Dec 05, 2021
नारीवादी

सीमेपार.. त्या वळणावर.. (भाग 3)

Read Later
सीमेपार.. त्या वळणावर.. (भाग 3)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

जुनैद..

तन्वी त्याच्याकडे बघत राहिली. त्याचा कलिग त्याच्याजवळ येऊन त्याला आत घेऊन गेला.पुढचा सगळं दिवस म्युझिअममध्ये सांस्कृतिक गोष्टी आणि इतिहास यांमध्येच गेला. अनेक गोष्टी कळल्या, अनेक नव्या लोकांशीही ओळखी झाल्या. पण दिवस खूप बिझी गेला.
हसन आणि तन्वी आपापसात आजबद्दल डिसकस करत होते. UPSC ला त्यांनी अनेक पुस्तक वाचली होती अभ्यासासाठी पण आता हे फक्त अभ्यासाबद्दल मर्यादित नव्हतं. आता खरं आयुष्य चालू झालं होतं. आता दर वेळी मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी असेलच असं नाही. प्रत्येकावर जबाबदारी होती. इतर देशांच्या डिप्लोमॅट्सशी बोलतानाही विचार करून बोलावं लगे. पण एकंदरीत वातावरण चांगलं होतं. मुळात तन्वीच स्वप्न साकार झालं होतं.
ती आणि हसन पुढच्या आठवड्यातल्या कामांबद्दल बोलत होते. इराणमध्ये बरेच भारतीय लोक राहतात. खास करून दक्षिण भारतीय. कधी कोणती केस येईल सांगता नाही येत. व्हिसाच्या प्रक्रियेबरोबरच अर्थशास्त्रातही तन्वीला खूप रस होता. तिचा स्पेशलायझेशनचा विषय अर्थशास्त्र होता. तर हसनला राजकारण आणि सांस्कृतिक विषयात रस होता. हसनबरोबर तन्वीच नेहमीच चांगलं जमायचं. एक आश्वासक भावना होती त्याच्याबद्दल अगदी ट्रेनिंगला त्यांची ओळख झाल्यापासूनच.

''केवढे व्हिसाचे अर्ज चेक करायचे आहेत अजून.'' तन्वी म्हणाली.
''करशील गं तू. जतिन सरांकडून खूप शिकायला मिळत न पण''  हसन त्याच्या नेहमीच्या शांत सुरात हसत म्हणाला.
आणि ते बाकीच्या ग्रुपकडे गेले. इतक्यात तन्वीने जुनैदला येताना पाहिलं आणि गडबडून त्याच्याकडे पाठ करुन हसनशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करू लागली.

''Hii I am Junaid'', तो हात पुढे करत हसनला म्हणाला.
"हॅलो, हसन सईद" हसनने प्रतिसाद दिला.
''जुनैद हयात'', तो हसून म्हणाला.
तेव्हा त्याच्या दोन्ही गालांवर खळ्या पडल्या. त्याने प्रश्नार्थक नजरेने तन्वी कडे पाहिलं.
"तन्वी", ती हात पुढे करत म्हणाली. इकडचं तिकडचं बोलणं होईपर्यंत परतायचीही वेळ झाली.

तन्वीचा कामाचा व्याप वाढत चालला होता. भारताचे इराणशी सर्वच स्तरावर संबंध असल्यामुळे दररोज बरच काम असायचं. बरेचदा शनिवारीही एम्बसीमध्ये जावं लागायचं. खरंतर शनिवारी जरा शांतता असायची त्यामुळे शांततेत कामाचा उरक पडायचा. तन्वीचे सगळ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्याने तिला मदतीचे हातही बरेच मिळायचे. टीमवर्क काय असतं हे खरं तर ती तिथेच शिकली.  
ती, सुमित्रा, शिखा आणि हसन यांचा तर पुन्हा चांगला ग्रुप जमला होता. प्रत्येक जण आपापलं काम अगदी चोख करत होते, नवीन गोष्टी शिकत होते, नवीन नवीन डिप्लोमॅट्सना भेटत होते आणि आपापसात याबद्दल चर्चाही करत होते. ध्येयाने झपाटलेले लोक बघायचे असतील तर लोकांनी या ४ जणांकडे बघावं. त्यांची दिवसाची सुरुवात चहाने न होता भारत आणि इराण मधील वर्तमानपत्र वाचून व्हायची. भारत आणि इराणमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींवर सतत लक्ष असायचं.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने डिप्लोमॅट्ससाठी आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्र, सांस्कृतिक सहली यांमध्ये तिची आणि जुनैदची भेट होतं असे.
एकदा सिंगापूरच्या डिप्लोमॅट्सने पार्टी आयोजित करून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या डिप्लोमॅट्सना बोलावलेलं. अर्थात तन्वी आणि जुनैद समोरासमोर आले. अशा पार्टीला वागायचे शिष्टाचार, कोणाशी किती आणि काय बोलायचं या सगळ्याचा अंदाज त्यांना होताच. हे तर सतत घडणार होतं. आणि मध्ये मध्ये इतरांना भेटून कामाव्यतिरिक्त बोलणंही गरजेचं असतं ना! तरीही कामाबद्दल चर्चा वायच्याच. राजकीय घडामोडी (शक्यतो त्या देशांच्या, ज्यांचे डिप्लोमॅट्स उपस्थित नाहीयेत), आपापल्या देशातील रीतीपद्धतीवर वगैरे हमखास बोलणं व्हायचं. मैत्रीपेक्षाही शिष्टाचार जास्त गरजेचे होते.

''लगता है आप सिर्फ सेमिनार में बात करती हो'' तन्वीला एकटीला उभं पाहून जुनैद म्हणाला.
ती मंद हसली आणि म्हणाली ''यापेक्षा मी घरी जाऊन झोप काढणं पसंत करेन.
''ते तर आहेच'' जुनैद संभाषण चालू ठेवायचा प्रयत्न करत होता. इतक्यात सुमित्राने तिला हाक मारली.

''मला जावं लागेल'' तन्वी म्हणाली.

''येस, शुअर.. पुढच्या महिन्यात माझी बदली होईल बहुतेक''
तो म्हणाला.

तन्वीला कळेना काय बोलावं.
''कुठेना कुठे कधीतरी भेटूच आपण'' तन्वी हसत म्हणाली.

''नक्कीच'' तो ही हसला.

सुमित्राकडे जाईपर्यंत हसनने तिला अडवलं.
''देख लिया मैने'' तो डोळे मिचकावत म्हणाला.

''हसन.... असं काही नाहीये'' तन्वी जरा त्राग्याने म्हणाली.

तो म्हणाला, ''त्याची पुढच्या महिन्यात बदली होणार आहे''.

''वाईट नाही वाटत आहे न तुला'' हसन पुन्हा मिश्कीलपणे म्हणाला.
तेवढ्यात सुमित्राच आली.
''जुनैद बद्दल बोलताय ना?'' तिनेही मिश्कीलपणे विचारलं.

''अरे आपण डिप्लोमॅट्स आहोत, UPSC पास केलीये आणि आपल्यापुढे अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि आपण मुलांबद्दल बोलतोय?? कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटतंय पुन्हा'' तन्वी जरा चिडली.

''शांत हो गं. आपण जरी इथे एम्बसीमध्ये काम करत असलो तरीही आपण बॅचलरपण आहोत. आणि... फॉर अ चेंज आज आपण इथे कामासाठी आलो नाहीयोत'' हसन नेहमीसारखा शांतपणे हसत म्हणाला.
सुमित्रापण हसत होती.

त्या रात्री तन्वीने पुन्हा पुन्हा ते संभाषण आठवलं. तो नक्कीच वेगळा होता. त्याचे विचार तन्वीने ऐकले होते. लोकांशी वागायची ढब पहिली होती. तो प्रचंड नम्र होता. असे सगळे विचार करत असतानाच तिला झोप लागली. नंतरचे काही दिवस ती कामात बुडून गेली. काही दिवसांनी टूर्स वर जुनैद ऐवजी दुसरी मुलगी दिसायला लागली. तन्वीला कळलं की त्याची बदली झाली आहे. कामाच्या व्यापात या सगळ्या गोष्टी बऱ्याच मागे पडल्या. आख्ख क्षितिज तिच्यापुढे आ वासून उभं होतं.

साधारण अजून एखाद वर्षाने तन्वीचीही बदली झाली. तन्वी पुन्हा दिल्लीला आली. साधारण ३ वर्षांनी आपल्या मायभूमीत येऊन खरंच खूप बरं वाटलं होतं. यावेळी ती नवखी नव्हती. तिच्याकडे चांगलाच अनुभव होता. साधारण ५-६ महिने दिल्लीमध्ये काम करून ती पुन्हा नवीन पोस्टिंग मिळायच्या प्रतीक्षेत होती.
तोच एके दिवशी तिला आईचा फोन आला.
''आईचा फोन?'' तन्वीने विचार करतंच उचलला.
''यावेळी सुट्टी घेतलीस की घरी ये''. आई म्हणाली.
''का? मी आलेलं चालणार आहे का?'' तन्वीचा सूर जरा बदलला.
''कितीही झालं तरीही तू मुलगी आहेस आमची. तुला आम्हाला भेटावसं वाटत नाही का?'' आई भावुक झाली.
''येते घरी'' तन्वीने फोन ठेवला.

३ वर्ष घरापासून लांब! खरंतर ती मनाने लांब केव्हापासूनच होती पण आता आता ती भेटायला जाणंही टाळायची. देशाबाहेरचं पोस्टिंग बरं वाटायचं.
थोड्या दिवसांनी तन्वी मुंबईला गेली. तिथे काहीतरी वेगळंच शिजत होतं. जर तन्वीला याची कल्पना असती तर तन्वी कधीही घरी गेली नसती.
(क्रमशः)        

Show quoted text

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kshiti

Student

An avid reader can always write something. So here I am! Trying my hand at writing something really thoughtful and not just something so random or funny. I have vowed to write a deep content after good research and a thoughtful process.