वकिली हिसका
भाग ३ ( अंतिम )
भाग २ वरुन पुढे.
भाग ३ ( अंतिम )
भाग २ वरुन पुढे.
अशाच एक एक महिन्याच्या अंतराने चार पांच तारखा वाया गेल्या. दोन वेळा अविनाश वकील हजर नव्हते म्हणून, आणि दोन वेळा केसेस ची गर्दी होती म्हणून. मधल्या काळात काशीनाथ ची धारणीला बदली झाली. त्यामुळे त्याला चार वेळा धारणीवरून यावं लागलं. सुट्ट्या तर वाया गेल्याच वरतून जाण्या येण्याचा खर्च पण झाला. काशीनाथची आता चीड चीड व्हायला लागली होती. त्याला होणाऱ्या मानसिक त्रासाचं काय? त्यांच्या मनात विचार आला. वर्ष होत आलं होतं. एक एक सुट्टी वाया जात होती. खर्च पण वाढत होता. शेवटी एकदाची कोर्टात केस सुनावणीला आली.
“काशीनाथ, तू यांच्या खाजगी मालमत्तेचं नुकसान केलस आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला. आणि हे तू मुद्दाम केलं असं वादीचं म्हणण आहे. तुला मान्य आहे का?” – न्यायाधीश
“साहेब मी मुद्दाम असं काहीच केलं नाही. मुलांनी कायदा पाळला नाही म्हणून त्यांना फक्त समज दिली. आणि साहेब ते तर माझं कामच आहे.” – काशीनाथ.
“कोणाचा कायदा मुलांनी मोडला?” – अविनाश.
“रात्रीच्या वेळी मुलं सायकल वरुन विदाउट लाइट आणि डबल सीट जात होती. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. मुलांना सांगितल्यावर त्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी तसं कबूल पण केलं.” – काशीनाथ.
“युअर ऑनर हे सांगतात तसं जर असेल, मुलांनी चूक कबूल केली असेल, तर त्यांना दंड करायाला हवा होता. पण काशीनाथ तुम्ही तसं केलं नाही. का?” – अविनाश.
“साहेब मी दंड केला होता, पण त्यांच्या जवळ दंड भरायला पैसे नव्हते.”– काशीनाथ.
“मग तुम्ही चलान फाडायला हवं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही स्वत: पोलीस स्टेशन मधे येऊन दंड भरला असता, पण तसं न करता तुम्ही सायकल ची नासधूस केलीत. युअर ऑनर याला उद्दाम पणा म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? – अविनाश
“काशीनाथ यावर तुमचं काय म्हणण आहे?” – न्यायाधीश.
“साहेब, शाळकरी मुलं होती, पुन्हा अशी चूक त्यांच्याकडून होऊ नये म्हणून मी एक छोटीशी शिक्षा दिली. चांगल्या घरातली मुलं दिसत होती ती साहेब, त्यांना चांगलं वळण लागावं एवढीच इच्छा होती साहेब, त्यांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू माझ्या मनात नव्हता. पण आता मलाही धडा मिळाला साहेब. मी माफी मागतो.”– काशीनाथ
“म्हणजे तुमच्या हातून चूक घडली हे तुम्ही मान्य करता आहात” – न्यायाधीश.
“हो साहेब. मी चुकलो. मला माफी द्यावी.” – काशीनाथ.
“वकील साहेबांनी सायकलच्या नुकसान भरपाई साठी २५० रुपये आणि जो मानसिक त्रास झाला त्यांच्या साठी ५०० रुपये असा ७५० रुपयांचा दावा ठोकला आहे. तुम्हाला गुन्हा कबूल आहे तर ही नुकसान भरपाई द्यावी लागेल.” – न्यायाधीश.
“साहेब, ६० रुपये पगार आहे माझा. त्यावर घर कसं बसं चालतं. माझ घर, शेती काही नाही. इस्टेट जायदाद पण नाही. एवढी मोठी रक्कम मी कशी उभी करू? साठ रुपये पगार असणाऱ्या माणसाला एवढी मोठी रक्कम कोणी कर्जाऊ पण देणार नाही साहेब. साहेब कृपा करा पण एवढी मोठी शिक्षा नका देऊ.” – काशीनाथ
“अविनाश साहेब, हा माणूस खरं बोलतो आहे. इतकी मोठी नुकसान भरपाई देणं याला शक्य होणार नाही.” – न्यायाधीश.
“पण साहेब, गुन्हा घडला आहे, शिक्षा व्हायलाच पाहिजे.” – अविनाश.
“ठीक आहे काशीनाथने गुन्हा कबूल केला आहे म्हणून हे कोर्ट त्याला ३ रुपये दंड करत आहे. हा दंड त्याने उद्या पर्यन्त कोर्टाच्या वेळेत भरायचा आहे. न भरल्यास दर दिवशी ३ रुपये वाढत जातील.
सायकलच्या दुरुस्ती पायी जो काही खर्च आला असेल तो काशीनाथने परस्पर अविनाश वकिलांना द्यावा.
डिसमिस
निकाल ऐकून काशीनाथच्या जीवात जीव आला. त्याने मनोमन ईश्वराचे आभार मानले.
कोर्टाच्या बाहेर पडत असतांना त्याला काशीनाथ अशी हाक ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिले तर अविनाश वकील त्याला बोलावत होते. त्याला बरंच वाटलं. काशीनाथला त्यांचे आभार मानायचे होते. त्यांनी आग्रह धरला नाही म्हणूनच इतक्या कामी शिक्षेवर सुटका झाली होती.
“या काशीनाथ राव, या चला आपण चहा पियू.” – अविनाश
“अं, चहा?” काशीनाथला आश्चर्याचा धक्काच बसला.
बाकावर बसल्यावर अविनाश वकिलांनी पाकीट काढलं आणि २५ रुपये काशीनाथच्या हातावर ठेवले. काशीनाथ त्यांच्या कडे बघतच राहिला.
“काशीनाथराव तुम्ही माझ्या मुलाला त्रास दिला, म्हणून मी पण एक छोटीशी झलक दाखवली. फिटटं फाट. आता तुम्हाला धारणीवरून बस चा खर्च करून यावं लागलं, सुट्टी घ्यावी लागली. आणि हे सगळं माझ्यामुळे झालं. त्यांची ही भरपाई. घ्या. मला दुरुस्तीचा खर्च नको. तीन रुपये आत्ताच भरून टाका. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. कोर्टात सुद्धा काहीच खोटं बोलला नाही. एक सांगतो, आयुष्यात तुम्हाला वकिलांची जरूर पडू नये, पण जर कधी पडलीच तर बिनदिक्कत माझ्याकडे या. मी काहीही फी न घेता तुमचं काम करेन. प्रॉमिस.” - अविनाश.
काशीनाथ भारावला. त्यांच्याजवळ बोलायला काहीच शब्द नव्हते.
******समाप्त.*****
दिलीप भिडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा