Jan 26, 2022
नारीवादी

आळशी आई

Read Later
आळशी आई

आळशी आई 

आज रविवारी ! ऑफिसही नियमित सुरु झालेलं म्हणून म्हटलं होईल तितकं घर आवरून, पुसून काढावं. मुलाला आवडतात म्हणून आधी मोमोज बनवले आणि पोटभरून दोघांनी खाल्ले. रोजच्या सवयीनुसार मोबाईलवर गाणं लावलं आणि लागली कामाला. वस्तू इथून तिथं उचलून ठेवायला म्हणून मुलाची मदत घेतली. झाडून झालं. आता घर पुसायचं बाकी. माझं घर पुसणं म्हणजे फक्त फरशी पुसणं नसतं तर टीव्ही, खिडक्या, चेयर, दारं,  टी टेबल सगळंच पुसल्या जातं. 

मि बकेट भरून पाणी घेतलं, त्यात फिनाईल टाकलं आणि टी टेबल, टीव्ही पुसून त्यावर कपडा ठेवला तोच आठ वर्षाचा माझा मुलगा मला म्हणतो, 

"आज मी घर पुसणार. " 

याला घर पुसू दिलं तर अर्धी धूळ घरातच राहणार. मनात आलं. पण सकाळी मोमोज करतांना त्याला मोमोज भरू नाही दिले आणि पुरी लाटू दिली नाही म्हणून आधीच बाळ रुसलं होतं. आता जर तु धूळ नीट साफ नाही करणार  म्हणून पुसूही नाही दिलं तर याचा आत्मविश्वास कमी होईल किंवा आईलाच सगळं करायचं असतं, ही कामं तिचीच आहेत, स्त्री जातीनंच घरातली कामं केली पाहिजे, ही भावना त्याच्या मनात रुजेल. म्हणून म्हटलं पूस आज तु.

 त्यानं आनंदाने हॉल, किचन आणि बेडरूम पुसून काढलं. मि पुसते तशा खिडक्याही पुसल्या. कापड धुऊन वाळू घातलं. 

मि पुसते तितकं स्वच्छ नाही पुसलं. पण त्यानं दाखवलेल्या उत्साहाने मी भारावून गेली.

मुलगा एक वर्षाचा होता तेव्हापासूनच मी त्याला त्याच हातानं, चमच्यानं खाऊ देतेय, दोन चा झाला तेव्हापासून त्याचे कपडे त्याला घालू देतेय, हळुहळू जेवायला बसायच्या आधी पाण्याची बॉटल ने, ताट घे, चटई टाक अशी कामं त्याला सांगू लागली. 

जेवण मी त्याला फक्त तेव्हाच भरवलं जेव्हा तो आजारी असेल.

आता तर बाळच कांदा, बटाटा कापून देतो, शेंगा तोडायला, भाज्या वेगळ्या करायला मदत करतो. झाडून काढतो, कपड्यांच्या घड्या करतो. 

कधी कधी मैत्रिणी गंमतीनं म्हणतातही, "तु नाही सांभाळत त्याला, तोच तुला सांभाळतो."

आणि लॉकडाऊन नी उरली सुरली कसर पूर्ण केली. तीन चार वेळा ताटं भरायची. मग आपण आपलं ताट धुवायचा फतवा काढला. मी पोळ्या करायला बसली की मुलाला थोडासा उंडा खेळायला हवा असे. खेळता खेळताच तो फरशीवर पोळी लाटून पाहतोय असं मला दिसलं. मग मि विचारलंच त्याला, 

"तुला पोळी करायची आहे?"

"हो, मि  लाटून देतो, तु शेक !" तो जणू माझीच वाट बघत होता. पोळ्या लाटायलाही शिकला हा कार्टा. मग अप्रूप वाटणारच ना त्याचं !

तर मी वर्किंग वूमन आहे, माझ्या जवळ त्याला बसून खाऊ घालायला, कपडे घालून द्यायला वेळ नाही, म्हणून हे झालं. असं बरेचदा ऐकते. पण खरं सांगते हा मी थोडी आळशी आई आहे. त्यात लिखाण करण्यासाठी आणि पुस्तकं वाचण्यासाठी मला माझा मी टाईम खूप गरजेचा वाटतो.

खूप दिवस झाले मी मुलाला जेवण वाढून देणं सोडलं. त्याचं त्यालाच घ्यायला सांगते आणि त्याला ताकीदही दिली आहे, सांड उलंड करायची नाही. तुझं तुलाच पुसून काढावं लागेल.

तर हे सगळं इथे लिहायचा उद्देश एकच, 

"माझा मुलगा / मुलगी कितीही सांगितलं तरीही अजिबात कामात मदत करत नाही." 

असं म्हणणाऱ्या आया मला पटतच नाहीत. तुम्ही लहानापासून त्यांना घर खराब करतील, कपडे घाणेरडे होतील म्हणून काही करूच देत नाही आणि मग उगाच तोंड फुगवता, मुलांना ओरडता, याला अर्थ काय? अहो मुलं, चुकतील,  सांडतील, उलंडतील पण तेव्हाच शिकतीलही आणि समजतीलही की हे असं, अश्या पद्धतीने केल्या शिवाय आपल्या जवळ दुसरा पर्याय नाही.

तसंच शाळा बंद, कॉलेज बंद अशात मुलं टीव्ही किंवा मोबाईलच्या आहारी गेल्यापेक्षा घर कामात गुंतले तर तुम्हाला तर मदत होईलच, मुलांचा वेळही चांगला जाईल. ते काहीतरी शिकतील.

तर आयांनो थोडं आळशी बना. करू द्या मुलांचं मुलांना !

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Archana Wasatkar

HR assistant

An optimistic person. Like to express myself through writing stories, articles & poems. Thank you