चिराग..
तन्वीच्या डोळ्यासमोर त्या जुन्या आठवणी तराळल्या. चिरागचं आणि तिचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. तन्वीचे बाबा आणि चिरागचे बाबा अगदी जुने मित्र. त्यांचे खूप जुने कौटुंबिक संबंध होते. चिराग तन्वीपेक्षा ३ वर्षांनी मोठा होता. ते लहान असताना त्यांचं चांगला जमायचं. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे. जशी जशी तन्वी मोठी होत गेली तसं तसं सगळंच कमी झालं. ती सगळ्यापासून अलिप्त होतं गेली. चिरागही बदलत गेला. त्याचे विचार नवीन आकार घेऊ लागले. आणि त्याच्यातले बदल तन्वीला खटकायला लागले.
चिरागला श्रीमंतीचा खूप गर्व होता आणि तन्वीला हे अजिबात आवडायचं नाही. चिराग कोणतीच गोष्ट अशीच सहज करण्यातला नव्हता. पक्का बिझनेसमन होता तो. नंतर नंतर तन्वी त्याच्यापासून लांब राहणंच पसंत करू लागली.
आणि आज या चिरागचं स्थळ तिला सांगून आलं होतं. तन्वीला धक्का बसला होता. मला याची कल्पना असायला हवी होती. माझ्या आधीच का नाही लक्षात आलं की चिराग असं काही करू शकतो. चिरागला तन्वी आवडायची असं तिला कोणाकोणाकडून कळलं होतं. त्याने कधीच स्वतःहून सांगितलं नव्हतं आणि तिने कधी उडत उडत कानावर आलेल्या गोष्टींवर विश्वास नव्हता ठेवला. काहीही झालं तरी चिरागशी लग्न करणं म्हणजे सगळ्या आशा आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखं होतं. चिराग त्याच्या वडिलांचा बिझनेस पुढे चालवत होतं आणि तो खूप यशस्वी झाला होता. 40 under 40 मध्ये त्याचं नाव होतं. ती मासिकात किंवा पेपरमध्ये येणाऱ्या त्याच्या मुलाखती वगैरे वाचायची मध्ये मध्ये. पण ती UPSC पास झाल्यापासून त्यांचा काही जास्त संबंध नव्हता राहिला. तो फक्त हुशारच नाही तर पक्का धोरणीही होता. तन्वीच्या आणि त्याच्या यशस्वीपणाच्या व्याख्याच वेगळ्या होत्या.
''नाही'' तन्वीने निक्षून सांगितलं.
''अगं एकदा त्याला भेटून बघ. आता बदलला आहे तो. त्याने स्वतःहून तुझ्या इंटरेस्ट दाखवला आहे. आपल्यामध्ये तुझं लग्न होणं कठीण आहे हे तुलाही माहितीये ना. दर २-३ वर्षांनी तुझी बदली होणार. तुला सगळं सोपं वाटत का?'' आई समजावत होती.
''मी एकटी IFS ला सिलेक्ट झाले नाहीये. बाकीचेपण आहेत.'' तन्वी त्राग्याने म्हणाली.
''त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती यात जामीन आस्मानाचं अंतर आहे''. आई म्हणाली.
तन्वीला कळून चुकलं आपलं इथे काही चालणार नाहीये. यांनी बहुतेक माझं लग्न ठरवलंच आहे आणि म्हणूनच तनयही इथे आला असणार.
''तुझं लग्न झालं की देवेनला पण करता येईल. बहीण लग्नाची असताना भावाचं लग्न नाही लावून देता येत.'' आईच चालूच होतं.
''कधी कधी मला असं वाटत की आपण अजूनही १९६०च्या वगैरे दशकात राहतोय. लोकांना कळलं की तुमचे हे विचार असे आहेत तर काय होईल गं?'' तन्वी तिरस्काराने म्हणाली.
''मी बघू का मला मुलगा?'' तन्वीने विचारलं.
''चिराग पेक्षा चांगला शोधूनही मिळणार नाही तुला.'' आई समजावत म्हणाली.
''चिरागपेक्षा चांगला?? म्हणजे चिरागपेक्षा श्रीमंत, बरोबर?'' तन्वीच संयम जात होता पण ती कळून चुकली होती की आपली डाळ इथे शिजणार नाही कारण यावेळी तिच्या घरच्यांनी ठरवूनच टाकलं होतं.
तन्वीची सुट्टी संपत आली होती. कधी एकदा दिल्लीला जाते असं झालं होतं तिला.
यापेक्षा समीरने का नाही विचारलं मला, तिने विचार केला. निदान त्याचा विचार तरी केला असतं मी. छे! समीरने नसतं विचारलं. तो एक मित्र म्हणूनच चांगला आहे. तन्वी जवळ जवळ रडवेली झाली होती. तिला तिचं काम आठवलं. तिने आतापर्यंत सांभाळलेल्या जबाबदाऱ्या, जर्मनी, इराण आणि दिल्लीमध्ये घालवलेले क्षण, UPSC result चा दिवस, ट्रेनिंग हे सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं. तिने नकळत समीरला फोन लावला.
तो गप्प होता. त्याला कल्पना होती. पण त्यांच्या कौटुंबिक विषयात तो बोलू शकत नव्हता. तन्वीला कल्पना होती या सगळ्यामागे तिचे बाबा असणार. त्यांना कधीच आवडलं नव्हता तिचं UPSC ला जाणं. समीरचं म्हणणंही हेच पडला की एकदा चिरागला भेटून बघ. तुला लगेच लग्न करायचं नाहीये.
तन्वी नाईलाजाने चिरागला भेटायला तयार झाली. आज कधी नवे ती तिच्या काका काकूंना, चुलत भावांना आणि मामेभावांना पण भेटत होती. कितीही वाद असले तरी लग्नकार्याला भारतात लोक नक्कीच एकत्र येतात. टिपिकल ड्रेस घालून कांदेपोह्याचा कार्यक्रम करताना तिला स्वतःची खूप लाज वाटत होती.
''तू पूर्वीपेक्षाही खूप छान दिसते आहेस'' चिराग म्हणाला.
तन्वीने गुलाबी ड्रेस घातला होता. तिच्या सावळ्या रंगावर हलका गुलाबी रंग उठून दिसत होता. ती मंद हसली तशी तिच्या गालाला खळी पडली. चिराग तिच्याकडे बघतच राहिला. तिचे काळेभोर मोठे मोठे डोळे, छोटं पण तुरतुरीत नाक, सडपातळ बांधा, खांद्यावर रुळणारे कुरळे केस, गालावर खळी आणि याहीपेक्षा जास्त म्हणजे तिची हुशारी.... कोण मुलगा हिच्या प्रेमात पडणार नाही.
''तुझा होकार समजू मग?'' चिरागने मिश्कीलपणे विचारलं.
''तुला कोणी आवडत असेल तर तसं सांग. माझी काही हरकत नाही.'' तन्वी काहीच बोलली नाही हे पाहून चिराग म्हणाला.
तन्वी विचार करत होती. असंच सांगून टाकूया का त्याला की आवडतो एक मुलगा? पण ही गोष्ट घरच्यांपर्यंत जाईलच. त्याचे परिणाम अजून वाईट होतील. खरंतर आत्ता तिच्याकडे चिरागला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता.
''चिराग, तुला माहिती आहे माझं आता कुठेतरी पोस्टींग होईल. तेव्हा...''
''त्याच्या आधीच साखरपुडा करून घेऊ घरातल्या घरात मग लग्नासाठी थांबूया की.'' चिराग तिला मधेच तोडत म्हणाला.
तन्वीच्या पायाखालची जमीन हादरली. आत्ता साखरपुडा?? नाही. हे होता काम नये.
''चिराग, तू विसरतो आहेस. आपण असाच साखरपुडा उरकू शकत नाही. निदान प्रसार माध्यमांना दाखवायला तरी आपल्याला थोडं प्लॅनिन्ग करावं लागेल ना.'' तन्वी खोटं खोटं हसत म्हणाली. खरं तर ती मनातून पार हादरून गेली होती. आधी लग्न करायचंय या विचाराने आणि नंतर चिरागशी लग्न करायचंय या विचाराने.
त्यांच्यामध्ये जास्त बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं आता. चिराग त्याच्या बिझनेसबद्दल बोलत होता. त्याने तन्वीची तोंडदेखली चौकशी केली होती पण त्याला तिच्या कामात फार काही रस नव्हता. तन्वीला याची चांगलीच कल्पना होती. फक्त चिरागच काय तिच्या आजूबाजूच्या कोणालाच तिच्या UPSC चं कौतुक नव्हतं, एक समीर सोडला तर. तिला समीरची खूप आठवण येत होती. तिला कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. तिच्या पाठी सगळ्यांचा नक्कीच एक प्लॅन होता.
तन्वीला अजिबात जेवण गेलं नाही. पण घरात बाकी सगळे खुश होते. तिच्या साखरपुड्याची चर्चा चालूही झाली होती. तन्वीने डोकं ताळ्यावर ठेवायचा प्रयत्न केला. मी खुश आहे हे दाखवायला हवं नाहीतर हे मला दिल्लीला जाऊ देणार नाहीत, तिने तिच्या मनाला समजावलं.
''तन्वी, परत कधी घेशील सुट्टी? आपल्याला तशी साखरपुड्याची तारीख ठरवायला.'' आई खुश होती.
'' दिल्लीला गेल्याशिवाय नाही सांगता येणार ते आत्ताच. पण आपल्याला तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल. साधाच करायचा आहे ना तसाही! माझ्यासाठी ड्रेस तू बघून ठेव मी आले की फायनल ठरवेन.'' तन्वीने शक्य तेवढं आनंद चेहऱ्यावर दाखवत प्रतिसाद दिला.
नंतर त्यांचं याविषयी आपापसात बोलणं चालू होतं. तन्वी खूप दमली होती. शरीराने नाही तर मनाने! तिने वेळ मारून नेली होती. अजून ३ दिवस काढायचेत आणि इथून सुटका! तन्वीची झोप उडाली होती. मी नकार दिला तर काय होईल, मी जर पळून गेले कुठे तर चालेल का, अशा जगण्यापेक्षा न जगलेलं परवडलं वगैरे विचारांनी तिच्या मनात काहूर माजवलं होतं. आत्तापर्यंत तिने एकटीने घरच्यांविरुद्ध लढा दिला होता पण ती थकली होती, प्रचंड घाबरली होती. आज तर वाईन घेऊनही झोप येत नव्हती. तिने तिची जुनी डायरी काढली आणि एक एक गोष्ट लिहायला घेतली.
साधारण सकाळी ५ च्या सुमाराला तिच्याकडे प्लॅन B तयार होता. घरच्यांपासून ती अजून दूर गेली. UPSC ला झालेले मित्र आणि मैत्रिणी हेच तिला तिचं जग वाटू लागले. तिला जतिन सर आठवले. इराणमध्ये जबाबदारीने काम केल्यावर दर वेळी कौतुक करणारे जतिन सर तिचं प्रेरणास्थान होते. ट्रेनिंगला असतानाही जतिन सर भारतात असले तर त्यांचे अनुभव सांगायला यायचे आणि त्यामुळे त्यांना तिच्या फॅमिलीबद्दल माहिती होतं. पण त्यांनी कधीच तिला वेगळा वागवलं नाही. उलट त्यांना तिच्याविषयी कळवळा होता.
''तन्वी, तू खूप पुढे जाणार. तुझी जिद्द मला खूप आवडते'' असं ते नेहमी म्हणत.
गेल्या ६-७ वर्षांच्या आठवणींनी तिला बळ दिलं.
पुढचे २ दिवस ती नेहमीसारखी वावरली घरात. समीरला फोन करून तिने सगळं सांगितलं. त्याला कल्पना तर होती पण तो मुलगा चिराग असेल असं वाटलं नव्हतं.
''मी तुला भेटायला येतो'', समीर काळजीने म्हणाला.
''नको'' तन्वीने त्याला तोडलं.
''तू अपसेट आहेस हे माहितीये मला'', समीर म्हणाला.
''मी अपसेट नक्कीच आहे पण मी यावर खूप विचार केलाय.'' तन्वी निग्रहाने म्हणाली.
कसं सहन करते ही एवढं सगळं, कुठून आणते एवढं मानसिक बळ! समीर विचार करत होता.
पण तिने नक्कीच मार्ग काढला असणार. ती अशी गप्प बसणार नाही. तो स्वतःशीच हसला.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा