सीमेपार.. त्या वळणावर.. (भाग ७)

Tanvi and Junaid keep meeting. Now they are not just acquaintance but they are friends. She is comfortable with him.



 

''मिस तन्वी?'' एक प्रश्नार्थक हाक.
इथे मला कोण हाक मारणार आता, असं विचार करतंच तन्वी मागे वळली.

''जुनैद'' तिचे डोळे चमकले आणि चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं.
''अपनी मुलाकात इतनी जल्दी होंगी ऐसे नाही लगा था'' त्याच्याही चेहेऱ्यावर आश्चर्य आणि हसू.

''पाकिस्तान मध्ये पोस्टींग?? कधी मिळालं? कधी आलीस?'' त्याने एकामागोमाग प्रश्न विचारायला सुरुवात केली.

''होय. पाकिस्तानमध्ये पोस्टींग. साधारण १५ दिवस झाले येऊन.'' तन्वी हसत म्हणाली.

''हसनचं पोस्टींग कुठे आहे सध्या?'' त्याने विचारलं.

वाह! त्याच्या लक्षात आहे तर.
"हसन नेपाळला आहे'' ती म्हणाली.

''तुझं काय? सध्या इथेच आहेस की पोस्टींग झालं आहे?'' तिने विचारलं.

''सध्या पाकिस्तानमध्येच. एखाद दोन वर्षांनी पोस्टींग घेईन आता.'' तो म्हणाला.

''ओह्ह. Long way,'' ती म्हणाली.  
 
''काय घेत होतीस?'' त्याने अचानक विषय बदलला.

''काही नाही. आज पहिल्यांदा एकटी बाहेर पडले आहे त्यामुळे आज बघतेय फक्त,'' तन्वी अजूनही हसत होती.

''कुठे राहतेस?'' त्याचा पुन्हा प्रश्न.

''काराकोरम'' तन्वी म्हणाली.

''अरे वाह! मी ही. म्हणजे बरेच डिप्लोमॅट्स तिथेच राहतात पण भारतीयांचं माहिती नव्हतं मला,'' जुनैदच्या चेहेऱ्यावर तसंच हास्य.

शॉपिंग करता करता त्यांनी अजून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.
 
शेवटी निघता निघता तो म्हणाला, ''माझा अजून विश्वास बसत नाहीये. केवढा योगायोग आहे ना हा. बहुतेक पुन्हा भेटू आपण.''
अशा योगायोगाने भेटी घडणं तेवढं सोपं नव्हतं. तरीही ती आणि जुनैद पुन्हा भेटले होते.
 
पाकिस्तानमध्ये बरंच जबाबदारीचं काम होतं. तन्वीला खूप कमी वेळ मिळायचा. रात्री घरी आल्यावर तिचा सगळा वेळ घरच्यांमध्ये जायचा. दर वेळी पाकिस्तानकडून चांगलीच वागणूक मिळायची असं नाही पण त्यांची या गोष्टीला तयारी होती. मानसिक खच्चीकरण करण्याचेही प्रयत्न व्हायचे पण या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. ते दुर्लक्ष करायला शिकले होते.
 
तन्वी आणि श्रेया एक अपार्टमेंट शेअर करत होत्या. त्यांचं रुटीनही हळू होऊ बसत चाललं होतं. पाकिस्तानात इस्लामाबाद बाहेर जायला त्यांना परवानगी नव्हतीच त्यामुळे पर्यटनाची फार काही संधी नव्हती. आजूबाजूची पर्यटन स्थळं म्हणजे रावळ लेक, इस्लामाबाद म्युझिअम, व्हीयू पॉईंट, शहरातले मॉल्स हे सगळं २-३ महिन्यात बघून झालं होतं. शनिवार रविवार सुपर मार्केट मध्ये आठवड्याची खरेदी करण्यात जायचा. तन्वी अर्थात बरंच वाचन करायची. चिराग आणि साखरपुड्याचे विचार सतत तिचा पिच्छा करायचे. आठवडाभर कामाच्या नादात विचार करायलाही वेळ मिळायचा नाही. तेच कुठेतरी बरं होतं.
 
तन्वीला पाकिस्तानच्या संस्कृतीबद्दल नेहमीच आकर्षण होतं. पण डिप्लोमॅटिक एंकलेव मध्ये राहून खरा पाकिस्तान कळायला मार्ग नव्हता. त्यांचा परिसर युरोपलाही लाजवेल इतका चांगला होता. सर्वसामान्य पाकिस्तानी लोकांना तिथे यायला अजिबात परवानगी नव्हती. त्यामुळे तन्वीची उत्सुकता तशीच होती.
 
तिची आणि जुनैदची येगायोगाने होणारी भेट आता वरचेवर होऊ लागली. आधी ते बरेचदा सुपर मार्केटमध्येच भेटायचे आणि कधीतरी घराजवळ. आता हाय, हॅलो पलीकडेही त्यांच्या गप्पा व्हायला लागल्या होत्या. एकमेकांचं शिक्षण, तिचं UPSC, त्याचं CSS , एकंदरीत इस्लामाबाद कसं वाटतंय वगैरे पासून चालू झालेल्या गप्पा आता कॉफी शॉप पर्यंत येऊन पोहोचलेल्या.

एके दिवशी शनिवारी थोडंफार सामान घेऊन तन्वी निघाली आणि जुनैदने तिला गाठलं.

''तू नेहमीच शनिवारी येतेस न'' त्याने डोळे मिचकावत विचारलं.

''तू ही नेहमीच शनिवारी येतोस, जुनैद'' तिनेही तसंच उत्तर दिलं.
''मग आज कॉफी घ्यायची?''

अचानक त्याचा प्रश्न ऐकून तन्वी जरा गडबडली. काय उत्तर द्यावं कळेना. तोही गडबडला. असं विचारायला नको होतं एकदम.

''मी गम्मत केली''
''चालेल कॉफी''
दोघंही एकत्र म्हणाले आणि एकमेकांकडे बघत राहिले.
दोघंही हसले आणि जुनैद म्हणाला, ''This way madam''
ती हसली आणि ते निघाले. 
तन्वी इथे पहिल्यांदाच कॅफे मध्ये जात होती आणि ते ही एका अनोळखी मुलाबरोबर. तिचा त्याच्याशी परिचय होता पण म्हणावी तशी ओळख नव्हती. तरीही तिला त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं होतं. कदाचित त्यालाही घ्यायचं असेल.

सुरुवातीचं अवघडलेपण थोड्याच वेळात नाहीस झालं. त्यांच्यात बोलायला अनेक विषय होते. दोघांचं ग्रॅज्युएशन अर्थशास्त्रात झालं होतं, दोघांना वाचायची प्रचंड आवड होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांचीही स्वप्नं सारखीच होती.

भारत, पाकिस्तान, त्यांचं काम हे असे विषय ते दोघंही कटाक्षाने टाळत असत. खरंतर त्याची गरजही नव्हती काही. त्यांना त्यांच्या गप्पा मारायला वेळ पुरत नसे.

घरापासून लांब तन्वीला नेहमीच बरं वाटायचं. तिच्यावर लक्ष ठेवायला कोणीही नाही. तिला नेहमी स्वातंत्र्य हवं होतं.

काही दिवसांनी तन्वी आणि जुनैदच्या भेटी अजून वाढत गेल्या. बरेचदा ते दोघे रात्री जेवायला बाहेर जाऊ लागले. दर वेळी नवीन नवीन हॉटेल्स ट्राय करू लागले. आता त्यांचा फक्त परिचय नव्हता तर आता ते एकमेकांचे मित्र झाले होते. ओळख जरी नवी असली तरी त्या ओळखीची व्याप्ती वाढत चालली होती.

पाकिस्तानमधील तन्वीचा पाहिला आणि कदाचित एकमेव मित्र!
तन्वीला असं वाटायचं की आपण याला एकटं सारखं भेटता कामा नये पण तिला खूप बरं वाटायचं त्याच्याबरोबर. तो तिचं कोणतंही म्हणणं नीट ऐकून घ्यायचा, तिच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करायचा, तिला  चिडवायचा, तिची गंमत करायचा आणि तिच्याशी वादही घालायचा.  तन्वीला आतापर्यंत कायम एकटं वाटत आलं होतं. आता जुनैदला भेटल्यापासून ते एकटेपण कुठेतरी दूर गेलं होतं. त्याच्याबरोबर तिला खूप निर्धास्त वाटायचं. त्याच्या वागण्यात खूप आदब होती. तो दिसायला जेवढा चांगला होता तेवढाच प्रचंड नम्रपणा आणि समजूतदारपणा त्याच्यात होता.

एके दिवशी तन्वी त्याला म्हणाली की मला इथलं लोकांचं खरं जीवन बघायचं आहे.

''तुझं कुटुंब इथेच राहतं का?'' तन्वी.

''नाही, ते मरीला राहतात,'' जुनैद म्हणाला.

''मरी!'' तन्वीने डोळे विस्फारले.

जुनैद हसला. ''पण माझं उच्च शिक्षण इथेच झालं आहे'', तो म्हणाला.
 
''मला आवडेल मरीला जायला,'' ती म्हणाली.

जुनैदने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तन्वी त्याच्याकडे बघून हसत होती.

''तू जो विचार करते आहेस तसं काही होणार नाहीये'', जुनैद म्हणाला.

''Come on जुनैद, आपल्यामागे सतत कॅमेरे लावलेले नाहीयेत. नियम सगळेच तोडतात आणि आपण पहिल्यांदा करणार आहोत का असं? तू असं बोलतो आहेस जसं काही याआधी कोणी हे केलंच नाहीये.'' तिचं चालूच होतं.

''पर्यटन स्थळं भेट नको देऊया कोणत्याही. फक्त तू जिथे  राहतोस तो परिसर बघू. हवं तर एक चक्कर मारू आणि लगेच परत येऊ. एका दिवसाचं काम आहे.'' तो शांत बसलेला पाहून ती पुन्हा म्हणाली.

''आणि तुला असं वाटतं की एक फेरफटका मारल्याने तुला इथल्या लोकांचं जीवन कळेल?'' जुनैद हसला.

''नाही, पण निदान मला तो परिसर, घर हे तरी बघता येईल. इस्लामाबाद बाहेरचं जग कळेल ना.'' तिच्याशी वाद घालणं कठीण होतं.

जुनैदचे विचार चालू झाले.

''या शनिवारी वेळेत २ वाजता निघूया. साधारण ३.३०-४ पर्यंत पोहोचू. ५ ला तिथून निघायचं म्हणजे ७ वाजेपर्यंत परत इथे पोहोचू.'' जुनैदने वेळेचं गणित मांडलं.''

''अरे वाह!'' तन्वीचे डोळे एकदम चमकले. ती खूप उत्साहीत झाली.

''तू लगेच मनावर घेतलंस. Thank you so much'' तन्वी म्हणाली.
 
तिला एवढं उल्हसित झालेलं बघून जुनैदला पण आनंद झाला. तो तिच्याकडे एक टक पहात राहिला. एवढं नक्कीच करू शकतो मी हिच्यासाठी, तो विचार करत होता.
जुनैदने रात्री अम्मीला फोन करून याची कल्पना दिली की तो शनिवारी थोड्यावेळासाठी येऊन जाईल.
 
तन्वी उत्साहात घरी आली. ती आतुरतेने शनिवारची वाट पाहत होती. तिने याबद्दल कोणालाही सांगितलं नाही.
सगळं व्यवस्थित पार पडलं तर ठीक होतं नाहीतर ही तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी घोडचूक ठरणार होती.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all