधार आहात. खरच खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात येण्यासाठी."
"अरे सासू सून काय खुसुर - पुसुर करताय?"
"काही नाही रे सुरेश तुझ्या बायकोचे कौतुक करत होते."
" मग माझी बायको आहेच कौतुक करण्यासारखी,हो की नाही वृंदा?"
"इश्य,काय हे !आईंसमोर असे बोलतं का कोणी?"
वृंदा खूप छान लाजली आणि बेडरूम मध्ये गेली.
" आई किती छान लाजली बघ वृंदा!"
"हो ना!"
असे म्हणत सुरेश आणि सासुबाई हसू लागले. मुलांची आपली एकीकडे दंगामस्ती सुरू होती. वृंदा दुपारी जराशी आडवी झाली आणि तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही.
खरंतर ती पाठपोट झोपलेली होती. पण अचानक तिला उठताच येईना. तिने खूप प्रयत्न केला ;पण कंबरेखालचा तिचा भाग तिला बधिर जाणवला.
"सासुबाई, सुरेश, विहान, निधी लवकर या इकडे!"
सर्वजण घरातच होते. पण वृंदाच्या अशा ओरडण्याने ते थोडे घाबरले व ताबडतोब बेडरूम मध्ये गेले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा