Sep 23, 2023
मराठी बोधकथा

लायकी दाखवायचे दिवस

Read Later
लायकी दाखवायचे दिवस

लायकी दाखवण्याचे दिवस

गवार वीस रुपये... 
कलिंगडं शंभरला तीन!

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठले. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकी आहे. तिथं पी’ असा सल्ला दिला. ‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’

दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं. तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तिबी संपली. म्हणून म्हणालो.’

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा? म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना आसलं तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं. 

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्या गैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. 

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्च विद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.’ असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला. आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर  ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, वडील होते माझे.’ 

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकण्यासाठी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे. आत्ताच्या काळात गरिबांबरोबर लोक जेवढं वाईट वागत्यात तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होते. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...