शेवटी तो दिवस उगवला आणि तन्वीची दिल्लीला जायची वेळ झाली. तन्वी आतुरतेने वाट पाहत होती.
आज बाबापण घरी होते. तन्वी उठेपर्यंत थांबले होते ते. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. बाबा खुश होते. तन्वीने विचार केला आज इतक्या वर्षांनी बाबा माझ्या निर्णयामुळे खुश आहेत. ती कळवळली. तिरस्कार आणि आनंद अशा दोन्ही भावना एकत्र तिच्या मनात आल्या. तिचे शालेय दिवस संपल्यावर तिने बाबांना नेहमी त्रासच दिलं होता. तिला पुन्हा पुन्हा त्याचा भूतकाळ आठवलं. याच टेबलवर बसून ते रोज सकाळी नाश्ता करायचे. बाबा त्यांच्या कामाबद्दल बोलायचे, तनय आणि ती शाळेतल्या गमतीजमती सांगायचे, परीक्षा, मित्र मैत्रिणी ई. देवेन नेहमी त्यांना काहींना काही सल्ले द्यायचा. अशा अनेक गोष्टी ते सगळे एकत्र शेअर करायचे. आज पुन्हा अनेक वर्षांनी ते सगळे टेबलवर बसून सकाळचा नाश्ता करत होते.
''तन्वी, दिल्लीला काळजी घे. मध्ये मध्ये चिराग येईलच तुला भेटायला. तू काही काळजी करू नकोस. लग्नाची अजिबात घाई नाहीये. चिराग सारखं स्थळ मात्र मिळालं नसतंच तुला तो तुला नक्की खुश ठेवेल बघच तू.'' बाबा म्हणाले.
''हो बाबा. माझं पोस्टींग दुसरीकडे झालं तरी चिराग येईलच मला भेटायला यात काही शंका नाही. आणि पुढच्या वर्षी सुट्टी घेऊन येईन तेव्हा अजून मजा येईल.'' तन्वी उसनं हसत म्हणाली. तिला त्यांना कळू द्यायचं होतं की ती दिल्लीला थांबणार नाहीये आणि कुठेतरी पोस्टींग घेणार आहे. पण तिने लग्नाला होकार दिल्याने त्यांची काही हरकत नव्हती आता.
तन्वीचे घरी दाखवण्याचे अनेक चेहरे होते. खरंतर तिचा खरा चेहराच तिने घरच्यांपासून कायम लपवला होता. तो फक्त समीरला माहिती असायचा. सरड्याच्या रंगाप्रमाणे तन्वी स्वतःचे चेहरे बदलायची. ती सामान भारत असताना आई खोलीत आली.
''तन्वी, तू खरंच मनापासून होकार दिलं आहेस ना?'' आईने आल्या आल्या विचारलं.
तन्वी एकदम चमकली. आईला कळलं की काय. शेवटी कितीही झालं तरी ती आई होती. तन्वीला रडू आलं. असं वाटलं आईला सगळं खरं सांगावं. पण नाही!! असं नाही करू शकत. आई बाबांपासून काही लपवणार नाही आणि तन्वीला आता इतकं सगळं झाल्यावर कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. तिने मोठ्या मुश्किलीने अश्रू आवरले.
''अर्थात गं आई. मी पण विचार केला की मला चिरागपेक्षा दुसरा चांगला मुलगा नाही मिळणार. चिराग यशस्वी तर आहेच पण तो ओपन माईंडेड पण आहे. मला स्वातंत्र्य मिळेल माझं.'' तन्वी आईच्या जवळ जात चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली. खरं तर आतल्या आत ती आक्रोशत होती.
''तन्वी, मी तुझी आई आहे. त्याचं यश तुला कधीपासून यश वाटायला लागलं?'' आई खरंच ओळखून होती तिला.
''मी खूप विचार केला आणि यावेळी नुसता विचार नाही तर व्यावहारिक विचार केला. आता मी २८ वर्षांची आहे पण उद्या मला लग्न करावंसं वाटेल आणि स्थैर्य हवं असंही वाटेल, तेव्हा चिरागसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. आणि तेव्हा कदाचित मला वाटेल की तेव्हाच संधी होती तर मी उगाचंच नाकारलं त्याला. कारण त्याला कोणीही मुलगी हसत हसत होकार देईल.'' तन्वी अगदी शांतपणे म्हणाली.
आईने तिला जवळ घेतलं. ''खरंच मोठी झाली माझी लेक'' आई चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.
तन्वीच जीव तीळ तीळ तुटत होता. ''मला माफ कर आई पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये'' ती मनातल्या मनात आक्रंदत होती.
यावेळी मात्र कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिला दिल्लीला सोडायला तनय, आई आणि समीर आले. समीरने तिला घट्ट मिठी मारली. ''काळजी घे'', त्याच्या या सांगण्यातही काळजी होती.
''अजूनही विचार कर, बाबा अगदी सहज सोडतील तुला दिल्लीला,'' आई म्हणाली.
''नाही ग आई, वेळ नाहीये आता तेवढा. चल निघते. पोस्टिंगचं कळवेन.'' तन्वीने निरोप घेतला.
''विमानात मनसोक्त रडून घेतलं कारण आता परत रडायचं नाही. दिल्लीला तिला नवी सुरुवात करायची होती.
विमानतळावर तिला घ्यायला गाडी आलीच होती. ती घरी आली. उद्यापासून नीट कामावर लक्ष द्यायचं या विचाराने तिने आजपासूनच थोडीशी सुरुवात केली. घरी ती पोहोचल्याचं कळवून टाकलं. आता ती तिच्या कामावर आणि नवीन प्लॅनवर काम करायला मोकळी होती.
काही दिवसात तन्वीने पोस्टींगसाठी अर्ज केला. यावेळी तिने खूप विचारपूर्वक कृती केली. हा अर्ज जर स्वीकारला गेला आणि तिला हवं तिथे पोस्टींग मिळालं तर तो तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरणार होता. तन्वीने पाकिस्तानसाठी अर्ज केलेला. तिने जतिन सरांची मदत घेतली. तिचं उर्दूवरच प्रभुत्व, इराणमधील जबाबदारी तसेच जर्मनीमध्ये अगदी पहिल्या पोस्टिंगला कामात दाखवलेली चुणूक यासगळ्याचे संदर्भ दिले. जतिन सरांनीही तिची बरीच मदत केली. दिल्लीमध्येही तिच्या कामाचं आणि हुशारीचं कौतुक होतं होतं. पाकिस्तानसारख्या देशात जायला फार कोणी उत्सुक नसतं हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि काही दिवसातच तन्वीला कळलं की तिचा पोस्टींग पाकिस्तानला होत आहे.
तन्वीचा आनंद गगनात मावेना. UPSC च्या रिझल्टच्या दिवशी झालेल्या आनंदापेक्षाही हा आनंद बहुमोल होता. तिचं स्वप्न तर साकार झालं होतच पण आता ती तिच्या लग्नापासूनही दूर पाळणार होती. इतकी दूर की ते ठरवूनही तिच्या मागे येऊ शकत नव्हते.
पाकिस्तानातील पोस्टींग म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. अनेक गोष्टी काळजीपूर्वक हाताळाव्या लागणार होत्या. MEA कडून त्यांच्यासाठी स्पेशल लेक्चर ठेवलं होतं ज्यात आपल्या देशाचे पाकिस्तानात काम केलेले वरिष्ठ राजदूत त्यांचे अनुभव शेअर करत. भारतातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचे पडसादही पाकिस्तानात उमटत असत. सध्या काही काळ परिस्थिती जरा शांत होती. परंतु अनिश्चितता कायम असायची. तन्वी खुश होती.
आता एक मोठं काम होतं ते म्हणजे घरी ही बातमी कळवणं. तन्वीने पाकिस्तानला जायच्या २ दिवस आधी घरी कळवायचं ठरवलं. म्हणजे त्यांना काही हालचाल जरी करायची असेल तरी वेळ मिळणार नाही.
तिने आईला फोन लावला पण तिच्या मनात धाकधूक होती. ४ वेळा फोन लावून कट केल्यावर तिने हिंमत केली आणि परत लावला आणि सरळ सांगून टाकलं. आईला धक्का बसला. त्यांनी कोणीच कल्पना केली नव्हती की तिला पाकिस्तानला पोस्टींग मिळेल. आई अक्षरशः फोनवर ओरडायला लागली. रात्रीची वेळ असल्याने तनय, देवेन आणि बाबापण घरात होते. सगळे आईभोवती जमले.
''अहो ही बघा काय सांगते आहे.'' आई अजूनही धक्क्यात होती.
तनयने फोन घेतला. त्यालाही धक्का बसला होता. तो मनोमन विचार करत होता की या शक्यतेचा विचार आपण करायला हवा होता. त्याने काही न बोलून फोन देवेनकडे दिला. तन्वीचा अंदाज चुकला होता. ते या गोष्टीला इतकं मोठं रूप देतील असं तिला कधीच वाटलं नव्हतं. आता ती खूप घाबरली. आपण तिथे जाऊनच कळवायला हवं होतं असं वाटलं तिला.
''काय चाललंय, तन्वी?'' देवेनचा रुक्ष आवाज.
''मला पाकिस्तानला पोस्टींग मिळालाय. एवढं काही झालं नाहीये.'' ती शक्य तितक्या शांतपणे म्हणाली.
''काय???'' देवेनपण जोरात ओरडला. त्याने फोन स्पीकरवर टाकला.
''मी या क्षेत्रात आले तेव्हाच माझी या सगळ्याला तयारी होती. तुम्हीही तुमची तयारी करायला हवी होती. किमान २ C ग्रेड देशात पोस्टींग घेतल्याशिवाय USA सारख्या A ग्रेड देशात पोस्टींग मिळणार नाही.'' तन्वीला मनातून आनंदच होतं होता त्या सगळ्यांना असं पाहून.
''तुला या सगळ्याची काही गरज नाहीये. कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतेस? इराण ठीक होतं पण आता पाकिस्तान? आणि दिलं कोणी तुला पोस्टींग? फक्त सिनिअर राजदूत जातात ना?'' तनय म्हणाला.
तन्वी विचार करत होती की बाबा कसं काही बोलत नाहीयेत अजून? मी काय केलं आहे हे बाबा नक्कीच शोधून काढू शकतात. चिरागपण पाठपुरावा करू शकतो. अरे यार, एवढा साधा विचार कसा केला नाही मी, ती चरफडत विचार करत होती. त्या दिवशी रात्रभर जागून विचार करण्यापेक्षा सकाळी विचार करायला हवा होता.
''तनय, मी खूप खालच्या पोस्टवर आहे. राजदूतपर्यंत पोहोचायला खूप वेळ आहे अजून. खालच्या पोस्टला एवढा धोका नाहीये आणि माझ्याबरोबर एक सिनिअर मुलगी आहे कानपूरची, श्रेया त्रिपाठी. मी एकटी नाहीये,'' तन्वी शक्य तेवढ्या शांतपणे बोलत होती.
खरंतर IFS हे एकाच असं क्षेत्र होता ज्यात फार कोणी हस्तक्षेप करू शकत नसे. तन्वीच्या पथ्यावर पडलेलं.
''तुझ्या सुरक्षेचं काय तिथे?'' शेवटी तन्वीने बाबांचा आवाज ऐकला.
''खरं तर आपण ज्या देशात जातो तो देश सुरक्षा पुरवतो पण पाकिस्तानमध्ये भारतच आम्हाला सुरक्षा पुरवतो.'' तन्वी म्हणाली.
''त्याची कल्पना आहे मला पण ती किती प्रभावी आहे यावर विश्वास नाही माझा. चिरागला सांगितलं तर तो तुझं पोस्टींग दुसरीकडे करू शकतो.'' बाबा तसे शांत होते.
हीच भीती होती तन्वीला. अजून एक दिवस जायचा होता मध्ये.
''MEA च्या कारभारात आपण कोणीच हस्तक्षेप न केलेला बरा. चिराग कुठे कुठे जात असतो बाहेर. उद्या त्याच्यावर कोणतं संकट ओढावलं तर त्या देशातली एम्बसीच मदत करेल आणि पाकिस्तानला दुसऱ्या देशासारखंच समजा. आमच्यासाठी खरंच ही काही मोठी गोष्ट नाहीये. अर्थात युरोप किंवा अमेरिकेसारखं नाही आहे पण मी मगाशी सांगितलं तसंच या देशांमध्ये पोस्टींग घेऊनच पुढे जाता येतं आणि मला माझ्या कर्तृत्वावर हे मिळालं आहे.'' तन्वी आधी शांतपणे बोलत होती पण नंतर मात्र रडवेली झाली ती.
तिचा धीर खचत चालला होता. एवढ्या हुशार आणि तिच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेल्या माणसांना ती असं हातोहात कशी फसवू शकेल! बाबांकडे सगळ्याला नेहमी मार्ग असतो याची जाणीव होती तिला पण तिला कोणताच मार्ग नको होता. तिने तिचा मार्ग स्वतः निवडला होता आणि तिला फक्त शांतता हवी होती.
''दररोज आम्हाला फोन करायचास आणि जर तणाव वाटला भारत पाकिस्तान दरम्यान तर लगेच भारतात निघून यायचं.'' आई जरा शांत झाली होती.
''तणाव नेहमीच असतो गं. आता जरा परिस्थिती बरी आहे पण आम्ही सावध असणार कायम. तू चिंता करू नकोस. आजूबाजूला तिथे एम्बसीज आहेत. इस्लामाबाद मधला Red Zone Area आहे तो. सर्वसामान्य लोकांना तिथे यायला पास शिवाय परवानगीही नाहीये. त्यामुळे तिथे बहुतेक करून डिप्लोमॅट आणि High ranking ऑफिसर्स आणि त्यांची security च असते.'' तन्वी आता जरा शांत झाली होती. तिला कुठेतरी खात्री पटली होती की आपला मार्ग मोकळा आहे.
समीरच्या सगळं लक्षात आलं होतं. ती न बोलता ही त्याला तिचं मन कळायचं.
''मला माहिती होतं तू नक्की काहीतरी ठरवलं आहेस'' तो कौतुकाने म्हणाला. तन्वीला त्याचा आधार होता आणि तिला जरा हायसं वाटलं की कोणीतरी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतंय
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चिरागचे ८ मिस्ड कॉल्स होते. तन्वीला वैताग आला होता काल एवढं बोलून. तिने कंटाळत त्याला फोन लावला.
''आपण तुझं पोस्टींग दुसरीकडे करूया'' चिराग हॅलो म्हणायच्या आधी हेच म्हणाला. तन्वीला अपेक्षित होतंच.
''नाही रे चिराग. काल मी आई बाबांना हेच समजावलं आहे. आणि पाकिस्तानमध्ये असल्यामुळे मला हक्काने सुट्टी घेता येईल आपल्या साखरपुड्यासाठी. अशा देशांमध्ये शक्यतो अडवत नाहीत,'' तन्वी त्याला समजावत म्हणाली.
खरंतर त्याच्याशी बोलायची तिची अजिबात इच्छा नव्हती. काल रात्री तिने १०-१० वेळा घरी सांगितलं होता की साखरपुड्यासाठी ती सुट्टी घेऊन येईल म्हणून. तिला कुठेतरी माहिती होतं बाबांना आपण एवढं सहजासहजी मूर्ख नाही बनवू शकत पण कसे का होईना ते तयार झाले होते. चिरागपण खूप स्मार्ट होता पण त्याला तिच्या क्षेत्राबद्दल फार माहिती नव्हती आणि तिच्या नशिबाने त्याने कधीही कोणत्या IFS किंवा डिप्लोमॅटबरोबर डील केलं नव्हतं. त्याचा या सगळ्याशी काही संबंध नव्हता आणि तो त्याच्या कामात प्रचंड बिझी असायचा. पण तिची सगळी शक्ती सगळ्यांना स्पष्टीकरण देण्यातच खर्च होतं होती.
शेवटी हे सगळं सरलं. High Commission of India मध्ये तिने तिच्या मेरीटवर पोस्टींग मिळवलं होतं. ती खूप आनंदात होती.
पाकिस्तानला आल्यावर साधारण १५ दिवसांनी आज ती बाहेर पडली होती एकटी. श्रेयाला एकटीला बाहेर येण्यात जास्त रस नव्हता. तिला खूप मोकळं वाटत होतं. हा सगळा विचार करत ती एकटीच सावकाश चालत होती. इतक्यात तिला सुपर मार्केट दिसलं. चला, आत जाऊन बघूया तसंही आता हळू हळू गोष्टी आणाव्या लागतील आणि सवयही करायला हवी म्हणून ती आत शिरली.
सगळ्या सवयीच्या वस्तू; बासमती तांदूळ, चहा, बिस्कीट, लेज ई.
इतक्यात मागून एक प्रश्नार्थक आवाज ऐकू आला, ''मिस तन्वी?''
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा